Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 5
तैसें
नामरुप तयाचें । एर्हवीं ब्रह्मचि तो साचें ।
मन साम्या
आलें जयाचें । सर्वत्र गा ॥ १०१ ॥
१०१)
त्याप्रमाणें त्याच्या नामरुपाची गोष्ट आहे. एर्हवीं, ज्याचें मन सर्व ठिकाणी
साम्याला आलेले आहे, तो खरोखर ब्रह्मच आहे.
ऐसोनि
समदृष्टि जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे ।
अर्जुना
संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥ १०२ ॥
१०२)
अशा तर्हेनें जो समदृष्टीनें असतो, त्या पुरुषाला ( ओळखण्याचें ) लक्षण देखील
आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला तें थोडक्यांत सांगतों. त्याचा तूं विचार
कर.
तरी
मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।
तैसा शुभाशुभीं
न विकरे । पातलां जो ॥ १०३ ॥
१०३)
मृगजळाच्या लोंढ्यानें ज्याप्रमाणें मोठा पर्वत ( किंचितहिं ) ढकलला जात नाहीं,
त्याप्रमाणें चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असतां, ज्याच्यामध्यें
विकार उत्पन्न होत नाहीत;
तोचि तो
निरुता । समदृष्टि तत्त्वता ।
हरि म्हणे
पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥ १०४ ॥
१०४)
तोच खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना, तोच
तेम ब्रह्म ( समज ).
जया आपणपें
सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणें नाहीं ।
तो विषय न
सेवी हें काई । विचित्र येथ ॥ १०५ ॥
१०५) जो
आत्मस्वरुपाला सोडून केव्हांहि इंद्रियरुपी गांवांत येत नाहीं ( म्हणजे
इंद्रियांशीं तादात्म्य करीत नाहीं ), तो विषय सेवन करीत नाहीं, यांत आश्र्चर्य
तें काय आहे ?
सहजें
स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडें अंतरें ।
रचिला
म्हणऊनि बाहिरें । पाऊल न घली ॥ १०६ ॥
१०६)
अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेनें अंतःकरणांतच स्थिर
झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकीत नाही. ( विषयाकडे प्रवृत्त ) होत नाही).
सांगें
कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।
तो चकोरु
काई वाळुवंटें । चुंबितु आहे ॥ १०७ ॥
१०७)
सांग, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो,
तो वाळूचे कण चाटीत बसेल काय ?
तैसें
आत्मसुख उपाइलें । जयासि आपपांचि फावलें ।
तया विषय
सहज सांडवले । सांगों काई ॥ १०८ ॥
१०८)
त्याप्रमाणें ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झालें, त्या
सहजच विषय सुटले, हें काय सांगावयास पाहिजे ?
एर्हवीं
तरी कौतुकें । विचारुनि पाहें पां निकें ।
या
विषयांचेनि सुखें । झकवती कवण ॥ १०९ ॥
१०९)
एर्हवीं सहजच चांगला विचार करुन पाहा, या विषयाच्या सुखानें कोण फसले जातात ?
जिहीं
आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले ।
जैसें रंक
कां आळुकैलें । तुषांतें सेवी ॥ ११० ॥
११०)
ज्याप्रमाणें भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणें ज्यांनीं
आत्मस्वरुपाचा अनुभव घेतला नाहीं, तेच या विषयांत रंगतात.
नातरी मृगें
तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें ।
मग
तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥ १११ ॥
१११)
अथवा तहानेनें त्रस्त झालेलीं हरिणें, भ्रमानें खर्या पाण्याला विसरुन, (
मृगजळाला ) पाणी आहे असें समजून माळरानावरच येऊन पोचतात;
तैसें
आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे ।
तयासीचि
विषय हे गोमटे । आवडती ॥ ११२ ॥
११२)
तसेंच ज्याला आत्मस्वरुपाचा अनुभव नाहीं, ज्याच्या ठिकाणीं स्वरुपानंदाचा नेहमीं
पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरुप वाटतात.
एर्हवीं
विषयीं काइ सुख आहे । हें बोलणेंचि सारिखें नोहे ।
तरी
विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥ ११३ ॥
११३)
एर्हवीं विषयांमध्यें कांहीं सुख आहे, हें म्हणणें बोलण्याच्यासुद्धां योग्यतेचें
नाहीं. नाहीं तर विजेच्या चमकण्यानें जगामध्यें कां उजाडत नाहीं ?
सांगें
वातवर्षआतपु धरे । ऐसें अभ्रच्छायाचि जरी सरे ।
तरी
त्रिमळिकें धवळारें । करावी कां ॥ ११४ ॥
११४)
सांग. वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचें काम जर ढगांच्या सावलीनेंच होईल,
तर तीन मजल्यांची चुनेगच्ची घरें बांधण्याचा ( खटाटोप ) कां करावा ?
म्हणोनि
विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे ।
जैसें महुर
कां म्हणिजे । विषकंदातें ॥ ११५ ॥
११५)
म्हणून ज्याप्रमाणें विषयाच्या कांद्याला ( बचनागाला ) मधुर म्हणावें,
त्याप्रमाणें विषयांत सुख आहे असें जे म्हणतात, ती ( विषयाचें खरें स्वरुप न
जाणतांच ) व्यर्थ केलेली बडबड आहे ( असें समज ).
नातरी भौमा
नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।
तैसा
सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥ ११६ ॥
११६)
किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असें म्हणतात ( पण त्याचा परिणाम
पीडाकारक दिसून येतो, ) किंवा मृगजळालाच ‘ जल ‘ असें म्हणता; त्याचप्रमाणें
विषयांपासून येणार्या अनुभवाला ' सुख ‘ म्हणणें व्यर्थ बडबड आहे..
हे असो आघवी
बोली । सांग पां सर्पफणीची साउली ।
ते शीतल
होईल केतुली । मूषकासी ॥ ११७ ॥
११७)
हें सर्व प्रतिपादन राहूं दे. तूंच सांग सर्पाच्या फणीची सावली आहे, ती उंदराला
कितपत शांत करणारी होईल बरें !
जैसा
आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा ।
तैसा
विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणे ॥ ११८ ॥
११८)
अर्जुना, ज्याप्रमाणें गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जेथपर्यंत मासा गिळीत नाहीं,
तेथपर्यंत ठिक; त्याप्रमाणें विषयांच्या संगाची स्थिति आहे, हें तूं निःसंशय समज !
हें
विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी ।
तैं
पांडुरोगाचिये पुष्टी । सारिखें दिसे ॥ ११९ ॥
११९)
विरक्तांच्या दृष्टीनें पाहिलें तर हें विषयसुख, अर्जुना पंडुरोगामध्यें आलेल्या
सुजेप्रमाणें ( घातक ) आहे. असें समज.
म्हणोनि विषयभोगीं
जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख ।
परि काय
करिती मूर्ख । न सेवितां न सरे ॥ १२० ॥
१२०)
म्हणून विषयांच्या उपभोगांमध्यें जें सुख असतें, तें प्रारंभापासून शेवटपर्यंत
दुःखच आहे, हे समज; परंतु काय करतील मूर्ख ? विषयांचें सेवन केल्याशिवाय त्यांचें
चालतच नाहीं.
ते अंतर
नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणें घडे ।
सांगें
पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥ १२१ ॥
१२१) ते
बिचारे मूर्ख त्या विषयांचें आंतलें स्वरुप जाणत नाहींत, म्हणून त्यांच्याकडून
विषयांचे अगत्य सेवन होतें. तूंच सांग, पुवांच्या चिखलांतील किडे पुवांची किळस
घेतात काय ?
तयां
दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर ।
ते
भोगजळातें जलचर । सांडिती केवीं ॥ १२२ ॥
१२२) त्या
दुःखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेलें असतें. ते विषयरुपी चिखलांतील बेडूकच
बनतात. ते विषयासक्त लोकरुपी मासे विषयोपभोगरुपी पाण्याला कसें टाकतील ?
आणि
दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती ।
जरी
विषयांवरी विरक्ति । धरिती जीव ॥ १२३ ॥
१२३)
शिवाय, जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दुःखदायक योनि ज्या आहेत, त्या सर्व
निरर्थक होणार नाहींत काय ?
नातरी
गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट ।
हे
विसांवेनवीण वाट । वाहावी कवणें ॥ १२४ ॥
१२४)
अथवा गर्भांत राहणें वगैरे संकटें किंवा जन्म आणि मरण यांपासून होणारे कष्ट, हा
मार्ग अविश्रांतपणें कोणी चालावा ?
जरी विषयीं
विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल ।
आणि संसारु
हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ॥ १२५ ॥
१२५) जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील, तर
मोठमोठ्या दोषांस राहावयास जागा कोठें मिळेल ?
आणि मग या जगामध्यें संसार हा शब्दच खोटा ठरणार
नाहीं काय ?
No comments:
Post a Comment