Shri Dnyaneshwari
तंव देखिलें जी आघवेंचि ।
तरि आतां तुज देवा ठावो तूंचि ।त
तूं कवणाचा नव्हेसि ऐसाचि ।
अनादि आयता ॥ २७६ ॥
२७६) तेव्हा महाराज, मी
सर्वच विचार करुन पाहिलें, तर देवा, आतां तुझें ठिकाण तूंच आहेस. तूं कोणाचा
नाहींस ? तर तूं अनादि व स्वतःसिद्ध असाच आहेस.
तूं उभा ना बैठा । दिघडु ना
खुजटा ।
तुज तळीं वरी वैकुंठ ।
तूंचि आहासी ॥ २७७ ॥
२७७) तूं उभा नाहीस
अथवा बसलेला नाहींस; तूं मोठा उंच नाहींस; अथवा ठेंगणा नाहींस; देवा, तुझ्या खालीं
व तुझ्यावर तूंच आहेस.
तूं रुपें आपणयांचि ऐसा ।
देवा तुझी तूंचि वयसा ।
पाठीं पोट परेशा । तुझें
तूं गा ॥ २७८ ॥
२७८) तूं रुपानें
आपल्यासारखाच आहेस, देवा, तुझें वय तूंच आहेस व हे मायेच्या मालका, तुझीं पाठ व
पोट तूंच आहेस.
किंबहुना आतां । तुज तूंचि
आघवें अनंता ।
हें पुढत पुढती पाहतां ।
देखिलें मियां ॥ २७९ ॥
२७९) आतां फार काय सांगावें
? हे अनंता, तुझें सर्व तूंच आहेस. मी वारंवार विचार केल्यावर हेंच मला कळलें.
परि या तुझिया रुपाआंतु ।
जी उणीव एक असें देखतु ।
जे आदि मध्य अंतु । तिन्हीं
नाहीं ॥ २८० ॥
२८०) परंतु या तुझ्या
रुपांत जो एक कमीपणा मी पाहात आहें तो हा कीं, तुझा आरंभ कोठें झाला व तुझा मध्य
कोठे आहे व तुझा शेवट कोठें आहे, असें पाहूं लागलेअसतां, हे तिन्हीं तुझ्या
ठिकाणीं नाहींत.
एर्हवीं गिंवसिलें आघवां
ठायीं । परि सोय न लाहेचि कहीं ।
म्हणोनि त्रिशुद्धी हे
नाहीं । तिन्ही एथ ॥ २८१ ॥
२८१) खरें म्हटलें तर,
तुझ्या विश्वरुपी मी हे ( आदि, मध्य, अंत ) सर्व ठिकाणी शोधले; पण त्यांचा कोठेंच
पत्ता लागत नाहीं. म्हणून तुझ्या स्वरुपीं हे तिन्ही निश्चये करुन नाहींत.
एवं आदिमध्यांतरहिता ।
विश्र्वेश्र्वरा अपरिमिता ।
तूं देखिलासि जी तत्त्वतां
। विश्र्वरुपा ॥ २८२ ॥
२८२) हे आरंभ, मध्य व
शेवट नसलेल्या त्रैलोक्यनायका, मी याप्रमाणें तुला विश्वरुपा, खरोखर पाहिलें.
तुज महामूर्तीचां आंगीं ।
उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी ।
लेइलासि वानें परींचीं
आंगीं । ऐसा आवडतु आहासी ॥ २८३ ॥
२८३) तूं जो विश्वरुप,
त्या तुझ्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ति उमटल्या आहेत. म्हणून नाना प्रकारची
वस्त्रें अंगावर तूं धारण केलीं आहेस, असें वाटतें.
नाना पृथक् मूर्ती
द्रूमवेली । तुझां स्वरुपमहाचळीं ।
दिव्यालंकारफुलीं फळीं ।
सासिन्नलिया ॥ २८४ ॥
२८४) अथवा दिव्य अलंकार
रुप फळाफुलांनीं अगदीं दाट भरुन आलेल्या अशा या अनेक प्रकारच्या मूर्तिरुप
वृक्षवेली, तुझ्या या विश्वरुप महापर्वतावर उत्पन्न झालेल्या आहेत.
हो कां जे महोदधी तूं देवा
। जाहलासि तरंगी मूर्ती हेलावा ।
कीं तूं वृक्षु एक बरवा ।
मूर्तिफळीं फळलासि ॥ २८५ ॥
२८५) अथवा हे
परमेश्र्वरा, ( तुझ्या स्वरुपावर दिसणारा ) मूर्तिरुपी लाटांनीं उसळणारा असा तूं
मोठा समुद्र आहेस, किंवा तूं एक चांगला वृक्ष असून मूर्तिरुपी फळांनी फळभारास आला
आहेस.
जी भूतीं भूतळ मांडिलें ।
जैसें नक्षत्रीं गगन गुढलें ।
तैसें मूर्तिमय भरलें ।
तुझें देखतसें रुप ॥ २८६ ॥
२८६) महाराज,
प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे किंवा आकाश जसें नक्षत्रांनीं
व्यापलेलें आहें, त्याप्रमाणें तुझें स्वरुप मूर्तींनीं भरलेलें आहे, असें मी
पाहातों.
जी एकेकीचां अंगप्रांतीं ।
होय जाय हें त्रिजगतीं ।
एवढियाही तुझां आंगीं
मूर्ती । कीं रोमां जालिया ॥ २८७ ॥
२८७) महाराज, एका एका
मूर्तीच्या अंगप्रदेशांत हें त्रैलोक्य उत्पन्न होत आहे व लयाला जात आहे. अशी
प्रचंड मूर्ति असूनहि त्या तुझ्या ( विश्वरुपाच्या ) शरीराच्या रोमांच्या ठिकाणी
झाल्या आहेत.
ऐसा पवाडु मांडूनि
विश्र्वाचा । तूं कवण पां एथ कैचा ।
हें पाहिलें तंव आमुचा ।
सारथी तोचि तूं ॥ २८८ ॥
२८८) असा विश्वाचा
पसारा मांडून तेथें तूं कोण ? कसा ? असा विचार करुन पाहिलें, तर आमचा जो सारथी,
तोच तूं आहेस.
तरी मज पाहता मुकुंदा । तूं
ऐसाचि व्यापकु सर्वदा ।
भक्तानुग्रहें तया मुग्धा ।
रुपातें धरिसी ॥ २८९ ॥
२८९) तर श्रीकृष्णा,
विचार करुन पाहिलें तरी मला असें वाटतें कीं, तूं नेहमीं असाच व्यापक स्वरुपानें
असतोस, पण भक्तावर कृपा करण्याकरितां तूं सुंदर सगुण अवतार घेतोस.
कैसें चहूं भुजांचें
सांवळें । पाहतां वोल्हावती मन डोळे ।
खेंव देऊं जाइजे तरि आकळे ।
दोहींचि बाहीं ॥ २९० ॥
२९०) ( तुझें )
श्यामसुंदर चतुर्भुज रुप असें आहे कीं, ज्याला पाहिलें असतां मन व डोळे शांत होतात
व आलिंगन द्यावयास लागलें तर दोन्हीं हातांमध्यें कवटाळलें जातें !
ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा
। करुनि होसी विश्र्वरुपा ।
कीं आमुचियाचि दिठी सलेपा ।
जे सामान्यत्वें देखती ॥ २९१ ॥
२९१) हे विश्र्वरुपा
देवा, तुम्ही भक्तांवर कृपा करुन असें सुंदर रुप बनतां, परंतु आमच्याच दृष्टि मलिन
आहेत, म्हणून त्या तुमच्या सगुण मूर्तीला सामान्यत्वानें पाहातात.
तरी आतां दिठीचा विटाळु
गेला । तुवां सहजें दिव्यचक्षू केला ।
म्हणोनि यथारुपें देखवला ।
महिमा तुझा ॥ २९२ ॥
२९२) तर आतां तो
दृष्टीचा दोष दूर झाला. ( कारण ) तूं लीलेनें मला ज्ञानदृष्टिवान् बनविलेंस, आणि
म्हणूनच तुझा मोठेपणा जसा आहे, तसा मी पाहूं शकलों.
परि मकरतुंडामागिलेकडे ।
होतासि तोचि तूं एवढें ।
रुप जाहलासि हें फुडें ।
वोळखिलें मियां ॥ २९३ ॥
२९३) परंतु मकरतुंडाच्या मागल्या बाजूला जो तूं बसलेला होतास, तोच तूं एवढें विश्वरुप बनला आहेस, हें मीं पक्कें जाणलें.
No comments:
Post a Comment