Thursday, December 24, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ४

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 4
Ovya 76 to 100 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ४ 
ओव्या ७६ ते १००

जैसा कां सर्वेश्र्वरु । पाहिजे तंव निर्व्यापारु ।

परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥ ७६ ॥

७६) ज्याप्रमाणें सर्वेश्र्वर जर पाहिला, तर तो वस्तुतः क्रियाशून्य असतो; परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो.

आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपे ।

जे हातुपावो न लिंपे । उदास वृत्तीचा ॥ ७७ ॥

७७) आणि त्यास कर्ता असें म्हणावें, तर तो कोणत्याहि कर्मानें लिप्त होत नाहीं. कारण त्याच्या ठिकाणीं असणार्‍या उदासीनतेचा कोणताहि अवयव अशुद्ध होत नाहीं. ( त्याची उदासीनता किंचितहि बिघडत नाहीं.)

योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे ।

परी महाभूतांचें दळवाडें । उभारी भलें ॥ ७८ ॥

७८) त्याच्या सहजस्थितीचा तर भंग होत नाहीं व त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाहीं; असें असूनहि तो महाभूतांचे अनेक समुदाय चांगल्या तर्‍हेनें उत्पन्न करतो.

जगाचां जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे ।

जगचि हें होये जाये । तो शुद्धीही नेणे ॥ ७९ ॥

७९) तो जगांतील सर्व प्राण्यांना व्यापून असतो. परंतु केव्हांहि कोणाची आसक्ति धरीत नाहीं. हें जग उत्पन्न होते व नाहींसे होतें, याची त्यास खबरहि नसते. 

पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखे ।

आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ॥ ८० ॥

८०) ( प्राणीमात्रांकडून होणारी सपूर्ण ) पापपुण्यें, हीं त्याच्या अगदी जवळ असून, तो त्यांना जाणत नाहीं. ( फार काय ? ) तो त्यांचा साक्षीहि होऊन राहात नाहीं, तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलावयास पाहिजे.

पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे ।

परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥ ८१ ॥

८१) सगुण स्वरुपाच्या संगतीनें तो सगुण होऊन क्रीडा करतो; परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला मलिनपणा येत नाही. 

तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जें चराचरीं ।

तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥ ८२ ॥

८२) तो उत्पन्न करतो, पालन करतो व संहार करतो, असे त्याच्या कर्तुत्वाविषयी सर्व लोकांत वर्णन होते; अर्जुना, ऐक, ते केवळ अज्ञान आहे.

तें अज्ञान जैं समूळ तुटे । तैं भ्रांतीचें मसैरें फिटे ।

मग अकर्तृत्व प्रगटे । ईश्र्वराचें ॥ ८३ ॥

८३) तें अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसें होतें, त्यावेळेला भ्रांतिरुप काजळी दूर होते आणि मग ईश्र्वराचें कर्तृत्व प्रतीतीला येतें.

एथ ईश्र्वरु एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता ।

तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ॥ ८४ ॥

८४) आणि ईश्र्वर एक अकर्ता  आहे, असें चित्ताला पटतें आणि मुळापासून स्वभावतःच तोच ( ईश्र्वरच ) मी आहें, ( तर मीहि उघडच अकर्ता आहे ),  

ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासि भेदु कैंचा त्रिजगतीं ।

देखे आपुलिया प्रतीती । जगचि मुक्त ॥ ८५ ॥

८५) अशा विचारानें चित्तांत उदय केला असतां, त्याला तिन्ही लोकांत भेद कशाचा ? तो आपल्या अनुभवानें सर्व जगच मुक्त आहे असें पाहतो.

जैशी पूर्वदिशेचां राउळीं । उदयाची सूर्ये दिवाळी ।

कीं येरींहि दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ॥ ८६ ॥

८६) ज्याप्रमाणें पूर्वदिशेच्या राजवाड्यांत सूर्योदयरुपी दिवाळी झाली असतां त्याच वेळेला दुसर्‍याहि दिशांतील काळोख नाहींसा होतो.

बुद्धिनिश्र्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण ।

ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ॥ ८७ ॥

८७) आत्मज्ञानासंबंधीं त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे, साधक आपणच आपल्याला ब्रह्मरुप मानूं लागतो आणि आपली वृत्ति पूर्णब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानांत असतो.   

ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदयातें गिंवसित आलें ।

तयांचि समतादृष्टि बोलें । विशेषूं काई ॥ ८८ ॥

८८) असें चांगलें व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयाचा शोध करीत आलें ( ज्यांना प्राप्त झालें ), त्यांची जी समतादृष्टि होते, तिचें शब्दांनी विशेष काय वर्णन करुं !

एक आपणपेंचि पां जैसें । ते देखती विश्र्व तैसें ।

हे बोलणें कायसें । नवलु एथ ॥ ८९ ॥

८९) ते जसें आपल्यालाच ब्रह्मरुप पाहातात, तसेंच ते सर्व जगाला ( ब्रह्मरुप ) पाहातात, हें येथें सांगण्यांत काय मोठे आश्र्चर्य आहे ?

परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे ।

कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥ ९० ॥

९०) परंतु ज्याप्रमाणें दैव हें लीलेने देखील केव्हांच दरिद्रतेला पाहत नाही, किंवा विचार हा ज्याप्रमाणें भ्रांतीला जाणत नाहीं,

नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं ।

अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥ ९१ ॥

९१) किंवा अंधकाराचा प्रकार ज्याप्रमाणें सूर्याला स्वप्नांतहि दिसत नाहीं किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताहि येत नाही; 

हें असो संतापु कैसा । चंद्र न स्मरे जैसा ।

भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥ ९२ ॥

९२) हें राहूं दे; उष्णता कशी असते, हें ज्याप्रमाणें चंद्राला आठवूनहि लक्षांत येणार नाहीं, त्याप्रमाणें ते ज्ञानी प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाहीत. 

मग हा मशकु हा गजु । कीं हा श्र्वपचु हा द्विजु ।

पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ॥ ९३ ॥

९३) मग ( त्यांच्या ठिकाणीं ) हें चिलिट आणि हा हत्ती किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा हा पलीकडे असलेला परका हा भेद कोठून उरणार ? 

ना तरी हे धेनु हें श्र्वान । एक गुरु एक हीन ।

हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥ ९४ ॥

९४) अथवा, ही गाय आणि हें कुत्रें अथवा एक थोर आणि एक नीच ( हें कोठलें ? ) हें राहूं दे. जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार ?

एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा ।

तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषम काई ॥ ९५ ॥

९५) आणि जर अहंकार उतलेला असेल तरच भेदाची प्रतीती होईल. तो अहंकार ( तर ) अगोदरच सर्व नाहींसा झाला; आतां भेदभाव कोठला ?

म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म ।

हें संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचें ॥ ९६ ॥

९६) म्हणून सर्व ठिकाणीं, सर्व काळ सारखें असणारें जे अद्वय ब्रह्म तेंच आपण आहों, हें जें सम दृष्टीचें तत्त्व, तें तो संपूर्ण जाणतो. 

जिद्दीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां ।

परी भोगिली निसंगता । कामेंविण ॥ ९७ ॥

९७) ज्यांनी विषयांचा संबंध न टाकतां आणि इंद्रियांचें दमन न करतां निरिच्छ असल्यामुळें अलिप्तता भोगिली;

जिद्दीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें ।

पण सांडिलें निद्सुरें । लौकिकु हें ॥ ९८ ॥

९८) जे लोकांना अनुसरुन, लोक करतात त्याप्रमाणें व्यवहार करतात; परंतु ज्यांनीं लोकांच्या ठिकाणीं असणार्‍या अज्ञानाचा त्याग केला आहे;   

जैसा जनामाजि खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु ।

तैसा शरीरी तो परिसंसारु । नोळखे तयांतें ॥ ९९ ॥

९९) ज्याप्रमाणें पिशाच्च जगांत असून जगाला दिसत नाहीं, त्याप्रमाणें तो देहधारी असूनहि संसारी लोक त्याला ओळखत नाहींत.

हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे ।

तें आणिकें म्हणती वेगळे । कल्लोळ हे ॥ १०० ॥

१००) हें राहूं दे. वार्‍याच्या संगतीनें ज्याप्रमाणें पाण्यावरच 

पाणी ( लाटरुपानें ) खेळतें, ( पण ) लोक त्यास, ह्या लाटा पाण्याहून वेगळया आहेत, असे म्हणतात;




Custom Search

No comments: