Friday, April 30, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 7 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ५

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 7 Part 5 
Ovya 119 to 150 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ५ 
ओव्या ११९ ते १५०

उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।

अस्थिनः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८ ॥

१८) हे सर्वहि भक्त उत्कृष्ट आहेत; पण ( त्यांपैकी ) ज्ञानी तर केवळ माझा आत्माच होय, असे मी समजतों. कारण ( ‘ मीच  ब्रह्म ‘ अशा बुद्धीनें ) माझ्या ठिकाणीं स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी, त्या मलाच प्राप्त झालेला असतो.     

म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभें । मज आवडे तोही भक्त झोंबे ।

परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ॥ ११९ ॥

११९) म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेनें वाटेल तो भक्त मला झोंबतो; परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो, असा त्यांपैकीं ‘ ज्ञानी ‘ भक्त होय. 

पाहें पां दुभतेयाचिया आशा । जगचि धेनूसि करीताहे फांसा ।

परि दोरेंविण कैसा । वत्साचा बळी ॥ १२० ॥

१२०) असें पाहा, अर्जुना, दुभत्याच्या आशेनें लोकच गायीला फासा घालतात; परंतु दोरांवाचून वांसराचा पाश कसा बळकट आहे. ! ( किंवा दोरावाचून त्याचा भाग त्याला सहज मिळतो. ) 

कां जे तनुमनुप्राणें । तें आणिक कांहींचि नेणे ।

देखे तयातें म्हणे । हे मायाचि कीं माझी ॥ १२१ ॥

१२१) याचें कारण एवढेंच कीं तें वांसरु शरीरानें, मनानें, व प्राणानें दुसर्‍या ( आपल्या आईखेरिज ) कोणासहि जाणत नाही. जें त्याला पुढे दिसेल, त्याला ‘ ही माझी आईच आहे ‘ , असे तें म्हणतें.  

तें येणें मानें अनन्यगती । म्हणूनि धेनूही तैसीचि प्रीती ।

यालागीं लक्ष्मीपती । बोलिले साच ॥ १२२ ॥

१२२) तें वासरुं इतकें ( गायीच्या ठिकाणीं ) अनन्य गति असतें म्हणून गायीचीहि त्याच्यावर तशीच प्रीति असते. म्हणून श्रीकृष्ण जें वर म्हणाले तें खरें आहे. ( असे ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात.)  

हें असो मग म्हणितलें । जे कां तुज संगितले ।

तेही भक्त भले । पढियंते आम्हां ॥ १२३ ॥

१२३) तर भगवंतांनीं म्हटलें, हे असो; इतर तीन भक्त जे तुला सांगितले, तेदेखील आम्हाला चांगले आवडते आहेत.

परि जाणोनियां मातें । जो पाहों विसरला मागौतें ।

जैसें सागरा येऊनि सरिते । मुरडावें ठेलें ॥ १२४ ॥

१२४) परंतु, मला जाणून जो ज्ञानी ( ज्ञानी भक्त ) मागें पाहावयास विसरला ( देहेंद्रियादि प्रपंचाला  विसरला ); ज्याप्रमाणें नदी समुदराला निळाल्यावर माघारी वळत नाहीं,

तैसी अंतःकरणकुहरीं उपजली । जयाची प्रतीतिगंगा मज मिनली ।

तो मी हें काय बोली । फार करुं ॥ १२५ ॥

१२५) त्याप्रमाणें अंतःकरणरुपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली, ज्याची अनुभवरुपी गंगा मला मिळाली आहे, तो मी आहे, हे शब्दानें विचार करुन काय सांगू !    

एर्‍हवीं ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझें ।

हें न म्हणावें परि काय कीजे । न बोलणे बोलों ॥ १२६ ॥

१२६) वास्तविक पाहिलें तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो माझा केवळ आत्माच आहे; ही गोष्ट शब्दांनीं सांगण्यासारखी नाही; परंतु काय करावें ? ही न बोलण्यासारखी गोष्ट पण तुला सांगितली.

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।

वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९ ॥

१९) अनेक जन्म घेतल्यानंतर , ‘ सर्व ( विश्र्व ) वासुदेव होय. ‘ असे ज्ञान प्राप्त होऊन, तो ज्ञानी मला शरण येतो. ( मला येऊन पोंचतो ); असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे.

जे तो विषयांची मोट झाडी- । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं ।

चुकावूनि आला पाडी । सद्वासनेचिया ॥ १२७ ॥

१२७) कारण तो विषयांच्या दाट झाडींतून, काम, क्रोध यांची संकटें टाळून, चांगल्या वासनारुपी डोंगरावर आला.  

मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कार्माचिया वाटा ।

अप्रवृत्तीचा अव्हांटा । डावलूनि ॥ १२८ ॥

१२८) अर्जुना, मग संतांच्या संगतीनें विहित कर्मांच्या सरळ मार्गानें, निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून,

आणि जन्मशतांचा वाहतवणा । तेविंचि आस्थेचिया न लेचि वाहणा ।

तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥ १२९ ॥

१२९) आणि शेकडों जन्मांचा ( कर्ममार्गानें ) प्रवास करीत असतां, तो फलाशेच्या वहाणा ( अंतःकरणरुपी ) पायांत घालीत नाहीं, अशा स्थितींत ( स्वर्गादि ) फलांच्या हेतूंचा हिशेब कोणी करावा ?   

ऐसा शरीरसंयोगाचिये राती-। माजें धांवतां सडिया आयती ।

तंव कर्मक्षयाची पाहती । पाहांट जाली ॥ १३० ॥

१३०) ह्याप्रमाणें देहतादात्म्यरुप रात्रींत सर्वसंग परित्यागरुपी तयारीनें धांवत असतांना, कर्माच्या क्षयाची उजाडती पहाट आली.   

तैसी गुरुकृपाउखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली ।

तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ॥ १३१ ॥

१३१) त्याचप्रमाणें गुरुकृपारुप उषःकाल झाला; व ज्ञानरुपी कोंवळें ऊन पडलें, तेव्हा त्याप्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचें ऐश्र्वर्य दिसूं लागलें  

ते वेळीं जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एक आहे ।

अथवा निवांत जरी राहे । तरी मीचि तया ॥ १३२ ॥

१३२) त्या वेळीं तो जिकडे जिकडे पाहील, तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे; अथवा तो जरी निवांत राहिला तरीहि त्याला मीच आहें.

हें असो आणिक कांहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं ।

जैसें सबाह्य जळ डोहीं । बुडालिया घटा ॥ १३३ ॥

१३३) हें बोलणें असो; त्याला ठिकाणीं माझ्या वांचून दुसरें कांहीं एक नाहीं. ज्याप्रमाणे डोहांत घट बुडाला असतां त्याच्या आंत बाहेर जसें पाणीच असतें; 

तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरीं ।

हें सांगिजे बोलवरी । तैसें नव्हे ॥ १३४ ॥

१३४) त्याप्रमाणें तो माझ्यामध्यें असतो व मी त्यांच्या आंतबाहेर असतों; ही स्थिति शब्दानें सांगतां येईल, अशी नाही.

म्हणोनि असो हें यापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी ।

तेणें संसरलेनि करी । आपु विश्र्व ॥ १३५ ॥

१३५) म्हणून हें राहूं दे; याप्रमाणें तो ज्ञानाचें भांडार पाहातो व त्या योगानें सांवरल्यामुळें सर्व जग आत्मरुप पाहातो.

हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो ।

म्हणोनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥ १३६ ॥

१३६) हें संपूर्ण विश्व श्रीवासुदेव आहे, अशा अनुभवरुपी रसाचा त्याचा भाव ओतलेला असतो; म्हणून सर्व भक्तांमध्यें तो राजा आहे आणि ज्ञानीहि तोच आहे.   

जयाचिये प्रतीतीचां वाखौरां । पवाडु होय चराचरा ।

तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥ १३७ ॥

१३७) ज्याच्या अनुभवरुपी भांडारांत स्थावरजंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो, हे अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे.

येर बहु जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं ।

जे आशातिमिरें दृष्टी-। मंद जाले ॥ १३८ ॥

१३८) ज्यांची भजनें भोगासाठीं असतात व ज्यांची दृष्टी आशारुपी नेत्ररोगानें मंद झालेली असते, असे इतर भक्त पुष्कळ मिळतात.   

मूळ श्लोक

कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।

तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २० ॥

२०) ( जन्मांतरी मिळविलेल्या संस्कारांनीं प्राप्त झालेल्या ) स्वतःच्या स्वभावानें नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या ( विषयांच्या ) अभिलाषांनी ज्ञान नष्ट झालेले ( लोक ), निरनिराळ्या नियमांचा आश्रय करुन, ( माझ्याहून ) वेगळ्या अशा देवतांची भक्ति करतात.   

आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा जाला रिगावा ।

कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥ १३९ ॥

१३९) आणि फलाविषयींच्या तीव्र इच्छमुळें अंतःकरणांत कामानें प्रवेश केला आणि त्याच्या संसर्गानें ज्ञानाचा दिवा गेला.

ऐसे उभयतां आंधारीं पडले । म्हणोनि पासींचि मातें चुकले ।

मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरां ॥ १४० ॥

१४०) ( बाहेर आशारुपी नेत्ररोगानें व आंत अविवेकानें ) असें दोन्ही प्रकारांनी ( अज्ञानरुपी ) अंधारांत ते पडले; म्हणून त्यांच्या जवळच असणारा जो मी, त्या मला ते चुकले. नंतर ( इच्छित फल देणार्‍या ) निरनिराळ्या देवतांना सर्व भावानें भजूं लागले.  

आधींच प्रकृतीचे पाइक । वरे भोगालागीं तंव रंक ।

मग तेणें लोलुप्यें कौतुक । कैसे भजती ॥ १४१ ॥

१४१) अगोदरच देहात्मबुद्धिचे दास, त्याशिवाय आणखी भोगाकरितां दीन झालेले, असे ते लोक मग त्या विषयसुखाच्या लालसेनें इतर देवांचे कशा कौतुकानें भजन करतात ( तें पाहा. ).

कवणी तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि ।

कां अर्पण यथाविधि । विहित करणें ॥ १४२ ॥

१४२) त्या त्या देवतेच्या आराधनेविषयीं जो जो नियम प्रसिद्ध आहे, त्याचा त्याचा आश्रय करुन, कोणते कोणते उपचार अर्पण कसें करावेत ; तें समजून घेऊन, शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणें कर्में करतात.   

मूळ श्लोक

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।

तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ २१ ॥

२१) जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धेने भक्ति करण्याची इच्छा करतो, त्या त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतेच्या ठिकाणीं मी स्थिर करतो.

पैं जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी ।

तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥ १४३ ॥

१४३) परंतु, जो ज्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो, त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरविणारा मीच आहे. 

देवोदेवी मीचि पाहीं । हाही निश्र्चय त्यासि नाहीं ।

भाव ते ते ठायीं । वेगळाला धरी ॥ १४४ ॥

१४४) देवदेवतान्तरांतून मीच आहें, हा निश्र्चय देखील त्यास नसतो; त्या त्या देवताविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते.  

मूळ श्लोक

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।

लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ २२ ॥

२२) तो भक्त त्या श्रद्धेनें युक्त होऊन त्या देवतेचें आराधन करतो; आणि मग ( त्या देवतेपासून ) मीच निर्माण केलेली इच्छित फळें त्याला मिळतात.

मम श्रद्धायुक्त । तेथिंचें आराधन जें उचित ।

तें सिद्धीवरी समस्त । वर्तों लागे ॥ १४५ ॥

१४५) मग ( त्या देवतेचे ) जें योग्य आराधन असेल, तें ( तो ) श्रद्धेनें आपली कार्यसिद्धि होईपर्यंत संपूर्ण आचरतो. 

ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे ।

परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ॥ १४६ ॥

१४६) याप्रमाणें ज्यानें ज्याची इच्छा करावी, त्याला तें फळ मिळते . पण तें देखील सर्व माझ्यामुळेंच होतें.   

मूळ श्लोक

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।

देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥ २३ ॥

२३) परंतु त्या अल्पबुद्धि मनुष्यांना तें मिळालेलें फल विनाशी ठरतें. देवतांची भक्ति करणारे देवतांप्रत जातात आणि माझी भक्ति करणारे मजप्रत येतात.

परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती ।

म्हणोनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥ १४७ ॥

१४७) पण ते भक्त मला जाणत नाहींत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहींत व म्हणून त्यांना नाशवंत असें इच्छिलेले फळ प्राप्त होतें.   

किंबहुना ऐसें जें भजन । ते संसाराचेंचि साधन ।

येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥ १४८ ॥

१४८) फार काय सांगावें ! असें जे भजन आहे. तें जन्ममरणाला देणारे आहें आणि त्या भजनानें मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फळभोग क्षणभर दिसणारें स्वप्नच आहे..

हें असो परौतें । मग हो का आवडे तें ।

परि यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥ १४९ ॥

१४९) हें एक बाजूला राहूं दे. मग वाटेल तें कां दैवत असेना, परंतु जो ज्या देवतांना भजतो, त्या त्या देवतास प्राप्त होतो.

येर तनुमनप्राणीं । जे निरंतर माझेयाचि वाहणीं ।

ते देहाचां निर्वाणीं । मीचि होती ॥ १५० ॥

१५०) दुसरे जे शरीरानें, मनानें व प्राणानें अखंड माझ्या

 भजनाच्या मार्गांत आहेत, ते देह पडल्यावर मीच

 होतात.  


Custom Search

No comments:

Post a Comment