Monday, September 26, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 29 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २९

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 29 
Ovya 609 to 622 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग २९ 
ओव्या ६०९ ते ६२२

श्रीभगवानुवाच – मया प्रसन्नेन तवाजुनेदं रुपं दर्शितमात्मयोगात् ।

तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥ ४७ ॥

श्रीकृष्ण म्हणाले, ‘ अर्जुना, मी प्रसन्न होऊन, माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्यानें तुला हें माझें तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असें श्रेष्ठ स्वरुप दाखविलें, हें माझें ( रुप ) तुझ्याखेरीज पूर्वी कोणीहि पाहिलेलें नाहीं.

या आर्जुनाचिया बोला । विश्वरुपा विस्मयो जाहला ।

म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥ ६०९ ॥

६०९) अर्जुनाचें, हें बोलणें ऐकून विश्वरुपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला, असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही !

कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी ।

मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा ॥ ६१० ॥

६१०) ही कोणती वस्तु तुला प्राप्त झालीआहे ! तिच्या प्राप्तीचा आनंद मानीत नाहींस; उलट, एककल्ली मनुष्यासारखा भिऊन काय बोलतोस , तें कळत नाहीं.

आम्ही सवियाची जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणे देणें ।

वांचोनि जीव असे वेचणें । कवणासि गा ॥ ६११ ॥

६११) आम्ही जेव्हां सहजच प्रसन्न होतों तेव्हां आपल्या शरीरापर्यंत सुद्धा भक्तानें म्हटलेलें त्यास देतो. पण ( याशिवाय ) अर्जुना, कोणास आपला जीव अर्पण केला अशी गोष्ट कोठें घडली आहे काय ?

तें हें तुझिये चाडे । आजि जिवाचेंचि दळवाडें ।

कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान ॥ ६१२ ॥

६१२) आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करुन तुझ्या इच्छेकरितां हें एवढें विश्वरुप मूर्तीचें रुप तयार केलें आहे. 

ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी ।

म्हणोनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥

६१३) आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळें वेडी झाली आहे कीं काय, हें कळत नाहीं. म्हणून आम्ही गुप्त गोष्टीचा ( विश्वरुपाचा ) जगांत ध्वज लावला ( जगांत प्रसिद्ध केलें ).

तें हें अपरां अपार । स्वरुप माझें परात्पर ।

एधूनि ते अवतार । कृष्णादिक ॥ ६१४ ॥

६१४) तें हें माझें मायेपलीकडील स्वरुप सर्व अमर्याद वस्तूंपेक्षां अमर्याद आहे व कृष्णादिक जे अवतार होतात, ते येथूनच होतात.

हें ज्ञानतेजाचें निखळ । विश्र्वात्मक केवळ ।

अनंत हे अढळ । आद्य सकळां ॥ ६१५ ॥

६१५) हें स्वरुप केवळ ज्ञानतेजाचेंच बनलेलें आहे व विश्व हें केवळ त्याचें स्वरुप आहे. या स्वरुपाला कधीं अंत नाहीं व तें कधीं ढळत नाहीं व तें सर्वांचें मूळ आहे. 

हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना ।

जे जोगें नव्हे साधना । म्हणोनियां ॥ ६१६ ॥

६१६) अर्जुना, हें ( विश्वरुप ) तुझ्याशिवाय पूर्वी दुसर्‍या कोणी ऐकलेलें किंवा पाहिलेलें नाहीं. कारण हे कोणत्याहि साधनांनीं प्राप्त होण्यासारखें नाहीं.

मूळ श्लोक

न वेदयज्ञाध्ययनैर्नं दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।

एवंरुपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥ ४८ ॥

४८) हें कुरुकुलश्रेष्ठा ! वेदपठन, यज्ञयागादि, शास्त्रपठन, दान (श्रौतस्मार्तादि ) कर्में अथवा उग्र तपश्र्चर्या, यांनीदेखील असें हें माझें रुप, मनुष्य लोकांमध्ये तुझ्याशिवाय दुसर्‍या कोणालाहि दिसणें शक्य नाहीं.

याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें ।

यज्ञ की माघौते आले । स्वर्गौनीचि ॥ ६१७ ॥

६१७) वेद याला ( विश्वरुपाला ) जाणण्याच्याच मार्गाला लागले व ते मौन धारण करुन बसले. आणि यज्ञ म्हणशील तर ते स्वर्गापासूनच माघारी आले.

साधकीं देखिला आयासु । म्हणोनि वाळिला योगाभ्यासु ।

आणि अध्ययनें सौरसु । नाहीं एथ ॥ ६१८ ॥

६१८) साधकांनी याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला, म्हणून त्यांनीं योगाभ्यास टाकला आणि अध्ययनानें विश्वरुप पाहण्याची योग्यता येत नाहीं.

सीगेचीं सत्कर्मे । धाविन्नलीं संभ्रमें ।

तिहीं बहुतेकीं श्रमें । सत्यलोकु ठाकिला ॥ ६१९ ॥

६१९) पूर्ण आचरलेलीं सत्कर्में मोठ्या उत्कंठेने विश्वरुप प्राप्तीकरितां धांवली; पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टानें सत्यलोक गांठला.

तपीं ऐश्र्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें ।

एवं तपसाधन जें ठेलें । अपरांतरी ॥ ६२० ॥

६२०) तपांनीं विश्वरुपाचें ऐश्वर्य पाहिलें आणि आपला उग्रपणा उभ्याउभ्याच टाकून दिला. याप्रमाणें जें विश्वरुपच, तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिलें

तें हें तुवां अनायासें । विश्वरुप देखिलें जैसें ।

इये मनुष्यलोकीं तैसें । न फावेचि कवणा ॥ ६२१ ॥

६२१) असें जें विश्वरुप तें तूं कांहीं एक श्रम न पडतां जसें पाहिलेंस, तसें या मृत्युलोकांत कोणासहि पाहावयास सांपडणार नाहीं.  

आजि ध्यानसंपत्तीलागीं । तूंचि एकु आथिला जगीं ।

हें परमभाग्य आंगीं । विरंचींही नाहीं ॥ ६२२ ॥

६२२) आज ध्यानरुप संपत्तीकरितां जगांत तूंच एक संपन्न आहेस. असलें श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याहि अंगीं नाहीं.   




Custom Search

No comments: