Friday, August 19, 2022

KikshindhaKanda Part 9 ShriRamCharitManas Doha 24 to Doha 27 किष्किन्धाकाण्ड भाग ९ श्रीरामचरितमानस दोहा २४ ते दोहा २७

 

KikshindhaKanda Part 9
ShriRamCharitManas 
Doha 24 to Doha 27 
किष्किन्धाकाण्ड भाग ९ 
श्रीरामचरितमानस 
दोहा २४ ते दोहा २७

दोहा---दिख जाइ उपबन बर सर बिगसित बहु कंज ।

मंदिर एक रुचिर तहँ बैठि नारि तप पुंज ॥ २४ ॥

आत गेल्यावर तेथे एक उत्तम उपवन व तलाव दिसला. त्यात पुष्कळ कमळे उमललेली होती. तेथे एक सुंदर मंदिर होत व त्यात एक तपस्विनी बसली होती. ॥ २४ ॥

दूरि ते ताहि सबन्हि सिरु नावा । पूछें निज बृत्तांत सुनावा ॥

तेहिं तब कहा करहु जल पाना । खासु सुरस सुंदर फल नाना ॥

सर्वांनी दुरुनच तिला मस्तक नम्र करुन नमस्कार केला. विचारल्यावर त्यांनी आपली हकिगत सांगितली. तेव्हा ती म्हणाली, ‘ पाणी प्या आणि तर्‍हेतर्‍हेची रसाळ फळे खा. ‘ ॥ १ ॥

मज्जनु कीन्ह मधुर फल खाए । तासु निकट पुनि सब चलि आए ॥

तेहिं सब आपनि कथा सुनाई । मैं अब जाब जहॉं रघुराई ॥

आज्ञा मिळताच सर्वांनी स्नान केले, गोड फळे खाल्ली आणि ते तिच्याकडे गेले. तेव्हा तिने आपली सर्व कथा सांगितली आणि म्हटले, ‘ आता मी रघुनाथांच्याकडे जाते. ॥ २ ॥

मूदहु नयन बिबर तजि जाहू । पैहहु सीतहि जनि पछिताहू ॥

नयन मूदि पुनि देखहिं बीरा । ठाढ़े सकल सिंधु कें तीरा ॥

तुम्ही सर्वजण डोळे मिटा आणि गुहा सोडून बाहेर जा. तुम्हांला सीता भेटेल. निराश होऊ नका. ‘ डोळे मिटून त्यांनी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा त्या सर्व वीरांना आपण समुद्रकाठी उभे आहोत, असे दिसले. ॥ ३ ॥

सो पुनि गई जहॉं रघुनाथा । जाइ कमल पद नाएसि माथा ॥

नाना भॉंति बिनय तेहिं कीन्ही । अनपायनी भगति प्रभु दीन्ही ॥

ती तपस्विनी स्वतः श्रीरघुनाथांच्याकडे गेली. तिने जाऊन प्रभूंचे चरण धुतले. नतमस्तक होऊन त्यांना विनवणी केली. तेव्हा प्रभूंनी तिला आपली अढळ भक्ती दिली. ॥ ४ ॥             

दोहा--- बदरीबन कहुँ सो गई प्रभु अग्या धरि सीस ।

उर धरि राम चरन जुग जे बंदत अज ईस ॥ २५ ॥

तिने प्रभूंची आज्ञा शिरोधार्य मानली आणि ब्रह्मदेव व महादेव श्रीरामांच्या ज्या चरणांना वंदन करतात, ते चरण हृदयी धरुन ती तपस्विनी स्वयंप्रभा बदरिकाश्रमाला गेली. ॥ २५ ॥

इहॉं बिचारहिं कपि मन माहीं । बीती अवधि काज कछु नाहीं ॥

सब मिलि कहहिं परस्पर बाता । बिनु सुधि लएँ करब का भ्राता ॥

इकडे वानरगणांच्या मनात काळजी वाटत होती की, एक महिन्याचा काळ लोटला, परंतु अद्याप काम झाले नाही. ते एकमेकांशी बोलू लागले की, ‘ हे बंधू , आता सीतेची वार्ता कळल्याविना परत जाऊन तरी काय करणार ?’ ॥ १ ॥

कह अंगद लोचन भरि बारी । दुहुँ प्रकार भइ मृत्यु हमारी ॥

इहॉं न सुधि सीता कै पाई । उहॉं गएँ मारिहि कपिराई ॥

अगंद डोळ्यांत पाणी आणून म्हणाला की, ‘ दोन्हीकडून आमचे मरण ओढवले आहे. इथे तर सीतेची गंधवार्ता नाही आणि तिथे गेल्यावर वानरराज सुग्रीव ठार करील. ॥ २ ॥

पिता बधे पर मारत मोही । राखा राम निहोर न ओही ॥

पुनि पुनि अंगद कह सब पाहीं । मरन भयउ कछु संसय नाहीं ॥

त्याने माझ्या पित्याचा वध झाल्यावरच मला मारले असते. श्रीरामांनी माझे रक्षण केले, त्यात सुग्रीवाने काही उपकार केलेले नाहीत.’ अंगद सर्वांना सांगत होता की, आता मरण ओढवले आहे यात काही शंका नाही. ॥ ३ ॥

अंगद बचन सुनत कपि बीरा । बोलि न सकहिं नयन बह नीरा ॥

छन एक सोच मगन होइ रहे । पुनि अस बचन कहत सब भए ॥

वानरवीर अंगदाचे बोलणे ऐकून घेत होते. पण बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. एका क्षणांत सर्वजण काळजीत पडले. मग सर्वजण म्हणू लागले. ॥ ४ ॥

हम सीता कै सुधि लीन्हें बिना । नहिं जैहैं जुबराज प्रबीना ॥

अस कहि लवन सिंधु तट जाई । बैठे कपि सब दर्भ डसाई ॥

‘ हे सुज्ञ युवराज ! आम्ही सीतेचा शोध घेतल्याशिवाय परतणार नाही. ‘ असे म्हणून ते लवणसागराच्या तटावर प्रायोपवेशनासाठी कुश अंथरुन बसले. ॥ ५ ॥

जामवंत अंगद दुख देखी । कहीं कथा उपदेस बिसेषी ॥

तात राम कहुँ नर जनि मानहु । निर्गुन ब्रह्म अजित अज जानहु ॥

जांबवानाने अंगदाचे दुःख पाहून खास उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, बाळा, श्रीरामांना मनुष्य मानू नकोस. ते निर्गुण ब्रह्म, अजेय आणि अजन्मा आहेत, असे समज. ॥ ६ ॥

हम सब सेवक अति बड़भागी । संतत सगुन ब्रह्म अनुरागी ॥

आपण निरंतर सगुण ब्रह्म असलेल्या श्रीरामांवर प्रेम करतो. आपण सर्व सेवक मोठे भाग्यवान आहोत. ॥ ७ ॥

दोहा---निज इच्छॉं प्रभु अवतरइ सुर महि गो द्विज लागि ।

सगुन उपासक संग तहँ रहहिं मोच्छ सब त्यागि ॥ २६ ॥

देव, पृथ्वी, गाई व ब्राह्मण यांच्या हितासाठी प्रभू आपल्या इच्छेने जेथे अवतार घेतात, तेथे सगुणोपासक सर्व प्रकारचे मोक्ष सोडून त्यांच्या सेवेसाठी सोबत असतात. ॥ २६ ॥

एहि बिधि कथा कहहिं बहुभॉंती । गिरि कंदरॉं सुनी संपाती ॥

बाहेर होइ देखि बहु कीसा । मोहि अहार दीन्ह जगदीसा ॥

अशाप्रकारे जांबवान बर्‍याच गोष्टी सांगत होता. त्याचे हे बोलणे पर्वताच्या गुहेत बसलेल्या संपातीने ऐकले. बाहेर आल्यावर त्याला पुष्कळ वानर दिसले. तेव्हा तो म्हणाला, ‘ जगदीश्वराने घरात बसल्या बसल्या पुष्कळसा आहार माझ्यासाठी पाठवून दिला आहे. ॥ १ ॥

आजु सबहि कहँ भच्छन करऊँ । दिन बहु चले अहार बिनु मरऊँ ॥

कबहुँ न मिल भरि उदर अहारा । आजु दिन्हि बिधि एकहिं बारा ॥

आज मी या सर्वांना खाऊन टाकतो. बरेच दिवस मी अन्नाविना मरत होतो. पोटभर भोजन कधी मिळाले नाही. आज विधात्याने एकाच वेळी पुष्कळ भोजन दिले.’ ॥ २ ॥

डरपे गीध बचन सुनि काना । अब भा मरन सत्य हम जाना ॥

कपि सब उठे गीध कहँ देखी । जामवंत मन सोच बिसेषी ॥

गिधाडाचे बोल ऐकून सर्वजण घाबरले की, आता खरोखर मरण आले आहे. हे आम्हांला कळले. नंतर त्या गिधाड संपातीला पाहण्यासाठी सर्व वानर थोडे उठून उभे राहिले. जांबवानाला जास्त काळजी वाटू लागली. ॥ ३ ॥

कह अंगद बिचारि मन माहीं । धन्य जटायू सम कोइ नाहीं ॥

राम काज कारन तनु त्यागी । हरि पुर गयउ परम बड़भागी ॥

अंगद मनात विचार करुन म्हणाला, ‘ अहाहा ! जटायूसारखा धन्य कोणी नाही. श्रीरामांच्या कार्यासाठी त्याने देहत्याग केला. तो परम भाग्यवान भगवंताच्या परमधामी गेला. ॥ ४ ॥

