Shri Dnyaneshwari
तरि तया माझारीं कांहीं ।
भरंवसोनि उणें नाहीं ।
इयें वायांचि सैन्यें पाहीं
। वल्गिजत आहाती ॥ ४५८ ॥
४५८) तर त्यामध्यें
खात्रीपूर्वक कांहीच शिल्लक राहाणार नाहीं. तें पाहा, या सैन्याकडून व्यर्थ बडबड
केली जात आहे.
हे जे मिळोनियां मेळे ।
कुंथती वीरवृत्तीचेनि बळें ।
यमावरि गजदळें ।
वाखाणिजताती ॥ ४५९ ॥
४५९) हे जे सैन्यांचे
समुदाय जमवून शौर्यवृत्तीच्या बळानें गुरगुरत आहेत व हत्तीचे थवे वगैरे आपलीं
सैन्यें यमाच्या वरचढ आहेत, असे त्यांचे वर्णन करीत आहेत,
म्हणती सृष्टीवरी सृष्टी
करुं । आण वाहूनि मृत्यूतें मारुं ।
जगाचा भरुं । घोटु यया ॥
४६० ॥
४६०) तीं म्हणतात, (
तीं सैन्यें अशी वल्गना करतात ) कीं, आम्ही प्रतिसृष्टि करुं. शपथ वाहून (
प्रतिज्ञेनें ) मृत्यूला मारुं, आणि या विश्वाचा घोट भरुं.
पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश
वरिच्यावरि जाळूं ।
काई वाणवरी खिळूं ।
वारयातें ॥ ४६१ ॥
४६१) आम्ही ही सर्वच
पृथ्वी गिळूं व हें आकाश तर वरच्या वरच पेटवून भस्म करुं; इतकेंच काय, एवढा चंचल
वारा, पण त्यास देखील आम्ही आपल्या बाणानें जागच्या जागीं जखडून टाकूं.
ऐशा चतुरंगाचिया संपदा ।
करित महाकाळेंसीं स्पर्धा ।
वांटिवेचिया मदा । वघळले जे
॥ ४६२ ॥
४६२) पराक्रमाच्या
मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत, ते अशा या चतुरंग सैन्यरुप संपत्तीच्या
साहाय्यानें महाकाळाबरोबर स्पर्धा करतात.
बोल हतियेराहूनि तिखट ।
दिसती अग्निपरिस दासट ।
मारकपणें काळकूट । महुर
म्हणत ॥ ४६३ ॥
४६३) त्यांचे शब्द
शस्त्रापेक्षां तीक्ष्ण आणि अग्नीपेक्षां दाहक वाटतात आणि या शब्दांच्या मारकपणाची
काळकूट विषाशी तुलना केली, तर काळकूट विषाला मधुर म्हणावें लागेल.
तरि हे गंधर्वनगरींचे उमाळे
। जाण पोकळीचे पेंडवळे ।
अगा चित्रींचीं फळें । वीर
हे देखें ॥ ४६४ ॥
४६४) ( अशी जरी ते
गर्वाने वल्गना करीत आहेत ) तरी हें वीर गंधर्वनगराचे लोट आहेत, किंवा पोकळीचे
भेंडाळें. चित्राची रंगीत पोकळ फळें आहेत असें समज.
हा मृगजळाचा पूर आला । दळ
नव्हे कापडाचा साप केला ।
इया शृंगारुनियां खाला ।
मांडिलिया पैं ॥ ४६५ ॥
४६५) हा सैन्यसमुदाय
म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे. हें सैन्य नव्हे तर कापडाचा साप केलेला आहे. अथवा
हे सजवून मांडलेले भोत आहेत.
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो
लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३ ॥
३३) म्हणून तूं ( युद्धाला
) उभा राहा. यश संपादन कर. शत्रूंना जिंकून समृद्धियुक्त अशा राज्याचा उपभोग घे.
हे ( सर्व ) मीं पूर्वींच मारुन टाकलेले आहेत, हे सव्यासाचिन्, ( तूं ) केवळ
निमित्तमात्र हो.
येर चेष्टवितें जें बळ ।
तें मियां मागांचि ग्रासिलें सकळ ।
जातां कोलौरीचे वेताळ ।
तैसे निर्जीव हे आहाती ॥ ४६६ ॥
४६६) शिवाय ज्या
सामर्थ्यानें ते हालचाल करतात, तें सर्व सामर्थ्य मीं मध्येंच नाहीसें केले आहे.
आतां हे मातीच्या चित्रांतील वेताळासारखे निर्जीव आहेत.
हालविती दोरी तुटली । तरि
तियें खांबावरील बाहुलीं ।
भलतेणें लोटिली । उलथोनि
पडली ॥ ४६७ ॥
४६७) खांबावरच्या
बाहुल्यांना हालविणारी दोरी तुटली म्हणजे हवीं त्यानें त्या बाहुल्यांना ढकलले
असतां त्या उलथून पडतात.
तैसा सैन्याचा यया बगा ।
मोडतां वेळु न लगेल पैं गा ।
म्हणोनि उठीं उठीं वेगा ।
शाहाणा होई ॥ ४६८ ॥
४६८) त्याप्रमाणें
सैन्याचा हा आकार नाहींसा करण्याला काहींच वेळ लागणार नाही; एवढ्याकरितां अर्जुना,
शहाणा हो, आणि लवकर ऊठ पाहूं.
तुवां गोग्रहणाचेनि अवसरें
। घातलें मोहनास्त्र एकसरें ।
मग विराटाचेनि महाभेडें
उत्तरें । आसडूनि नागाविलें ॥ ४६९ ॥
४६९) विराटराज्याच्या
गायी हरण करण्यांस जेव्हा हे ( कौरव ) मत्स्य देशांत आले होते, त्यावेळेस सरसकट
सर्वांसच तू मोहनास्त्र घातलेंस. मग विराटाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर नावाच्या
मुलानेंसुद्धा जशी सर्वांची शस्त्रें हिसकवून त्यांना नग्न केलें.
आतां हें त्याहूनि निपटारें
जाहलें । निवटीं आयितें रण पडिलें ।
घेईं यश रिपु जिंतिले ।
एकलेनि अर्जुनें ॥ ४७० ॥
४७०) आतां हे
त्याहीपेक्षां तेजोहीन झालेले आहेत व आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे. तर त्यांस
तूं मार व एकट्या अर्जुनानें शत्रू जिंकले असें यश मिळव.
आणि कोरडें यशचि नोहे ।
समग्र राज्यही आलें आहे ।
तूं निमितमात्रचि होये ।
सव्यासाची ॥ ४७१ ॥
४७१) आणि यांत केवळ
रिकामें यशच मिळणार आहे असें नाही, तर संपूर्ण राज्यदेखील त्यांत आलेलें आहे.
अर्जुना, तूं केवळ नांवाला मात्र कारण हो.
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं
च कर्णं तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा
व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥ ३४ ॥
३४) द्रोण, भीष्म,
जयद्रथ आणि कर्ण आणि तसेच युद्धांतले इतर वीर मी मारलेले आहेत, त्यांना तू ठार कर.
भिऊं नकोस. युद्ध कर. प्रतिपक्षीयांना युद्धांत तूं जिंकशील.
द्रोणचा पाडु न करीं ।
भीष्माचें भय न धरीं ।
कैसेनि कर्णावरी । परजूं
हें न म्हण ॥ ४७२ ॥
४७२) द्रोणाची पर्वा
करुं नकोस. भीष्माचें भय धरुं नकोस व कर्णावर शस्त्र कसें चालवूं असें म्हणू नकोस.
कोण उपायो जयद्रथा कीजे ।
हें न चिंतू चित्त तुझें ।
आणिकही आधि जे जे । नावणिगे
वीर ॥ ४७३ ॥
४७३) जतद्रथाकरितां काय
उपाय करावा, याविषयीं तुझ्या बुद्धीला विचार करण्याचें कारण नाही. आणखी
वरीलप्रमाणे जे जे नांवाजलेले वीर आहेत;
तेही एक एक आघवे ।
चित्रींचे सिंहाडे मानावे ।
जैसे वोलेनि हातें घ्यावे ।
पुसोनियां ॥ ४७४ ॥
४७४) ते देखील एक एक
पाहिले तर, सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून
घेण्यास योग्य आहेत, असे समज.
यावरी पांडवा । काइसा
झुंजाचा मेळावा ।
हा आभासु गा आघवा । येर
ग्रासिलें मियां ॥ ४७५ ॥
४७५) अर्जुना, अशी
वास्तविक स्थिती असतांना, युद्धाचा समुदाय तो काय उरलेला आहे ? हा सर्व नुसता आभास
आहे. बाकी ( बाहेरील देखाव्याशिवाय इतर बल, तेज वगैरे ) सर्व मी नाहींसे केलें
आहे.
जेव्हां तुवां देखिले । हे
माझां वदनीं पडिले ।
तेव्हांचि यांचें आयुष्य
सरलें । आतां रितीं सोपें ॥ ४७६ ॥
४७६) ज्या वेळेला तूं
हे सैनिक माझ्या तोंडांत पडलेले पाहिलेस, त्याच वेळेला या सर्वांचे आयुष्य संपलें.
आतां हे पोकळ सोपटाप्रमाणें राहिलेले आहेत.
म्हणोनि वहिला उठीं । मियां
मारिले तूं निवटीं ।
न रिगे शोकसंकटीं ।
नाथिलिया ॥ ४७७ ॥
४७७) म्हणून लवकर ऊठ.
मी यांस ( आंतून ) मारलें आहे, व तूं यांस ( बाहेरुन ) मार, आणि नसत्या शोकसंकटांत
पडूं नकोस.
आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें
जैसा विंधोनि पाडिजे ।
तैसें देखें गा तुझें ।
निमित्त आहे ॥ ४७८ ॥
४७८) आपणच निशाण उभें
करावें व आपणच त्यास कौतुकानें बाण मारुन तें पाडावें. ( यांत असे बाण हे
निमित्तमात्र आहेत, त्याप्रमाणे या सर्वांस मीच उत्पन्न केले व मीच मारलें आहे ).
त्या बाणाप्रमाणें यांत तूं केवळ निमित्त आहेस,
बापा विरुद्ध जें जाहलें ।
तें उपजताचि वाघें नेलें ।
आतां राज्येंशीं संचलें ।
यश तूं भोगी ॥ ४७९ ॥
४७९) बाबा अर्जुना,
तुझ्या हिताला विरुद्ध असें जें कांहीं एक उत्पन्न झालें होतें, तें उत्पन्न
होतांक्षणींच वाघानें नेले ( उत्पन्न झाल्याबरोबरच तें नाहीसें झालें ) आतां (
वाटेंतील कांटा आयताच निघाल्यामुळें ) तुला मिळालेल्या राज्यासह यश तूं भोग.
सावियाचि उतत होते दायाद ।
आणि बळिये जगीं दुर्मद ।
ते वधिले विशद । सायासु न
लागतां ॥ ४८० ॥
४८०) तुझे भाऊबंद
स्वभावतःच गर्वानें फुगून गेले होते व जगामध्यें ते बलवान आणि मदोन्मत्त झाले
होते. त्यास मुळींच आयास न लागतां तूं साफ नाहीसें केलेस.
ऐसिया इया गोष्टी ।
विश्र्वाचां वाक्पटीं ।
लिहूनि घाली किरीटी ।
जगामाजीं ॥ ४८१ ॥
४८१) अर्जुना, या जगामध्यें अशा गोष्टी सर्व जगताच्या
वाचारुपी पटलावर लिहून ठेव.
No comments:
Post a Comment