Friday, August 19, 2022

KikshindhaKanda Part 9 ShriRamCharitManas Doha 24 to Doha 27 किष्किन्धाकाण्ड भाग ९ श्रीरामचरितमानस दोहा २४ ते दोहा २७

 

KikshindhaKanda Part 9
ShriRamCharitManas 
Doha 24 to Doha 27 
किष्किन्धाकाण्ड भाग ९ 
श्रीरामचरितमानस 
दोहा २४ ते दोहा २७

दोहा---दिख जाइ उपबन बर सर बिगसित बहु कंज ।

मंदिर एक रुचिर तहँ बैठि नारि तप पुंज ॥ २४ ॥

आत गेल्यावर तेथे एक उत्तम उपवन व तलाव दिसला. त्यात पुष्कळ कमळे उमललेली होती. तेथे एक सुंदर मंदिर होत व त्यात एक तपस्विनी बसली होती. ॥ २४ ॥

दूरि ते ताहि सबन्हि सिरु नावा । पूछें निज बृत्तांत सुनावा ॥

तेहिं तब कहा करहु जल पाना । खासु सुरस सुंदर फल नाना ॥

सर्वांनी दुरुनच तिला मस्तक नम्र करुन नमस्कार केला. विचारल्यावर त्यांनी आपली हकिगत सांगितली. तेव्हा ती म्हणाली, ‘ पाणी प्या आणि तर्‍हेतर्‍हेची रसाळ फळे खा. ‘ ॥ १ ॥

मज्जनु कीन्ह मधुर फल खाए । तासु निकट पुनि सब चलि आए ॥

तेहिं सब आपनि कथा सुनाई । मैं अब जाब जहॉं रघुराई ॥

आज्ञा मिळताच सर्वांनी स्नान केले, गोड फळे खाल्ली आणि ते तिच्याकडे गेले. तेव्हा तिने आपली सर्व कथा सांगितली आणि म्हटले, ‘ आता मी रघुनाथांच्याकडे जाते. ॥ २ ॥

मूदहु नयन बिबर तजि जाहू । पैहहु सीतहि जनि पछिताहू ॥

नयन मूदि पुनि देखहिं बीरा । ठाढ़े सकल सिंधु कें तीरा ॥

तुम्ही सर्वजण डोळे मिटा आणि गुहा सोडून बाहेर जा. तुम्हांला सीता भेटेल. निराश होऊ नका. ‘ डोळे मिटून त्यांनी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा त्या सर्व वीरांना आपण समुद्रकाठी उभे आहोत, असे दिसले. ॥ ३ ॥

सो पुनि गई जहॉं रघुनाथा । जाइ कमल पद नाएसि माथा ॥

नाना भॉंति बिनय तेहिं कीन्ही । अनपायनी भगति प्रभु दीन्ही ॥

ती तपस्विनी स्वतः श्रीरघुनाथांच्याकडे गेली. तिने जाऊन प्रभूंचे चरण धुतले. नतमस्तक होऊन त्यांना विनवणी केली. तेव्हा प्रभूंनी तिला आपली अढळ भक्ती दिली. ॥ ४ ॥             

दोहा--- बदरीबन कहुँ सो गई प्रभु अग्या धरि सीस ।

उर धरि राम चरन जुग जे बंदत अज ईस ॥ २५ ॥

तिने प्रभूंची आज्ञा शिरोधार्य मानली आणि ब्रह्मदेव व महादेव श्रीरामांच्या ज्या चरणांना वंदन करतात, ते चरण हृदयी धरुन ती तपस्विनी स्वयंप्रभा बदरिकाश्रमाला गेली. ॥ २५ ॥

इहॉं बिचारहिं कपि मन माहीं । बीती अवधि काज कछु नाहीं ॥

सब मिलि कहहिं परस्पर बाता । बिनु सुधि लएँ करब का भ्राता ॥

इकडे वानरगणांच्या मनात काळजी वाटत होती की, एक महिन्याचा काळ लोटला, परंतु अद्याप काम झाले नाही. ते एकमेकांशी बोलू लागले की, ‘ हे बंधू , आता सीतेची वार्ता कळल्याविना परत जाऊन तरी काय करणार ?’ ॥ १ ॥

कह अंगद लोचन भरि बारी । दुहुँ प्रकार भइ मृत्यु हमारी ॥

इहॉं न सुधि सीता कै पाई । उहॉं गएँ मारिहि कपिराई ॥

अगंद डोळ्यांत पाणी आणून म्हणाला की, ‘ दोन्हीकडून आमचे मरण ओढवले आहे. इथे तर सीतेची गंधवार्ता नाही आणि तिथे गेल्यावर वानरराज सुग्रीव ठार करील. ॥ २ ॥

पिता बधे पर मारत मोही । राखा राम निहोर न ओही ॥

पुनि पुनि अंगद कह सब पाहीं । मरन भयउ कछु संसय नाहीं ॥

त्याने माझ्या पित्याचा वध झाल्यावरच मला मारले असते. श्रीरामांनी माझे रक्षण केले, त्यात सुग्रीवाने काही उपकार केलेले नाहीत.’ अंगद सर्वांना सांगत होता की, आता मरण ओढवले आहे यात काही शंका नाही. ॥ ३ ॥

अंगद बचन सुनत कपि बीरा । बोलि न सकहिं नयन बह नीरा ॥

छन एक सोच मगन होइ रहे । पुनि अस बचन कहत सब भए ॥

वानरवीर अंगदाचे बोलणे ऐकून घेत होते. पण बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. एका क्षणांत सर्वजण काळजीत पडले. मग सर्वजण म्हणू लागले. ॥ ४ ॥

हम सीता कै सुधि लीन्हें बिना । नहिं जैहैं जुबराज प्रबीना ॥

अस कहि लवन सिंधु तट जाई । बैठे कपि सब दर्भ डसाई ॥

‘ हे सुज्ञ युवराज ! आम्ही सीतेचा शोध घेतल्याशिवाय परतणार नाही. ‘ असे म्हणून ते लवणसागराच्या तटावर प्रायोपवेशनासाठी कुश अंथरुन बसले. ॥ ५ ॥

जामवंत अंगद दुख देखी । कहीं कथा उपदेस बिसेषी ॥

तात राम कहुँ नर जनि मानहु । निर्गुन ब्रह्म अजित अज जानहु ॥

जांबवानाने अंगदाचे दुःख पाहून खास उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, बाळा, श्रीरामांना मनुष्य मानू नकोस. ते निर्गुण ब्रह्म, अजेय आणि अजन्मा आहेत, असे समज. ॥ ६ ॥

हम सब सेवक अति बड़भागी । संतत सगुन ब्रह्म अनुरागी ॥

आपण निरंतर सगुण ब्रह्म असलेल्या श्रीरामांवर प्रेम करतो. आपण सर्व सेवक मोठे भाग्यवान आहोत. ॥ ७ ॥

दोहा---निज इच्छॉं प्रभु अवतरइ सुर महि गो द्विज लागि ।

सगुन उपासक संग तहँ रहहिं मोच्छ सब त्यागि ॥ २६ ॥

देव, पृथ्वी, गाई व ब्राह्मण यांच्या हितासाठी प्रभू आपल्या इच्छेने जेथे अवतार घेतात, तेथे सगुणोपासक सर्व प्रकारचे मोक्ष सोडून त्यांच्या सेवेसाठी सोबत असतात. ॥ २६ ॥

एहि बिधि कथा कहहिं बहुभॉंती । गिरि कंदरॉं सुनी संपाती ॥

बाहेर होइ देखि बहु कीसा । मोहि अहार दीन्ह जगदीसा ॥

अशाप्रकारे जांबवान बर्‍याच गोष्टी सांगत होता. त्याचे हे बोलणे पर्वताच्या गुहेत बसलेल्या संपातीने ऐकले. बाहेर आल्यावर त्याला पुष्कळ वानर दिसले. तेव्हा तो म्हणाला, ‘ जगदीश्वराने घरात बसल्या बसल्या पुष्कळसा आहार माझ्यासाठी पाठवून दिला आहे. ॥ १ ॥

आजु सबहि कहँ भच्छन करऊँ । दिन बहु चले अहार बिनु मरऊँ ॥

कबहुँ न मिल भरि उदर अहारा । आजु दिन्हि बिधि एकहिं बारा ॥

आज मी या सर्वांना खाऊन टाकतो. बरेच दिवस मी अन्नाविना मरत होतो. पोटभर भोजन कधी मिळाले नाही. आज विधात्याने एकाच वेळी पुष्कळ भोजन दिले.’ ॥ २ ॥

डरपे गीध बचन सुनि काना । अब भा मरन सत्य हम जाना ॥

कपि सब उठे गीध कहँ देखी । जामवंत मन सोच बिसेषी ॥

गिधाडाचे बोल ऐकून सर्वजण घाबरले की, आता खरोखर मरण आले आहे. हे आम्हांला कळले. नंतर त्या गिधाड संपातीला पाहण्यासाठी सर्व वानर थोडे उठून उभे राहिले. जांबवानाला जास्त काळजी वाटू लागली. ॥ ३ ॥

कह अंगद बिचारि मन माहीं । धन्य जटायू सम कोइ नाहीं ॥

राम काज कारन तनु त्यागी । हरि पुर गयउ परम बड़भागी ॥

अंगद मनात विचार करुन म्हणाला, ‘ अहाहा ! जटायूसारखा धन्य कोणी नाही. श्रीरामांच्या कार्यासाठी त्याने देहत्याग केला. तो परम भाग्यवान भगवंताच्या परमधामी गेला. ॥ ४ ॥

सुनि खग हरष सोक जुत बानी । आवा निकट कपिन्ह भय मानी ॥

तिन्हहि अभय करि पूछेसि जाई । कथा सकल तिन्ह ताहि सुनाई ॥

हे हर्ष व शोकयुक्त बोलणे ऐकून संपाती वानरांच्या जवळ आला. वानर घाबरुन गेले. त्यांना अभय देऊन जवळ येऊन जटायूचा वृत्तांत्त विचारला. तेव्हा वानरांनी सर्व हकिगत त्याला सांगितली. ॥ ५ ॥

सुनि संपाति बंधु कै करनी । रघुपति महिमा बहुबिधि बरनी ॥

बंधू जटायूची अद्भुत कामगिरी ऐकून संपातीने अनेक प्रकारे श्रीरघुनाथांचा महिमा वर्णन केला. ॥ ६ ॥

दोहा—मोहि लै जाहु सिंधुतट देउँ तिलांजलि ताहि ।

बचन सहाइ करबि मैं पैहहु खोजहु जाहि  ॥ २७ ॥

तो म्हणाला, ‘ मला समुद्रकिनारी घेऊन चला. मी जटायूला तिलांजली देतो. या सेवेबद्दल मी तुम्हांला सीतेचा ठावठिकाणा सांगून मदत करीन. जिला तुम्ही शोधत आहात, ती तुम्हांला भेटेल.’ ॥ २७ ॥

अनुज क्रिया करि सागर तीरा । कहि निज कथा सुनहु कपि बीरा ॥

हम द्वौ बंधु प्रथम तरुनाई । गगन गए रबि निकट उड़ाई ॥

समुद्रकिनार्‍यावर संपातीने आपला भाऊ जटायू याचे श्राद्धादी कर्म केले आणि तो स्वतःची हकीगत सांगू लागला, ‘ हे वीर वानरांनो, आम्ही दोघे भाऊ नवतारुण्यात एकदा आकाशात उडून सूर्याजवळ पोहोचलो. ॥ १ ॥

तेज न सहि सक सो फिरि आवा । मैं अभिमानी रबि निअरावा ॥

जरे पंख अति तेज अपारा । परेउँ भूमि करि घोर चिकारा ॥

जटायू ते तेज सहन करु शकला नाही, म्हणून तो परत आला. परंतु मी गर्विष्ठ होतो, म्हणून सूर्याजवळ गेलो. सूर्याच्या अत्यंत अपार तेजामुळे माझे पंख जळून गेले. मी जोराने किंचाळून जमिनीवर पडलो. ॥ २ ॥

मुनि एक नाम चंद्रमा ओही । लागी दया देखि करि मोही ॥

बहु प्रकार तेहि ग्यान सुनावा । देहजनित अभिमान छड़ावा ॥

तेथे चंद्रमा नावाचे एक मुनी होते. मला पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला पुष्कळ ज्ञानोपदेश दिला आणि माझा देहजनित अभिमान दूर केला. ॥ ३ ॥

त्रेतॉं ब्रह्म मनुज तनु धरिही । तासु नारि निसिचर पति हरिही ॥

तासु खोज पठइहि प्रभू दूता । तिन्हहि मिलें तैं होब पुनीता ॥

ते म्हणाले, ‘ त्रेतायुगात प्रत्यक्ष परब्रह्म मनुष्यशरीर धारण करणार आहे. त्यांच्या स्त्रीला राक्षसांचा राजा हरण करुन नेईल, तिच्या शोधासाठी प्रभू दूत पाठवतील. ते दूत भेटल्यावर तूं पवित्र होशील. ॥ ४ ॥

जमिहहिं पंख करसि जनि चिंता । तिन्हहि देखाइ देहेसु तैं सीता ॥

मुनि कइ गिरा सत्य भइ आजू । सुनि मम बचन करहु प्रभु काजू ॥

आणि तुला पंख फुटतील, चिंता करु नकोस. तू त्यांना सीतेचा पत्ता दे.’ मुनींची वाणी आज खरी ठरली. आता माझे बोलणे ऐकून तुम्ही प्रभूंचे काम करा. ॥ ५ ॥

गिरि त्रिकूट ऊपर बस लंका । तहँ रह रावन सहज असंका ॥

तहँ असोक उपबन जहँ रहई । सीता बैठि सोच रत अहई ॥ 

त्रिकूट पर्वतावर लंका वसलेली आहे. तेथे स्वभावातःच निर्भय असलेला रावण राहातो. तेथे अशोक नावाचे उपवन आहे. तेथे सीता राहाते. ती यावेळी मोठ्या काळजीत बसली आहे. ॥ ६ ॥



Custom Search

KikshindhaKanda Part 8 ShriRamCharitManas Doha 21 to Doha 23 किष्किन्धाकाण्ड भाग ८ श्रीरामचरितमानस दोहा २१ ते दोहा २३

 

KikshindhaKanda Part 8
ShriRamCharitManas 
Doha 21 to Doha 23 
किष्किन्धाकाण्ड भाग ८ 
श्रीरामचरितमानस 
दोहा २१ ते दोहा २३

दोहा---एहि बिधि होत बतकही आए बानर जूथ ।

नाना बरन सकल दिसि देखिअ कीस बरुथ ॥ २१ ॥

अशाप्रकारे बोलणे चालले होते, एवढ्यात वानरांच्या झुंडी आल्या. अनेक रंगांचे वानरांचे समूह सर्व दिशांना दिसू लागले. ॥ २१ ॥

बानर कटक उमा मैं देखा । सो मूरुख जो करन चह लेखा ॥

आइ राम पद नावहिं माथा । निरखि बदनु सब होहिं सनाथा ॥

शिव म्हणतात, ‘ हे उमे, वानरांची ती सेना मी पाहिली होती. तिची गणती करणारा महामूर्ख होय. सर्व वानर येऊन श्रीरामांच्या चरणीं मस्तक ठेवत होते, आणि त्यांच्या सौंदर्य-माधुर्य-निधीअसलेल्या श्रीमुखाचे दर्शन घेऊन कृतार्थ होत होते. ॥ १ ॥

अस कपि एक न सेना माहीं । राम कुसल जेहि पूछी नाहीं ॥

यह कछु नहिं प्रभु कइ अधिकाई । बिस्वरुप ब्यापक रघुराई ॥

श्रीरामांनी ज्याची खुशाली विचारली नाही, असा सेनेमध्ये एकही वानर नव्हता. त्यांच्या दृष्टीने ही काही विशेष गोष्ट नव्हती,’ कारण श्रीरघुनाथ हे विश्वरुप आणि सर्वव्यापक आहेत. ॥ २ ॥

ठाड़े जहँ तहँ आयसु पाई । कह सुग्रीव सबहि समुझाई ॥

राम काजु अरु मोर निहोरा । बानर जूथ जाहु चहुँ ओरा ॥

आज्ञा घेऊन सर्वजण जिकडे तिकडे उभे राहिले. तेव्हा सुग्रीवाने सर्वांना समजावून सांगितले की, ‘ हे वानर-समूहांनो, हे श्रीरघुनाथांचे काम आहे आणि माझी तुम्हांला विनंती आहे. तुम्ही चोहीकडे जा, ॥ ३ ॥     

जनकसुता कहुँ खोजहु जाई । मास दिवस महँ आएहु भाई ॥

अवधि मेटि जो बिनु सुधि पाएँ । आवइ बनिहि सो मोहि मराएँ ॥

आणि जाऊन जानकीचा शोध घ्या. हे बंधूंनो, महिन्याभरात परत या. जो महिन्याभराचा काळ घालवून शोध न घेता परत येईल, त्याचा मी वध करीन.’ ॥ ४ ॥

दोहा---बचन सुनत सब बानर जहँ तहँ चले तुरंत ।

तब सुग्रीवँ बोलाए अंगद नल हनुमंत ॥ २२ ॥

सुग्रीवाचे बोलणे ऐकून सर्व वानर निरनिराळ्या दिशांना गेले. तेव्हा सुग्रीवाने अंगद, नल, हनुमान इत्यादी मुख्य-मुख्य योद्ध्यांना बोलावून सांगितले, ॥ २२ ॥

सुनहु नील अंगद हनुमाना । जामवंत मतिधीर सुजाना ॥

सकल सुभट मिलि दच्छिन जाहू । सीता सुधि पूँछेहु सब काढ

‘ हे स्थिर बुद्धी असणार्‍या चतुर नीला, अंगदा, जांबुवंता आणि हनुमाना ! तुम्ही सारे श्रेष्ठ योद्धे मिळून दक्षिणेकडे जा आणि भेटेल त्याला सीतेचा पत्ता विचारा. ॥ १ ॥

मन क्रम बचन सो जतन बिचारेहु । रामचंद्र कर काजु सँवारेहु ॥

भानु पीठि सेइअ उर आगी । स्वामिहि सर्ब भाव छल त्यागी ॥

मन, वचन व कर्माने सीतेचा शोध घेण्याचाच उपाय करा. श्रीरामचंद्रांचे काम पुरे करा. सूर्याचे पाठीमागून व अग्नीचे समोरुन सेवन करावे, परंतु स्वामींची सेवा फसवणूक न करता सर्वभावाने केली पाहिजे. ॥ २ ॥

तजि माया सेइअ परलोका । मिटहिं सकल भवसंभव सोका ॥

देह धरे कर यह फलु भाई । भजिअ राम सब काम बिहाई ॥

विषयांची ममता व आसक्ती सोडून परलोकीचे दिव्यधाम प्राप्त करण्यासाठी भगवत्सेवारुप असलेले साधन केले पाहिजे, त्यामुळे जन्म-मरणरुप भयामुळे उत्पन्न होणारे सर्व दुःख नाहीसे होईल. हे बंधूंनो, सर्व कामना सोडून श्रीरामांचे भजनच केले पाहिजे, हेच देह धारण करण्याचे फल आहे. ॥ ३ ॥

सोइ गुनग्य सोई बड़भागी । जो रघुबीर चरन अनुरागी ॥

आयसु मागि चरन सिरु नाई । चले हरषि सुमिरत रघुराई ॥

जो श्रीरघुनाथंच्या चरणांचा भक्त असतो, तो सद्गुरु जाणणारा आणि मोठ्या भाग्याचा असतो. ‘ मग सर्वजण आज्ञा घेऊन व चरणी मस्तक नमवून श्रीरामचंद्रांचे स्मरण करीत आनंदाने निघाले. ॥ ४ ॥

पाछें पवन तनय सिरु नावा । जानि काज प्रभु निकट बोलावा ॥

परसा सीस सरोरुह पानी । करमुद्रिका दीन्हि जन जानी ॥

सर्वांच्या शेवटी पवनसुत हनुमानाने मस्तक नमविले. कार्याचे महत्व लक्षात आणून प्रभूंनी त्याला जवळ बोलाविले. त्यांनी आपल्या कर-कमलांनी त्याच्या मस्तकाला स्पर्श केला आणि आपला खास सेवक समजून आपल्या हातातील अंगठी काढून त्याला दिली. ॥ ५ ॥

बहु प्रकार सीतहि समुझाएहु । कहि बल बिरहु बेगि तुम्ह आएहु ॥

हनुमत जन्म सुफल करि माना । चलेउ हृदयँ धरि कृपानिधाना ॥

आणि म्हटले, ‘ अनेक प्रकारे सीतेला समजावून सांग आणि माझे सामर्थ्य व विरह हे तिला सांगून तू लवकर परत ये.’ यामुळे हनुमानाला आपला जन्म सार्थक झाल्याचे वाटले आणि प्रभूंना हृदयामध्ये धारण करुन तो निघाला. ॥ ६ ॥

जद्यपि प्रभु जानत सब बाता । राजनीति राखत सुरत्राता ॥

देवांचे रक्षण करणारे प्रभू सर्व गोष्टी जाणतात. परंतु ते राजनीती पाळण्यासाठी व नीतीची मर्यादा राखण्यासाठी सीतेचा शोध घेण्याकरिता वानरांना सर्वत्र पाठवीत आहेत. ॥ ७ ॥

दोहा—चले सकल बन खोजत सरिता सर गिरि खोह ।

राम काज लयलीन मन बिसरा तन कर छोह ॥ २३ ॥

सर्व वानर वन, नदी, तलाव, पर्वतांवरील गुहा यांमध्ये शोधत निघाले, मन श्रीरामांच्या कार्यामध्ये मग्न होते. ते शरीराचे ममत्वही विसरले होते. ॥ २३ ॥

कतहुँ होइ निसिचर सैं भेंटा । प्रान लेहिं एक एक चपेटा ॥

बहु प्रकार गिरि कानन हेरहिं । कोउ मुनि मिलइ ताहि सब घेरहिं ॥

कुठे राक्षस भेटला, तर ते एकेका थपडीने त्यांचे प्राण घेत होते, ते पर्वत व वने याठिकाणी तर्‍हेतर्‍हेने शोधत होते. कुणी मुनी भेटला, तर सीतेचा पत्ता विचारण्यासाठी त्याच्याजवळ कोंडाळे करीत होते. ॥ १ ॥

लागि तृषा अतिसय अकुलाने । मिलइ न जल घन गहन भुलाने ॥

मन हनुमान कीन्ह अनुमाना । मरन चहत सब बिनु जल पाना ॥

इतक्यात तहान लागल्यामुळे सर्व व्याकुळ झाले, परंतु कुठेही पाणी मिळेना. दाट जंगलात सर्वजण भरकटले. हनुमानाला अदाज आला की, पाणी मिळाले नाही तर सर्व मरतील. ॥ २ ॥

चढ़ि गिरि सिखर चहूँ दिसि देखा । भूमि बिबर एक कौतुक पेखा ॥

चक्रबाक बक हंस उड़ाहीं । बहुतक खग प्रबिसहिं तेहि माहीं ॥

त्याने डोंगराच्या शिखरावर जाऊन चोहीकडे पाहिले, तेव्हा त्याला पृथ्वीवर एका गुहेमध्ये एक आश्चर्यजनक गोष्ट दिसली. तिच्यावर पुष्कळ चक्रवाक, बगळे आणि हंस उडत होते आणि पुष्कळ पक्षी त्या गुहेत जात होते. ॥ ३ ॥

गिरि ते उतरि पवनसुत आवा । सब कहुँ लै सोइ बिबर देखावा ॥

आगें कै हनुमंतहि लीन्हा । पैठे बिबर बिलंबु न कीन्हा ॥

पवनकुमार हनुमानाने पर्वतावरुन खाली उतरुन सर्वांना

 ती गुहा दाखविली. सर्वजण हनुमानाला पुढे करुन वेळ

 न घालविता गुहेत घुसले. ॥ ४ ॥



Custom Search

KikshindhaKanda Part 7 ShriRamCharitManas Doha 18 to Doha 20 किष्किन्धाकाण्ड भाग ७ श्रीरामचरितमानस दोहा १८ ते दोहा २०

 

KikshindhaKanda Part 7 
ShriRamCharitManas 
Doha 18 to Doha 20 
किष्किन्धाकाण्ड भाग ७ 
श्रीरामचरितमानस 
दोहा १८ ते दोहा २०

 दोहा—तब अनुजहि समुझावा रघुपति करुना सींव ।

भय देखाइ लै आवहु तात सखा सुग्रीव ॥ १८ ॥

तेव्हा दयेची परिसीमा असलेल्या श्रीरघुनाथांनी लक्ष्मणाला समजावले की, हे वत्सा, सुग्रीव आपला मित्र आहे. म्हणून त्याला केवळ भीती दाखवून घेऊन ये. ॥ १८ ॥

इहॉं पवनसुत हृदयँ बिचारा । राम काजु सुग्रीवँ बिसारा ॥

निकट जाइ चरनन्हि सिरु नावा । चारिहु बिधि तेहिकहि समुझावा ॥

इकडे किष्किंधानगरीमध्ये पवनकुमार हनुमानाने विचार केला की, सुग्रीव श्रीरामांचे कार्य विसरुन गेला आहे. त्याने सुग्रीवापाशी जाऊन चरणांवर मस्तक नमविले आणि साम, दाम, भेद, दंड या चारी प्रकारच्या नीती सांगून त्याला समजाविले. ॥ १ ॥

सुनि सुग्रीवँ परम भय माना । बिषयँ मोर हरि लीन्हेउ ग्याना ॥

अब मारुतसुत दूत समूहा । पठवहु जहँ तहँ बानर जूहा ॥

हनुमानाचे बोलणे ऐकून सुग्रीवाला फार भीती वाटली. तो म्हणाला, ‘ विषयांनी माझे ज्ञान हरण केले. आता हे पवनपुत्रा, जिथे जिथे वानरांचे कळप आहेत, तिथे तिथे तूं दूतांना पाठव. ॥ २ ॥

कहहु पाख महुँ आव न जोई । मोरें कर ता कर बध होई ॥

तब हनुमंत बोलाए दूता । सब कर करि सनमान बहूता ॥

आणि निरोप पाठव की, एका पंधरवड्यात जो येणार नाही, त्याचा माझ्या हातून वध होईल.’ हनुमानाने दूतांना बोलावले आणि सर्वांचा मान राखत, ॥ ३ ॥

भय अरु प्रीति नीति देखराई । चले सकल चरनन्हि सिर नाई ॥

एहि अवसर लछिमन पुर आए । क्रोध देखि जहँ तहँ कपि धाए ॥

सर्वांना भय, प्रेम आणि नीती दाखवून दिली. सर्व वानर नतमस्तक होऊन निघाले. त्याचवेळी लक्ष्मण नगरात पोहोचला. त्याचा राग पाहून वानर जिकडे तिकडे पळाले. ॥ ४ ॥

दोहा—धनुष चढ़ाइ कहा तब जारि करउँ पुर छार ।

ब्याकुल नगर देखि तब आयउ बालिकुमार ॥ १९ ॥

नंतर लक्ष्मणाने धनुष्य सज्ज करुन म्हटले की,  ‘ मी आताच नगराची राखरांगोळी करुन टाकतो.’ तेव्हा संपूर्ण नगर व्याकूळ झाल्याचे पाहून वालीपुत्र अंगद त्याच्याजवळ आला. ॥ १९ ॥

चरन नाइ सिरु बिनती कीन्ही । लछिमन अभय बॉंह तेहि दीन्ही ॥

क्रोधवंत लछिमन सुनि काना । कह कपीस अति भयँ अकुलाना ॥

अंगदाने त्याच्यासमोर नतमस्तक होऊन क्षमायाचना केली. तेव्हा लक्ष्मणाने त्याला भिऊ नकोस असे म्हणून अभय दिले. सुग्रीवाने स्वतःच्या कानांनी लक्ष्मणाचे रागाचे बोलणे ऐकून भयाने खूप व्याकूळ होऊन म्हटले, ॥ १ ॥

सुनु हनुमंत संग लै तारा । करि बिनती समुझाउ कुमारा ॥

तारा सहित जाइ हनुमाना । चरन बंदि प्रभु सुजस बखाना ॥

‘ हे हनुमाना ! ऐकून घे. तू तारेला सोबत घेऊन जा व राजकुमाराला समजावून शांत कर.’ हनुमानाने तारेसह जाऊन लक्ष्मणाच्या चरणी वंदन केले व प्रभूंच्या सुंदर कीर्तीची वाखाणणी केली. ॥ २ ॥

करि बिनती मंदिर लै आए । चरन पखारि पलँग बैठाए ॥

तब कपीस चरनन्हि सिरु नावा । गहि भुज लछिमन कंठ लगावा ॥

विनंती करुन ते लक्ष्मणाला महालात घेऊन आले आणि त्याचे चरण धुऊन त्याला पलंगावर बसविले.मग वानरराज सुग्रीव त्याच्या पाया पडू लागला, तेव्हा लक्ष्मणाने त्याचा हात धरुन त्याला मिठी मारली. ॥ ३ ॥

नाथ बिषय सम मद कछु नाहीं । मुनि मन मोह करइ छन माहीं ॥

सुनत बिनीत बचन सुख पावा । लछिमन तेहि बहु बिधि समुझावा ॥

सुग्रीव म्हणाला, ‘ हे नाथ, विषयासारखा इतर कोणताही मद नाही. तो मुनींच्या मनांतही एका क्षणात मोह उत्पन्न करतो. मग मी तर विषयी जीव. ’ सुग्रीवाचे नम्र बोलणे ऐकून लक्ष्मणाला आनंद झाला आणि त्याने सुग्रीवाला खूप समजावून धीर दिला. ॥ ४ ॥

पवन तनय सब कथा सुनाई । जेहि बिधि गए दूत समुदाई ॥

तेवढ्यात पवनसुत हनुमानाने कशाप्रकारे सर्व दिशांना दूतांचे समूह गेले आहेत, ते सर्व सांगितले. ॥ ५ ॥

दोहा—हरषि चले सुग्रीव तब अंगदादि कपि साथ ।

रामानुज आगें करि आए जहँ रघुनाथ ॥ २० ॥

मग अंगद इत्यादी वानरांना सोबत घेऊन आणि लक्ष्मणाला पुढे घालून सुग्रीव आनंदाने श्रीरामांच्याकडे आला. ॥ २० ॥

नाइ चरन सिरु कह कर जोरी । नाथ मोहि कछु नाहिन खोरी ॥

अतिसय प्रबल देव तव माया । छूटइ राम करहु जौं दाया ॥

श्रीरघुनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन व हात जोडून सुग्रीव म्हणाला, ‘ हे नाथ, यात माझा काही दोष नाही. हे देव, तुमची माया ही अत्यंत प्रबळ आहे. हे राम, तुम्ही जेव्हा दया करता, तेव्हाच ती सुटते. ॥ १ ॥

बिषय बस्य सुर नर मुनि स्वामी । मैं पावँर पसु कपि अति कामी ॥

नारि नयन सर जाहि न लागा । घोर क्रोध तम निसि जो जागा ॥

हे स्वामी, देव, मनुष्य आणि मुनी हे सर्व विषयांना वश असतात. मग मी तर पामर पशू आणि पशूंच्यामध्ये अत्यंत कामी वानर आहे. स्त्रीचा नयन-बाण ज्याला लागत नाही, जो भयंकर क्रोधरुपी अंधार्‍या रात्रीही जागत असतो, जो क्रोधाने आंधळा होत नाही, ॥ २ ॥

लोभ पॉंस जेहिं गर न बँधाया । सो नर तुम्ह समान रघुराया ॥

यह गुन साधन तें नहिं होई । तुम्हरी कृपॉं पाव कोइ कोई ॥

आणि लोभाच्या दोरीमध्ये ज्याने आपला गळा अडकविला नाही, हे रघुनाथा, तो मनुष्य तुमच्यासमान होय, हे गुण साधनाने प्राप्त होत नाहीत. तुमच्या कृपेमुळेच एखाद्यालाच हे प्राप्त होतात.’ ॥ ३ ॥

