Thursday, December 24, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ५

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 5 
Ovya 101 to 125 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ५ 
ओव्या १०१ ते १२५

तैसें नामरुप तयाचें । एर्‍हवीं ब्रह्मचि तो साचें ।

मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥ १०१ ॥

१०१) त्याप्रमाणें त्याच्या नामरुपाची गोष्ट आहे. एर्‍हवीं, ज्याचें मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखर ब्रह्मच आहे.

ऐसोनि समदृष्टि जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे ।

अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥ १०२ ॥

१०२) अशा तर्‍हेनें जो समदृष्टीनें असतो, त्या पुरुषाला ( ओळखण्याचें ) लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला तें थोडक्यांत सांगतों. त्याचा तूं विचार कर. 

तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।

तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलां जो ॥ १०३ ॥

१०३) मृगजळाच्या लोंढ्यानें ज्याप्रमाणें मोठा पर्वत ( किंचितहिं ) ढकलला जात नाहीं, त्याप्रमाणें चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असतां, ज्याच्यामध्यें विकार उत्पन्न होत नाहीत;   

तोचि तो निरुता । समदृष्टि तत्त्वता ।

हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥ १०४ ॥

१०४) तोच खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना, तोच तेम ब्रह्म ( समज ). 

जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणें नाहीं ।

तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥ १०५ ॥

१०५) जो आत्मस्वरुपाला सोडून केव्हांहि इंद्रियरुपी गांवांत येत नाहीं ( म्हणजे इंद्रियांशीं तादात्म्य करीत नाहीं ), तो विषय सेवन करीत नाहीं, यांत आश्र्चर्य तें काय आहे ?

सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडें अंतरें ।

रचिला म्हणऊनि बाहिरें । पाऊल न घली ॥ १०६ ॥

१०६) अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेनें अंतःकरणांतच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकीत नाही. ( विषयाकडे प्रवृत्त ) होत नाही).

सांगें कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।

तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु आहे ॥ १०७ ॥

१०७) सांग, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो वाळूचे कण चाटीत बसेल काय ?  

तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपपांचि फावलें ।

तया विषय सहज सांडवले । सांगों काई ॥ १०८ ॥

१०८) त्याप्रमाणें ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झालें, त्या सहजच विषय सुटले, हें काय सांगावयास पाहिजे ?

एर्‍हवीं तरी कौतुकें । विचारुनि पाहें पां निकें ।

या विषयांचेनि सुखें । झकवती कवण ॥ १०९ ॥ 

१०९) एर्‍हवीं सहजच चांगला विचार करुन पाहा, या विषयाच्या सुखानें कोण फसले जातात ? 

जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले ।

जैसें रंक कां आळुकैलें । तुषांतें सेवी ॥ ११० ॥

११०) ज्याप्रमाणें भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणें ज्यांनीं आत्मस्वरुपाचा अनुभव घेतला नाहीं, तेच या विषयांत रंगतात.

नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें ।

मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥ १११ ॥

१११) अथवा तहानेनें त्रस्त झालेलीं हरिणें, भ्रमानें खर्‍या पाण्याला विसरुन, ( मृगजळाला ) पाणी आहे असें समजून माळरानावरच येऊन पोचतात;   

तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे ।

तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥ ११२ ॥

११२) तसेंच ज्याला आत्मस्वरुपाचा अनुभव नाहीं, ज्याच्या ठिकाणीं स्वरुपानंदाचा नेहमीं पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरुप वाटतात.

एर्‍हवीं विषयीं काइ सुख आहे । हें बोलणेंचि सारिखें नोहे ।

तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥ ११३ ॥

११३) एर्‍हवीं विषयांमध्यें कांहीं सुख आहे, हें म्हणणें बोलण्याच्यासुद्धां योग्यतेचें नाहीं. नाहीं तर विजेच्या चमकण्यानें जगामध्यें कां उजाडत नाहीं ? 

सांगें वातवर्षआतपु धरे । ऐसें अभ्रच्छायाचि जरी सरे ।

तरी त्रिमळिकें धवळारें । करावी कां ॥ ११४ ॥

११४) सांग. वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचें काम जर ढगांच्या सावलीनेंच होईल, तर तीन मजल्यांची चुनेगच्ची घरें बांधण्याचा ( खटाटोप ) कां करावा ?    

म्हणोनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे ।

जैसें महुर कां म्हणिजे । विषकंदातें ॥ ११५ ॥

११५) म्हणून ज्याप्रमाणें विषयाच्या कांद्याला ( बचनागाला ) मधुर म्हणावें, त्याप्रमाणें विषयांत सुख आहे असें जे म्हणतात, ती ( विषयाचें खरें स्वरुप न जाणतांच ) व्यर्थ केलेली बडबड आहे ( असें समज ).

नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।

तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥ ११६ ॥

११६) किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असें म्हणतात ( पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो, ) किंवा मृगजळालाच ‘ जल ‘ असें म्हणता; त्याचप्रमाणें विषयांपासून येणार्‍या अनुभवाला ' सुख ‘ म्हणणें व्यर्थ बडबड आहे..  

हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीची साउली ।

ते शीतल होईल केतुली । मूषकासी ॥ ११७ ॥

११७) हें सर्व प्रतिपादन राहूं दे. तूंच सांग सर्पाच्या फणीची सावली आहे, ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरें !

जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा ।

तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणे ॥ ११८ ॥

११८) अर्जुना, ज्याप्रमाणें गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जेथपर्यंत मासा गिळीत नाहीं, तेथपर्यंत ठिक; त्याप्रमाणें विषयांच्या संगाची स्थिति आहे, हें तूं निःसंशय समज !

हें विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी ।

तैं पांडुरोगाचिये पुष्टी । सारिखें दिसे ॥ ११९ ॥

११९) विरक्तांच्या दृष्टीनें पाहिलें तर हें विषयसुख, अर्जुना पंडुरोगामध्यें आलेल्या सुजेप्रमाणें ( घातक ) आहे. असें समज.   

म्हणोनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख ।

परि काय करिती मूर्ख । न सेवितां न सरे ॥ १२० ॥

१२०) म्हणून विषयांच्या उपभोगांमध्यें जें सुख असतें, तें प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे, हे समज; परंतु काय करतील मूर्ख ? विषयांचें सेवन केल्याशिवाय त्यांचें चालतच नाहीं.

ते अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणें घडे ।

सांगें पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥ १२१ ॥

१२१) ते बिचारे मूर्ख त्या विषयांचें आंतलें स्वरुप जाणत नाहींत, म्हणून त्यांच्याकडून विषयांचे अगत्य सेवन होतें. तूंच सांग, पुवांच्या चिखलांतील किडे पुवांची किळस घेतात काय ?

तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर ।

ते भोगजळातें जलचर । सांडिती केवीं ॥ १२२ ॥

१२२) त्या दुःखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेलें असतें. ते विषयरुपी चिखलांतील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरुपी मासे विषयोपभोगरुपी पाण्याला कसें टाकतील ?  

आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती ।

जरी विषयांवरी विरक्ति । धरिती जीव ॥ १२३ ॥ 

१२३) शिवाय, जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दुःखदायक योनि ज्या आहेत, त्या सर्व निरर्थक होणार नाहींत काय ?

नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट ।

हे विसांवेनवीण वाट । वाहावी कवणें ॥ १२४ ॥

१२४) अथवा गर्भांत राहणें वगैरे संकटें किंवा जन्म आणि मरण यांपासून होणारे कष्ट, हा मार्ग अविश्रांतपणें कोणी चालावा ?

जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल ।

आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ॥ १२५ ॥

१२५) जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील, तर 

मोठमोठ्या दोषांस राहावयास जागा कोठें मिळेल ? 

आणि मग या जगामध्यें संसार हा शब्दच खोटा ठरणार

नाहीं काय ?


Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ४

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 4
Ovya 76 to 100 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ४ 
ओव्या ७६ ते १००

जैसा कां सर्वेश्र्वरु । पाहिजे तंव निर्व्यापारु ।

परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥ ७६ ॥

७६) ज्याप्रमाणें सर्वेश्र्वर जर पाहिला, तर तो वस्तुतः क्रियाशून्य असतो; परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो.

आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपे ।

जे हातुपावो न लिंपे । उदास वृत्तीचा ॥ ७७ ॥

७७) आणि त्यास कर्ता असें म्हणावें, तर तो कोणत्याहि कर्मानें लिप्त होत नाहीं. कारण त्याच्या ठिकाणीं असणार्‍या उदासीनतेचा कोणताहि अवयव अशुद्ध होत नाहीं. ( त्याची उदासीनता किंचितहि बिघडत नाहीं.)

योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे ।

परी महाभूतांचें दळवाडें । उभारी भलें ॥ ७८ ॥

७८) त्याच्या सहजस्थितीचा तर भंग होत नाहीं व त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाहीं; असें असूनहि तो महाभूतांचे अनेक समुदाय चांगल्या तर्‍हेनें उत्पन्न करतो.

जगाचां जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे ।

जगचि हें होये जाये । तो शुद्धीही नेणे ॥ ७९ ॥

७९) तो जगांतील सर्व प्राण्यांना व्यापून असतो. परंतु केव्हांहि कोणाची आसक्ति धरीत नाहीं. हें जग उत्पन्न होते व नाहींसे होतें, याची त्यास खबरहि नसते. 

पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखे ।

आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ॥ ८० ॥

८०) ( प्राणीमात्रांकडून होणारी सपूर्ण ) पापपुण्यें, हीं त्याच्या अगदी जवळ असून, तो त्यांना जाणत नाहीं. ( फार काय ? ) तो त्यांचा साक्षीहि होऊन राहात नाहीं, तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलावयास पाहिजे.

पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे ।

परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥ ८१ ॥

८१) सगुण स्वरुपाच्या संगतीनें तो सगुण होऊन क्रीडा करतो; परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला मलिनपणा येत नाही. 

तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जें चराचरीं ।

तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥ ८२ ॥

८२) तो उत्पन्न करतो, पालन करतो व संहार करतो, असे त्याच्या कर्तुत्वाविषयी सर्व लोकांत वर्णन होते; अर्जुना, ऐक, ते केवळ अज्ञान आहे.

तें अज्ञान जैं समूळ तुटे । तैं भ्रांतीचें मसैरें फिटे ।

मग अकर्तृत्व प्रगटे । ईश्र्वराचें ॥ ८३ ॥

८३) तें अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसें होतें, त्यावेळेला भ्रांतिरुप काजळी दूर होते आणि मग ईश्र्वराचें कर्तृत्व प्रतीतीला येतें.

एथ ईश्र्वरु एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता ।

तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ॥ ८४ ॥

८४) आणि ईश्र्वर एक अकर्ता  आहे, असें चित्ताला पटतें आणि मुळापासून स्वभावतःच तोच ( ईश्र्वरच ) मी आहें, ( तर मीहि उघडच अकर्ता आहे ),  

ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासि भेदु कैंचा त्रिजगतीं ।

देखे आपुलिया प्रतीती । जगचि मुक्त ॥ ८५ ॥

८५) अशा विचारानें चित्तांत उदय केला असतां, त्याला तिन्ही लोकांत भेद कशाचा ? तो आपल्या अनुभवानें सर्व जगच मुक्त आहे असें पाहतो.

जैशी पूर्वदिशेचां राउळीं । उदयाची सूर्ये दिवाळी ।

कीं येरींहि दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ॥ ८६ ॥

८६) ज्याप्रमाणें पूर्वदिशेच्या राजवाड्यांत सूर्योदयरुपी दिवाळी झाली असतां त्याच वेळेला दुसर्‍याहि दिशांतील काळोख नाहींसा होतो.

बुद्धिनिश्र्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण ।

ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ॥ ८७ ॥

८७) आत्मज्ञानासंबंधीं त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे, साधक आपणच आपल्याला ब्रह्मरुप मानूं लागतो आणि आपली वृत्ति पूर्णब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानांत असतो.   

ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदयातें गिंवसित आलें ।

तयांचि समतादृष्टि बोलें । विशेषूं काई ॥ ८८ ॥

८८) असें चांगलें व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयाचा शोध करीत आलें ( ज्यांना प्राप्त झालें ), त्यांची जी समतादृष्टि होते, तिचें शब्दांनी विशेष काय वर्णन करुं !

एक आपणपेंचि पां जैसें । ते देखती विश्र्व तैसें ।

हे बोलणें कायसें । नवलु एथ ॥ ८९ ॥

८९) ते जसें आपल्यालाच ब्रह्मरुप पाहातात, तसेंच ते सर्व जगाला ( ब्रह्मरुप ) पाहातात, हें येथें सांगण्यांत काय मोठे आश्र्चर्य आहे ?

परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे ।

कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥ ९० ॥

९०) परंतु ज्याप्रमाणें दैव हें लीलेने देखील केव्हांच दरिद्रतेला पाहत नाही, किंवा विचार हा ज्याप्रमाणें भ्रांतीला जाणत नाहीं,

नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं ।

अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥ ९१ ॥

९१) किंवा अंधकाराचा प्रकार ज्याप्रमाणें सूर्याला स्वप्नांतहि दिसत नाहीं किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताहि येत नाही; 

हें असो संतापु कैसा । चंद्र न स्मरे जैसा ।

भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥ ९२ ॥

९२) हें राहूं दे; उष्णता कशी असते, हें ज्याप्रमाणें चंद्राला आठवूनहि लक्षांत येणार नाहीं, त्याप्रमाणें ते ज्ञानी प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाहीत. 

मग हा मशकु हा गजु । कीं हा श्र्वपचु हा द्विजु ।

पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ॥ ९३ ॥

९३) मग ( त्यांच्या ठिकाणीं ) हें चिलिट आणि हा हत्ती किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा हा पलीकडे असलेला परका हा भेद कोठून उरणार ? 

ना तरी हे धेनु हें श्र्वान । एक गुरु एक हीन ।

हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥ ९४ ॥

९४) अथवा, ही गाय आणि हें कुत्रें अथवा एक थोर आणि एक नीच ( हें कोठलें ? ) हें राहूं दे. जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार ?

एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा ।

तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषम काई ॥ ९५ ॥

९५) आणि जर अहंकार उतलेला असेल तरच भेदाची प्रतीती होईल. तो अहंकार ( तर ) अगोदरच सर्व नाहींसा झाला; आतां भेदभाव कोठला ?

म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म ।

हें संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचें ॥ ९६ ॥

९६) म्हणून सर्व ठिकाणीं, सर्व काळ सारखें असणारें जे अद्वय ब्रह्म तेंच आपण आहों, हें जें सम दृष्टीचें तत्त्व, तें तो संपूर्ण जाणतो. 

जिद्दीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां ।

परी भोगिली निसंगता । कामेंविण ॥ ९७ ॥

९७) ज्यांनी विषयांचा संबंध न टाकतां आणि इंद्रियांचें दमन न करतां निरिच्छ असल्यामुळें अलिप्तता भोगिली;

जिद्दीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें ।

पण सांडिलें निद्सुरें । लौकिकु हें ॥ ९८ ॥

९८) जे लोकांना अनुसरुन, लोक करतात त्याप्रमाणें व्यवहार करतात; परंतु ज्यांनीं लोकांच्या ठिकाणीं असणार्‍या अज्ञानाचा त्याग केला आहे;   

जैसा जनामाजि खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु ।

तैसा शरीरी तो परिसंसारु । नोळखे तयांतें ॥ ९९ ॥

९९) ज्याप्रमाणें पिशाच्च जगांत असून जगाला दिसत नाहीं, त्याप्रमाणें तो देहधारी असूनहि संसारी लोक त्याला ओळखत नाहींत.

हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे ।

तें आणिकें म्हणती वेगळे । कल्लोळ हे ॥ १०० ॥

१००) हें राहूं दे. वार्‍याच्या संगतीनें ज्याप्रमाणें पाण्यावरच 

पाणी ( लाटरुपानें ) खेळतें, ( पण ) लोक त्यास, ह्या लाटा पाण्याहून वेगळया आहेत, असे म्हणतात;




Custom Search

Tuesday, December 15, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 3 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ३

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 3
Ovya 51 to 75 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ३ 
ओव्या ५१ ते ७५

 देखें बुद्धीची भाषा नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे ।

ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥ ५१ ॥

५१) पाहा, जें कर्म, बुद्धीला समजण्याच्या पूर्वीं व मनांत विचार उद्भवण्याच्या अगोदर होतें, त्या ( कर्माच्या ) व्यवहाराला ‘ कायिक ‘ व्यवहार म्हणतात.

हेंचि मराठें परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी ।        

योगिये कर्में करिती तैशीं । केवळ तनू ॥ ५२ ॥

५२) हेंच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक, ज्याप्रमाणें तान्ह्या मुलाची हालचाल असते, त्याप्रमाणें योगी केवळ शरीरानेंच कर्में करतात.

मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें ।

तेथ मनचि राहाटे एकलें । स्वप्नीं जेवीं ॥ ५३ ॥

५३) मग हें पांच भूतांचें बनलेलें शरीर ज्या वेळेला झोपलेलें असतें, त्या वेळेला ज्याप्रमाणें एकटें मनच स्वप्नांत व्यवहार करतें.  

नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा ।

देहा होंऊ नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥ ५४ ॥

५४) अर्जुना, एक आश्र्चर्य पाहा, या वासनेचा विस्तार केवढा आहे ? ती देहाला जागें होऊं देत नाहीं, पण सुखदुःखांचा भोग भोगविते.   

इंद्रियांचां गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे ।

तो केवळ गा म्हणिजे । मानसाचा ॥ ५५ ॥

५५) अरे, इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो, असें जें कर्म उत्पन्न होतें, त्यास केवळ ‘ मानसिक ‘ कर्म म्हणतात.

योगिये तोहि करिती । परी कर्में तेणें न बंधिजती ।

जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥ ५६ ॥

५६) योगी तेंहि कर्म करतात, पण तें त्याकर्मानें बांधले जात नाहींत; कारण त्यांनी अहंकाराची संगति टाकलेली असते. 

आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त ।

मग इंद्रियांचे चेष्टित । विकळु दिसे ॥ ५७ ॥

५७) आतां ज्याप्रमाणें भूत संचार झाल्यामुळे चित्त भ्रमिष्ट होतें, मग त्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात.

स्वरुप तरी देखे । आळविलें आइके ।

शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ॥ ५८ ॥

५८) त्यास रुप तर दिसतें, हाकां मारलेलें ऐकूं येतें, तो तोंडानें शब्दांचा उच्चारहि करतो, परंतु हें सर्व केल्याची जाणीव नसते.   

हें असो काजेंविण । जें जें कांहीं कारण ।

तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥ ५९ ॥

५९) हें राहूं दे, तो प्रयोजनावांचून जें जें कांहीं करतो, ते ते सर्व केवळ इंद्रियांचें कर्म आहे, असें समज.

मग सर्वत्र जें जाणतें । तें बुद्धीचें कर्म निरुते ।

वोळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥ ६० ॥

६०) मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणीं जाणण्याचें जें काम आहे, ते खरोखर बुद्धीचें आहे, असे ओळख.

ते बुद्धि धुरे करुनी । कर्म करिती चित्त देउनी ।

परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥ ६१ ॥

६१) ते ( कर्मयोगी ) बुद्धि पुढें करुन मनःपूर्वक कर्मे करतात; पण ते नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षांहि मुक्त दिसतात.

जे बुद्धीचिये ठावूनि देहीं । तयां अहंकाराचा सेचि नाहीं ।

म्हणोनि कर्मेंचि करितां पाहीं । चोखाळले ॥ ६२ ॥

६२) कारण त्यांच्यामध्यें बुद्धिपासून देहापर्यंत कोठेंहि अहंकाराचे स्मरणच नसतें, म्हणून अशा कर्मांचें आचरण करीत असतांहि ते शुद्धच असतात, असें समज.

अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें निष्कर्म ।

हें जाणती सवर्म । गुरुगम्य जें ॥ ६३ ॥

६३) अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेलें जें कर्म, तेंच नैष्कर्म्य होय; ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट ( प्राप्त पुरुष ) समजतात.

आतां शांतरसाचें भरिते । सांडीत आहे पात्रातें ।

जे बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥ ६४ ॥

६४) आतां ( माझ्या बोलण्यांतील ) शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे; कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचें व्याख्यान करतां आलें.   

एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु ।

तयासीचि आथि लागु । परिसावया ॥ ६५ ॥

६५) ज्यांचा इंद्रियांविषयींचा पराधीनपणा चांगल्या तर्‍हेनें नाहींसा झाला आहे, त्यांनाच हें ऐकण्याची योग्यता आहे.

 हा असो अतिप्रसंगु । न संडीं पां कथालागु ।

होईल श्र्लोकसंगतिभंगु म्हणोनियां ॥ ६६ ॥

६६) ( या ज्ञानेश्र्वरमहाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात, ) हें विषयांतर करणें पुरें. कथेचा संबंध सोडूं नकोस, कारण तसें करण्यानें श्र्लोकांच्या संगतीचा बिघाड होईल. 

जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे ।

तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥ ६७ ॥

६७) जें मनानें आकलन करणें कठीण आहे, घासाघीस केली तर बुद्धीला बुद्धीला जें प्राप्त होत नाहीं तें दैवाच्या अनुकूलतेनें तुला सांगतां आलें. 

जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे ।

तरी आणिकें काय करावें । सांगें कथा ॥ ६८ ॥

६८) जें स्वभावतः शब्दांच्या पलीकडचें आहे, तें बोलण्यांत जर सांपडलें, तर आणिकांचें काय प्रयोजन ? तेव्हां तूं श्रीकृष्णार्जुनसंवादाची चाललेली कथा सांग. 

हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृत्तीचा ।

म्हणे संवादु तया दोघांचा । परिसोनि परिसा ॥ ६९ ॥

६९) श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तिनाथांचे शिष्य ( ज्ञानेश्र्वरमहाराज ) म्हणतात, ‘ कृष्ण आणि अर्जुन या दोघांत झालेलें संभाषण एवढा वेळ ऐकलें तें लक्षांत घेऊन यापुढें ऐका. 

मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिह्न पुरतें ।

सांगेन तुज निरुतें । चित्त देईं ॥ ७० ॥

७०) मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आतां तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचें चिन्ह संपूर्ण सांगेन. तूं चांगलें लक्ष दे.

तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।

तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ॥ ७१ ॥

७१) तरी या जगांत ज्ञानयोगानें जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे, त्याला घरांत घुसून शांति वरते.

येरु कर्मबंधें । किरीटी । अभिलाषाचिया गांठी ।

कळासला खुंटीं । फळभोगाचां ॥ ७२ ॥

७२) अर्जुना, त्याहून दुसरा ( आसक्त ) कर्माच्या बंधामुळें अभिलाषेच्या दाव्यानें फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो.

जैसा फळाचिये हावे । ऐसें कर्म करी आघवें ।

मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥ ७३ ॥

७३) फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणें तो सर्व कर्में करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाहीं, अशा अकर्तेपणाच्या समजुतीनें जो त्याविषयीं उदासीन राहातो,

तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।

तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥ ७४ ॥

७४) तो जिकडे पाहातो, तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथें सांगेल तेथें महाबोध नांदतो.

नवद्वारे देहीं । तो असतुचि परि नाहीं ।

करितुचि न करी कांहीं । फलत्यागी ॥ ७५ ॥

७५) नऊ छिद्रांच्या देहामध्यें वागत असूनहि त्याचें 

देहाशीं तादात्म्य नसतें. तो फलांचा त्याग करणारा कर्में 

करीत असतांनाहि ( तत्त्वतः ) कांहींच करीत नाहीं.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग २

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 2 
Ovya 26 to 50 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग २ 
ओव्या २६ ते ५०

एर्‍हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा ।

ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं ॥ २६ ॥

२६) एर्‍हवीं तरी अर्जुना, जे पूर्णपणें अज्ञानी आहेत, ते सांख्ययोग आणि कर्मयोग यांचें स्वरुप कसें जाणूं शकतील. 

सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न ।

एर्‍हवी दीपाप्रति काई अनान । प्रकाशु आहाती ॥ २७ ॥

२७)  ते स्वभावतःच मूर्ख असतात, म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. एर्‍हवीं प्रत्येक दिव्याचें प्रकाश काय निराळें आहेत ?  

पै सम्यक् एकें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें ।

ते दोन्हींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥ २८ ॥

२८) एकाचेंच चांगलें आचरण करुन ज्यांनी संपूर्ण रीतीनें तत्त्वाचा अनुभव घेतला. ते दोन्हीहि ( मार्ग ) एकच आहेत, असें समजतात. 

आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे ।

म्हणोनि ऐक्यता दोहींते सहजें । इयापरी ॥ २९ ॥

२९) आणि सांख्य मार्गानें, जें मिळतें तेंच योगाने प्राप्त होतें. म्हणून अशा रीतीनें या दोन मार्गांत सहजच ऐक्य आहे.   

देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा ।

तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥ ३० ॥

३०) पाहा, आकाश आणि पोकळी यांच्यामध्यें ज्याप्रमाणें भिन्नता नाहीं, त्याप्रमाणें कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते, 

तयासींचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें ।

जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥ ३१ ॥

३१) ( असा ), ज्यांला सांख्य आणि कर्मयोग अभिन्नतेनें पटले, त्यालाच जगांत उजाडलें, ( ज्ञानप्राप्ति झाली, ) व त्यानेंच आत्मस्वरुप पाहिलें. 

जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता ।

तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥ ३२ ॥

३२) अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याच्या हातवटीच्या रस्त्यानें मोक्षरुप पर्वतावर चढतो, तो परमानंदरुपी शिखर त्वरेनें गांठतो.

येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे ।

परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥ ३३ ॥

३३) याहून दुसरा ज्याच्याकडून कर्मयोगाचें अनुष्ठान होत नाहीं, तो व्यर्थच ( संन्यासाच्या ) छंदांत पडतो. परंतु त्याला संन्यासाची प्राप्ति केव्हांच घडत नाहीं. ॥ ३३ ॥   

जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें ।

मग आत्मस्वरुपीं घातलें । हारौनिया ॥ ३४ ॥

३४) ज्यानें विषयांपासून हिरावून घेतलेले आपलें मन गुरुपदेशानें स्वच्छ करुन आत्मस्वरुपांत मुरवून ठेवलें,  

जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें अल्प आवडे ।

मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥ ३५ ॥

३५) समुद्रांत मीठ पडलें नाहीं तोपर्यंत तें वेगळें अल्प असें दिसतें, मग ज्या वेळीं समुद्राशीं त्याचा संयोग होतो, त्या वेळीं तें समुद्राएवढेंच होतें,  

तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचे मनचि चैतन्य जाहलें ।

तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ॥ ३६ ॥

३६) त्याप्रमाणें संकल्पापासून दूर केल्यामुळें ज्याचें चित्त चिद्रूप झालें तो परिछिन्न दिसला. तरी, त्यानें तिन्ही लोक व्यापले आहेत, असे समज.

आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।

आणि करी जर्‍ही आघवें । तर्‍ही अकर्ता तो ॥ ३७ ॥ 

३७) आतां कर्ता, कर्म, कार्य, हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावतःच त्याच्या ठिकाणीं बंद पडतो आणि यावर त्यानें सर्व ( कर्म ) जरी केलें, तरी तो ( तत्त्वतः ) त्याचा कर्ता होत नाहीं.

जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं ।

तरी कर्तृत्व कैचें काई । उरे सांगे ॥ ३८ ॥

३८) कारण, अर्जुना त्याच्या ठिकाणीं ‘ मी देह ‘ अशी आठवणच नसते, तर मग कर्तेपणा कोठचा ? तो ( कर्तेपणा ) तेथें राहील काय ? सांग.

ऐसे तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण ।

दिसती संपूर्ण । योगयुक्ता ॥ ३९ ॥

याप्रमाणें शरीरचा त्याग केल्याशिवाय, अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण, त्या कर्मयोग्याच्या ठिकाणीं स्पष्टपणें अनुभवास येतात.   

एर्‍हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी ।

अशेषींही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥ ४० ॥ 

४०) एर्‍हवीं तोहि इतर लोकांप्रमाणें शरीरांत असून, सर्व व्यवहार करीत असतांना दिसतो.

तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे ।

परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥ ४१ ॥

४१) तो देखील ( इतर लोकांसारखा ) डोळ्यांनी पाहातो, कानांनी ऐकत असतो, परंतु आश्चर्य पाहा कीं, तो त्या व्यवहारानें मुळीच लिप्त होत नाहीं.

स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें ।

अवसरोंचित बोलणें । तयाहि आथी ॥ ४२ ॥

४२) तो स्पर्शासहि समजतो, नाकानें गंधाचा अनुभव येतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारहि त्याच्या कडून होतो.

आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी ।

निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥ ४३ ॥

४३) आहाराचें सेवन करतो, टाकावयाचें तें टाकतो व झोपेच्या वेळेला सुखाने झोप घेतो.

आपुलेनि इच्छावशें । तोहि गा चालतु दिसे ।

पैं सकळ कर्म ऐसें । राहाटे कीर ॥ ४४ ॥

४४) तो आपल्या इच्छेनुसार चालतांना दिसतो. असें तो सर्व कर्मांचे आचरण करतो.

हें सांगों काई एकैक । देखें श्र्वासोच्छ्वासादिक ।

आणि निमिषोन्निमिष । आदिकरुनि ॥ ४५ ॥

४५) हें एकेक काय सांगावें ? पाहा, श्वास घेणें व सोडणें आणि पापण्यांची उघडझाप करणें इत्यादि कर्मे,

पार्था तयांचा ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं ।

परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ॥ ४६ ॥

४६) अर्जुना, पाहा. त्याच्या ठिकाणीं ही सर्वच असतात. परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर ह्यांचा कर्ता मुळींच होत नाही.

जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।

मग ज्ञानोदयीं चेइला । म्हनोनियां ॥ ४७ ॥

४७) ज्यावेळेला तो भ्रांतिरुप अंथरुणावर झोंपला होता, त्या वेळीं स्वप्नाच्या सुखानें घेरला होता, मग ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला. म्हणून ( तो आपल्याला कर्ता समजत नाही. )

आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती ।

आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥ ४८ ॥

४८) आतां चैतन्याच्या आश्रयानें सर्वेंद्रियांच्या वृत्ति आपल्या विषयांकडे धांव घेत असतात. 

दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे ।

देहीं कर्मजात तैसें । योगयुक्ता ॥ ४९ ॥

४९) दिव्याच्या उजेडावर ज्याप्रमाणे  घरांतील व्यवहार चालतात, त्याप्रमाणें ( ज्ञानाच्या प्रकाशांत ) योगयुक्तांचीं सर्व कर्में देहांत चालतात.

तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।

जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥ ५० ॥

५०) ज्याप्रमाणें कमळाचें पान पाण्यांत असूनही पाण्यानें 

लिप्त होत नाहीं, त्याप्रमाणें तो सर्व कर्में करतो, परंतु ( 

धर्माधर्मरुप ) कर्मबंधनानें आकळला जात नाहीं



Custom Search