Tuesday, December 15, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग २

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 2 
Ovya 26 to 50 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग २ 
ओव्या २६ ते ५०

एर्‍हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा ।

ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं ॥ २६ ॥

२६) एर्‍हवीं तरी अर्जुना, जे पूर्णपणें अज्ञानी आहेत, ते सांख्ययोग आणि कर्मयोग यांचें स्वरुप कसें जाणूं शकतील. 

सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न ।

एर्‍हवी दीपाप्रति काई अनान । प्रकाशु आहाती ॥ २७ ॥

२७)  ते स्वभावतःच मूर्ख असतात, म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. एर्‍हवीं प्रत्येक दिव्याचें प्रकाश काय निराळें आहेत ?  

पै सम्यक् एकें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें ।

ते दोन्हींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥ २८ ॥

२८) एकाचेंच चांगलें आचरण करुन ज्यांनी संपूर्ण रीतीनें तत्त्वाचा अनुभव घेतला. ते दोन्हीहि ( मार्ग ) एकच आहेत, असें समजतात. 

आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे ।

म्हणोनि ऐक्यता दोहींते सहजें । इयापरी ॥ २९ ॥

२९) आणि सांख्य मार्गानें, जें मिळतें तेंच योगाने प्राप्त होतें. म्हणून अशा रीतीनें या दोन मार्गांत सहजच ऐक्य आहे.   

देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा ।

तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥ ३० ॥

३०) पाहा, आकाश आणि पोकळी यांच्यामध्यें ज्याप्रमाणें भिन्नता नाहीं, त्याप्रमाणें कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते, 

तयासींचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें ।

जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥ ३१ ॥

३१) ( असा ), ज्यांला सांख्य आणि कर्मयोग अभिन्नतेनें पटले, त्यालाच जगांत उजाडलें, ( ज्ञानप्राप्ति झाली, ) व त्यानेंच आत्मस्वरुप पाहिलें. 

जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता ।

तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥ ३२ ॥

३२) अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याच्या हातवटीच्या रस्त्यानें मोक्षरुप पर्वतावर चढतो, तो परमानंदरुपी शिखर त्वरेनें गांठतो.

येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे ।

परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥ ३३ ॥

३३) याहून दुसरा ज्याच्याकडून कर्मयोगाचें अनुष्ठान होत नाहीं, तो व्यर्थच ( संन्यासाच्या ) छंदांत पडतो. परंतु त्याला संन्यासाची प्राप्ति केव्हांच घडत नाहीं. ॥ ३३ ॥   

जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें ।

मग आत्मस्वरुपीं घातलें । हारौनिया ॥ ३४ ॥

३४) ज्यानें विषयांपासून हिरावून घेतलेले आपलें मन गुरुपदेशानें स्वच्छ करुन आत्मस्वरुपांत मुरवून ठेवलें,  

जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें अल्प आवडे ।

मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥ ३५ ॥

३५) समुद्रांत मीठ पडलें नाहीं तोपर्यंत तें वेगळें अल्प असें दिसतें, मग ज्या वेळीं समुद्राशीं त्याचा संयोग होतो, त्या वेळीं तें समुद्राएवढेंच होतें,  

तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचे मनचि चैतन्य जाहलें ।

तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ॥ ३६ ॥

३६) त्याप्रमाणें संकल्पापासून दूर केल्यामुळें ज्याचें चित्त चिद्रूप झालें तो परिछिन्न दिसला. तरी, त्यानें तिन्ही लोक व्यापले आहेत, असे समज.

आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।

आणि करी जर्‍ही आघवें । तर्‍ही अकर्ता तो ॥ ३७ ॥ 

३७) आतां कर्ता, कर्म, कार्य, हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावतःच त्याच्या ठिकाणीं बंद पडतो आणि यावर त्यानें सर्व ( कर्म ) जरी केलें, तरी तो ( तत्त्वतः ) त्याचा कर्ता होत नाहीं.

जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं ।

तरी कर्तृत्व कैचें काई । उरे सांगे ॥ ३८ ॥

३८) कारण, अर्जुना त्याच्या ठिकाणीं ‘ मी देह ‘ अशी आठवणच नसते, तर मग कर्तेपणा कोठचा ? तो ( कर्तेपणा ) तेथें राहील काय ? सांग.

ऐसे तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण ।

दिसती संपूर्ण । योगयुक्ता ॥ ३९ ॥

याप्रमाणें शरीरचा त्याग केल्याशिवाय, अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण, त्या कर्मयोग्याच्या ठिकाणीं स्पष्टपणें अनुभवास येतात.   

एर्‍हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी ।

अशेषींही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥ ४० ॥ 

४०) एर्‍हवीं तोहि इतर लोकांप्रमाणें शरीरांत असून, सर्व व्यवहार करीत असतांना दिसतो.

तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे ।

परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥ ४१ ॥

४१) तो देखील ( इतर लोकांसारखा ) डोळ्यांनी पाहातो, कानांनी ऐकत असतो, परंतु आश्चर्य पाहा कीं, तो त्या व्यवहारानें मुळीच लिप्त होत नाहीं.

स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें ।

अवसरोंचित बोलणें । तयाहि आथी ॥ ४२ ॥

४२) तो स्पर्शासहि समजतो, नाकानें गंधाचा अनुभव येतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारहि त्याच्या कडून होतो.

आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी ।

निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥ ४३ ॥

४३) आहाराचें सेवन करतो, टाकावयाचें तें टाकतो व झोपेच्या वेळेला सुखाने झोप घेतो.

आपुलेनि इच्छावशें । तोहि गा चालतु दिसे ।

पैं सकळ कर्म ऐसें । राहाटे कीर ॥ ४४ ॥

४४) तो आपल्या इच्छेनुसार चालतांना दिसतो. असें तो सर्व कर्मांचे आचरण करतो.

हें सांगों काई एकैक । देखें श्र्वासोच्छ्वासादिक ।

आणि निमिषोन्निमिष । आदिकरुनि ॥ ४५ ॥

४५) हें एकेक काय सांगावें ? पाहा, श्वास घेणें व सोडणें आणि पापण्यांची उघडझाप करणें इत्यादि कर्मे,

पार्था तयांचा ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं ।

परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ॥ ४६ ॥

४६) अर्जुना, पाहा. त्याच्या ठिकाणीं ही सर्वच असतात. परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर ह्यांचा कर्ता मुळींच होत नाही.

जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।

मग ज्ञानोदयीं चेइला । म्हनोनियां ॥ ४७ ॥

४७) ज्यावेळेला तो भ्रांतिरुप अंथरुणावर झोंपला होता, त्या वेळीं स्वप्नाच्या सुखानें घेरला होता, मग ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला. म्हणून ( तो आपल्याला कर्ता समजत नाही. )

आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती ।

आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥ ४८ ॥

४८) आतां चैतन्याच्या आश्रयानें सर्वेंद्रियांच्या वृत्ति आपल्या विषयांकडे धांव घेत असतात. 

दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे ।

देहीं कर्मजात तैसें । योगयुक्ता ॥ ४९ ॥

४९) दिव्याच्या उजेडावर ज्याप्रमाणे  घरांतील व्यवहार चालतात, त्याप्रमाणें ( ज्ञानाच्या प्रकाशांत ) योगयुक्तांचीं सर्व कर्में देहांत चालतात.

तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।

जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥ ५० ॥

५०) ज्याप्रमाणें कमळाचें पान पाण्यांत असूनही पाण्यानें 

लिप्त होत नाहीं, त्याप्रमाणें तो सर्व कर्में करतो, परंतु ( 

धर्माधर्मरुप ) कर्मबंधनानें आकळला जात नाहीं



Custom Search

No comments: