Monday, September 26, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 30 Ovya 623to 639 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३० ओव्या ६२३ ते ६३९

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 30 
Ovya 623to 639 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३० 
ओव्या ६२३ ते ६३९

मूळ श्लोक

मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रुपं घोरमीदृङ्ममेदम् ।

व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रुपमिदं प्रपश्य ॥ ४९ ॥

४९) हें माझें अशा प्रकारचें भयानक रुप पाहून तूं व्याकुळ होऊं नकोस, तूं भ्रांतचित्त होऊं नकोस. गतभय व प्रीतियुक्त अंतःकरणाचा होऊन, पुन्हा तूं तें माझें पूर्वींचेच रुप पाहा. 

म्हणोनि विश्र्वरुपलाभें श्र्लाघ । एथिंचें भय नेघ नेघ ।

हें वांचूनि चांग । न मनीं कांहीं ॥ ६२३ ॥

६२३) म्हणून विश्वरुपप्राप्तीनें तूं आपल्याला धन्य समज व या विश्वरुपाची भीति मुळींच बाळगूं नकोस. या विश्वरुपावांचून कांहीं चांगलें मानूं नकोस.  

हां गा समुद्रु अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।

मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ॥ ६२४ ॥

६२४) अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात् कोणी तेथें प्राप्त झाला; मग आपण यांत बुडून मरुन जाऊं, म्हणून कोणी तरी त्याचा त्याग केला आहे काय ? 

नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु ।

ऐसें म्हणोनि अव्हेरु । करणें घडे ॥ ६२५ ॥

६२५) अथवा ( एखादा ) मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असतां ) हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर ‘ आपल्याला नेतां येत नाही, ‘ असें म्हणून त्याचा त्याग करणें घडेल काय ?

दैवें चिंतामणि लेईजे । कीं हें ओझें म्हणोनि सांडिजे ।

कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणोनि ॥ ६२६ ॥

६२६) दैवयोगानें चिंतामणि नांवाचें रत्न अंगावर धारण करावें व तें ओझें म्हणून ज्याप्रमाणें टाकून द्यावें किंवा आपल्याला पोसवत नाहीं म्हणून ( ज्याप्रमाणें ) कामधेनु हांकुन द्यावी;

चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगें करितोसि उबारा ।

पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर ॥ ६२७ ॥

६२७) चंद्र आपल्या घरीं आला असतां तुझ्या योगानें उष्मा होतो म्हणून त्याला ज्याप्रमाणें तूं चालता हो, असें म्हणावें, अथवा तूं सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा, असें सूर्यास म्हणावें; 

तैसें ऐश्र्वर्य हें महातेज । आजि हातां आलें आहे सहज ।

कीं एथ तुज गजबज । होआवी कां ॥ ६२८ ॥

६२८) त्याप्रमाणें हें महातेजरुपी ( विश्वरुपी ) ऐश्र्वर्य आज तुझ्या हातीं सहज आलें आहे. असें असून येथें तुझी कासाविशी कां व्हावी ?

परि नेणसीच गांवढिया । काय कोपों आतां धनंजया ।

आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ॥ ६२९ ॥

६२९) परंतु हें अडाण्या, तुला कांहीं कळत नाहीं. अर्जुना, आतां तुझ्यावर काय रागवायचें आहे ? प्रत्यक्ष अग सोडून पडछायेला आलिंगन तूं देतो आहेस नव्हे काय ?

हें नव्हे जो मी साचें । एथ मन करुनियां काचें ।

प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें ॥ ६३० ॥

६३०) विश्वरुप हें माझें खरें रुप नाही काय ? पण त्या ठिकाणीं मन साशंक करुन, क्षुल्लक असें जें चतुर्भुज रुप त्या ठिकाणी तूं प्रेम धरतोस, हे बरें नाहीं ! 

तरि आझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था ।

इयेविषयीं आस्था । करिसी झणें ॥ ६३१ ॥

६३१) तर अर्जुना, अजुनपर्यंत तरी हें तुझें ठरलेले मत ( विश्वरुप हें भयंकर रुप आहे व चतुर्भुज रुप हें सुंदर आहे ) टाकून दे. या सगुण रुपाविषयीं आस्था ( प्रेम ) कदाचित् करशील, तर करुं नकोस.    

हें रुप जरी घोर । विकृति आणी थोर ।

तरी कृतनिश्र्चयाचें घर । हेंचि करीं ॥ ६३२ ॥

६३२) हें विश्वरुप जरी भयंकर अक्राळविक्राळ आणि अवाढव्य असें, आहे, तरी ( चतुर्भुज रुपापेक्षां ) हें विश्वरुप माझें खरें रुप असल्याकारणानें हेंच खरें आहे, असा तूं पक्का निश्चय कर. 

कृपण चित्तवृत्ति जैसी । रोवोनि घाली ठेवयापासीं ।

मग नुसधेनि देहेसीं । आपण असे ॥ ६३३ ॥

६३३) कंजूष मनुष्य आपलें सर्व लक्ष ज्याप्रमाणें आपण पुरुन ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपलें इतर सर्व व्यवहार करीत असतो; 

कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळां ।

पक्षिणी अंतराळां- । माजीं जाय ॥ ६३४ ॥

६३४) किंवा पंख न फुटलेल्या पिलांच्याजवळ त्या घरट्यांत आपला सर्व जीव ठेवून त्या पिलांची आई ( पक्षीण ) जशी आकाशांत संचार करण्याकरितां जाते;

नाना गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधिलें वत्सें घरीं ।

तैसें प्रेम एथिंचें करीं । स्थानपती ॥ ६३५ ॥

६३५) अथवा गाय डोंगरांत चरत असते, परंतु तिचें सर्व लक्ष घरीं आपल्या वासरावर अडकून राहिलेलें असतें, त्याप्रमाणें या ( विश्वरुप ) ठिकाणचें तूं आपलें प्रेम मालक कर.  

येरें वरिचिलेनि चित्तें । बाह्यसव्यसुखापुरतें ।

भोगिजो कां श्रीमूर्तीतें । चतुर्भुज ॥ ६३६ ॥

६३६) बाकी वरवर बाह्यात्कारी मनानें बाहेरच्या मैत्रीच्या सुखापर्यंत आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे. 

परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा ।

जे इये स्वरुपौनि सद्भावा । नेदावें निघों ॥ ६३७ ॥

६३७) परंतु अर्जुना, या विश्वरुपापासून आपल्या सद्भभावास दुसरीकडे कोठें जाऊं देऊं नकोस. एवढें आमचें एक सांगणें तूं विसरुं नयेस, हेच तुला वारंवार सांगणें आहे. 

हें कहीं नव्हतें देखिलें । म्हणोनि भय जें तुज उपजलें ।

तें सांडी एथ संचलें । असों दे प्रेम ॥ ६३८ ॥

६३८) हें विश्वरुप म्हणजे ( पूर्वी ) कधीं न पाहिलेली गोष्ट, म्हणून तुला याचें भय उत्पन्न झालें आहे. ते भय टाक व या विश्वरुपाच्या ठिकाणीं प्रेम सांठवलेले राहूं दे.

आतां करुं तुजयासारिखें । म्हणितलें विश्र्वतोमुखें ।

तरि रुप सुखें । न्याहाळीं पां तूं ॥ ६३९ ॥

६३९) आतां तुझ्या म्हणण्यासारखें करुं तर अर्जुना,

 मागील ( सगुण ) रुप तूं खुशाल पाहा, असें सर्व बाजूंनी

 ज्याला मुखें आहेत असा विश्वरुप परमात्मा म्हणाला.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 29 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २९

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 29 
Ovya 609 to 622 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग २९ 
ओव्या ६०९ ते ६२२

श्रीभगवानुवाच – मया प्रसन्नेन तवाजुनेदं रुपं दर्शितमात्मयोगात् ।

तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥ ४७ ॥

श्रीकृष्ण म्हणाले, ‘ अर्जुना, मी प्रसन्न होऊन, माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्यानें तुला हें माझें तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असें श्रेष्ठ स्वरुप दाखविलें, हें माझें ( रुप ) तुझ्याखेरीज पूर्वी कोणीहि पाहिलेलें नाहीं.

या आर्जुनाचिया बोला । विश्वरुपा विस्मयो जाहला ।

म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥ ६०९ ॥

६०९) अर्जुनाचें, हें बोलणें ऐकून विश्वरुपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला, असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही !

कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी ।

मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा ॥ ६१० ॥

६१०) ही कोणती वस्तु तुला प्राप्त झालीआहे ! तिच्या प्राप्तीचा आनंद मानीत नाहींस; उलट, एककल्ली मनुष्यासारखा भिऊन काय बोलतोस , तें कळत नाहीं.

आम्ही सवियाची जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणे देणें ।

वांचोनि जीव असे वेचणें । कवणासि गा ॥ ६११ ॥

६११) आम्ही जेव्हां सहजच प्रसन्न होतों तेव्हां आपल्या शरीरापर्यंत सुद्धा भक्तानें म्हटलेलें त्यास देतो. पण ( याशिवाय ) अर्जुना, कोणास आपला जीव अर्पण केला अशी गोष्ट कोठें घडली आहे काय ?

तें हें तुझिये चाडे । आजि जिवाचेंचि दळवाडें ।

कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान ॥ ६१२ ॥

६१२) आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करुन तुझ्या इच्छेकरितां हें एवढें विश्वरुप मूर्तीचें रुप तयार केलें आहे. 

ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी ।

म्हणोनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥

६१३) आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळें वेडी झाली आहे कीं काय, हें कळत नाहीं. म्हणून आम्ही गुप्त गोष्टीचा ( विश्वरुपाचा ) जगांत ध्वज लावला ( जगांत प्रसिद्ध केलें ).

तें हें अपरां अपार । स्वरुप माझें परात्पर ।

एधूनि ते अवतार । कृष्णादिक ॥ ६१४ ॥

६१४) तें हें माझें मायेपलीकडील स्वरुप सर्व अमर्याद वस्तूंपेक्षां अमर्याद आहे व कृष्णादिक जे अवतार होतात, ते येथूनच होतात.

हें ज्ञानतेजाचें निखळ । विश्र्वात्मक केवळ ।

अनंत हे अढळ । आद्य सकळां ॥ ६१५ ॥

६१५) हें स्वरुप केवळ ज्ञानतेजाचेंच बनलेलें आहे व विश्व हें केवळ त्याचें स्वरुप आहे. या स्वरुपाला कधीं अंत नाहीं व तें कधीं ढळत नाहीं व तें सर्वांचें मूळ आहे. 

हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना ।

जे जोगें नव्हे साधना । म्हणोनियां ॥ ६१६ ॥

६१६) अर्जुना, हें ( विश्वरुप ) तुझ्याशिवाय पूर्वी दुसर्‍या कोणी ऐकलेलें किंवा पाहिलेलें नाहीं. कारण हे कोणत्याहि साधनांनीं प्राप्त होण्यासारखें नाहीं.

मूळ श्लोक

न वेदयज्ञाध्ययनैर्नं दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।

एवंरुपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥ ४८ ॥

४८) हें कुरुकुलश्रेष्ठा ! वेदपठन, यज्ञयागादि, शास्त्रपठन, दान (श्रौतस्मार्तादि ) कर्में अथवा उग्र तपश्र्चर्या, यांनीदेखील असें हें माझें रुप, मनुष्य लोकांमध्ये तुझ्याशिवाय दुसर्‍या कोणालाहि दिसणें शक्य नाहीं.

याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें ।

यज्ञ की माघौते आले । स्वर्गौनीचि ॥ ६१७ ॥

६१७) वेद याला ( विश्वरुपाला ) जाणण्याच्याच मार्गाला लागले व ते मौन धारण करुन बसले. आणि यज्ञ म्हणशील तर ते स्वर्गापासूनच माघारी आले.

साधकीं देखिला आयासु । म्हणोनि वाळिला योगाभ्यासु ।

आणि अध्ययनें सौरसु । नाहीं एथ ॥ ६१८ ॥

६१८) साधकांनी याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला, म्हणून त्यांनीं योगाभ्यास टाकला आणि अध्ययनानें विश्वरुप पाहण्याची योग्यता येत नाहीं.

सीगेचीं सत्कर्मे । धाविन्नलीं संभ्रमें ।

तिहीं बहुतेकीं श्रमें । सत्यलोकु ठाकिला ॥ ६१९ ॥

६१९) पूर्ण आचरलेलीं सत्कर्में मोठ्या उत्कंठेने विश्वरुप प्राप्तीकरितां धांवली; पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टानें सत्यलोक गांठला.

तपीं ऐश्र्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें ।

एवं तपसाधन जें ठेलें । अपरांतरी ॥ ६२० ॥

६२०) तपांनीं विश्वरुपाचें ऐश्वर्य पाहिलें आणि आपला उग्रपणा उभ्याउभ्याच टाकून दिला. याप्रमाणें जें विश्वरुपच, तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिलें

तें हें तुवां अनायासें । विश्वरुप देखिलें जैसें ।

इये मनुष्यलोकीं तैसें । न फावेचि कवणा ॥ ६२१ ॥

६२१) असें जें विश्वरुप तें तूं कांहीं एक श्रम न पडतां जसें पाहिलेंस, तसें या मृत्युलोकांत कोणासहि पाहावयास सांपडणार नाहीं.  

आजि ध्यानसंपत्तीलागीं । तूंचि एकु आथिला जगीं ।

हें परमभाग्य आंगीं । विरंचींही नाहीं ॥ ६२२ ॥

६२२) आज ध्यानरुप संपत्तीकरितां जगांत तूंच एक संपन्न आहेस. असलें श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याहि अंगीं नाहीं.   




Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 28 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २८

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 28 
Ovya 586 to 608 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग २८ 
ओव्या ५८६ ते ६०८

तयां आघवियांचिआंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु ।

परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥ ५८६ ॥

५८६) त्या सर्व जन्मांचा मी झाडा घेऊन पाहात आहें, पण ही गोष्ट ( विश्वरुपाचे दर्शन ) ऐकलेतरी किंवा पाहिलेली आढळतच नाही.

बुद्धीचें जाणणें । कहीं व वचेचि याचेनि आंगणें ।

हे सादही अंतःकरणें । करवेचिना ॥ ५८७ ॥

५८७) बुद्धीची जाणण्याची शक्ति कधीं याच्या ( विश्वरुपाच्या ) अंगणांतसुद्धा येत नाही व अंतःकरणाला कल्पनासुद्धां करतां येत नाहीं,

तेथ डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी ।

किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत ॥ ५८८ ॥

५८८) अशा स्थितींत डोळ्यांना पाहावयास मिळावें, ही गोष्टच कशाला बोलावयास पाहिजे ? फार काय सांगावें ? हें पूर्वीं कधींहि पाहिलें नाहीं अथवा ऐकलें नाहीं. 

तें हें विश्वरुप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें ।

तरि माझें मन झालें । हृष्ट देवा ॥ ५८९ ॥

५८९) तें हें आपलें विश्वरुप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवलेंत, त्यामुळें देवा, माझें मन आनंदित झालें.

परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसी गोठी करावी ।

जवळीक हे भोगावी । आलिंगावासी ॥ ५९० ॥ 

५९०) परंतु आतां अशी जीवामध्यें इच्छा आहे कीं, तुझ्याशीं गोष्टी कराव्यात व तुझें सान्निध्य भोगावें व तुला आलिंगन द्यावें.      

ते येचि स्वरुपीं करुं म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे ।

आणि कोणा खेंव देइजे । तुज लेख नाहीं ॥ ५९१ ॥

ह्या सर्व गोष्टी या विश्वरुपाबरोबर करुं म्हटलें, तर अनंत मुखांपैकीं कोणत्या एका मुखाबरोबर बोलावें ? आणि तुझ्या विश्वरुपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावें ?

म्हणोनि वारियासवें धांवणें । न ठके गगना खेंव देणें ।

जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ॥ ५९२ ॥

५९२) एवढ्याकरितां वार्‍याबरोबर पळणें जमणार नाहीं व आकाशाला आलिंगन देणें घडणार नाहीं. समुद्रामध्यें जलक्रीडा कशी खेळावी ? 

यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा ।

म्हणोनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हें आतां ॥ ५९३ ॥

५९३) याकरितां हे श्रीकृष्णा, माझ्या मनांत या विश्वरुपाविषयीं भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा कीं आपण प्रकट केलेलें विश्वरुप आतां परत आवरुन घ्यावें.

पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे ।

तैसें चतुर्भुज रुप तुझें । तो विसावा आम्हां ॥ ५९४ ॥

५९४) स्थावरजंगमात्मक जग मजेनें हिंडून पाहावें ( व त्या हिंडण्यांत बर्‍याचशा हालअपेष्टा भोगल्यावर ) त्यामुळें घरीं सुखानें विश्रांति घेत राहावें, त्याप्रमाणें ( तुझे अफाट विश्वरुप पाहिल्यानंतर तुझें श्यामसुंदर चतुर्भुज रुप आम्हांस विश्रांतीची जागा आहे.

आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें ।

शास्त्रांतें आलोडावें । परि तियें सिद्धांतु तो हाचि ॥ ५९५ ॥  

५९५) आम्हीं योगमात्राचा अभ्यास करावा व त्या योगानें याच अनुभवाला ( तुझें श्यामसुंदर चतुर्भुज रुप ) यावें. आम्ही शास्त्राचा अभ्यास करावा, परंतु शास्त्रांचा सिद्धान्त हाच ( चतुर्भुज रुप ) आहे.

आम्हीं यजनें किजती सकळें । परि तियें फळावीं येणेंचि फळें ।

तीर्थें होतु सकळें । याचिलागीं ॥ ५९६ ॥

५९६) आम्हीं सर्व यज्ञ करावेत, परंतु याचें फळ हेंच ( चतुर्भुज रुप ) मिळावें. आमच्या सर्व तीर्थयात्रा याचकरितां असोत.

आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे ।

तया फळीं फळ हेंचि तुझें । चतुर्भुज रुप ॥ ५९७ ॥

५९७) आणखीं जें जें कांहीं दानपुण्य आम्ही करुं त्याच्या फळाच्या ठिकाणीं तुझें चतुर्भुज रुप हेंच फळ होय.  

ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणोनि तेंचि देखावया लवडसचडी ।

वर्तत असे ते सांकडी । फेडीं वेगां ॥ ५९८ ॥

५९८) याप्रमाणें त्या चतुर्भुज रुपाची आवड आहे; म्हणून तेंच पाहण्याकरितां लगबग आहे. ती अडचण ( तळमळ ) आपण लवकर दूर करा.

अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्ववसवितेया ।

प्रसन्न होईं पूजितया । देवांचिया देवा ॥ ५९९ ॥ 

५९९) हे अंतःकरणांतील सर्व गोष्टी जाणणार्‍या देवा, सर्व विश्व वसविणार्‍या देवा, व भजलें जाणारे जे देव त्या देवांच्या देवा, मला प्रसन्न हो.    

मूळ श्लोक

किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।

तेनैव रुपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ ४६ ॥

४६) किरीट  धारण करणार्‍या, गदा धारण करणार्‍या हातामध्यें चक्र धारण करणार्‍या अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे विश्वरुपधारिन्, तूं पुन्हा तेंच चतुर्भुज स्वरुप धारण कर.   

कैसें नीलोत्पलातें रांवित । आकाशाही रंगु लावित ।

तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ॥ ६०० ॥

६००) त्या चतुर्भुज श्यामसुंदर रुपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगविणारा, आकाशासहि ( निळा ) रंग देणारा व इंद्रनील नांवाच्या रत्नाला निळ्या रंगाचें तेज ( प्रकाश ) दाखविणारा आहे.

जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासीचि निघालिया भुजा ।

ज्याचें जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥ ६०१ ॥

६०१) ज्याप्रमाणे पाचेच्या रत्नाला सुगंध उत्पन्न व्हावा अथवा आनंदासच हात फुटावेत ( त्याप्रमाणें भगवंताचें शरीर शोभत होतें.) ज्याच्या घुडग्यांचा आश्रय केल्यामुळे ( ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळें ) मदनास सौंदर्य प्राप्त झालें. 

मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें ।

शृंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया ॥ ६०२ ॥

६०२) प्रभूंनी मुकुटाला मस्तकावर ठेवल्यामुळें त्या मुकुटाला भगवंताचें मस्तक मुकुट झालें. ( म्हणजे भगवंताच्या मस्तकानें मुकुटाला शोभा आली.) व ज्या भगवंतांच्या शरीरानें शृंगारास ( वस्त्रें, अलंकार इत्यादिकांस अलंकार ( शोभा ) प्राप्त झाला. 

इंद्रधनुष्याचिये आडणी । माजी मेघ गगनरंगणीं ।

तैसें आवरिलें शार्ङ्गपाणी । वैजयंतिया ॥ ६०३ ॥

६०३) आकाशमंडळांत इंद्रधनुष्याच्या वर्तुळांत जसा मेघ आवरलेला आसतो, त्याप्रमाणें वैजयंती माळेनें श्रीकृष्ण आवरले गेले.  

कवणी ते उदार गदा । असुरां देत कैवल्य सदा ।

कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ॥ ६०४ ॥

६०४) कशी ती उदार गदा ! कीं जी गदा असुरांना नेहमीं मोक्षपदाला नेते ! गोविंदा, तुमचें सुदर्शन चक्र खरोखरच सौम्य तेजानें कसें शोभत आहे ?

किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठेत पां मी ।

म्हणोनि आतां तुम्ही । तैसया होआवें ॥ ६०५ ॥

६०५) फार काय सांगावें ? महाराज, तें आपले चतुर्भुज श्यामसुंदर रुप पाहण्यास मी उत्सुक आहें, म्हणून आतां आपण ( हें प्रचंड विश्वरुप आवरुन ) तें चतुर्भुज रुप धारण करावें.

हे विश्वरुपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे ।

आतां होताति आधले । कृष्णमूर्तीलागीं ॥ ६०६ ॥

६०६) महाराज, हें विश्वरुपाचें सोहाळे भोगून माझे डोळे शांत झाले. आतां ते ( डोळे ) श्रीकृष्णमूर्ति पाहण्याकरितां अत्यंत उत्सुक होत आहेत.

तें साकार कृष्णरुपडें । वांचूनि पाहो नावडे ।

तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥ ६०७ ॥

६०७) ह्या डोळ्यांस त्या सगुण कृष्णमूर्तिशिवाय इतर कांहीं पाहणें आवडत नाहीं. तें सगुण स्वरुप यांस पाहावयास मिळालें नाहीं, तर या विश्वरुपाची माझ्या डोळ्यांना कांहीं किंमत वाटत नाहीं.    

आम्हां भोगमोक्षाचां ठायीं । श्रीमूर्ती वांचूनि नाहीं ।

म्हणोनि तैसाचि साकारु होई । हें सांवरीं आतां ॥ ६०८ ॥

६०८) आम्हांला ( ऐहिक व पारलौकिक ) भोगाच्या

 ठिकाणीं ( फार काय सांगावें ) मोक्षाच्या ( देखील )

 ठिकाणीं श्यामसुंदर मूर्तीवांचून दुसरें कांहीं नाहीं. म्हणून

 देवा, आतां तूं तसाच ( चतुर्भुज ) हो व हें विश्वरुप 

आटोप.




Custom Search

Sunday, September 25, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 27 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २७

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 27 
Ovya 567 to 585 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग २७ 
ओव्या ५६७ ते ५८५

मूळ श्लोक

तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।

पितेव पुत्रस्य सखेव सख्यु: प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥ ४४ ॥

४४) यास्तव, जगताचा स्वामी व स्तवन करण्यास योग्य अशा तुला मी दंडवत घालून, नकस्कार करुन ( प्रार्थना करतो ); प्रसन्न हो. हे देवा, पिता ज्याप्रमाणें पुत्राचें, मित्र ज्याप्रमाणें मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणें प्रियजनांचे ( अपराध सहन करतो ) त्याप्रमाणें माझे अपराध तूं कृपा करुन सहन करावेस. (पोटांत घालावेस.)  

ऐसे अर्जुने म्हणितलें । मग पुढती दंडवत घातलें ।

सात्त्विकाचें आलें । भरतें तया ॥ ५६७ ॥

५६७) याप्रमाणें अर्जुनानें भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळीं त्यांच्यांत अष्टसात्त्विक भाव भरुन आले.  

मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद ।

काढीं जी अपराध--। समुद्रौनि मातें ॥ ५६८ ॥

५६८) मग त्याची वाचा सद्गदित होऊन तो म्हणावयास लागला, ‘ प्रसन्न हो, प्रसन्न हो. ‘ देवा, मला अपराधरुपी समुद्रातून काढ.

तुज विश्र्वसुहृदातें कहीं । सोयरपणें न मनूंचि पाहीं ।

तुज ईश्र्वरेश्वराचां ठायीं । ऐश्वर्य केलें ॥ ५६९ ॥

५६९) तूं सर्व जगाचा मित्र असून, तूं आमचा एक नातेवाईक आहेस, असे समजून मी तुला कधी मान दिला नाही. सगळ्या देवांचा जो तूं ईश्र्वर, त्या तुझ्या ठिकाणीं ( तुला सारथी करुन ) प्रभुत्व ( धनीपण ) गाजविले.   

तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे ।

तरि मियां वल्गिजे क्षोभें । अधिकाधिक ॥ ५७० ॥

५७०) सर्वांकडून वर्णन करण्यास तूं एकच योग्य आहेस ( तेव्हा वास्तविक पाहाता मीच तुझें वर्णन करणें योग्य होते; ) पण माझ्याव तुझें प्रेम असल्यामुळें सभेमध्ये तूं माझेच वर्णन करीत होतास. ( तेव्हां मी आपलीस्वतःची योग्यता ओळखून उगीच बसावें की नाहीं ? तरी तसे न करतां ) तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिकअधिकच बडबड करीत होतो. 

आतां ऐसऐसेया अपराधां । मर्यादा नाही मुकुंदा ।

म्हणोनि रक्ष रक्ष प्रमादा । पसावो म्हणुनी ॥ ५७१ ॥

५७१) आतां देवा, अशा माझ्या हातून घडलेल्या अपराधाला मर्यादा नाही. याकरितां माझ्यावर प्रसाद म्हणून माझ्या चुकापासून माझे रक्षण कर.

जी हेंचि विनवावयालागी । कैंची योग्यता माझां आंगीं ।

परि अपत्य जैसें सलगीं । बापेंसि बोले ॥ ५७२ ॥

५७२) देवा, हीसुद्धा विनंती करण्याची योग्यता माझ्या अंगी कोठे आहे ? परंतु लहान मूल ज्याप्रमाणें आपल्या बापाशीं सलगीचे भाषण करते ( त्याप्रमाणें मी तुमच्याशी सलगीचे भाषण करीत आहे. )

पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध ।

तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसे साहिजो जी ॥ ५७३ ॥

५७३) आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या तरी बाप ज्याप्रमाणे दुजेपणा सोडून त्या सहन करतो, त्याप्रमाणे, अहो महाराज, माझे अपराध आपण सहन करा.   

सख्याचें उद्दत । सखा साहे निवांत ।

तैसें तुवां समस्त । साहिजो जी ॥ ५७४ ॥

५७४) बरोबरीचा स्नेही, आपल्या स्नेह्याकडून कांहीं उपमर्द झाला असता, त्या विषयी कांहींच मनांत न घेतां सहन करतो, त्याप्रमाणें महाराज, मी केलेलीं सर्व अविचारी कृत्यें आपण सहन करा.

प्रियाचां ठायीं सन्मान । प्रिय न पाहे समर्था जाण ।

तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो ॥ ५७५ ॥

५७५) असें पाहा कीं, स्नेह्याच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळींच इच्छा करीत नाही, त्याप्रमाणें आपण आमच्या घरीं उच्छिष्ट काढलें. त्याची आपण क्षमा करावी. 

नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जिये संकटें ।

तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ॥ ५७६ ॥

५७६) अथवा जिवलग स्नेह्याची गांठ पडल्यावर, मग आपण भोगलेले जे संकटाचे सर्व प्रसंग, ते त्यांस सांगावयास काहींच संकोच वाटत नाहीं. 

कां उखितें आंगें जीवें । आपणपें दिधलें जिया भावें ।

तिये कांतु मिनलिया न राहवें । हृदय जेवीं ॥ ५७७ ॥

५७७) अथवा ज्या पतिव्रतेने आपल्याला शरीरानें व प्राणानें सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण केलें, तिची व पतीची भेट झाली असतां ज्याप्रमाणें तिच्या मनांतील कोणतीहि गोष्ट पतीला सांगितल्यावाचून तिच्यानें राहवत नाहीं;

तयापरी जी मियां । हें विनविलें तुमतें गोसाविया ।

आणि कांहीं एक म्हणावया । कारण असे ॥ ५७८ ॥

५७८) अहो महाराज, त्याप्रमाणें मीं तुम्हांला माझें मागील अपराध क्षमा करण्याची विनंती केली; माझा आणखी कांहीं एक सांगावयाचा हेतु आहे.   

मूळ श्लोक

अदृष्टपूर्व हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे ।

तदेव मे दर्शय देव रुपं प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ४५ ॥

४५) पूर्वीं ( कधीं ) न पाहिलेलें हें ( तुझें विश्वरुप ) पाहून मी हर्ष पावलों आहे; आणि भयानें माझें मन व्याकुळे झालें आहे. ( म्हणून ) देवा मला तेंच ( पूर्वींचे ) रुप दाखव. हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, माझ्यावर प्रसन्न हो.

तरि देवेंसीं सलगी केली । जे विश्र्वरुपाची आळी घेतली ।

ते मायबापें पुरविली । स्नेहाळाचेनि ॥ ५७९ ॥

५७९) तरी मी विश्वरुपदर्शनाचा हट्ट घेतला, हा जो देवाशीं मी लडिवाळपणा केल, तो माझा लडिवाळपणाचा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप, त्या तुम्ही पुरविला.

सुरतरुंचीं झाडें । आंगणीं लावावीं कोडें ।

देयाचें कामधेनुचें पाडें । खेळावया ॥ ५८० ॥

५८०) कल्पवृक्षांची झाडें अंगणामध्येंच कौतुकानें लावून द्यावींत अथवा कामधेनूचें वासरुं खेळावयास आणून द्यावें;

मियां नक्षत्रीं डाव पाडावा । चंद्र चेंडूवालागीं देयावा ।

हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवां ॥ ५८१ ॥

५८१) मी नक्षत्रांच्या फांद्यांशी डाव खेळावा, मला चेंडू म्हणून खेळावयास चंद्र द्यावा, हा सर्व माझा हट्ट माझ्या आई, तूं सिद्धीस नेलास.

जया अमृतशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारी मास ।

पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणि पेरिले ॥ ५८२ ॥

५८२) ज्या अमृताच्या थेंबाकरितां कष्ट पडतात, त्या अमृताचा पाऊस आपण चार महिने पाडलात व सर्वच पृथ्वी पेरणीस लायक करुन तीमध्यें पाभारीच्या प्रत्येक तासांत ( फणांच्या रेषांत ) चिंतामणि नांवाची रत्नें पेरलींत.

ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्ही ।

दाविलें जे हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ॥ ५८३ ॥

५८३) महराज, याप्रमाणें मला आपण कृतकृत्य केलेंत, तुम्हीं माझे पुष्कळ लाड पुरवलेत व जें शंकरव ब्रह्मदेव यांनीं कानांनीं देखील ऐकलें नाहीं, तें तुम्हीं मला प्रत्यक्ष दाखविलेंत. 

मग देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी ।

ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ॥ ५८४ ॥

५८४) मग तें त्यांना ( प्रत्यक्ष ) पाहावयाची गोष्ट कशाला पाहिजे ? ज्यांचें उपनिषदांना दर्शन नाहीं अशी आपल्या जीवांतील गुह्य गोष्ट तुम्हीं माझ्याकरितां उघड केली.

जी कल्पादीलागोनी । आजिची घडी धरुनी ।

माझीं जेतुली होउनी । गेलीं जन्में ॥ ५८५ ॥  

५८५) महाराज, कल्पाच्या आरंभापासून तों आजची

 घटका धरुन ( एवढ्या काळांत ) माझें जितके जन्म 
होऊन गेले




Custom Search