BhaktiYoga Part 7
तैसें येणेंचि शरीरें । शरीरा
येणें सरे ।
किंबहुना येरझारे । चिरा
पडे ॥ १३६ ॥
१३६) त्याप्रमाणें याच
शरीरानें शरीराला येणें ( जन्माला येणें ) संपतें. फार काय सांगावें ?
जन्ममरणाच्या खेपांवर दगड पडतो.
पैं अभ्यासाचां पाउटीं ।
ठाकिजे ज्ञान किरीटी ।
ज्ञानें येइजे भेटी ।
ध्यानाचिये ॥ १३७ ॥
१३७) मग अर्जुना,
अभ्यासाच्या ( वरील ९ व्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणें ) पायरीनें ज्ञान (
परमेश्र्वराचे परोक्ष ज्ञान ) प्राप्त करुन घ्यावें व त्या ज्ञानाच्या योगानें
ध्यानाच्या भेटीस यावें. ( त्या ज्ञानानें माझ्या स्वरुपाचें ध्यान करावें )
मग ध्यानासि खेंव । देती
आघवेचि भाव ।
तेव्हां कर्मजात सर्व ।
दूरी ठाके ॥ १३८ ॥
१३८) मग सर्व भाव (
कायिक, वाचिक, मानसिक भाव ) ध्यानाला आलिंगन देतात म्हणजे ध्यानात गढून जातात.
त्या वेळेला कर्ममात्र जेंवढें आहे, तें दूर राहातें. ( म्हणजे होत नाहीं. कारण
कर्में करण्याची साधनें किंवा द्वारें जी काया, वाचा व मन तीं सर्व ध्यानांत गढून
गेल्यामुळें कर्मे करण्यास जाग्यावर कोणीच नसतात; म्हणून कर्मे होत नाहीत.
कर्म जेथ दुरावे । तेथ
फलत्यागु संभवे ।
त्यागास्तव आंगवे । शांति
सगळी ॥ १३९ ॥
१३९) फळाला उत्पन्न
करणारें जें कर्म तें जेव्हां दूर होतें, तेव्हां फलत्याग संभवतो आणि अशा त्या
त्यागामुळें पूर्ण शांति ( पूर्ण ब्रह्मस्थिति ) हस्तगत होते.
म्हणोनि यावया शांती । हाचि
अनुक्रमु सुभद्रापती ।
अभ्यासुचि प्रस्तुतीं ।
करणें एथ ॥ १४० ॥
१४०) म्हणूनच अर्जुना,
शांति प्राप्त होण्याकरितां हाच ( आतां सांगितलेला ) काय तो क्रम आहे; ( म्हणून )
सांप्रतकाळीं तुला अभ्यासच केला पाहिजे.
मूळ श्लोक
श्रेयो हि
ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद् ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्
कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥ १२ ॥
१२) अभ्यासापेक्षां
ज्ञान गहन आहे, ज्ञानापेक्षां ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षां कर्मफलत्याग अधिक
बरा आणि कर्मफलत्यागापेक्षाहि शांति श्रेष्ठ आहे.
अभ्यासाहूनि गहन । पार्था
मग ज्ञान ।
ज्ञानापासोनि ध्यान ।
विशेषिजे ॥ १४१ ॥
१४१) अर्जुना, मग
अभ्यासापेक्षां ज्ञान हें खोल आहे आणि ज्ञानापेक्षां ध्यान अधिक महत्वाचें आहे.
मग कर्मफलत्यागु । तो
ध्यानापासोनि चांगु ।
त्यागाहूनि भोगु ।
शांतिसुखाचा ॥ १४२ ॥
१४२) मग कर्मफलत्याग जो
आहे, तो ध्यानापेक्षां चांगला आहे आणि कर्मफलत्यागापेक्षां शांतिसुखाचा भोग (
म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव ) चांगला आहे.
ऐसिया या वाटा । इहींचि
पेणां सुभटा ।
शांतीचा माजिवटा । ठाकिला
जेणें ॥ १४३ ॥
१४३) अर्जुना, अशा या
वाटेनें व याच मुक्कामाच्या क्रमानें ज्यानें शांतीचा मध्य गांठला,
मूळ श्लोक
अद्वेष्टा सर्वभूतानां
मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहंकारः
समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥
१३) सर्व भूतांच्या
ठिकाणीं द्वेष न धरणारा, मैत्रीनें वागणारा आणि तसाच कृपायुक्त, मी-माझेंपण रहित,
सुख व दुःख समान मानणारा, क्षमाशील,
जो सर्व भूतांचां ठायीं ।
द्वेषातें नेणेचि कहीं ।
आपपरु नाहीं । चैतन्या जैसा
॥ १४४ ॥
१४४) सर्वव्यापी
चैतन्याला ज्याप्रमाणें आपला व परकेपणाचा भाव कोठेंच नसतो, त्याप्रमाणें त्याला
लोकांविषयीं आपला व परकेपणा राहिला नाही, म्हणून तो कोणत्याहि प्राण्याचा द्वेष
करण्याची गोष्ट जाणत नाही;
उत्तमातें धरिजे । अधम तरि
अव्हेरिजे ।
हें कांहींच नेणिजे । वसुधा
जेवीं ॥ १४५ ॥
१४५) उत्तमाचा स्वीकार
करावा आणि नीच म्हणून ( नीचाचा ) त्याग करावा, हें ज्याप्रमाणें पृथ्वी मुळींच
जाणत नाही;
कां रायाचें देह चाळूं ।
रंका परौतें गाळूं ।
हें न म्हणेचि कृपाळू ।
प्राणु पैं गा ॥ १४६ ॥
१४६) किंवा अर्जुना,
राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा, असे कृपाळू
प्राण केव्हांहि म्हणतच नाही;
गाईची तृषा हरुं । कां
व्याघ्रा विष होऊनि मारुं ।
ऐसें नेणेचि का करुं । तोय
जैसें ॥ १४७ ॥
१४७) गायीची तहान
भागवूं आणि वाघाला विष होऊन मारुं, असें करणें पाण्याला जसें ठाऊकच नसतें;
तैसी आघवांचि भूतमात्रीं ।
एकपणें जया मैत्री ।
कृपेशीं धात्री । आपणपां जो
॥ १४८ ॥
१४८) त्याप्रमाणें
ऐक्यबोधानें संपूर्ण प्राणिमात्रांशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची
जन्मभूमि असतो;
आणि मी तूं हे भाष नेणे ।
माझें कांहींचि न म्हणे ।
सुखदुःख जाणणें । नाहीं जया
॥ १४९ ॥
१४९) आणखी मी- तूं अशी
भाषा त्याला माहीत नसते आणि माझें असें तो कांहींच म्हणत नाही व ज्याला
सुखदुःखांची जाणीव नसते;
तेवींच क्षमेलागीं ।
पृथ्वीसि पवाडु आंगीं ।
संतोषा उत्संगीं । दिधलें
घर ॥ १५० ॥
१५०) त्याप्रमाणें
क्षमेच्या बाबतीत, ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व त्यानें आपल्या माडीवर
संतोषाला घर दिले आहे. ( संतोष ज्याच्यामुळें वाढता आहे. )
मूळ श्लोक
संतुष्टः सततं योगी यतात्मा
दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो
मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४ ॥
१४) सर्वदा संतुष्ट,
योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणीं ज्याचें मन दृढ आहे असा, माझ्या ठिकाणीं ज्यानें
मन व बुद्धि अर्पण केलीं आहेत, असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे.
वार्षियेंवीण सागरु । जैसा
जळें नित्य निर्भरु ।
तैसा निरुपचारु । संतोषी जो
॥ १५१ ॥
१५१) वर्षाॠतूशिवाय जसा
समुद्र पाण्यानें नेहमी पूर्ण भरलेला असतो, तसा जो कोणताहि बाह्य उपचाराशिवाय
संतोषानें नेहमीं पूर्ण भरलेला असतो.
वाहुनि आपुली आण । धरी जो
अंतःकरण ।
निश्र्चया साचपण । जयाचेनि
॥ १५२ ॥
१५२) जो अंतःकरणाला
आपली शपथ घालून आंवरुन धरतो आणि ज्याच्या योगानें निश्चयाला खरेपणा असतो;
जीव परमात्मा दोन्ही ।
बैसोनि ऐक्यासनीं ।
जयाचां हृदयभुवनीं ।
विराजती ॥ १५३ ॥
१५३) त्याच्या
अंतःकरणरपी घरामध्यें जीव व परमात्मा हे दोन्हीं ऐक्यरुपी आसनावर बसून शोभत आहेत.
( जीव व परमात्मा यांचें ऐक्य, ज्याच्या अनुभवाला आलें आहे );
ऐसा योगसमृद्धि । होऊनि जो
निरवधि ।
अर्पी मनोबुद्धि । माझां
ठायीं ॥ १५४ ॥
१५४) असा ऐक्यरुपी
ऐश्वर्यानें संपन्न होऊन जो आपलें मन व बुद्धि अखंड माझ्या ठिकाणीं अर्पण करितो;
आंतु बाहेरि योगु ।
निर्वाळलेयाही चांगु ।
तरि माझा अनुरागु । सप्रेम
जया ॥ १५५ ॥
१५५) अंतःकरणांत (
आत्मैक्यप्रतीतीच्या दृढतेनें ) व बाह्य शरीरांत ( ध्यान, धारणा इत्यादिकांच्या
द्वारें ) चांगल्या तर्हेनें योगांत तयार होऊन देखील, ज्याला माझ्या सगुण
स्वरुपाविषयीं दृढ प्रेम असतें;
अर्जुना गा तो भक्तु । तोचि
योगी तोचि मुक्तु ।
तो वल्लभा मी कांतु । ऐसा
पढिये ॥ १५६ ॥
१५६) अर्जुना, तो भक्त,
तोच योगी आणि तोच मुक्त; तो जशी कांहीं स्त्री व मी पति इतका तो मला आवडतो.
हें ना तो आवडे । मज
जीवाचेनि पाडें ।
हेंही एथ थोडें । रुप करणें
॥ १५७ ॥
१५७) इतकेंच नाहीं, तर
तो मला जीवाइतका प्यारा आहे. पण माझें जें त्याच्यावर प्रेम आहे, त्याला ही देखील
उपमा अपुरी आहे.
तरी पढियंतयाची कहाणी । हे
भुलीची भारणी ।
इयें तंव न बोलणीं । परि
बोलवी श्रद्धा ॥ १५८ ॥
१५८) परंतु, प्रेमळ
भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून
दाखविण्यासारख्या नाहीत. पण अर्जुना, तुझी माझ्यावरील श्रद्धा, असली न बोलावयाची
गोष्ट ( पण ) बोलावयास लावते.
म्हणोनि गा आम्हां । वेगा
आली उपमा ।
एर्हवीं काय प्रेमा ।
अनुवादु असे ॥ १५९ ॥
१५९) म्हणून आम्ही (
बायकोची व जीवाची ) झटकन उपमा देऊं शकलों.
नाहीं तर हे प्रेम बोलून दाखविण्यांत येईल काय ?
आतां असो हें किरीटी । पैं
प्रियाचिया गोष्टी ।
दुणा थांव उठी । आवडी गा ॥
१६० ॥
१६०) आतां अर्जुना, हें
असूं दे. पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढतें.
तयाही वरी विपायें ।
प्रेमळु संवादिया होये ।
तिये गोडीसी आहे । कांटाळें
मग ॥ १६१ ॥
१६१) त्यांत आणखी
कदाचित् संवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला, तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा आहे
काय ?
म्हणोनि गा पांडुसुता ।
तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता ।
वरी प्रियाची वार्ता ।
प्रसंगें आली ॥ १६२ ॥
१६२) म्हणून अर्जुना,
तूंच प्रेमळ भक्त आणि तूंच श्रोता आहेस;
शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाची गोष्ट बोलण्याची वेळ आली.
तरी आतां बोलों । भलेया
सुखा मीनलों ।
ऐसें म्हणतखेंवीं डोलों ।
लागले देवो ॥ १६३ ॥
१६३) ( जरी प्रेमळाची
गोष्ट शब्दांनी बोलून दाखवितां येत नाहीं, तरी मागील ओवींत सांगितल्याप्रमाणें
प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे ) म्हणून आतां मी बोलतोंच. या बोलण्याच्या
सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे ! असें म्हणतांक्षणीं देव डोलावयास लागले.
मग म्हणे जाण । तया
भक्तांचें लक्षण ।
जया मी अंतःकरण । बैसों
घालीं ॥ १६४ ॥
१६४) मग श्रीकृष्ण
म्हणाले, ज्या भक्ताला मी आपलें अंतःकरण बसावयास घालतों, त्या भक्ताचीं लक्षणें
समजून घे.
No comments:
Post a Comment