सुनि खग हरष सोक जुत बानी । आवा निकट कपिन्ह भय मानी ॥

तिन्हहि अभय करि पूछेसि जाई । कथा सकल तिन्ह ताहि सुनाई ॥

हे हर्ष व शोकयुक्त बोलणे ऐकून संपाती वानरांच्या जवळ आला. वानर घाबरुन गेले. त्यांना अभय देऊन जवळ येऊन जटायूचा वृत्तांत्त विचारला. तेव्हा वानरांनी सर्व हकिगत त्याला सांगितली. ॥ ५ ॥

सुनि संपाति बंधु कै करनी । रघुपति महिमा बहुबिधि बरनी ॥

बंधू जटायूची अद्भुत कामगिरी ऐकून संपातीने अनेक प्रकारे श्रीरघुनाथांचा महिमा वर्णन केला. ॥ ६ ॥

दोहा—मोहि लै जाहु सिंधुतट देउँ तिलांजलि ताहि ।

बचन सहाइ करबि मैं पैहहु खोजहु जाहि  ॥ २७ ॥

तो म्हणाला, ‘ मला समुद्रकिनारी घेऊन चला. मी जटायूला तिलांजली देतो. या सेवेबद्दल मी तुम्हांला सीतेचा ठावठिकाणा सांगून मदत करीन. जिला तुम्ही शोधत आहात, ती तुम्हांला भेटेल.’ ॥ २७ ॥

अनुज क्रिया करि सागर तीरा । कहि निज कथा सुनहु कपि बीरा ॥

हम द्वौ बंधु प्रथम तरुनाई । गगन गए रबि निकट उड़ाई ॥

समुद्रकिनार्‍यावर संपातीने आपला भाऊ जटायू याचे श्राद्धादी कर्म केले आणि तो स्वतःची हकीगत सांगू लागला, ‘ हे वीर वानरांनो, आम्ही दोघे भाऊ नवतारुण्यात एकदा आकाशात उडून सूर्याजवळ पोहोचलो. ॥ १ ॥

तेज न सहि सक सो फिरि आवा । मैं अभिमानी रबि निअरावा ॥

जरे पंख अति तेज अपारा । परेउँ भूमि करि घोर चिकारा ॥

जटायू ते तेज सहन करु शकला नाही, म्हणून तो परत आला. परंतु मी गर्विष्ठ होतो, म्हणून सूर्याजवळ गेलो. सूर्याच्या अत्यंत अपार तेजामुळे माझे पंख जळून गेले. मी जोराने किंचाळून जमिनीवर पडलो. ॥ २ ॥

मुनि एक नाम चंद्रमा ओही । लागी दया देखि करि मोही ॥

बहु प्रकार तेहि ग्यान सुनावा । देहजनित अभिमान छड़ावा ॥

तेथे चंद्रमा नावाचे एक मुनी होते. मला पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला पुष्कळ ज्ञानोपदेश दिला आणि माझा देहजनित अभिमान दूर केला. ॥ ३ ॥

त्रेतॉं ब्रह्म मनुज तनु धरिही । तासु नारि निसिचर पति हरिही ॥

तासु खोज पठइहि प्रभू दूता । तिन्हहि मिलें तैं होब पुनीता ॥

ते म्हणाले, ‘ त्रेतायुगात प्रत्यक्ष परब्रह्म मनुष्यशरीर धारण करणार आहे. त्यांच्या स्त्रीला राक्षसांचा राजा हरण करुन नेईल, तिच्या शोधासाठी प्रभू दूत पाठवतील. ते दूत भेटल्यावर तूं पवित्र होशील. ॥ ४ ॥

जमिहहिं पंख करसि जनि चिंता । तिन्हहि देखाइ देहेसु तैं सीता ॥

मुनि कइ गिरा सत्य भइ आजू । सुनि मम बचन करहु प्रभु काजू ॥

आणि तुला पंख फुटतील, चिंता करु नकोस. तू त्यांना सीतेचा पत्ता दे.’ मुनींची वाणी आज खरी ठरली. आता माझे बोलणे ऐकून तुम्ही प्रभूंचे काम करा. ॥ ५ ॥

गिरि त्रिकूट ऊपर बस लंका । तहँ रह रावन सहज असंका ॥

तहँ असोक उपबन जहँ रहई । सीता बैठि सोच रत अहई ॥ 

त्रिकूट पर्वतावर लंका वसलेली आहे. तेथे स्वभावातःच निर्भय असलेला रावण राहातो. तेथे अशोक नावाचे उपवन आहे. तेथे सीता राहाते. ती यावेळी मोठ्या काळजीत बसली आहे. ॥ ६ ॥



Custom Search

No comments: