Tuesday, December 20, 2022

SunderKanda Part 16 ShriRamCharitManas Doha 44 to Doha 46 सुंदरकाण्ड भाग १६ श्रीरामचरितमानस दोहा ४४ ते दोहा ४६

 

SunderKanda Part 16 
ShriRamCharitManas 
Doha 44 to Doha 46 
सुंदरकाण्ड भाग १६ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ४४ ते दोहा ४६

दोहा—उभय भॉंति तेहि आनहु हँसि कह कृपानिकेतन ।

जय कृपाल कहि कपि चले अंगद हनू समेत ॥ ४४ ॥

कृपेचे धाम असलेले श्रीराम हसून म्हणाले, ‘ दोन्हीही परिस्थितींमध्ये त्याला घेऊन ये.’ मग अगंद आणि हनुमान यांना सोबत घेऊन ‘ कृपाळू श्रीरामांचा विजय असो.’ असे म्हणत सुग्रीव निघाला. ॥ ४४ ॥

सादर तेहि आगें करि बानर । चले जहॉं रघुपति करुनाकर ॥

दूरिहि ते देखे द्वौ भ्राता । नयनानंद दान के दाता ॥

बिभीषणाला आदराने पुढे घालून वानर, करुणेची खाण असलेल्या श्रीरघुनाथांच्या जवळ आले. नेत्रांना आनंद देणार्‍या दोघा बंधूंना बिभीषणाने दुरुनच पाहिले. ॥ १ ॥

बहुरि राम छबिधाम बिलोकी । रहेउ ठटुकि एकटक पल रोकी ॥

भुज प्रलंब कंजारुन लोचन । स्यामल गात प्रनत भय मोचन ॥

नंतर लावण्यनिधी श्रीरामांना पाहून डोळ्यांची उघडझाप विसरुन-थबकून तो पाहातच राहिला. भगवंतांच्या विशाल भुजा होत्या, लाल कमलांसारखे प्रफुल्ल नेत्र होते आणि शरणागताच्या भयाचा नाश करणारे त्यांचे सावळे शरीर होते. ॥ २ ॥

सिंध कंध आयत उर सोहा । आनन अमित मदन मन मोहा ॥

नयन नीर पुलकित अति गाता । मन धरि धीर कही मृदु बाता ॥

सिंहासारखे खांदे होते, विशाल वक्षःस्थल शोभून दिसत होते. असंख्य कामदेवांच्या मनाला मोहित करणारे मुख होते. भगवंतांचे ते स्वरुप पाहून बिभीषणाच्या नेत्रात प्रेमाश्रू भरुन आले आणि शरीर अत्यंत पुलकित झाले. मग मनात धीर धरुन तो कोमल शब्दांमध्ये बोलू लागला. ॥ ३ ॥

नाथ दसानन कर मैं भ्राता । निसिचर बंस जनम सुरत्राता ॥

सहज पापप्रिय तामस देहा । जथा उलूकहि तम पर नेहा ॥

‘ हे नाथ, मी दशमुख रावणाचा भाऊ आहे. हे देवांचे रक्षक, माझा जन्म राक्षसकुळात झाला. माझे शरीर तामसी आहे. स्वभावतः पाप मला प्रिय आहे. ज्याप्रमाणे घुबडाला अंधकाराबद्दल सहज प्रेम असते. ॥ ४ ॥     

दोहा—श्रवन सुजसु सुनि आयउँ प्रभु भंजन भव भीर ।

त्राहि त्राहि आरति हरन सरन सुखद रघुबीर ॥ ४५ ॥

मी तुमची सुकीर्ती ऐकून आलो आहे की, प्रभू जन्म-मरणाचे भय दूर करणारे आहेत. हे दुःखीजनांचे दुःख दूर करणारे आणि शरणागताला सुख देणारे श्रीरघुवीर ! माझे रक्षण करा. ‘ ॥ ४५ ॥

अस कहि करत दंडवत देखा । तुरत उठे प्रभु हरष बिसेषा ॥

दीन बचन सुनि प्रभु मन भावा । भुज बिसाल गहि हृदयँ लगावा ॥

असे म्हणत दंडवत करताना त्याला प्रभूंनी पाहिले मात्र आणि ते अत्यंत आनंदाने उठून उभे राहिले. बिभीषणाचे नम्र भाषण प्रभूंच्या मनाला खूप आवडले. त्यांनी आपल्या विशाल भुजांनी त्याला हृदयाशी धरले. ॥ १ ॥

अनुज सहित मिलि ढिग बैठारी । बोले बचन भगत भयहारी ॥

कहु लंकेस सहित परिवारा । कुसल कुठाहर बास तुम्हारा ॥

लक्ष्मणानेही त्याला आलिंगन दिल्यावर त्यांनी त्याला जवळ बसवून भक्तांचे भय दूर करणारे श्रीराम म्हणाले की, ‘ हे लंकेशा, परिवारासह आपले क्षेम-कुशल सांग. तुझा निवास वाईट जागी आहे. ( म्हणून विचारतो. ) ॥ २ ॥

खल मंडली बसहु दिनु राती । सखा धरम निबहइ केहि भॉंती ॥

मैं जानउँ तुम्हारि सब रीती । अति नय निपुन न भाव अनीती ॥

खल मंडली दुष्टांच्या मंडळीमध्ये राहतोस. अशा अवस्थेमध्ये हे मित्रा, तुला धर्म कसा सांभाळता येतो ? मला तुझा सर्व आचार-व्यवहार माहीत आहे. तू अत्यंत नीतिनिपुण आहेस, तुला अनीती बरी वाटत नाही. ॥ ३ ॥

बरु भल बास नरक कर ताता । दुष्ट संग जनि देइ बिधाता ॥

अब पद देखि कुसल रघुराया । जौं तुम्ह कीन्हि जानि जन दाया ॥

बाबा रे ! नरकात राहाणे चांगले; परंतु विधाता दुष्टांचा संग कधी न देवो. ‘ बिभीषण म्हणाला, ‘ हे रघुनाथा, आता तुमच्या चरणांच्या दर्शनामुळे सर्व कुशल आहे. तुम्ही आपला सेवक समजून माझ्यावर दया केलीत. ॥ ४ ॥

दोहा—तब लगि कुसल न जीव कहुँ सपनेहुँ मन बिश्राम ।

जब लगि भजत न राम कहुँ सोक धाम तजि काम ॥ ४६ ॥

जोपर्यंत जीव हा शोकाचे घर असणारी विषय-वासना सोडून श्रीरामांना भजत नाही, तोपर्यंत जीवाला सुख लाभत नाही आणि स्वप्नातही त्याच्या मनाला शांतता लाभत नाही. ॥ ४६ ॥

तब लगि हृदयँ बसत खल नाना । लोभ मोह मच्छर मद माना ॥

जब लगि उर न बसत रघुनाथा । धरें चाप सायक कटि भाथा ॥

लोभ, मोह, मत्सर, मद, मान इत्यादी अनेक दुष्ट विकार हृदयात तोपर्यंत राहात असतात जोपर्यंत धनुष्यबाण आणि कमरेला भाता धारण केलेले श्रीरघुनाथ हृदयामध्ये निवास करीत नाहीत. ॥ १ ॥

ममता तरुन तमी अँधिआरी । राग द्वेष उलूक सुखकारी ॥

तब लगि बसति जीव मन माहीं । जब लगि प्रभु प्रताप रबि नाहीं ॥

ममता ही पूर्ण अंधारी रात्र आहे. ती राग-द्वेषरुपी घुबडांना सुख देणारी आहे. ती ममतारुप रात्र तोपर्यंतच जीवाच्या मनात निवास करते, जोपर्यंत प्रभू, तुमचा प्रतापरुपी सूर्य उदय पावत नाही. ॥ २ ॥

अब मैं कुसल मिटे भय भारे । देखि राम पद कमल तुम्हारे ॥

तुम्ह कृपाल जा पर अनुकूला । ताहि न ब्याप त्रिबिध भव सूला ॥

हे श्रीराम, तुमच्या चरणारविंदांच्या दर्शनाने आता मी सुखरुप झालो आहे. माझे मोठे भय नाहीसे झाले. हे कृपाळू, तुम्ही ज्यांना अनुकूल असता, त्याला आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीनही प्रकारचे भवताप त्रास देत नाहीत. ॥ ३ ॥

मैं निसिचर अति अधम सुभाऊ । सुभ आचरनु कीन्ह नहिं काऊ ॥

जासु रुप मुनि ध्यान न आवा । तेहिं प्रभु हरषि हृदयँ मोहि लावा ॥

मी अत्यंत नीच स्वभावाचा राक्षस आहे. मी कधी चांगले

 आचरण केलेले नाही. असे असूनही ज्यांचे रुप मुनींच्या

 ध्यानातही येत नाही, त्या प्रभूंनी स्वतः आनंदाने मला

 हृदयाशी धरले. ॥ ४ ॥



Custom Search

SunderKanda Part 15 ShriRamCharitManas Doha 41 to Doha 43 सुंदरकाण्ड भाग १५ श्रीरामचरितमानस दोहा ४१ ते दोहा ४३

 

SunderKanda Part 15 
ShriRamCharitManas 
Doha 41 to Doha 43 
सुंदरकाण्ड भाग १५ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ४१ ते दोहा ४३

दोहा—रामु सत्यसंकल्प प्रभु सभा कालबस तोरि ।

मैं रघुबीर सरन अब जाउँ देहु जनि खोरि ॥ ४१ ॥

‘ श्रीराम सत्यसंकल्प व सर्वसमर्थ प्रभू व हे रावणा, तुझी सभा काळाच्या दाढेत आहे. म्हणून मी श्रीरामांना शरण जातो. नंतर मला दोष देऊ नकोस.’ ॥ ४१ ॥

अस कहि चला बिभीषनु जबहीं । आयूहीन भए सब तबहीं ॥

साधु अवग्या तुरत भवानी । कर कल्यान अखिल कै हानी ॥

असे म्हणून बिभीषण जाताच सर्व राक्षसांचा मृत्यु निश्र्चित झाला. शिव म्हणतात, ‘ हे भवानी, साधूचा अपमान संपूर्ण कल्याणाचा तत्काळ नाश करतो. ॥ १ ॥   

रावन जबहिं बिभीषन त्यागा । भयउ बिभव बिनु तबहिं अभागा ॥

चलेउ हरषि रघुनायक पाहीं । करत मनोरथ बहु मन माहीं ॥

रावणाने ज्या क्षणी बिभीषणाचा त्याग केला, त्याच क्षणी तो अभागी ऐश्र्वर्यहीन झाला. बिभीषण आनंदामध्ये अनेक मनोरथ करीत श्रीरघुनाथांच्याकडे गेला. ॥ २ ॥

देखिहउँ जाइ चरन जलजाता । अरुन मृदुल सेवक सुखदाता ॥

जे पद परसि तरी रिषिनारी । दंडक कानन पावनकारी ॥

तो विचार करीत होता की, ‘ मी जाऊन भगवंताच्या कोमल व तांबूस चरण-कमलांचे दर्शन घेईन. ते सेवकांना सुख देणारे आहेत. त्या चरणांच्या स्पर्शाने ऋषिपत्नी अहल्येचा उद्धार झाला आणि ते चरण दंडकवनास पवित्र करणारे आहेत. ॥ ३ ॥

जे पद जनकसुतॉं उर लाए । कपट कुरंग संग धर धाए ।

हर उर सर सरोज पद जेई । अहोभाग्य मैं देखिहउँ तेई ॥

जे चरण जानकीने आपल्या हृदयी धारण केले आहेत, जे चरण कपटमृगाच्या मागे पृथ्वीवर धावत होते आणि जी चरण-कमले साक्षात शिवांच्या हृदयरुपी सरोवरात विराजमान आहेत, तीच मी आज पाहीन. हे केवढे माझे भाग्य ! ॥ ४ ॥

दोहा—जिन्ह पायन्ह के पादुकन्हि रतु रहे मन लाइ ।

ते पद आजु बिलोकिहउँ इन्ह नयनन्हि अब जाइ ॥ ४२ ॥

ज्या चरणांच्या पादुकांमध्ये भरताने आपले मन मग्न केले आहे, अहाहा, आज जाऊन त्याच चरणांचे दर्शन मी आपल्या नेत्रांनी घेणार ! ॥ ४२ ॥

एहि बिधि करत सप्रेम बिचारा । आयउ सपदि सिंधु एहिं पारा ॥

कपिन्ह बिभीषनु आवत देखा । जाना कोउ रिपु दूत बिसेषा ॥

अशा प्रकारे प्रेमपूर्वक विचार करीत बिभीषण लगेच समुद्राच्या पलीकडील तीरावर पोहोचला. बिभीषण येताना पाहून वानरांना वाटले की, हा शत्रूचा कोणी खास दूत असावा. ॥ १ ॥

ताहि राखि कपीस पहिं आए । समाचार सब ताहि सुनाए ॥

कह सुग्रीव सुनहु रघुराई । आवा मिलन दसानन भाई ॥

त्याला पहार्‍यावर थांबवून ते सुग्रीवाजवळ आले आणि त्यांनी बातमी सांगितली. सुग्रीवाने श्रीरामांच्याजवळ सांगितले की, ‘ हे रघुनाथा, रावणाचा भाऊ तुम्हांला भेटायला आला आहे. ‘ ॥ २ ॥

कह प्रभु सखा बूझिऐ काहा । कहइ कपीस सुनहु नरनाहा ॥

जानि न जाइ निसाचर माया । कामरुप केहि कारन आया ॥

प्रभू राम म्हणाले, ‘ हे मित्रा, तुझा काय विचार आहे ?’ वानरराज सुग्रीव म्हणाला, ‘ हे महाराज, राक्षसांची माया समजत नाही. आपल्या इच्छेप्रमाणे रुप बदलणारा हा कशासाठी आला आहे, कुणास ठाऊक ! ॥ ३ ॥

भेद हमार लेन सठ आवा । राखिअ बॉंधि मोहि अस भावा ॥

सखा नीति तुम्ह नीकि बिचारी । मम पन सरनागत भयहारी ॥

मला असे वाटते की, हा मूर्ख आपले रहस्य जाणून घेण्यासाठी आला आहे, म्हणून याला बांधून घालावे, ‘ श्रीराम म्हणाले, ‘ हे मित्रा, तू चांगली नीती सांगितलीस. परंतु शरणागताचे भय दूर करणे, हे माझे ब्रीद आहे. ॥ ४ ॥

सुनि प्रभु बचन हरष हनुमाना । सरनागत बच्छल भगवाना ॥

प्रभूंचे वचन ऐकून हनुमानाला आनंद झाला. तो मनात म्हणू लागला की, ‘ भगवान किती शरणागतवत्सल आहेत ! ‘ ॥ ५ ॥   

दोहा—सरनागत कहुँ जे तजहिं निज अनहित अनुमानि ।

ते नर पावँर पापमय तिन्हहि बिलोकत हानि ॥ ४३ ॥

मग श्रीराम म्हणू लागले, ‘ जे लोक आपले अहित होईल, असे अनुमान करुन शरण आलेल्याला दूर लोटतात, ते क्षुद्र होत, पापी होत. त्यांना पाहणे हेसुद्धा पाप आहे.’ ॥ ४३ ॥

कोटि बिप्र बध लागहिं जाहू । आएँ सरन तजउँ नहिं ताहू ॥

सनमुख होइ जीव मोहि जबहीं । जन्म कोटि अघ नासहिं तबहीं ॥

ज्याने कोट्यावधी ब्राह्मणांची हत्या केली असेल, तोही शरण आल्यास मी त्याचा त्याग करीत नाही. ज्याक्षणीं जीव माझ्यासमोर येतो, त्याच क्षणी त्याचे कोट्यावधी जन्मांचे पाप नष्ट होते. ॥ १ ॥

पापवंत कर सहज सुभाऊ । भजनु मोर तेहि भाव न काऊ ॥

जौं पै दुष्ट हृदय सोइ होई । मोरें सनमुख आव कि सोई ॥

माझे भजन कधीही न आवडणे, हा पापी मनुष्याचा मुळचा स्वभाव असतो. जर तो रावणाचा भाऊ खराच दुष्ट मनाचा असता, तर तो माझ्यासमोर आला असता का ? ॥ २ ॥

निर्मल मन जन सो मोहि पावा । मोहि कपट छल छिद्र न भावा ॥

भेद लेन पठवा दससीसा । तबहुँ न कछु भय हानि कपीसा ॥

जो मनुष्य निर्मल मनाचा असतो, तोच मला भेटतो. मला कपट, लबाडी हे आवडत नाहीत. जरी रावणाने आपले रहस्य जाणण्यासाठी त्याला पाठविले असले, तरी हे सुग्रीवा, आपल्याला कोणतेही भय किंवा नुकसान नाही. ॥ ३ ॥

जग महुँ सखा निसाचर जेते । लछिमनु हनइ निमिष महुँ तेते ॥

जौं सभीत आवा सरनाईं । रखिहउँ ताहि प्रान की नाईं ॥

कारण हे मित्रा, जगात जितके म्हणून राक्षस आहेत,

 त्यांना एका क्षणांत लक्ष्मण मारु शकतो आणि तो

 भयभीत होऊन मला शरण आला असेल, तर मी त्याला

 प्राणाप्रमाणे जपेन. ‘ ॥ ४ ॥



Custom Search

SunderKanda Part 14 ShriRamCharitManas Doha 37 to Doha 40 सुंदरकाण्ड भाग १४ श्रीरामचरितमानस दोहा ३७ ते दोहा ४०

 

SunderKanda Part 14 
ShriRamCharitManas 
Doha 37 to Doha 40 
सुंदरकाण्ड भाग १४ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ३७ ते दोहा ४०

दोहा—सचिव बैद गुर तीनि जौं प्रिय बोलहिं भय आस ।

राज धर्म तन तीनि कर होइ बेगिहीं नास ॥ ३७ ॥

मंत्री, वैद्य व गुरु हे तिघे जर कुणी नाताज होईल या भीतीने किंवा लाभाच्या आशेने हिताची गोष्ट न सांगता प्रिय बोलले, तर ते राज्य, शरीर व धर्म या तिन्हींचा लवकरच नाश होतो. ॥ ३७ ॥

सोइ रावन कहुँ बनी सहाई । अस्तुति करहिं सुनाइ सुनाई ॥

अवसर जानि बिभीषन आवा । भ्राता चरन सीसु तेहिं नावा ॥

रावणावरही असाच प्रसंग आला. मंत्री त्याच्यासमोर स्तुती करीत होते. याचवेळी योग्य प्रसंग पाहून बिभीषण तेथे आला. त्याने मोठा भाऊ रावण याच्या चरणी मस्तक नम्र केले. ॥ १ ॥

पुनि सिरु नाइ बैठ निज आसन । बोला बचन पाइ अनुसासन ॥

जौ कृपाल पूँछिहु मोहि बाता । मति अनुरुप कहउँ हित ताता ॥

मग पुन्हा एकदा नतमस्तक होऊन तो आपल्या आसनावर बसला आणि आज्ञा घेऊन म्हणाला, ‘ हे कृपाळू, तू मला विचारलेच आहेस, म्हणून हे दादा ! मी आपल्या बुद्धीनुसार तुझ्या हिताची गोष्ट सांगतो, ॥ २ ॥

जो आपन चाहै कल्याना । सुजसु सुमति सुभ गति सुख नाना ॥

सो परनारि लिलार गोसाईं । तजउ चउथि के चंद कि नाईं ॥

ज्या मनुष्याला आपले कल्याण, सुंदर कीर्ती, सुंदर बुद्धी, शुभगती आणि नाना प्रकारची सुखे हवी असतात, हे स्वामी, त्याने परस्त्रीच्या मुखाकडे चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे अशुभ मानून पाहू नये. ॥ ३ ॥

चौदह भुवन एक पति होई । भूतद्रोह तिष्टइ नहिं सोई ॥

गुन सागर नागर नर जोऊ । अलप लोभ भल कहइ न कोऊ ॥

चौदा भुवनांचा एकच स्वामी असला तरी तोसुद्धा जिवांशी वैर केल्याने टिकू शकत नाही. जो मनुष्य गुणांचा समुद्र आणि चतुर आहे, परंतु त्याला थोडासा जरी लोभ असला तरी त्याला कोणी चांगले म्हणत नाहीत. ॥ ४ ॥

दोहा—काम क्रोध मद लोभ सब नाथ नरक के पंथ ।

सब परिहरि रघुबीरहि भजहिं जेहि संत ॥ ३८ ॥ 

हे राजा, काम, क्रोध, मद, लोभे हे सर्व नरकाचे मार्ग आहेत. यांना सोडून देऊन श्रीरामचंद्रांना भज. संत त्यांना भजतात. ॥ ३८ ॥

तात राम नहिं नर भूपाला । भुवनेस्वर कालहु कर काला ॥

ब्रह्म अनामय अज भगवंता । ब्यापक अजित अनादि अनंता ॥

हे बंधो ! श्रीराम मनुष्यांचे राजा नव्हेत. ते सर्व लोकांचे स्वामी आणि कालाचेही काल आहेत. ते षडैश्वर्यसंपन्न भगवान आहेत. ते विकाररहित, अजन्मा, व्यापक, अजेय, अनादी आणि अनंत ब्रह्म आहेत. ॥ १ ॥

गो द्विज धेनु देव हितकारी । कृपासिंधु मानुष तनुधारी ॥

जन रंजन भंजन खल ब्राता । बेद धर्म रच्छक सुनु भ्राता ॥

त्या कृपेचे समुद्र असलेल्या भगवानाने पृथ्वी, ब्राह्मण, गाई आणि देवांच्या कल्याणासाठीच मनुष्यशरीर धारण केलेले आहे. हे बंधू, ऐकून घे. ते सेवकांना आनंद देणारे, दुष्टांच्या समूहाचा नाश करणारे आणि वेद व धर्म यांचे रक्षण करणारे आहेत. ॥ २ ॥

ताहि बयरु तजि नाइअ माथा । प्रनतारति भंजन रघुनाथा ॥

देहु नाथ प्रभु कहुँ बैदेही । भजहु राम बिनु हेतु सनेही ॥

त्यांच्याशी वैर सोडून त्यांच्यापुढे मस्तक नम्र कर. ते रघुनाथ शरणागतांचे दुःख नष्ट करणारे आहेत. हे नाथ, त्या सर्वेश्वर प्रभूंना जानकी देऊन टाक आणि अकारण प्रेम करणार्‍या श्रीरामांना भज. ॥ ३ ॥

सरन गएँ प्रभु ताहु न त्यागा । बिस्व द्रोह कृत अघ जेहि लागा ॥

जासु नाम त्रय ताप नसावन । सोइ प्रभु प्रगट समुझु जियँ रावन ॥

ज्याला संपूर्ण जगाशी द्रोह करण्याचे पाप लागले आहे, तो प्रभूंना शरण गेल्यास ते त्याचाही त्याग करीत नाहीत. ज्यांचे नाम तिन्ही तापांचा नाश करणारे आहे, तेच प्रभू मनुष्यरुपाने प्रगट झाले आहेत. हे रावणा, मनापासून हे समजून घे. ॥ ४ ॥

दोहा—बार बार पद लागउँ बिनय करउँ दससीस ।

परिहरि मान मोह मद भजहु कोसलाधीस ॥ ३९ ( क ) ॥

हे दशानना ! मी वारंवार तुझ्या पाया पडतो आणि विनंती करतो की, मान, मोह व मद यांचा त्याग करुन श्रीरामांचे भजन कर. ॥ ३९ ( क ) ॥

मुनि पुलस्ति निज सिष्य सन कहि पठई यह बात ।

तुरत सो मैं प्रभु सन कही पाइ सुअवसरु तात ॥ ३९ ( ख ) ॥

पुलस्त्य मुनींनी आपल्या शिष्याबरोबर हाच निरोप पाठविला आहे. बंधो ! योग्य वेळ बघून मी ती गोष्ट तुला सांगत आहे. ‘ ॥ ३९ ( ख ) ॥

माल्यवंत अति सचिव सयाना । तासु बचन सुनि अति सुख माना ॥

तात अनुज तव नीति बिभूषन । सो उर धरहु जो कहत बिभीषन ॥

माल्यवान नावाचा एक मोठा बुद्धिमान मंत्री होता. त्याला बिभीषणाचे बोलणे ऐकून आनंद झाला, तो म्हणाला, ‘ हे महाराज ! तुमचे बंधू नीति-विभूषण आहेत. बिभीषण जे सांगत आहेत, ते लक्षात ठेवा.’ ॥ १ ॥

रिपु उतकरष कहत सठ दोऊ । दूरि न करहु इहॉं हइ कोऊ ॥

माल्यवंत गृह गयउ बहोरी । कहइ बिभीषन पुनि कर जोरी ॥

रावण म्हणाला, ‘ हे दोघे मूर्ख शत्रूचा महिमा सांगत आहेत. इथे कोणी आहे काय ? या दोघांना येथून हाकला. ‘ तेव्हा माल्यवान घरी गेला आणि बिभीषण हात जोडून पुन्हा बोलू लागला. ॥ २ ॥

सुमति कुमति सब कें उर रहहीं । नाथ पुरान निगम अस कहहीं ॥

जहॉं सुमति तहँ संपति नाना । जहॉं कुमति तहँ बिपति निदाना ॥

‘ हे बंधो, पुराणे व वेद असे सांगतात की, सुबुद्धी आणि कुबुद्धी सर्वांच्या मनात असते. जेथे सुबुद्धी असते, तेथे नाना प्रकारच्या संपदा असतात आणि जेथे कुबुद्धी असते, तेथे परिणामी विपत्ती असतात. ॥ ३ ॥

तव उर कुमति बसी बिपरीता । हित अनहित मानहु रिपु प्रीता ॥

कालराति निसिचर कुल केरी । तेहि सीता पर प्रीति घनेरी ॥

तुझ्या मनात उलटी बुद्धी आलेली आहे. म्हणून तू हिताला अहित व शत्रूला मित्र मानत आहात. जी राक्षसकुलासाठी काळरात्र आहे, त्या सीतेवर तुझे फार प्रेम आहे. ॥ ४ ॥    

दोहा—तात चरन गहि मागउँ राखहु मोर दुलार ।

सीता देहु राम कहुँ अहित न होइ तुम्हार ॥ ४० ॥

हे राजन ! मी तुझे पाय धरुन तुझ्याकडे भीक मागतो की, तू मज भावाचा आग्रह प्रेमाने स्वीकार. श्रीरामांना सीता देऊन टाक. त्यामुळे तुझे अहित होणार नाही. ‘ ॥ ४० ॥

बुध पुरान श्रुति संमत बानी । कही बिभीषन नीति बखानी ॥

सुनत दसानन उठा रिसाई । खल तोहि निकट मृत्यु अब आई ॥

बिभीषणाने पंडित, पुराण आणि वेद यांना संमत असलेली नीती वर्णन करुन सांगितली, परंतु ते ऐकताच रावण खवळून म्हणाला, ‘ अरे दुष्टा, आता तुझा मृत्यु जवळ आला आहे. ॥ १ ॥

जिअसि सदा सठ मोर जिआवा । रिपु कर पच्छ मूढ़ तोहि भावा ॥

कहसि न खल अस को जग माहीं । भुज बल जाहि जिता मैं नाहीं ॥

अरे मूर्खा, तू जिवंत आहेस, तो मी पोसल्यामुळे. हे मूर्खा, तुला शत्रूचा पक्ष चांगला वाटतो. अरे दुष्टा, जगात मी माझ्या स्वतःच्या भुजबलाने जिंकला नाही, असा कोण आहे ते सांग ? ॥ २ ॥

मम पुर बसि तपसिन्ह पर प्रीती । सठ मिलु जाइ तिन्हहि कहु नीती ॥

अस कहि कीन्हेसि चरन प्रहारा । अनुज गहे पद बारहिं बारा ॥

माझ्या नगरात राहून तू तपस्वांवर प्रेम करतोस ! मूर्खा, मग त्यांनाच जाऊन भेट आणि त्यांना नीती सांग. ‘ असे म्हणून रावणाने बिभीषणाला लाथ मारली. परंतु बिभीषणाने तरीही वारंवार त्याचे पाय धरले. ॥ ३ ॥

उमा संत कइ इहइ बड़ाई । मंद करत जो करइ भलाई ॥

तुम्ह पितु सरिस भलेहिं मोहि मारा । रामु भजें हित नाथ तुम्हारा ॥

शिव म्हणतात, ‘ हे उमे, संतांचे हेच मोठेपण असते की, ते वाईट करणार्‍याचेही भलेच करीत असतात. ‘ बिभीषण म्हणाला, ‘ तू मला पित्यासमान आहेस. मला तू मारलेस, त्याचे मला वाईट वाटत नाही. परंतु हे राजा ! तुझे कल्याण श्रीरामांना भजण्यात आहे. ‘ ॥ ४ ॥

सचिव संग लै नभ पथ गयऊ । सबहि सुनाइ कहत अस भयऊ ॥

असे म्हणून बिभीषण आपल्या मंत्र्यांसह आकाश-मार्गाने गेला आणि सर्वांना उद्देशून म्हणाला, ॥ ५ ॥      




Custom Search

SunderKanda Part 13 ShriRamCharitManas Doha 34 to Doha 36 सुंदरकाण्ड भाग १३ श्रीरामचरितमानस दोहा ३४ ते दोहा ३६

 

SunderKanda Part 13 
ShriRamCharitManas 
Doha 34 to Doha 36 
सुंदरकाण्ड भाग १३ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ३४ ते दोहा ३६

दोहा—कपिपति बेगि बोलाए आए जूथप जूथ ।

नाना बरन अतुल बल बानर भालु बरुथ ॥ ३४ ॥

वानरराज सुग्रीवाने लगेच वानरांना बोलावले. सेनापतींचे समूह आले. वानर व अस्वलांच्या झुंडी अनेक रंगांच्या होत्या आणि त्यांच्यामध्ये अतुलनीय बळ होते. ॥ ३४ ॥

प्रभुपद पंकज नावहिं सीसा । गर्जहिं भालु महाबल कीसा ॥

देखी राम सकल कपि सेना । चितइ कृपा करि राजिव नैना ॥

सर्वजण प्रभूंच्या चरणकमली नतमस्तक झाले. महाबलवान अस्वले व वानर गर्जना करीत होते. श्रीरामांनी सर्व सेना पाहून आपल्या कमलनेत्रांतून तिच्यावर कृपावर्षाव केला. ॥ १ ॥

राम कृपा बल पाइ कपिंदा । भए पच्छजुत मनहुँ गिरिंदा ॥

हरषि राम तब कीन्ह पयाना । सगुन भए सुंदर सुभ नाना ॥

रामकृपेचे बळ मिळाल्यामुळे श्रेष्ठ वानर जणूं पंख असलेले मोठे पर्वत झाले. मग श्रीरामांनी आनंदाने प्रस्थान केले. त्यावेळी अनेक सुंदर व शुभ शकुन झाले. ॥ २ ॥

जासु सकल मंगलमय कीती । तासु पयान सगुन यह नीती ॥

प्रभु पयान जाना बैदेहीं । फरकि बाम अँग जनु कहि देहीं ॥

ज्यांची कीर्ती ही सर्व मांगल्यांनी परिपूर्ण आहे, त्यांच्या प्रस्थानाच्या वेळी शकुन होणे, ही लीला आहे. प्रभूंचे प्रस्थान जानकीलाही जाणवले. तिची डावी अंगे स्फुरुन सांगत होती की, श्रीराम येत आहेत. ॥ ३ ॥

जोइ जोइ सगुन जानकिहि होई । असगुन भयउ रावनहि सोई ॥

चला कटकु को बरनैं पारा । गर्जहिं बानर भालु अपारा ॥

जानकीला जेव्हा शकुन होत होते, तेव्हा रावणाला अपशकुन झाले. श्रीरामांची सेना निघली, तिचे वर्णन कोण करील ? असंख्य वानर व अस्वले गर्जना करीत होती. ॥ ४ ॥

नख आयुध गिरि पादपधारी । चले गगन महि इच्छाचारी ॥

केहरिनाद भालु कपि करहीं । डगमगहिं दिग्गज चिक्करहीं ॥

नखें हीच त्यांची शस्त्रे होती, ती स्वच्छेनुसार चालणारी अस्वले व वानर पर्वत व वृक्ष उचलून आकाशातून निघाले आणि काही जमिनीवरुन चालत होते. ते सिंहाप्रमाणे गर्जना करीत होते. त्यांच्या चालण्याने व गर्जनेने दिग्गज घाबरुन चीत्कार करीत होते. ॥ ५ ॥

छं०—चिक्करहिं दिग्गज डोल महि गिरि लोल सागर खरभरे ।

मन हरष सभ गंधर्ब सुर मुनि नाग किंनर दुख टरे ॥

कटकटहिं मर्कट बिकट भट बहु कोटि कोटिन्ह धावहीं ।

जय राम प्रबल प्रताप कोसलनाथ गुन गन गावहीं ॥ १ ॥

दिशांचे हत्ती चीत्कार करु लागले, पृथ्वी डगमगू लागली, पर्वत कापू लागले आणि समुद्र खवळले. गंधर्व, देव, मुनी नाग, किन्नर हे सर्वच्या सर्व मनातून आनंदित झाले की, आता आमची दुःखे टळली. अनेक कोटी भयानक वानर योद्धे दात चावत होते आणि कोट्यावधी धावत होते. ‘ प्रबल प्रतापी कोसलनाथ श्रीरामचंद्रांचा विजय असो, ‘ अशा घोषणा देत ते श्रीरामांचे गुणगान करीत होते. ॥ १ ॥

सहि सक न भार उदार अहिपति बार बारहिं मोहई ।

गह दसन पुनि पुनि कमठ पृष्ट कठोर सो किमि सोहई ॥

रघुबीर रुचिर प्रयान प्रस्थिति जानि परम सुहावनी ।

जनु कमठ खर्पर सर्पराज सो लिखत अबिचल पावनी ॥

परमश्रेष्ठ व महान सर्पराज शेषसुद्धा सेनेचे ओझे सहन करु शकेना. तो वातंवार घाबरुन जात होता आणि पुनः पुन्हा कासवाच्या कठोर पाठीला दातांनी धरीत होता. वारंवार दांत घुसवून तो कासवाच्या पाठीवर तो रेघा ओढीत होता. तो असा शोभत होता की, जणू श्रीरामचंद्रांची सुंदर प्रस्थानयात्रा ही फार चांगली समजून तिची पवित्र व अढळ कथा सर्पराज शेष कासवाच्या पाठीवर लिहीत होता. ॥ २ ॥     

एहि बिधि जाइ कृपानिधि उतरे सागर तीर ।

जहँ तहँ लागे खान फल भालु बिपुल कपि बीर ॥ ३५ ॥

अशा प्रकारे कृपानिधान श्रीराम समुद्रतटावर जाऊन पोहोचले. अनेक अस्वले व वानर जिंकडे तिकडे फळे खाऊ लागले. ॥ ३५ ॥

उहॉं निसाचर रहहिं ससंका । जब तें जारि गयउ कपि लंका ॥

निज निज गृहँ सब करहिं बिचारा । नहिं निसिचर कुल के उबारा ॥

तिकडे लंकेत हनुमान लंका जाळून गेला, तेव्हापासून राक्षस भयभीत झाले होते. अपापल्या घरात सर्वजण विचार करीत होते की, आता राक्षसकुळाच्या बचावाचा कोणताही उपाय नाही. ॥ १ ॥

जासु दूत बल बरनि न जाई । तेहि आएँ पुर कवन भलाई ॥

दूतिन्ह सन सुनि पुरजन बानी । मंदोदरी अधिक अकुलानी ॥

ज्यांच्या दूताच्या बळाचे वर्णन करणे शक्य नाही, ते श्रीराम स्वतः नगरात आल्यावर आमची काय अवस्था होणार ! दूतींच्याकडून नगरवासींचे बोलणे ऐकून मंदोदरी फार व्याकूळ झाली. ॥ २ ॥

रहसि जोरि कर पति पग लागी । बोली बचन नीति रस पागी ॥

कंत करष हरि सन परिहरहू । मोर कहा अति हित हियँ धरहू ॥

ती एकांतात हात जोडून रावणाच्या पाया पडली आणि नीतिरसाने परिपूर्ण वाणीने म्हणाली, ‘ हे प्रियतम, श्रीहरींशी विरोध करणे सोडून द्या. माझे म्हणणे अत्यंत हितकारक समजून हृदयात धरा. ॥ ३ ॥

समुझत जासु दूत कइ करनी । स्रवहिं गर्भ रजनीचर घरनी ॥

तासु नारि निज सचिव बोलाई । पठवहु कंत जो चहहु भलाई ॥

ज्यांच्या दूताच्या कृत्याचा विचार करताच राक्षसांच्या स्त्रिया गर्भगळित होतात, हे प्रिय स्वामी, जर कल्याण व्हावेसे वाटत असेल, तर, आपल्या मंत्र्यांना बोलावून त्यांच्याबरोबर श्रीरामांच्या पत्नीला पाठवून द्या. ॥ ४ ॥        

तव कुल कमल बिपिन दुखदाई । सीता सीता निसा सम आई ॥

सुनहु नाथ सीता बिनु दीन्हें । हित न तुम्हार संभु अज कीन्हें ॥

सीता ही आपल्या कुलरुपी कमलवनाला दुःख देणार्‍या थंडीच्या रात्रीप्रमाणे झाली आहे. हे नाथ, ऐकून घ्या. सीतेला परत पाठविल्याशिवाय शंभू किंवा ब्रह्मदेवही तुमचे भले करणार नाहीत. ॥ ५ ॥

दोहा—राम बान अहि गन सरिस निकर निसाचर भेक ।

जब लगि ग्रसत न तब लगि जतनु करहु तजि टेक ॥ ३६ ॥

श्रीरामांचे बाण हे सर्पांच्या समूहासारखे आहेत आणि राक्षस-समूह त्यांच्यापुढे बेडकाप्रमाणे आहेत. ते जोपर्यंत यांना खाऊन टाकत नाहीत, तोपर्यंत आपला हट्ट सोडून काही उपाय करा. ‘ ॥ ३६ ॥

श्रवन सुनी सठ ता करि बानी । बिहसा जगत बिदित अभिमानी ॥

सभय सुभाउ नारि कर साचा । मंगल महुँ भय मन अति काचा ॥

मूर्ख आणि जगप्रसिद्ध घमेंडखोर रावण आपल्या कानांनी मंदोदरीचे बोलणे ऐकून मोठ्याने हसून म्हणाला, ‘ स्त्रियांचा स्वभाव खरोखरच भित्रट असतो. तूं मंगल प्रसंगीसुद्धा भीत आहेस. तुझे मन फारच हळवे आहे. ॥ १ ॥

जौं आवइ मर्कट कटकाई । जिअहिं बिचारे निसिचर खाई ॥

कंपहिं लोकप जाकीं त्रासा । तासु नारि सभीत बड़ि हासा ॥

जर वानरांची सेना आली, तर बिचारे राक्षस त्यांना खाऊन आपली पोटे भरतील. लोकपालही माझ्या भयाने कापू लागतात, त्याची बायको असून तू घाबरतेस, ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. ‘ ॥ २ ॥

अस कहि बिहसि ताहि उर लाई । चलेउ सभॉं ममता अधिकाई ॥

मंदोदरी हृदयँ कर चिंता । भयउ कंत पर बिधि बिपरीता ॥

रावणाने असे म्हणत हसून तिला हृदयाशधरले आणि मोठे प्रेम दाखवून तो सभेला गेला. मंदोदरी मनात काळजी करु लागली की, विधाता आपल्या पतीला प्रतिकूल झालेला आहे. ॥ ३ ॥

बैठेउ सभॉं खबरि असि पाई । सिंधु पार सेना सब आई ॥

बूझेसि सचिव उचित मत कहहू । ते सब हँसे मष्ट करि रहहू ॥

रावण सभेमध्ये जाऊन बसताच त्याला समजले की, शत्रूची सर्व सेना समुद्रापलीकडे आली आहे. त्याने मंत्र्यांना म्हटले की, योग्य सल्ला द्या. तेव्हा सर्वजण हसले व म्हणाले की, ‘ गप्प राहावे, यात सल्ला काय द्यायचा ? ॥ ४ ॥       

जितेहु सुरासुर तब श्रम नाहीं । नर बानर केहि लेखे माहीं ॥

तुम्ही देव व राक्षसांना जिंकून घेतले, तेव्हासुद्धा काही

 कष्ट पडले नाहीत. मग मनुष्य व वानर यांचे काय घेऊन

 बसलात ? ‘ ॥ ५ ॥



Custom Search