Tuesday, December 20, 2022

SunderKanda Part 16 ShriRamCharitManas Doha 44 to Doha 46 सुंदरकाण्ड भाग १६ श्रीरामचरितमानस दोहा ४४ ते दोहा ४६

 

SunderKanda Part 16 
ShriRamCharitManas 
Doha 44 to Doha 46 
सुंदरकाण्ड भाग १६ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ४४ ते दोहा ४६

दोहा—उभय भॉंति तेहि आनहु हँसि कह कृपानिकेतन ।

जय कृपाल कहि कपि चले अंगद हनू समेत ॥ ४४ ॥

कृपेचे धाम असलेले श्रीराम हसून म्हणाले, ‘ दोन्हीही परिस्थितींमध्ये त्याला घेऊन ये.’ मग अगंद आणि हनुमान यांना सोबत घेऊन ‘ कृपाळू श्रीरामांचा विजय असो.’ असे म्हणत सुग्रीव निघाला. ॥ ४४ ॥

सादर तेहि आगें करि बानर । चले जहॉं रघुपति करुनाकर ॥

दूरिहि ते देखे द्वौ भ्राता । नयनानंद दान के दाता ॥

बिभीषणाला आदराने पुढे घालून वानर, करुणेची खाण असलेल्या श्रीरघुनाथांच्या जवळ आले. नेत्रांना आनंद देणार्‍या दोघा बंधूंना बिभीषणाने दुरुनच पाहिले. ॥ १ ॥

बहुरि राम छबिधाम बिलोकी । रहेउ ठटुकि एकटक पल रोकी ॥

भुज प्रलंब कंजारुन लोचन । स्यामल गात प्रनत भय मोचन ॥

नंतर लावण्यनिधी श्रीरामांना पाहून डोळ्यांची उघडझाप विसरुन-थबकून तो पाहातच राहिला. भगवंतांच्या विशाल भुजा होत्या, लाल कमलांसारखे प्रफुल्ल नेत्र होते आणि शरणागताच्या भयाचा नाश करणारे त्यांचे सावळे शरीर होते. ॥ २ ॥

सिंध कंध आयत उर सोहा । आनन अमित मदन मन मोहा ॥

नयन नीर पुलकित अति गाता । मन धरि धीर कही मृदु बाता ॥

सिंहासारखे खांदे होते, विशाल वक्षःस्थल शोभून दिसत होते. असंख्य कामदेवांच्या मनाला मोहित करणारे मुख होते. भगवंतांचे ते स्वरुप पाहून बिभीषणाच्या नेत्रात प्रेमाश्रू भरुन आले आणि शरीर अत्यंत पुलकित झाले. मग मनात धीर धरुन तो कोमल शब्दांमध्ये बोलू लागला. ॥ ३ ॥

नाथ दसानन कर मैं भ्राता । निसिचर बंस जनम सुरत्राता ॥

सहज पापप्रिय तामस देहा । जथा उलूकहि तम पर नेहा ॥

‘ हे नाथ, मी दशमुख रावणाचा भाऊ आहे. हे देवांचे रक्षक, माझा जन्म राक्षसकुळात झाला. माझे शरीर तामसी आहे. स्वभावतः पाप मला प्रिय आहे. ज्याप्रमाणे घुबडाला अंधकाराबद्दल सहज प्रेम असते. ॥ ४ ॥     

दोहा—श्रवन सुजसु सुनि आयउँ प्रभु भंजन भव भीर ।

त्राहि त्राहि आरति हरन सरन सुखद रघुबीर ॥ ४५ ॥

मी तुमची सुकीर्ती ऐकून आलो आहे की, प्रभू जन्म-मरणाचे भय दूर करणारे आहेत. हे दुःखीजनांचे दुःख दूर करणारे आणि शरणागताला सुख देणारे श्रीरघुवीर ! माझे रक्षण करा. ‘ ॥ ४५ ॥

अस कहि करत दंडवत देखा । तुरत उठे प्रभु हरष बिसेषा ॥

दीन बचन सुनि प्रभु मन भावा । भुज बिसाल गहि हृदयँ लगावा ॥

असे म्हणत दंडवत करताना त्याला प्रभूंनी पाहिले मात्र आणि ते अत्यंत आनंदाने उठून उभे राहिले. बिभीषणाचे नम्र भाषण प्रभूंच्या मनाला खूप आवडले. त्यांनी आपल्या विशाल भुजांनी त्याला हृदयाशी धरले. ॥ १ ॥

अनुज सहित मिलि ढिग बैठारी । बोले बचन भगत भयहारी ॥

कहु लंकेस सहित परिवारा । कुसल कुठाहर बास तुम्हारा ॥

लक्ष्मणानेही त्याला आलिंगन दिल्यावर त्यांनी त्याला जवळ बसवून भक्तांचे भय दूर करणारे श्रीराम म्हणाले की, ‘ हे लंकेशा, परिवारासह आपले क्षेम-कुशल सांग. तुझा निवास वाईट जागी आहे. ( म्हणून विचारतो. ) ॥ २ ॥

खल मंडली बसहु दिनु राती । सखा धरम निबहइ केहि भॉंती ॥

मैं जानउँ तुम्हारि सब रीती । अति नय निपुन न भाव अनीती ॥

खल मंडली दुष्टांच्या मंडळीमध्ये राहतोस. अशा अवस्थेमध्ये हे मित्रा, तुला धर्म कसा सांभाळता येतो ? मला तुझा सर्व आचार-व्यवहार माहीत आहे. तू अत्यंत नीतिनिपुण आहेस, तुला अनीती बरी वाटत नाही. ॥ ३ ॥

बरु भल बास नरक कर ताता । दुष्ट संग जनि देइ बिधाता ॥

अब पद देखि कुसल रघुराया । जौं तुम्ह कीन्हि जानि जन दाया ॥

बाबा रे ! नरकात राहाणे चांगले; परंतु विधाता दुष्टांचा संग कधी न देवो. ‘ बिभीषण म्हणाला, ‘ हे रघुनाथा, आता तुमच्या चरणांच्या दर्शनामुळे सर्व कुशल आहे. तुम्ही आपला सेवक समजून माझ्यावर दया केलीत. ॥ ४ ॥

दोहा—तब लगि कुसल न जीव कहुँ सपनेहुँ मन बिश्राम ।

जब लगि भजत न राम कहुँ सोक धाम तजि काम ॥ ४६ ॥

जोपर्यंत जीव हा शोकाचे घर असणारी विषय-वासना सोडून श्रीरामांना भजत नाही, तोपर्यंत जीवाला सुख लाभत नाही आणि स्वप्नातही त्याच्या मनाला शांतता लाभत नाही. ॥ ४६ ॥

तब लगि हृदयँ बसत खल नाना । लोभ मोह मच्छर मद माना ॥

जब लगि उर न बसत रघुनाथा । धरें चाप सायक कटि भाथा ॥

लोभ, मोह, मत्सर, मद, मान इत्यादी अनेक दुष्ट विकार हृदयात तोपर्यंत राहात असतात जोपर्यंत धनुष्यबाण आणि कमरेला भाता धारण केलेले श्रीरघुनाथ हृदयामध्ये निवास करीत नाहीत. ॥ १ ॥

ममता तरुन तमी अँधिआरी । राग द्वेष उलूक सुखकारी ॥

तब लगि बसति जीव मन माहीं । जब लगि प्रभु प्रताप रबि नाहीं ॥

ममता ही पूर्ण अंधारी रात्र आहे. ती राग-द्वेषरुपी घुबडांना सुख देणारी आहे. ती ममतारुप रात्र तोपर्यंतच जीवाच्या मनात निवास करते, जोपर्यंत प्रभू, तुमचा प्रतापरुपी सूर्य उदय पावत नाही. ॥ २ ॥

अब मैं कुसल मिटे भय भारे । देखि राम पद कमल तुम्हारे ॥

तुम्ह कृपाल जा पर अनुकूला । ताहि न ब्याप त्रिबिध भव सूला ॥

हे श्रीराम, तुमच्या चरणारविंदांच्या दर्शनाने आता मी सुखरुप झालो आहे. माझे मोठे भय नाहीसे झाले. हे कृपाळू, तुम्ही ज्यांना अनुकूल असता, त्याला आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीनही प्रकारचे भवताप त्रास देत नाहीत. ॥ ३ ॥

मैं निसिचर अति अधम सुभाऊ । सुभ आचरनु कीन्ह नहिं काऊ ॥

जासु रुप मुनि ध्यान न आवा । तेहिं प्रभु हरषि हृदयँ मोहि लावा ॥

मी अत्यंत नीच स्वभावाचा राक्षस आहे. मी कधी चांगले

 आचरण केलेले नाही. असे असूनही ज्यांचे रुप मुनींच्या

 ध्यानातही येत नाही, त्या प्रभूंनी स्वतः आनंदाने मला

 हृदयाशी धरले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: