Wednesday, January 18, 2023

SunderKanda Part 17 Doha 47 to 49 सुंदरकाण्ड भाग १७ दोहा ४७ ते ४९

 

SunderKanda Part 17 ShriRamCharitManas 
Doha 47 to Doha 49
सुंदरकाण्ड भाग १७ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ४७ ते दोहा ४९

दोहा—अहोभाग्य मम अमित अति राम कृपा सुख पुंज ।

देखेउँ नयन बिरंचि सिव सेब्य जुगल पद कंज ॥ ४७ ॥

हे कृपा व सुखाचे निधान असलेले श्रीराम, ब्रह्मदेव व शिव हे ज्यांची सेवा करतात, त्या चरणकमल युगलांचे मी स्वतःच्या डोळ्यांनी आज दर्शन घेतले, हे माझे फार मोठे भाग्य आहे. ‘ ॥ ४७ ॥

सुनहु सखा निज कहउँ सुभाऊ । जान भुसुंडि संभु गिरिजाऊ ॥

जौं नर होइ चराचर द्रोही । आवै सभय सरन तकि मोही ॥

श्रीराम म्हणाले, ‘ हे मित्रा, मी तुला माझा स्वभाव सांगतो. तो काकभुशुंडी, शिव व पार्वती यांनाही ठाऊक आहे. कुणी मनुष्य संपूर्ण जगाचा जरी द्रोही असला, तरीही तो भयभीत होऊन जर मला शरण आला, ॥ १ ॥

तजि मद मोह कपट छल नाना । करउँ सद्य तेहि साधु समाना ॥

जननी जनक बंधु सुत दारा । तनु धनु भवन सुहृद परिवारा ॥

आणि मद, मोह आणि नाना प्रकारची कपट-फसवणूक त्याने सोडून दिली, तर मी फार लवकर त्याला साधुसारखा बनवितो. माता, पिता, भाऊ, पुत्र, स्त्री, शरीर, धन, घर, मित्र आणि परिवार, ॥ २ ॥

सब कै ममता ताग बटोरी । मम पद मनहि बॉंध बरि डोरी ॥

समदरसी इच्छा कछु नाहीं । हरष सोक भय नहिं मन माहीं ॥

जो या सर्वांच्या ममत्वरुपी धाग्यांना गुंडाळून त्या सर्वांची एक दोरी वळतो आणि त्या दोरीने आपले मन माझ्या चरणी बांधतो, जो समदर्शी आहे, ज्याला कशाची इच्छा नाही आणि ज्याच्या मनात हर्ष, शोक व भय नाही, ॥ ३ ॥

अस सज्जन मम उर बस कैसें । लोभी हृदयँ बसइ धनु जैसें ॥

तुम्ह सारिखे संत प्रिय मोरें । धरउँ देह नहिं आन निहोरें ॥

असा सज्जन, लोभी माणसाच्या मनात जसे धन वसलेले असते, तसा माझ्या मनात वसलेला असतो. तुझ्यासारखे संतच मला प्रिय असतात. मी इतर कोणत्याही कारणाने देह धारण करीत नाही. ॥ ४ ॥     

दोहा—सगुन उपासक परहित निरत नीति दृढ़ नेम ।

ते नर प्रान समान मम जिन्ह कें द्विज पद प्रेम ॥ ४८ ॥

जे सगुण-साकार भगवंताचे उपासक असतात, दुसर्‍याच्या हितासाठी झटतात, नीती आणि नियमांच्याबाबतीत कणखर असतात आणि ज्यांना ब्राह्मणांविषयी प्रेम आहे, ते मनुष्य मला प्राणांसारखे प्रिय असतात. ॥ ४८ ॥

सुनु लंकेस सकल गुन तोरें । तातें तुम्ह अतिसय प्रिय मोरें ॥

राम बचन सुनि बानर जूथा । सकल कहहिं जय कृपा बरुथा ॥

हे लंकापती, ऐक. तुझ्या अंगी वरील सर्व गुण आहेत. म्हणून तू मला अत्यंत आवडता आहेस. श्रीरामांचे बोलणे ऐकून वानरांचे सर्व समूह म्हणू लागले की, ‘ कृपानिधी श्रीरामांचा विजय असो.’ ॥ १ ॥

सुनत बिभीषनु प्रभु कै बानी । नहिं अघात श्रवनामृत जानी ॥

पद अंबुज गहि बारहिं बारा । हृदयँ समात न प्रेमु अपारा ॥

प्रभुंचे बोलणे ऐकताना कानांसाठी ते अमृत समजून बिभीषण तृप्त होत नव्हता. तो वारंवार श्रीरामांचे चरण-कमल धरीत होता. त्याच्या मनात अपार प्रेम होते. इतके की, ते हृदयात मावत नव्हते. ॥ २ ॥

सुनहु देव सचराचर स्वामी । प्रनतपाल उर अंतरजामी ॥

उर कछु प्रथम बासना रही । प्रभु पद प्रीति सरित सो बही ॥

बिभीषण म्हणाला, ‘ हे देवा, हे चराचराचे स्वामी, हे शरणागताचे रक्षक, हे सर्वांच्या हृदयामधील जाणणारे, माझ्या मनात पूर्वी काही विषयवासना होती, परंतु प्रभूंच्या चरणांच्या प्रीतिरुपी नदीमध्ये ती वाहून गेली. ॥ ३ ॥

अब कृपाल निज भगति पावनी । देहु सदा सिव मन भावनी ॥

एवमस्तु कहि प्रभु रनधीरा । मागा तुरत सिंधु कर नीरा ॥

आता तर हे कृपाळू ! शिवांच्या मनाला सदैव प्रिय वाटणारी आपली पवित्र भक्ती मला द्या.’ ‘ तथास्तु ‘ असे म्हणून रणधीर प्रभू श्रीरामांनी त्वरित समुद्र-जल मागविले. ॥ ४ ॥

जदपि सखा तव इच्छा नाहीं । मोर दरसु अमोघ जग माहीं ॥

अस कहि राम तिलक तेहि सारा । सुमन बृष्टि नभ भई अपारा ॥

आणि म्हटले, ‘ हे सखा, जरी तुझी इच्छा नसली, तरी जगामध्ये माझे दर्शन अमोघ आहे. ते निष्फल होत नाही. ‘ असे म्हणून श्रीरामांनी त्याला राजतिलक केला. आकाशांतून पुष्पांची अपार वृष्टी झाली. ॥ ५ ॥       

दोहा—रावन क्रोध अनल निज स्वास समीर प्रचंड ।

जरत बिभीषनु राखेउ दीन्हेउ राजु अखंड ॥ ४९ ( क ) ॥

रावणचा क्रोधरुपी अग्नी बिभीषणाच्या वचनांच्या वार्‍याने भडकला होता, त्यात जळण्यापासून बिभीषणाला श्रीरामांनी वाचविले आणि अखंड राज्य दिले. ॥ ४९ ( क ) ॥

जो संपति सिव रावनहि दीन्हि दिएँ दस माथ ।

सोइ संपदा बिभीषनहि सकुचि दीन्हि रघुनाथ ॥ ४९ ( ख ) ॥

रावणाने आपलया दहा शिरांचा बळी दिल्यावर शिवांनी जी संपत्ती त्याला दिली होती, तीच संपत्ती श्रीरघुनाथांनी बिभीषणाला मोठ्या संकोचाने दिली. ॥ ४९ ( ख ) ॥

अस प्रभु छाड़ि भजहिं जे आना । ते नर पसु बिनु पूँछ बिषाना ॥

निज जन जानि ताहि अपनावा । प्रभु सुभाव कपि कुल मन भावा ॥

अशा परम कृपाळू प्रभूंना सोडून जे दुसर्‍या कुणाला भजतात, ते शिंग व शेपूट नसलेले पशू होत. आपला सेवक मानून बिभीषणाला श्रीरामांनी स्वीकारले. प्रभूंचा हा स्वभाव वानरकुलाच्या मनाला आवडला. ॥ १ ॥

पुनि सर्बग्य सर्ब उर बासी । सर्बरुप सब रहित उदासी ॥

बोले बचन नीति प्रतिपालक । कारन मनुज दनुज कुल घालक ॥

नंतर सर्व काही जाणणारे, सर्वांच्या हृदयांत वसणारे, सर्व रुपांमध्ये प्रकट असणारे, सर्वांहून रहित, उदासीन, भक्तांवर कृपा करण्यासाठी मनुष्य बनलेले आणि राक्षस कुलाचा नाश करणारे श्रीराम नीतीचे पालन करण्यासाठी म्हणाले, ॥ २ ॥

सुनु कपीस लंकापति बीरा । केहि बिधि तरिअ जलधि गंभीरा ॥

संकुल मकर उरग झष जाती । अति अगाध दुस्तर सब भॉंती ॥

‘ हे वीर वानरराज सुग्रीव व लंकापती बिभीषण, ऐका. या खोल समुद्रास कसे ओलांडायचे ? अनेक प्रकारच्या मगरी, साप आणि मासे यांनी भरलेला हा अथांग सागर उल्लंघून जाण्यास फार कठीण आहे. ‘ ॥ ३ ॥

कह लंकेस सुनहु रघुनायक । कोटि सिंधु सोषक तव सायक ॥

जद्यपि तदपि नीति गाई । बिनय करिअ सागर सन जाई ॥

बिभीषण म्हणाला, ‘ हे रघुनाथ, जरी आपला एक

 बाणसुद्धा कोट्यावधी समुद्रांना शोषून घेऊ शकतो, परंतु

 नीती असे सांगते की, प्रथम जाऊन समुद्राला विनंती

 करावी, हे योग्य. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: