Thursday, April 28, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 3 Sopan 5 and Chanda 6 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ३ सोपान ५ आणि छंद ६

 

ShriRamCharitManas
Aranyakand Part 3 
Sopan 5 and Chanda 6 
श्रीरामचरितमानस
अरण्यकाण्ड भाग ३ 
सोपान ५ आणि छंद ६

सो०---सहज अपावनि नारि पति सेवत सुभ गति लहइ ।

जसु गावत श्रुति चारि अजहुँ तुलसिका हरिहि प्रिय ॥ ५ ( क ) ॥

स्त्री जन्माने अपवित्र आहे. परंतु पतीची सेवा केल्याने ती अनायासच शुभ गती प्राप्त करते. पातिव्रत्य धर्मामुळे तुळस ही आजही भगवंतांना प्रिय आहे आणि चारी वेद तिची कीर्ती गातात. ॥ ५ ( क ) ॥

सुनु सीता तव नाम सुमिरि नारि पतिब्रत करहिं ।

तोहि प्रानप्रिय राम कहिउँ कथा संसार हित ॥ ५ ( ख ) ॥

हे सीते, ऐक. तुझे नाव घेऊनच स्त्रिया पातिव्रत्य धर्माचे पालन करतील. तुला श्रीराम हे प्रांणाहून प्रिय आहेत. ही पातिव्रत्य धर्माची गोष्ट मी जगातील स्त्रियांच्या हितासाठी सांगितली आहे. ‘ ॥ ५ ( ख ) ॥

सुनि जानकी परम सुखु पावा । सादर तासु चरन सिरु नावा ॥

तब मुनि सन कह कृपानिधाना । आयसु होइ जाउँ बन आना ॥

हे ऐकून जानकीला खूप आनंद झाला आणि तिने मोठ्या आदराने अनसूयेच्या चरणी मस्तक ठेवले. मग कृपेची खाण असलेल्या श्रीरामांनी मुनींना सांगितले की, ‘ आज्ञा असेल तर आता मी दुसर्‍या वनांत जातो. ॥ १ ॥

संतत मो पर कृपा करेहू । सेवक जानि तजेहु जनि नेहू ॥

धर्म धुरंधर प्रभु कै बानी । सुनि सप्रेम बोले मुनि ग्यानी ॥

माझ्यावर निरंतर कृपा ठेवा. आणि आपला सेवक मानून माझ्यावरील प्रेम सोडू नका. धर्मधुरंधर प्रभू श्रीरामांचे बोलणे ऐकून ज्ञानी मुनी प्रेमाने म्हणाले, ॥ २ ॥

जासु कृपा अज सिव सनकादी । चहत सकल परमारथ बादी ॥

ते तुम्ह राम अकाम पिआरे । दीन बंधु मृदु बचन उचारे ॥

‘ हे रामा, ब्रह्मदेव, शिव व सनकादिक हे सर्व परमार्थवादी ज्यांची कृपा इच्छितात, ते निष्काम पुरुषांनाही प्रिय आणि दीनांचे बंधू असलेले भगवान तुम्हीच आहात. म्हणून असे गोड शब्द बोलत आहात. ॥ ३ ॥

अब जानी मैं श्री चतुराई । भजी तुम्हहि सब देव बिहाई ॥

जेहि समान अतिसय नहिं कोई । ता कर सील कस न अस होई ॥

आता मला श्रीलक्ष्मीचे चातुर्य समजले की, तिने इतर सर्व देव सोडून तुम्हांलाच का भजले ते. सर्व गोष्टींमध्ये ज्यांच्याहून फार मोठा दुसरा कोणीही नाही, त्याचे शील असे श्रेष्ठ का बरे असणार नाही ? ॥ ४ ॥

केहि बिधि कहौं जाहु अब स्वामी । कहहु नाथ तुम्ह अंतरजामी ॥

अस कहि प्रभु बिलोकि मुनि धीरा । लोचन जल बह पुलक सरीरा ॥

हे स्वामी, मी, कसे म्हणू की ‘ आता जा ‘ हे नाथ, तुम्ही अंतर्यामी आहात, तुम्हीच सांगा. ‘ असे म्हणून धीर मुनी प्रभूंच्याकडे पाहू लागले. मुनींच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले आणि त्यांचे शरीर रोमांचित झाले. ॥ ५ ॥

छं०- ---तन पुलक निर्भर प्रेम पूरन नयन मुख पंकज दिए ।

मन ग्यान गुन गोतीत प्रभु मैं दीख जप तप का किए ॥

जप जोग धर्म समूह तें नर भगति अनुपम पावई ।

रघुबीर चरित पुनीत निसि दिन दास तुलसी गावई ॥

अत्रिमुनी अत्यंत प्रेमात मग्न होते, त्यांचे शरीर पुलकित होत होते आणि नेत्र श्रीरामांच्या मुखकमलावर लागले होते. ते मनात विचार करीत होते की, मी असे कोणते जप-तप केले होते की, ज्याच्यामुळे मन, ज्ञान, गुण व इंद्रिये यांच्या पलीकडील प्रभूंचे दर्शन मला लाभले. जप, योग आणि धर्म-समूह यांमुळे मनुष्याला अनुपम भक्ती प्राप्त होते. अशा श्रीरघुवीरांचे पवित्र चरित्र तुलसेदास रात्रंदिवस गात आहेत. ॥ ६ ॥

दोहा---कलिमल समन दमन मन राम सुजस सुखमूल ।

सादर सुनहिं जे तिन्ह पर राम रहहिं अनुकूल ॥ ६ (क ) ॥   

श्रीरामचंद्रांची सुंदर कीर्ती कलियुगातील पापांचा नाश करणारी, मनाचे दमन करणारी आणि सुखाचे मूळ आहे. जे लोक ती आदराने ऐकतात, त्यांच्यावर श्रीराम प्रसन्न असतात. ॥ ६ ( क ) ॥

सो०---कठिन काल मल कोस धर्म न ग्यान न जोग जप ।

परिहरि सकल भरोस रामहि भजहिं ते चतुर नर ॥ ६ ( ख ) ॥

हा कठीण कलिकाळ पापांचा खजिना आहे. यात धर्म, ज्ञान, योग व जप योग्य प्रकारे होत नाही. म्हणून या युगात जे लोक इतर सर्वांवरचा विश्वास सोडून श्रीरामांनाच भजतात, तेच धन्य होत. ॥ ६ ( ख ) ॥

मुनि पद कमल नाइ करि सीसा । चले बनहि सुर नर मुनि ईसा ॥

आगें राम अनुज पुनि पाछें । मुनि बर बेष बने अति काछें ॥

मुनींच्या चरणीं नतमस्तक होऊन देव, मनुष्य व मुनींचे स्वामी असलेले श्रीराम पुढील वनाकडे निघाले. पुढे श्रीराम, त्यांच्यामागे लक्ष्मण असे ते दोघेही मुनि-वेषामध्ये फारच शोभून दिसत होते. ॥ १ ॥

उभय बीच श्री सोहइ कैसी । ब्रह्म जीव बिच माया जैसी ॥

सरिता बन गिरि अवघड घाटा । पति पहिचानि देहिं बर बाटा ॥

ज्याप्रमाणे परब्रह्म व जीव यांच्यामध्यें माया असते, त्याप्रमाणे राम-लक्ष्मण यांच्यामध्ये सीता शोभत होती. नदी, वन, पर्वत आणि दुर्गम घाट हे सर्व आपल्या स्वामींना ओळखून चांगल्या प्रकारे वाट देत होते. ॥ २ ॥

जहँ जहँ जाहिं देव रघुराया । करहिं मेघ तहँ तहँ नभ छाया ॥

मिला असुर बिराध मग जाता । आवतहीं रघुबीर निपाता ॥

श्रीरघुनाथ जिथे जिथे जात, तिथे तिथे मेघ आकाशातून सावली धरीत होते. रस्त्यात विराध नावाचा राक्षस भेटला. समोर येताच श्रीरामांनी त्याला ठार मारले. ॥ ३ ॥

तुरतहिं रुचिर रुप तेहिं पावा । देखि दुखी निज धाम पठावा ॥

पुनि आए जहँ मुनि सरभंगा । सुंदर अनुज जानकी संगा ॥

श्रीरामांच्या हातून मृत्यू पावताच विराधाला दिव्य रुप

 प्राप्त झाले. तो दुःखी आहे, असे पाहून प्रभूंनी त्याला

 परमधामाला पाठवून दिले. नंतर लक्ष्मण व सीता यांना

 घेऊन प्रभू शरभंग मुनींच्याकडे गेले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: