Wednesday, January 18, 2023

SunderKanda Part 19 Doha 53 to Doha 55 सुंदरकाण्ड भाग १९ दोहा ५३ ते दोहा ५५

 

SunderKanda Part 19 
ShriRamCharitManas 
Doha 53 to Doha 55 
सुंदरकाण्ड भाग १९ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ५३ ते दोहा ५५

दोहा—की भइ भेंट कि फिरि गए श्रवन सुजसु सुनि मोर ।

कहसि न रिपु दल तेज बल बहुत चकित चित तोर ॥ ५३ ॥

त्यांची तुझी भेट झाली की,कानांनी नुसती त्यांची कीर्ती ऐकून आलास ? शत्रु-सेनेचे तेज व बल किती आहे, ते सांगत का नाहीस ? तुझे चित्त फार थक्क झालेले दिसते. ‘ ॥ ५३ ॥

नाथ कृपा करि पूँछेहु जैसें । मानहु कहा क्रोध तजि तैसें ॥

मिला जाइ जब अनुज तुम्हारा । जातहिं राम तिलक तेहि सारा ॥

दूत म्हणाला, ‘ हे नाथ, तुम्ही ज्याप्रमाणे कृपा करुन विचारले, तसेच आता राग सोडून माझे म्हणणे ऐका. जेव्हा तुमचा भाऊ श्रीरामांना जाऊन भेटला, तेव्हा तो पोहोचताच श्रीरामांनी त्याला राजतिलक केला. ॥ १ ॥

रावन दूत हमहि सुनि काना । कपिन्ह बॉंधि दीन्हे दुख नाना ॥

श्रवन नासिका काटैं लागे । राम सपथ दीन्हें हम त्यागे ॥

आम्ही रावणाचे दूत आहोत, हे ऐकून वानरांनी आम्हांला बांधून घालून फार त्रास दिला. इतकेच काय, ते आमचे नाक-कान कापायला निघाले. आम्ही रामाची शपथ घातल्यावर त्यांनी आम्हांला सोडले. ॥ २ ॥

पूँछिहु नाथ राम कटकाई । बदन कोटि सत बरनि न जाई ॥

नाना बरन भालु कपि धारी । बिकटानन बिसाल भयकारी ॥

हे नाथ, तुम्ही रामांच्या सेनेबद्दल विचारले, तर तिचे वर्णन कोट्यावधी मुखांनीही करता येत नाही. अनेक रंगांची अस्वले आणि वानरांची सेना आहे. ते भयंकर तोंडाचे, विशाल देहाचे आणि भयानक आहेत. ॥ ३ ॥

जेहिं पुर दहेउ हतेउ सुत तोरा । सकल कपिन्ह महँ तेहि बलु थोरा ॥

अमित नाम भट कठिन कराला । अमित नाग बल बिपुल बिसाला ॥

ज्याने नगर जाळले आणि आपला पुत्र अक्षयकुमार याला मारले, त्या वानराचे बळ तर सर्व वानरांमध्ये कमीच आहे. असंख्य नावे असलेले खूपच कठोर आणि भयंकर योद्धे आहेत. त्यांच्यामध्ये असंख्य हत्तींचे बळ आहे आणि ते अतिशय विशाल आहेत. ॥ ४ ॥

दोहा—द्विबिद मयंद नील नल अंगद गद बिकटासि ।

दधिमुख केहरि निसठ सठ जामवंत बलरासि ॥ ५४ ॥

द्विविद, मयंद, नील, नल, अंगद, गद, विकटास्य, दधिमुख, केसरी, निशठ, शठ आणि जांबवान हे सर्व बळाचे सागर आहेत. ॥ ५४ ॥

ए कपि सब सुग्रीव समाना । इन्ह सम कोटिन्ह गनइ को नाना ॥

राम कृपॉं अतुलित बल तिन्हहीं । तृन समान त्रैलोकहि  गनहीं ॥

हे सर्व वानर बळामध्ये सुग्रीवासारखे आहेत, आणि त्यांच्यासारखे एक-दोन नव्हे, तर कोट्यावधी आहेत. त्या असंख्यांची गणती कोण करु शकणार ? श्रीरामांच्या कृपेमुळे त्यांच्यामध्ये अतुल्य बळ आहे. ते तिन्ही लोकांना कस्पटाप्रमाणे तुच्छ समजतात. ॥ १ ॥

अस मैं सुना श्रवन दसकंधर । पदुम अठारह जूथप बंदर ॥

नाथ कटक महँ सो कपि नाहीं । जो न तुम्हहि जीतै रन माहीं ॥

हे दशग्रीव, मी ऐकले आहे की, अथरा पद्मे तर वानरांचे सेनापतीच आहेत. हे नाथ, त्या सेनेमध्ये तुम्हांला युद्धात जिंकू शकणार नाही, असा एकही वानर नाही. ॥ २ ॥

परम क्रोध मीजहिं सब हाथा । आयसु पै न देहिं रघुनाथा ॥

सोषहिं सिंधु सहित झष ब्याला । पूरहिं न त भरि कुधर बिसाला ॥

सर्वच्या सर्व अत्यंत क्रोधाने हात चोळत बसले आहेत. परंतु श्रीरघुवीर त्यांना अजुनी आज्ञा देत नाहीत. ते म्हणतात, ‘ आम्ही मासे व सापांसह समुद्राला शोषून टाकू, नाहीतर मोठमोठ्या पर्वतांनी समुद्राला भरुन टाकू. ॥ ३ ॥

मर्दि गर्द मिलवहिं दससीसा । ऐसेइ बचन कहहिं सब कीसा ॥

गर्जहिं तर्जहिं सहज असंका । मानहुँ ग्रसन चहत हहिं लंका ॥

आणि रावणाला चिरडून त्याला धूळीत मिळवू ‘ सर्व वानर असेच बोलत आहेत. सर्वजण अगदी निर्भय आहेत. ते अशा प्रकारे गर्जना करतात व धावून येतात की, लंकेला गिळून टाकू पाहात आहेत. ॥ ४ ॥   

दोहा—सहज सूर कपि भालु सब पुनि सिर पर प्रभु राम ।

रावन काल कोटि कहुँ जीति सकहिं संग्राम ॥ ५५ ॥

सर्व वानर व अस्वले स्वभावतःच शूर आहेत. शिवाय त्यांच्या शिरावर सर्वेश्र्वर प्रभु श्रीराम आहेत. हे रावणा, ते युद्धामध्ये कोट्यावधी काळांना जिंकू शकतात. ॥ ५५ ॥

राम तेज बल बुधि बिपुलाई । सेष सहस सत सकहिं न गाई ॥

सक सर एक सोषि सत सागर । तव भ्रातहि पूँछेउ नय नागर ॥

श्रीरामचंद्रांचे सामर्थ्य, बळ आणि बुद्धी यांच्या महतीचे गायन लाखो शेषही करु शकत नाहीत. ते एका बाणाने शेकडो समुद्र शोषून टाकू शकतात. परंतु नीतिनिपुण श्रीरामांनी तुमच्या भावाला उपाय विचारला. ॥ १ ॥

तासु बचन सुनि सागर पाहीं । मागत पंथ कृपा मन माहीं ॥

सुनत बचन बिहसा दससीसा । जौं असि मति सहाय कृत कीसा ॥

त्याच्या बोलण्याप्रमाणे श्रीराम समुद्राला वाट मागत आहेत. त्यांच्या मनात कृपा भरलेली आहे, म्हणून ते त्याला शोषून टाकत नाहीत. ‘ दूताचे बोलणे ऐकून रावण खदखदा हसला आणि म्हणाला, ‘ श्रीरामाला अशी बुद्धी आहे तर ? म्हणूनच त्याने वानरांची मदत घेतली आहे. ॥ २ ॥

सहज भीरु कर बचन दृढ़ाई । सागर सन ठानी मचलाई ॥

मूढ़ मृषा का करसि बड़ाई । रिपु बल बुद्धि थाह मैं पाई ॥

स्वभावाने भित्र्या बिभीषणाचे बोलणे खरे मानून त्याने समुद्राशी बालहट्ट करायचे ठरविले आहे. अरे मूर्खा, त्याचे खोटे मोठेपण काय सांगतोस ? पुरे. शत्रू असलेल्या रामाच्या बल व बुद्धीचे रहस्य मला कळून चुकले. ॥ ३ ॥

सचिव सभीत बिभीषन जाकें । बिजय बिभूति कहॉं जग ताकें ॥

सुनि खल बचन दूत रिस बाढ़ी । समय बिचारि पत्रिका काढ़ी ॥

बिभीषणासारखा भित्रा ज्याचा मंत्री असेल, त्याला जगात विजय व ऐश्र्वर्य कसले मिळणार ? ‘ दुष्ट रावणाचे हे बोलणे ऐकून दूताला राग आला. त्याने संधी साधून चिठ्ठी काढली. ॥ ४ ॥

रामानुज दीन्ही यह पाती । नाथ बचाइ जुड़ावहु छाती ॥

बिहसि बाम कर लीन्ही रावन । सचिव बोलि सठ लाग बचावन ॥

आणि म्हटले, ‘ श्रीरामांचा लहान भाऊ लक्ष्मणाने ही चिठ्ठी दिली आहे. ‘ रावणाने ती डाव्या हाताने घेतली आणि मंत्र्याला बोलावून तो मूर्ख मंत्र्याकडून वाचून घेऊ लागला. ॥ ५ ॥  

 


Custom Search

No comments: