Thursday, July 7, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 15 Ovya 332 to 352 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग १५ ओव्या ३३२ ते ३५२

 

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 15
Ovya 332 to 352
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग १५ 
ओव्या ३३२ ते ३५२

मूळ श्लोक

रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च ।

गन्ध र्वयक्षासुरसिद्धसंघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ २२ ॥

२२) ( एकादश ) रुद्र, ( द्वादश ) आदित्य, ( अष्ट ) वसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनीकुमार, वायु आणि पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस व सिद्ध यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पाहात आहेत.      

हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे ।

अश्र्विनौदेव विश्र्वेदेव विभवें । वायुहि हे जी ॥ ३३२ ॥

३३२) हे अकरा रुद्र आणि बारा आदित्य यांचे समुदाय, आठ वसु व साध्य नांवाचे बारा देव, हे सर्व, दोन अश्विनीकुमार, वैभवयुक्त विश्वेदेव आणि वायुदेवता देखील हे महाराज,

अवधारा अग्नि हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व ।

जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ॥ ३३३ ॥

३३३) ऐका; अग्नि आणि गंधर्व, पलीकडे असलेले यक्षांचे व राक्षसांचे सर्व समुदाय; महाराज, इंद्र ज्यांमध्यें श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदिकरुन,

हे आघवेची आपुलां लोकीं । सोत्कंठित अवलोकीं ।

हे महामूर्ती दैविकी । पाहत आहाती ॥ ३३४ ॥

३३४) हे सर्व आपआपल्या लोकांत उत्कंठतेनेआपली दिव्य मूर्ति पाहात आहेत, हें पाहा.

मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं ।

करित निजमुकटीं वोवाळणी । प्रभुजी तुज ॥ ३३५ ॥

३३५) मग पाहात पाहात प्रत्येक क्षणांत मनामधयें चकित होऊन, हे देवा, ते तुला आपल्या मुकुटानें ओवाळीत आहेत.

ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे ।

ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥ ३३६ ॥

३३६) त्या ‘ जय जय ‘ घोषांच्या मंजुळ शब्दानें ते सर्व स्वर्गामध्यें गजर करतात व आपले दोन्ही हात चांगले जोडून नमस्कार करतात.

तिये विनयदुमाचिये आरवीं । सुरवाडली सात्त्विकांची माधवी ।

म्हणोनि करसंपुटपल्लवीं । तूं होतासि फळ ॥ ३३७ ॥

३३७) त्या नम्रतारुपी वृक्षांच्या अरण्यामध्यें, अष्टसात्त्विक भावरुपी वसंत ऋतू अनुकूल झाला, म्हणून ( त्यांच्या ) करसंपुटरुपी पालवीला तूं फल प्राप्त झाला आहेस.

रुपं महत् ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् ।

बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्याथितास्तथाहम् ॥ २३ ॥

२३) हे महाबाहो, अनंत मुखें व नेत्र असलेलें, अनंत बाहु, मांड्या व पाय असलेलें, अनंत उदरें असलेलें, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेलें तुझें प्रचंड रुप पाहून, हे लोक व्याकुळ झालेले आहेत, तसा मीदेखील व्याकुळ झालो आहे.

जी लोचन भाग्य उदेलें । जीवा सुखाचें सुयाणें पाहलें ।

जे अगाध तुझें देखिलें । विश्र्वरुप इहीं ॥ ३३८ ॥

३३८) महाराज, यांनीं जें तुझें अगाध विश्र्वरुप पाहिलें, तें त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आलें आहे; अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला. ( प्राप्त झाला )

हें लोकव्यापक रुपडें । पाहतां देवाही चवकु पडे ।

याचें सन्मुखपण जोडे । भलतयाकडूनी ॥ ३३९ ॥

३३९) हे लोकांना व्यापणारे रुप पाहून देवांनाहि दचका पडतो, वाटेल तिकडून यास पाहिले असतां, हा समोर असा वाटतो.

ऐसें एकचि परि विचित्रें । आणि भयानकें तेवींचि बहु वक्त्रें ।

बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा ॥ ३४० ॥  

३४०) याप्रमाणें आपले एकच स्वरप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला अनेक मुखें, अनेक नेत्र व शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत.

हे अनंत चारु चरण । बहु उदर आणि नानावर्ण ॥

कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें ॥ ३४१ ॥

३४१) या विश्वरुपास अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटें आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत, व प्रत्येक मुखाच्या ठिकाणी क्षोभाचा मस्तपणा कसा आहे !

हो कां जे महाकल्पाचां अंतीं । तवकलेनि यमें जेउतलेतीं ।

प्रळयाग्नीचीं उजिती । आंबुखिलीं जैसीं ॥ ३४२ ॥

३४२) अथवा महाप्रळयाच्या शेवटीं जोर बांधलेल्या यमानें जशा कांही जिकडे तिकडे प्रळयाग्नीच्या आगट्या पेटविल्या आहेत;

नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । कीं प्रळयभैरवांचीं क्षेत्रें ।

नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोढविलीं ॥ ३४३ ॥  

३४३) अथवा संहार करणार्‍या श्रीशंकराचा तोफखाना, किंवा प्रळयकाळच्या भैरवदेवांचे समुदाय उत्पन्न व्हावेत, अगर प्राण्यांच्या नाशासाठीं युगान्तशक्तीचीं पात्रें पुढें सरसावली आहेत,   

तैसीं जियेतियेकडे। तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें ।

न समाती दरीमाजीं सिंहाडे । तैसे दांत दिसती रागीट ॥ ३४४ ॥

३४४) त्याप्रमाणें जिकडेतिकडे तुझीं प्रचंड तोंडें मावत नाहींत आणि दरीमध्यें जसें सिंह तसें तुझ्या मुखांत दांत उग्र दिसतात.

जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघती संहारखेंचरें ।

तैस वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा ॥ ३४५ ॥

३४५) प्रळयकाळच्या गडद रात्रींत नाश करणारीं पिशाच्चें जशीं उल्हासानें संचार करतात, त्याप्रमाणें प्रळयकाळच्या नाश पावणार्‍या प्राण्यांच्या रक्तानें या मुखांतील दाढा भरलेल्या आहेत.

हें असो काळें अवंतिलें रण । कां सर्वसंहारें मातलें मरण ।

तैसें अतिभिंगुळवाणेंपण । वदनीं तुझिये ॥ ३४६ ॥

३४६) हें असो, काळानें जसें काय युद्धास आमंत्रण करावें, अथवा सर्वांच्या संहारकालीं जसें मरण माजून राहातें, त्याप्रमाणें तुझ्या मुखांत अत्यंत भयानकपणा आहे.

हे बापडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी ।

आणि दुःखकालिंदीचां तटीं । झाड होऊनि ठेली ॥ ३४७ ॥

३४७) त्या बिचार्‍या त्रैलोक्यावर जेव्हां थोडीशी नजर टाकली, तेव्हां तें दुःखरुप कालिंदीच्या किनार्‍यावर झाड बनून राहिलें आहे ( असें दिसलें )  

तुज महामृत्यूचां सागरीं । हे त्रैलोक्यजीविताची तरी ।

शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ॥ ३४८ ॥

३४८) तूं जो महामृत्युरुप समुद्र, त्यांत ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरुप प्रतिकूल वार्‍यानें उत्पन्न झालेल्या लाटांमुळें झोके खात आहे.

एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें ।

जें तुज लोकांचें काइ वाटे । तूं ध्यानसुख हें भोगीं ॥ ३४९ ॥

३४९) ‘ तुला या लोकांचें काय वाटतें ? तूं माझ्या या ध्यानाचें सुख भोग म्हणजे झालें ! ‘ अहो श्रीकृष्णा, असें जरी आपण आतां एकाएकीं रागावून बोललात तरी- 

वरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसें वोडण ।

केवीं सहसा म्हणें प्राण । माझेचि कांपती ॥ ३५० ॥

३५०) पण महाराज, माझ्याच जीवास भीतीनें कंप सुटला आहे, असें मी एकदम कसें म्हणावें ? म्हणून जगाचें सर्वसाधारण दुःख उगीच आडपडद्यासारखें खरोखर मध्यें केले आहे. 

ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे ।

तो मी अहाळबाहळी कांपें । ऐसें तुवां केलें ॥ ३५१ ॥

३५१) ज्या मला प्रळयकाळचा रुद्र ( देखील ) भितो, ज्या माझ्या भयानें मृत्यु लपून राहातो, असा जो मी, तो या ठिकाणी भयानें फार कांपत आहे, असें तूं केलें आहेस,

परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्र्वरुप जरी ।

हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ॥ ३५२ ॥

३५२) परंतु हें पाहा, ही महामारीच आहे आणि यालाच जर विश्वरुप म्हणावयाचें, तर बापा, हें एक आश्र्चर्यच आहे. ही महामारी आपल्या विक्राळ स्वरुपानें ( साक्षात् ) भयासहि माघार घ्यावयास लावतें.   



Custom Search

No comments:

Post a Comment