तब रघुपति बोले मुसुकाई । तुम्ह प्रिय मोहि भरत जिमि भाई ॥

अब सोइ जतनु करहु मन लाई । जेहि बिधि सीता कै सुधि पाई ॥

तेव्हा रघुनाथ हसत म्हणाले, ‘ हे बंधू, तू मला

 भरतासारखा प्रिय आहेस. आता मन लावून सीतेची वार्ता

 काढण्याचाच उपाय कर. ‘ ॥ ४ ॥



Custom Search

KikshindhaKanda Part 6 ShriRamCharitManas Doha 15 to Doha 17 किष्किन्धाकाण्ड भाग ६ श्रीरामचरितमानस दोहा १५ ते दोहा १७

 

KikshindhaKanda Part 6
ShriRamCharitManas 
Doha 15 to Doha 17 
किष्किन्धाकाण्ड भाग ६ 
श्रीरामचरितमानस 
दोहा १५ ते दोहा १७

दोहा---कबहुँ प्रबल बह मारुत जहँ तहँ मेघ बिलाहिं ।

जिमि कपूत के उपजें कुल सद्धर्म नसाहिं ॥ १५ ( क ) ॥

कधी कधी वारे जोराने वाहातात, त्यामुळे मेघ इकडे तिकडे नाहीसे होतात. ज्याप्रमाणे कुपुत्र उत्पन्न झाल्यावर उत्तम कुलाचार नष्ट होतात. ॥ १५ ( क ) ॥

कबहुँ दिवस महँ निबिड़ तम कबहुँक प्रगट पतंग ।

बिनसइ उपजइ ग्यान जिमि पाइ कुसंग सुसंग ॥ १५ ( ख ) ॥

कधी मेघांमुळे दिवसा अंधार दाटून येतो आणि कधी सूर्य प्रकट होतो. ज्याप्रमाणे कुसंगाने ज्ञान नष्ट होते आणि सत्संग मिळाल्यावर ते पुन्हा प्रकट होते. ॥ १५ ( ख ) ॥

बरष बिगत सरद रितु आई । लछिमन देखहु परम सुहाई ॥

फूलें कास सकल महि छाई । जनु बरषॉं कृत प्रगट बुढ़ाई ॥

हे लक्ष्मणा, बघ. वर्षाकाल संपला आणि परम सुंदर शरद् ऋतू आला. फुललेल्या कास गवतामुळे संपूर्ण पृथ्वी झाकली गेली आहे. जणू वर्षाऋतूने कासरुपी पांढर्‍या केसांच्या रुपाने आपले म्हातारपण प्रकट केले आहे. ॥ १ ॥

उदित अगस्ति पंथ जल सोषा । जिमि लोभहि सोषइ संतोषा ॥

सरिता सर निर्मल जल सोहा । संत हृदय जस गत मद मोहा ॥

ज्याप्रमाणे संतोष हा लोभाला शोषून घेतो, त्याप्रमाणे अगस्त्य तार्‍याने उदित होऊन मार्गावरील पाणी शोषले आहे. ज्याप्रमाणे संतांचे हृदय मद-मोहरहित निर्मल असते, त्याप्रमाणे नद्या व तलाव यांचे निर्मळ जल शोभत आहे. ॥ २ ॥          

रस रस सूख सरित सर पानी । ममता त्याग करहिं जिमि ग्यानी ॥

जानि सरद रितु खंजन आए । पाइ समय जिमि सुकृत सुहाए ।

नद्या व तलाव यांचे पाणी हळू हळू घटत आहे, ज्याप्रमाणे ज्ञानी पुरुष ममतेचा त्याग करतात. शरदऋतूची चाहूल लागताच खंजन पक्षी आले आहेत, ज्याप्रमाणे वेळ येताच चांगले पुण्य प्रगट होते.

पंक न रेनु सोह असि धरनी । नीति निपुन नृप कै जसि करनी ॥

जल संकोच बिकल भइँ मीना । अबुध कुटुंबी जिमि धनहीना ॥

ज्याप्रमाणे नीतिनिपुण राजाचा कारभार स्वच्छ असतो, त्याप्रमाणे चिखल व धूळ नसल्याने धरणी निर्मल बनून शोभून दिसत आहे. पाणी कमी झाल्यामुळे मासे व्याकूळ झाले आहेत, ज्याप्रमाणे विवेकशून्य गृहस्थ धनाविना व्याकूळ होतो. ॥ ४ ॥

बिनु घन निर्मल सोह अकासा । हरिजन इव परिहरि सब आसा ॥

कहुँ कहुँ बृष्टि सारदी थोरी । कोउ एक पाव भगति जिमि मोरी ॥

मेघांविना निर्मळ आकाश असे शोभून दिसत आहे की, ज्याप्रमाणे भगवद् भक्त सर्व आशा सोडून निर्मळ होतात. कुठे कुठे शरऋतूचा थोडा थोडा पाऊस पडत आहे, ज्याप्रमाणे कोणी विरळाच माझी भक्ती प्राप्त करतो. ॥ ५ ॥

दोहा—चले हरषि तजि नगर नृप तापस बनिक भिखारि ।

जिमि हरिभगति पाइ श्रम तजहिं आश्रमी चारि ॥ १६ ॥

शरदऋतू आल्यावर राजा, तपस्वी, व्यापारी आणि भिक्षुक हे विजय, तप, व्यापार आणि भिक्षुकी मिळवण्यासाठी आनंदाने नगर सोडून निघतात. त्याप्रमाणे श्रीहरीची भक्ती मिळाल्यावर चारी आश्रमांतील लोक नाना प्रकारच्या साधनांचे श्रम सोडून देतात. ॥ १६ ॥

सुखी मीन जे नीर अगाधा । जिमि हरि सरन न एकउ बाधा ॥

फूलें कमल सोह सर कैसा । निर्गुन ब्रह्म सगुन भएँ जैसा ॥

जे मासे खोल पाण्यात आहेत, ते सुखी आहेत. ज्याप्रमाणे श्रीहरीला शरण गेल्यावर एकही संकट येत नाही. कमळांनी फुललेले तलाव असे शोभत आहेत की, जसे निर्गुण ब्रह्म सगुण झाल्यावर शोभून दिसते. ॥ १ ॥

गुंजत मधुकर मुखर अनूपा । सुंदर खग रव नाना रुपा ॥

चक्रबाक मन दुख निसि पेखी । जिमि दुर्जन पर संपति देखी ॥

भ्रमर अनुपम आवाज करीत गुंजन करीत आहेत आणि पक्षी नाना प्रकारचे सुंदर कूजन करीत आहेत. रात्र झाल्याचे पाहून चक्रवाक पक्ष्याच्या मनात तसेच दुःख होते, ज्याप्रमाणे दुसर्‍याची संपत्ती पाहून दुष्टाला दुःख वाटते. ॥ २ ॥

चातक रटत तृषा अति ओही । जिमि सुख लहइ न संकरद्रोही ॥

सरदातप निसि ससि अपहरई । संत दरस जिमि पातक टरई ॥

चातक ढगाला आळवत आहे, त्याला खूप तहान लागली आहे. ज्याप्रमाणे शंकराचा द्वेष करणार्‍या माणसाला सुख न मिळाल्यामुळे तो दुःखी होतो. शरदऋतूचा ताप रात्री चंद्र हरण करतो, ज्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने पापे नाहीशी होतात. ॥ ३ ॥

देखि इंदु चकोर समुदाई । चितवहिं जिमि हरिजन हरि पाई ॥

मसक दंस बीते हिम त्रासा । जिमि द्विज द्रोह किएँ कुल नासा ॥

चकोर पक्ष्यांचे समुदाय चंद्राला अशा प्रकारे एकटक पाहू लागतात, ज्याप्रमाणे भगवद्भक्त भगवंत भेटल्यावर निर्निमेष नेत्रांनी त्यांचे दर्शन घेतात. मच्छर, डास हे थंडीच्या भीतीने अशा प्रकारे नाहीसे झाले आहेत की, ज्याप्रमाणे ब्राह्मणांशी वैर केल्याने कुळाचा नाश होतो. ॥ ४ ॥

दोहा—भूमि जीव संकुल रहे गए सरद रितु पाइ ।

सदगुर मिलें जाहिं जिमि संसय भ्रम समुदाई ॥ १७ ॥

वर्षाऋतुमुळे पृथ्वीवर जे जीव भरले होते, ते जीव शरदऋतू आल्यावर नष्ट झाले, ज्याप्रमाणे सद्गुरु लाभल्यावर संशय आणि भ्रम यांचे समूह नष्ट होतात. ॥ १७ ॥

बरषा गत निर्मल रितु आई । सुधि न तात सीता कै पाई ॥

एक बार कैसेहुँ सुधि जानौं । कालहु जीति निमिष महुँ आनौं ॥

वर्षाकाल गेला , निर्मळ शरदऋतु आला. परंतु हे बंधो ! सीतेची काही वार्ता  कळली नाही. एकदा का पत्ता मिळाला, तर मी काळालाही जिंकून एका क्षणांत जानकीला घेऊन येईन. ॥ १ ॥  

कतहुँ रहउ जौं जीवति होई । तात जतन करि आनउँ सोई ।

सुग्रीवहुँ सुधि मोरि बिसारी । पावा राज कोस पुर नारी ॥

हे बंधो ! कुठेही ती असो. जिवंत असेल, तर मी प्रयत्न करुन तिला नक्की आणीन. राज्य, खजिना, स्त्री व राजधानी मिळाल्यामुळे सुग्रीवही मला विसरला. ॥ २ ॥

जेहिं सायक मारा मैं बाली । तेहिं सर हतौं मूढ़ कहँ काली ॥

जासु कृपाँ छूटहिं मद मोहा । ता कहुँ उमा कि समनेहुँ कोहा ॥

ज्या बाणाने मी वालीला मारले, त्याच बाणाने मी त्या मूर्खाला मारीन. ‘ शिव म्हणतात, ‘ हे उमे, ज्यांच्या कृपेमुळे मद व मोह सुटतात, त्यांना स्वप्नातही कधी क्रोध येईल काय ? परंतु ही तर श्रीरामांची लीला आहे. ॥ ३ ॥

जानहिं यह चरित्र मुनि ग्यानी । जिन्ह रघुबीर चरन रति मानी ॥

लछिमन क्रोधवंत प्रभु जाना । धनुष चढ़ाइ गहे कर बाना ॥

ज्या ज्ञानी मुनींना श्रीरघुनाथांच्या चरणीं प्रेम आहे, तेच ही

 लीला जाणतात. लक्ष्मणाने जेव्हा प्रभू क्रुद्ध झालेले

 पाहिले, तेव्हा त्याने धनुष्य सज्ज करुन बाण हाती घेतला.

 ॥ ४ ॥



Custom Search