Shri Dnyaneshwari
तयां आघवियांचिआंतु ।
घरडोळी घेऊनि असें पाहतु ।
परि ही देखिली ऐकिली मातु ।
आतुडेचिना ॥ ५८६ ॥
५८६) त्या सर्व
जन्मांचा मी झाडा घेऊन पाहात आहें, पण ही गोष्ट ( विश्वरुपाचे दर्शन ) ऐकलेतरी
किंवा पाहिलेली आढळतच नाही.
बुद्धीचें जाणणें । कहीं व
वचेचि याचेनि आंगणें ।
हे सादही अंतःकरणें ।
करवेचिना ॥ ५८७ ॥
५८७) बुद्धीची
जाणण्याची शक्ति कधीं याच्या ( विश्वरुपाच्या ) अंगणांतसुद्धा येत नाही व
अंतःकरणाला कल्पनासुद्धां करतां येत नाहीं,
तेथ डोळ्यां देखी होआवी ।
ही गोठीचि कायसया करावी ।
किंबहुना पूर्वीं । दृष्ट
ना श्रुत ॥ ५८८ ॥
५८८) अशा स्थितींत
डोळ्यांना पाहावयास मिळावें, ही गोष्टच कशाला बोलावयास पाहिजे ? फार काय सांगावें
? हें पूर्वीं कधींहि पाहिलें नाहीं अथवा ऐकलें नाहीं.
तें हें विश्वरुप आपुलें ।
तुम्हीं मज डोळां दाविलें ।
तरि माझें मन झालें । हृष्ट
देवा ॥ ५८९ ॥
५८९) तें हें आपलें
विश्वरुप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवलेंत, त्यामुळें देवा, माझें मन
आनंदित झालें.
परि आतां ऐसी चाड जीवीं ।
जे तुजसी गोठी करावी ।
जवळीक हे भोगावी ।
आलिंगावासी ॥ ५९० ॥
५९०) परंतु आतां अशी
जीवामध्यें इच्छा आहे कीं, तुझ्याशीं गोष्टी कराव्यात व तुझें सान्निध्य भोगावें व
तुला आलिंगन द्यावें.
ते येचि स्वरुपीं करुं
म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे ।
आणि कोणा खेंव देइजे । तुज
लेख नाहीं ॥ ५९१ ॥
ह्या सर्व गोष्टी या
विश्वरुपाबरोबर करुं म्हटलें, तर अनंत मुखांपैकीं कोणत्या एका मुखाबरोबर बोलावें ?
आणि तुझ्या विश्वरुपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावें ?
म्हणोनि वारियासवें धांवणें
। न ठके गगना खेंव देणें ।
जळकेली खेळणें । समुद्रीं
केउतें ॥ ५९२ ॥
५९२) एवढ्याकरितां वार्याबरोबर
पळणें जमणार नाहीं व आकाशाला आलिंगन देणें घडणार नाहीं. समुद्रामध्यें जलक्रीडा
कशी खेळावी ?
यालागीं जी देवा । एथिंचें
भय उपजतसे जीवा ।
म्हणोनि येतुला लळा पाळावा
। जे पुरे हें आतां ॥ ५९३ ॥
५९३) याकरितां हे
श्रीकृष्णा, माझ्या मनांत या विश्वरुपाविषयीं भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच
एवढा हट्ट पुरवावा कीं आपण प्रकट केलेलें विश्वरुप आतां परत आवरुन घ्यावें.
पैं चराचर विनोदें पाहिजे ।
मग तेणें सुखें घरीं राहिजे ।
तैसें चतुर्भुज रुप तुझें ।
तो विसावा आम्हां ॥ ५९४ ॥
५९४) स्थावरजंगमात्मक
जग मजेनें हिंडून पाहावें ( व त्या हिंडण्यांत बर्याचशा हालअपेष्टा भोगल्यावर )
त्यामुळें घरीं सुखानें विश्रांति घेत राहावें, त्याप्रमाणें ( तुझे अफाट विश्वरुप
पाहिल्यानंतर तुझें श्यामसुंदर चतुर्भुज रुप आम्हांस विश्रांतीची जागा आहे.
आम्हीं योगजात अभ्यासावें ।
तेणें याचि अनुभवा यावें ।
शास्त्रांतें आलोडावें ।
परि तियें सिद्धांतु तो हाचि ॥ ५९५ ॥
५९५) आम्हीं
योगमात्राचा अभ्यास करावा व त्या योगानें याच अनुभवाला ( तुझें श्यामसुंदर
चतुर्भुज रुप ) यावें. आम्ही शास्त्राचा अभ्यास करावा, परंतु शास्त्रांचा सिद्धान्त
हाच ( चतुर्भुज रुप ) आहे.
आम्हीं यजनें किजती सकळें ।
परि तियें फळावीं येणेंचि फळें ।
तीर्थें होतु सकळें ।
याचिलागीं ॥ ५९६ ॥
५९६) आम्हीं सर्व यज्ञ
करावेत, परंतु याचें फळ हेंच ( चतुर्भुज रुप ) मिळावें. आमच्या सर्व तीर्थयात्रा
याचकरितां असोत.
आणीकही कांहीं जें जें ।
दान पुण्य आम्हीं कीजे ।
तया फळीं फळ हेंचि तुझें ।
चतुर्भुज रुप ॥ ५९७ ॥
५९७) आणखीं जें जें
कांहीं दानपुण्य आम्ही करुं त्याच्या फळाच्या ठिकाणीं तुझें चतुर्भुज रुप हेंच फळ
होय.
ऐसी तेथिंची जीवा आवडी ।
म्हणोनि तेंचि देखावया लवडसचडी ।
वर्तत असे ते सांकडी ।
फेडीं वेगां ॥ ५९८ ॥
५९८) याप्रमाणें त्या
चतुर्भुज रुपाची आवड आहे; म्हणून तेंच पाहण्याकरितां लगबग आहे. ती अडचण ( तळमळ )
आपण लवकर दूर करा.
अगा जीवींचें जाणतेया । सकळ
विश्ववसवितेया ।
प्रसन्न होईं पूजितया ।
देवांचिया देवा ॥ ५९९ ॥
५९९) हे अंतःकरणांतील
सर्व गोष्टी जाणणार्या देवा, सर्व विश्व वसविणार्या देवा, व भजलें जाणारे जे देव
त्या देवांच्या देवा, मला प्रसन्न हो.
मूळ श्लोक
किरीटिनं गदिनं
चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रुपेण चतुर्भुजेन
सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ ४६ ॥
४६) किरीट धारण करणार्या, गदा धारण करणार्या हातामध्यें
चक्र धारण करणार्या अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे
विश्वरुपधारिन्, तूं पुन्हा तेंच चतुर्भुज स्वरुप धारण कर.
कैसें नीलोत्पलातें रांवित
। आकाशाही रंगु लावित ।
तेजाची वोज दावित ।
इंद्रनीळा ॥ ६०० ॥
६००) त्या चतुर्भुज
श्यामसुंदर रुपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगविणारा, आकाशासहि ( निळा ) रंग
देणारा व इंद्रनील नांवाच्या रत्नाला निळ्या रंगाचें तेज ( प्रकाश ) दाखविणारा
आहे.
जैसा परिमळ जाहला मरगजा ।
कां आनंदासीचि निघालिया भुजा ।
ज्याचें जानुवरी मकरध्वजा ।
जोडली बरव ॥ ६०१ ॥
६०१) ज्याप्रमाणे पाचेच्या
रत्नाला सुगंध उत्पन्न व्हावा अथवा आनंदासच हात फुटावेत ( त्याप्रमाणें भगवंताचें
शरीर शोभत होतें.) ज्याच्या घुडग्यांचा आश्रय केल्यामुळे ( ज्याचा मुलगा होऊन
मांडीवर खेळल्यामुळें ) मदनास सौंदर्य प्राप्त झालें.
मस्तकीं मुकुटातें ठेविलें
। कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें ।
शृंगारा लेणें लाधलें ।
आंगाचेनि जया ॥ ६०२ ॥
६०२) प्रभूंनी मुकुटाला
मस्तकावर ठेवल्यामुळें त्या मुकुटाला भगवंताचें मस्तक मुकुट झालें. ( म्हणजे
भगवंताच्या मस्तकानें मुकुटाला शोभा आली.) व ज्या भगवंतांच्या शरीरानें शृंगारास (
वस्त्रें, अलंकार इत्यादिकांस अलंकार ( शोभा ) प्राप्त झाला.
इंद्रधनुष्याचिये आडणी ।
माजी मेघ गगनरंगणीं ।
तैसें आवरिलें शार्ङ्गपाणी
। वैजयंतिया ॥ ६०३ ॥
६०३) आकाशमंडळांत
इंद्रधनुष्याच्या वर्तुळांत जसा मेघ आवरलेला आसतो, त्याप्रमाणें वैजयंती माळेनें
श्रीकृष्ण आवरले गेले.
कवणी ते उदार गदा । असुरां
देत कैवल्य सदा ।
कैसें चक्र हन गोविंदा ।
सौम्यतेजें मिरवे ॥ ६०४ ॥
६०४) कशी ती उदार गदा !
कीं जी गदा असुरांना नेहमीं मोक्षपदाला नेते ! गोविंदा, तुमचें सुदर्शन चक्र
खरोखरच सौम्य तेजानें कसें शोभत आहे ?
किंबहुना स्वामी । तें
देखावया उत्कंठेत पां मी ।
म्हणोनि आतां तुम्ही ।
तैसया होआवें ॥ ६०५ ॥
६०५) फार काय सांगावें
? महाराज, तें आपले चतुर्भुज श्यामसुंदर रुप पाहण्यास मी उत्सुक आहें, म्हणून आतां
आपण ( हें प्रचंड विश्वरुप आवरुन ) तें चतुर्भुज रुप धारण करावें.
हे विश्वरुपाचे सोहळे ।
भोगूनि निवाले जी डोळे ।
आतां होताति आधले ।
कृष्णमूर्तीलागीं ॥ ६०६ ॥
६०६) महाराज, हें
विश्वरुपाचें सोहाळे भोगून माझे डोळे शांत झाले. आतां ते ( डोळे ) श्रीकृष्णमूर्ति
पाहण्याकरितां अत्यंत उत्सुक होत आहेत.
तें साकार कृष्णरुपडें ।
वांचूनि पाहो नावडे ।
तें न देखतां थोडें ।
मानिताती हे ॥ ६०७ ॥
६०७) ह्या डोळ्यांस
त्या सगुण कृष्णमूर्तिशिवाय इतर कांहीं पाहणें आवडत नाहीं. तें सगुण स्वरुप यांस
पाहावयास मिळालें नाहीं, तर या विश्वरुपाची माझ्या डोळ्यांना कांहीं किंमत वाटत
नाहीं.
आम्हां भोगमोक्षाचां ठायीं
। श्रीमूर्ती वांचूनि नाहीं ।
म्हणोनि तैसाचि साकारु होई
। हें सांवरीं आतां ॥ ६०८ ॥
६०८) आम्हांला ( ऐहिक व पारलौकिक ) भोगाच्या
ठिकाणीं ( फार काय सांगावें ) मोक्षाच्या ( देखील )
ठिकाणीं श्यामसुंदर मूर्तीवांचून दुसरें कांहीं नाहीं. म्हणून
देवा, आतां तूं तसाच ( चतुर्भुज ) हो व हें विश्वरुप
आटोप.
No comments:
Post a Comment