Showing posts with label श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११. Show all posts
Showing posts with label श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११. Show all posts

Sunday, October 16, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 34 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 34 
Ovya 691 to 708 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३४ 
ओव्या ६९१ ते ७०८

तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें ।

जाणितला तरी स्वभावें । दृष्ट होय ॥ ६९१ ॥

६९१) ( असें ज्या वेळीं होईल ), त्याच क्षणाबरोबर मी ( भगवंत ) विश्वरुप आहें असें कळेल; आणि असा मी समजल्यावर, साहजिक रीतीनें मी तसा ( विश्वरुप ) दिसेन.

मग इंधनीं अग्नि उद्दिपे । आणि इंधन हे भाष हारपे ।

तें अग्निचि होऊनि आरोपे । मूर्त जेवीं ॥ ६९२ ॥

६९२) मग काष्ठांत ( घर्षणानें ) अग्नि उत्पन्न झाल्यावर, काष्ठ हा शब्द नाहींसा होऊन, तें काष्ठच जसें मूर्तिमंत अग्नि बनतें;      

कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें ।

मग उदेलियां एकसरें । प्रकाशु होय ॥ ६९३ ॥

६९३) अथवा जोपर्यंत सूर्यानें उदय केला नाहीं, तोपर्यंत आकाशच अंधार होऊन असतें, मग सूर्योदय झाल्यावर तें आकाशच एकसारखें प्रकाश होतें;

तैसें माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।

अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥ ६९४ ॥

६९४) त्याप्रमाणें माझें प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची येरझार संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जातें, हें लक्षांत ठेव.

मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें ।

किंबहुना सामावे । समरसें तो ॥ ६९५ ॥   

६९५) मग मी, तो आणि सर्व ( विश्व ) हें एक मीच स्वभावतः आहे फार काय सांगावें ? तो ऐक्यभावानें माझ्यामध्यें सामावला जातो.

मूळ श्लोक

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः ।

निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ५५ ॥

५५) हे पांडवा, जो मत्प्रीत्यर्थ कर्म करणारा, मीच ज्यांचें प्राप्तव्य आहे, असा माझा भक्त, संसारसंगरहित, कोणाहि भूतांशीं वैर नसलेला असा तो ( पुरुष ) मजप्रत येतो.  

जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगी ।

जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥ ६९६ ॥

६९६) जो ( भक्त ) माझ्या एकट्याकरितांच शरीरानें कर्में आचरतो आणि ज्याला जगामध्यें माझ्यावांचून दुसरें कांहीं चांगलें नाहीं;

दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ ।

जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥ ६९७ ॥

६९७) ज्याचा इहपरलोक, हें सर्व केवळ मीच होऊन राहिलों आहें व ज्यानें आपलें जगण्याचें प्रयोजन माझीच प्राप्ति होणे, हेंच ठरविलें आहे,  

भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहे बांधला ।

म्हणोनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥ ६९८ ॥

६९८) तो, भूतें ही भाषा विसरला; कारण त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाहीं; म्हणून तो निर्वैर झाला असतां तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ति करतो.

ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये ।

तैं मीचि होऊनि ठाये । पांडवा गा ॥ ६९९ ॥

६९९) अरे अर्जुना, असा जो भक्त आहे, त्याचें हें शरीर ज्या वेळी पडतें, त्या वेळी तो मीच होऊन राहतो. 

ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें ।

संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥ ७०० ॥

७००) उदरामध्यें जगत् असल्यामुळें दोदिल झालेले व करुणेच्या रसाने रसाळ, असें जे श्रीकृष्णदेव, ते याप्रमाणे बोलले, असें संजय ( धृतराष्ट्राला ) म्हणाला. 

ययावरी तो पांडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु ।

आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥ ७०१ ॥

७०१) याप्रमाणें श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंदरुपी धनाने थोर झाला; कारण श्रीकृष्णाच्या चरणांचे सेवन करण्यांत जगामध्ये तोच एक चतुर होता.

तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं ।

तंव विश्र्वरुपाहूनि कृष्णाकृती । देखिला लाभु ॥ ७०२ ॥

७०२) त्यानें देवाच्या दोन्ही मूर्तिचित्तामध्ये चांगल्या न्हाहाळून पाहिल्या, तेव्हां विश्वरुपापेक्षां कृष्णाच्या सगुण रुपामध्यें फायदा आहे, असे त्यास आधळून आले. 

परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें ।

जें व्यापकाहूनि नव्हे । एकादेशी ॥ ७०३ ॥

७०३) परंतु त्याच्या या समजुतीला देवानें मान दिला नाहीच, कारण व्यापक रुपापेक्षां ( विश्वरुपापेक्षा ) एकदेशी रुप ( चतुर्भुज रुप ) बरें नव्हे, असें श्रीकृष्ण म्हणाले.

हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी ।

उपपत्ती शङ्गी । दाविता जाहला ॥ ७०४ ॥ 

७०४) आणि हेंच ( चतुर्भुज ) रुपापेक्षां विश्वरुप बरें ही गोष्ट स्थापित करण्याकरितां एक दोन चांगल्या युक्ति श्रीकृष्णांनी दाखविल्या.

तिया ऐकोनी सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु ।

तरी होय बरवें दोन्हींआंतु । तें पुढती पुसों ॥ ७०५ ॥

७०५) त्या युक्ति ऐकून अर्जुन मनांत म्हणतो, या दोन्ही रुपांमध्यें कोणतें बरें आहे, ते देवाला आतां यापुढें विचारुं.  

ऐसा आलोचु करुनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी ।

आदरील ते परिसावी । पुढां कथा ॥ ७०६ ॥

७०६) याप्रमाणें मनांत विचार करुन आतां तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारील; ती कथा पुढें आहे, ती ऐकावी.

प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें ।

निवृत्तिपादप्रसादें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७०७ ॥

७०७) निवृत्तीनाथांच्या पायांच्या कृपेनें ती कथा सोप्या अशा ओंवी छंदांत मजेनें सांगता येईल असे ज्ञानेश्रवरमहाराज म्हणतात. 

भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोंवियाफूलें मोकळीं ।

अर्पिली अंघ्रियुगुलीं । विश्र्वरुपाचां ॥ ७०८ ॥

७०८) मी शुद्ध भावनारुप ओंजळींत हीं ओव्यारुपी

 मोकळी फुलें भरुन विश्वरुपाच्या दोन्ही पायांवर अर्पण

 केली. ( असें ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात. )

इति श्रीनद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरुपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः ॥

( श्लोक ५५; ओव्या ७०८ )

॥ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥     



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 32 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३२

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 32 
Ovya 656 to 672 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३२ 
ओव्या ६५६ ते ६७२

नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें ।

स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥ ६५६ ॥

६५६) अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर, प्रपंचाचें सर्व ज्ञान ओसरल्याव, जसें एक ब्रह्ममात्र स्फुरतें, त्याप्रमाणें विश्वरुप ओसरल्यावर अर्जुनानें कृष्णमूर्ति पाहिली.

तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्र्वरुपाची जवनिका होती ।

ते फिटोनि गेली परौती । हें भलें जाहलें ॥ ६५७ ॥

६५७) त्या अर्जुनाला मनांत असें वाटलें कीं, ( माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्णमूर्तीच्या ) आड ( मध्यें ) जो विश्वरुपाचा पडदा होता, तो पलीकडे निघून गेला, हें चांगलें झालें. 

काय काळातें जिणोनि आला । महावातु मागां सांडिला ।

आपुलिया बाहीं उतरला । सात सिंधु ॥ ६५८ ॥

६५८) जसा काय काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वार्‍यास मागें हटविलें, अथवा आपल्या हातांनीं सात समुद्र पोहून उतरुन आला;

ऐसा संतोषु बहु चित्तें । घेइजत असे पांडुसुतें ।

विश्र्वरुपापाठीं कृष्णातें । देखोनियां ॥ ६५९ ॥

६५९) अर्जुनानें विश्वरुपानंतर कृष्णरुपाला पाहून आपल्या मनानें असा फार आनंद मानला.

मग सूर्याचां अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं ।

तैसी देखों लागला अवनी । लोकांसहित ॥ ६६० ॥

६६०) मग सूर्य मावळल्यावर पुन्हां आकाशांत चांदण्या प्रकट होतात, त्यप्रमाणें अर्जुन हा लोकांसहित पृथ्वी पाहावयास लागला.

पाहे तंव तें कुरुक्षेत्र । तैसेंचि दोहीं भागीं झालें गोत्र ।

वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवारी ॥ ६६१ ॥

६६१) अर्जुन पाहावयास लागला, तों तें कुरुक्षेत्र तसेंच होतें; दोन्ही बाजूंना नातलग मंडळी तशीच ( पूर्वीप्रमाणें ) उभी होती, आणि योद्धे, शस्त्रांचे व अस्त्रांचे समुदायच समुदाय वर्षाव करीत होते.

तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु आहे निवांतु ।

धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥ ६६२ ॥   

६६२) त्या बाणांच्या मांडवाआंत रथ पूर्वीप्रमाणें स्थिर होता व घोडे हाकण्याच्या जागीं लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झाले होते व आपण खालीं होता.

अर्जुन उवाच

दृष्ट्वेदं मानुषं रुपं तव सौम्यं जनार्दन ।

इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ॥ ५१ ॥

५१) अर्जुन म्हणाला, ‘ हे जनार्दना, हें तुझें सौम्य मानव रुप पाहून, आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत् सावध झालों आहें.   

एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीर्यविलासें ।

मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥ ६६३ ॥

६६३) पराक्रम करणें हाच ज्याचा खेळ आहे, त्या अर्जुनानें याप्रमाणें पूर्वी जसें होतें तसें कृष्णाचें रुप पाहिलें. मग श्रीकृष्णास म्हणाला आतां मी जगलों असें मला वाटतें.

बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वघळलें रान ।

अहंकारेंसी मन । देशधडी जाहलें ॥ ६६४ ॥

६६४) माझें ज्ञान बुद्धीला सोडून भयानें रानोमाळ झालें होतें आणि मग हें आहंकारासह परागंदा झालें होते.

इंद्रियें प्रवृत्ती भुलली । वाचा प्राणा चुकली ।

ऐसी आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ॥ ६६५ ॥

६६५) इंद्रियें विषयांकडे धावण्याचें विसरलीं होती व वाचाहि प्राणास मुकली होती ( बंद पडली होती ), याप्रमाणें शरीररुपी गांवात दुर्दशा उडाली होती.

तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटली प्रकृती ।

आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें इयां ॥ ६६६ ॥

६६६) तीं ( बुद्धि, मन व इंद्रियें ) सर्वच पुन्हां टवटवीत होऊन आपल्या मूळ पदावर आलीं. आतां श्रीकृष्णा, यांना जिवंतपण प्राप्त झालें ( ही आपल्या स्वभावावर येऊन आपापलीं कामें करावयास लागलीं ). 

ऐसें सुख जीवीं घेतलें । मग कृष्णातें जी म्हणितलें ।

मियां तुमचे रुप देखिलें । मानुष हें ॥ ६६७ ॥

६६७) असा त्यानें मनांत आनंद मानला व मग तो कृष्णास म्हणाला, महाराज, तुमचें हें मनुष्यरुप ( एकदाचें ) माझ्या दृष्टीस पडलें.

हें रुप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया ।

बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ॥ ६६८ ॥

६६८) हें देवाधिदेवा, हें रुप दाखविणें म्हणजे मी जें चुकलेलें मूल, त्या मला तूं जी माझी आई, तिनें माझी समजूत घालून मला स्तनपानच दिलें.  

जी विश्र्वरुपाचां सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी ।

तों इयें निजमूर्तीचां तीरीं । निगालों आतां ॥ ६६९ ॥

६६९) महाराज, विश्र्वरुपी समुद्रांत जो मी हातानें लाटेमागून लाट आक्रमीत होतों, ( गटांगळ्या खात होतो,) तो मी या आपल्या चतुर्भुज मूर्तिरुप किनार्‍यास आतां लागलों.  

आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतीया जी झाडा ।

हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥ ६७० ॥

६७०) हे द्वारकेच्या राजा, ऐक. ( विश्वरुपदर्शनानंतर या चतुर्भुज रुपाची भेट ) ही भेट नव्हे, तर मी जें सुकावयास लागलेलें झाड, त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षाव होय.  

सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला ।

आतां जिणयाचा फिटला । आभरंवसा ॥ ६७१ ॥

६७१) तहानेने पीडलेला जो मी, त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात भेटला. आतां माझा जगण्याविषयींचा संशय दूर झाला.

माझां हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी ।

सुखेंसीं बुझावणी । जाहली मज ॥ ६७२ ॥    

६७२) माझ्या हृदयदेशांत आनंदाच्या वेलांची लावणी होत

 आहे. ( आज ) सुखाची व माझी गांठ पडत आहे.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 31 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३१

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 31 
Ovya 640 to 655 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३१ 
ओव्या ६४० ते ६५५

श्लोक

संजय उवाच

इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रुपं दर्शयामास भूयः ।

आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ५० ॥

५०) संजय म्हणाला, ‘ असें बोलून याप्रमाणें वासुदेवानें पुन्हा स्वतःचे ( पूर्वीचे ) रुप दाखविलें; आणि तो महात्मा पुन्हा सौम्यस्वरुपधारी होऊन भयभीत अर्जुनाला धीर देता झाला.

ऐसें वाक्य जी बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो ।

हें ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥ ६४० ॥

६४०) महाराज ( राजा धृतराष्ट्रा ), असें वाक्य बोलतांक्षणींच देव पुन्हा मनुष्य झाले, यात काही मोठेंसें आश्चर्य नाही. परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीं जें प्रेम होतें, त्या प्रेमाचेंच मोठें आश्चर्य आहे ( असें संजय म्हणाला ).  

श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरी सर्वस्व विश्र्वरुपायेवढें ।

हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासि ॥ ६४१ ॥

६४१) श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच. असे असूनसुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णानें विश्वरुपाएवढें आपले सर्वस्व अर्जुनाच्या हातीं दिलें, असें असून तें ( विश्वरुप ) अर्जुनाला आवडलें नाही.

वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूषण ठेविजे ।

नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना न ये हे ॥ ६४२ ॥

६४२) ज्याप्रमाणें एखाद्या वस्तूचा स्वीकार करुन ( मग ती वाईट म्हणून ) टाकून द्यावी किंवा ज्याप्रमाणें अस्सल रत्नांत कांहीं तरी खोड काढीत बसावें, अथवा मुलीला पाहून मग ती आपल्याला पटत नाहीं, असें ज्याप्रमाणें म्हणावें;

तया विश्र्वरुपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढु कैसा ।

सेल दीधली उपदेशा । किरीटीसि देवें ॥ ६४३ ॥

६४३) श्रीकृष्णांनीं आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरुपाएवढा विस्तार केला, या गोष्टीवरुन अर्जुनाविषयीं श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती ( हें स्पष्ट दिसतें ). अर्जुनाला देवांनी विश्वरुप दाखविलें हा त्या शेलका ( अति उत्कृष्ट ) उपदेश केला.     

मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा ।

मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥ ६४४ ॥

६४४) सोन्याची लगड मोडून त्याचा जसा आपल्या इच्छेनुरुप दागिना करावा व मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाहीं, तर तो पुन्हां जसा आटवून टाकावा;

तैसे शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्र्वरुप केलें ।

तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ॥ ६४५ ॥  

६४५) त्याप्रमाणें शिष्याच्या प्रीतीकरतां वरील दृष्टांताप्रमाणें गोष्ट घडली. प्रथम सगुण श्रीकृष्णमूर्ति होती, त्याचें विश्वरुप केलें; तें अर्जुनाच्या मनाला येईना, मग सगुण कृष्णरुप पुन्हां आणलें.

हा ठाववरी शिष्याची निसी । सहाते गुरु आहाती कवणे देशीं ।

परी नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥ ६४६ ॥

६४६) येथपर्यंत शिष्यानें दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशांत आहेत ? परंतु देवाचें अर्जुनाविषयीं कसें प्रेम आहे, तें कळत नाहीं, असें संजय म्हणाला.   

मग विश्र्वरुप व्यापुनी भोंवतें । जें दिव्य योगतेज प्रगटलें होतें ।

तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरुपीं तिये ॥ ६४७ ॥

६४७) मग श्रीकृष्णानें विश्वरुपाचा पसारा घालून आपल्या सभोंवतीं जें अलौकिक योगाचें तेज प्रकट केले होतें, तेंच त्यानें पुन्हां त्या सगुण कृष्णरुपांत एकत्र करुन सांठविलें. 

जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदार्थी सामावे ।

अथवा द्रुमाकारु साठवे । बीजकणिके जेवीं ॥ ६४८ ॥

६४८) ज्याप्रमाणें त्वम् हें सर्वपद ( अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र, परिच्छिन्न अशा जीवाचें लक्ष्य जें कूटस्थ चैतन्य तें ) तत् पदाच्या अर्थामध्यें ( सर्वज्ञ,सर्वशक्तिमान, स्वतंत्रविभु अशा ईश्र्वरतत्त्वाचें लक्ष्य जें ब्रह्म; त्यांत ) सामावतें अथवा वृक्षाचा सर्व आकार जसा बीजाच्या कणांत साठवतो;     

नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा ।

श्रीकृष्णें योगु तैसा । संहारिला तो ॥ ६४९ ॥

६४९) अथवा जीवाची जागृतावस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते, त्याप्रमाणें तो योग ( विश्वरुपाचा विस्तार ) श्रीकृष्णांनी आपल्यांत सामावून घेतला.

जैसी प्रभा हारति बिंबीं । की जळदसंपत्ती नभीं ।

भरतें सिंधुगर्भों । रिंगालें राया ॥ ६५० ॥

६५०) ज्याप्रमाणें सूर्यादिकांचे तेज, हें सूर्यादिकांच्या बिंबांत सामावतें, किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्यें लीन होतात; ( अथवा ) राजा धृतराष्ट्रा, समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते;

हो कां ते कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्र्वरुपपटाची घडी ।

ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥ ६५१ ॥

६५१) त्याप्रमाणे कृष्णाकृतीच्या रुपानें जी विश्र्वरुपरुपी वस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या पंसतीकरितां देवांनी उकलून दाखविली.

तंव परिमाणा रंगु । तेणें देखिला साविया चांगु ।

तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणोनि घडी केली पुढती ॥ ६५२ ॥

६५२) तेव्हां ( एखादें वस्त्र विकत घेणारें गिर्‍हाईक जसें त्या वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज पाहातें त्याप्रमाणें ) अर्जुनानें या विश्र्वरोरुपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज नीट पाहिला, त्या वेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवच नाहीं; म्हणून देवांनीं विश्वरुप वस्त्राची सगुण कृष्णमूर्तिरुप पुन्हां घडी केली;  

तैसें वाढीचैनि बहुवसपणें । रुपें विश्र्व जिंतिलें जेणें ।

तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥ ६५३ ॥

६५३) त्याप्रमाणेंआपल्या वाढीच्या अतिशय विस्तारानें ज्या कृष्णरुपानें विश्व जिंकलें होतें, तें विश्र्वरुपानें वाढलेलें कृष्णरुप ( पुन्हां ) शांत सगुण व सुंदर असें झालें.

किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें ।

परि आश्र्वासिलें पार्थातें । बिहालियासी ॥ ६५४ ॥

६५४) फार काय सांगावें ! श्रीकृष्णानें पुन्हां मर्यादित सगुण रुप धारण केलें, पण भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला.

तेथ जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला ।

तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥ ६५५ ॥

६५५) त्या वेळीं स्वप्नांत स्वर्गांत गेलेला मनुष्य जसा

 अकस्मात जागा व्हावा ( म्हणजे तो जसा एकदम

 बदललेल्या परिस्थितीमुळें आश्चर्यचकित होतो ) तसें

 अर्जुनास आश्चर्य वाटलें. 

 


Custom Search

Monday, September 26, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 30 Ovya 623to 639 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३० ओव्या ६२३ ते ६३९

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 30 
Ovya 623to 639 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३० 
ओव्या ६२३ ते ६३९

मूळ श्लोक

मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रुपं घोरमीदृङ्ममेदम् ।

व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रुपमिदं प्रपश्य ॥ ४९ ॥

४९) हें माझें अशा प्रकारचें भयानक रुप पाहून तूं व्याकुळ होऊं नकोस, तूं भ्रांतचित्त होऊं नकोस. गतभय व प्रीतियुक्त अंतःकरणाचा होऊन, पुन्हा तूं तें माझें पूर्वींचेच रुप पाहा. 

म्हणोनि विश्र्वरुपलाभें श्र्लाघ । एथिंचें भय नेघ नेघ ।

हें वांचूनि चांग । न मनीं कांहीं ॥ ६२३ ॥

६२३) म्हणून विश्वरुपप्राप्तीनें तूं आपल्याला धन्य समज व या विश्वरुपाची भीति मुळींच बाळगूं नकोस. या विश्वरुपावांचून कांहीं चांगलें मानूं नकोस.  

हां गा समुद्रु अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।

मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ॥ ६२४ ॥

६२४) अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात् कोणी तेथें प्राप्त झाला; मग आपण यांत बुडून मरुन जाऊं, म्हणून कोणी तरी त्याचा त्याग केला आहे काय ? 

नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु ।

ऐसें म्हणोनि अव्हेरु । करणें घडे ॥ ६२५ ॥

६२५) अथवा ( एखादा ) मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असतां ) हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर ‘ आपल्याला नेतां येत नाही, ‘ असें म्हणून त्याचा त्याग करणें घडेल काय ?

दैवें चिंतामणि लेईजे । कीं हें ओझें म्हणोनि सांडिजे ।

कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणोनि ॥ ६२६ ॥

६२६) दैवयोगानें चिंतामणि नांवाचें रत्न अंगावर धारण करावें व तें ओझें म्हणून ज्याप्रमाणें टाकून द्यावें किंवा आपल्याला पोसवत नाहीं म्हणून ( ज्याप्रमाणें ) कामधेनु हांकुन द्यावी;

चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगें करितोसि उबारा ।

पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर ॥ ६२७ ॥

६२७) चंद्र आपल्या घरीं आला असतां तुझ्या योगानें उष्मा होतो म्हणून त्याला ज्याप्रमाणें तूं चालता हो, असें म्हणावें, अथवा तूं सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा, असें सूर्यास म्हणावें; 

तैसें ऐश्र्वर्य हें महातेज । आजि हातां आलें आहे सहज ।

कीं एथ तुज गजबज । होआवी कां ॥ ६२८ ॥

६२८) त्याप्रमाणें हें महातेजरुपी ( विश्वरुपी ) ऐश्र्वर्य आज तुझ्या हातीं सहज आलें आहे. असें असून येथें तुझी कासाविशी कां व्हावी ?

परि नेणसीच गांवढिया । काय कोपों आतां धनंजया ।

आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ॥ ६२९ ॥

६२९) परंतु हें अडाण्या, तुला कांहीं कळत नाहीं. अर्जुना, आतां तुझ्यावर काय रागवायचें आहे ? प्रत्यक्ष अग सोडून पडछायेला आलिंगन तूं देतो आहेस नव्हे काय ?

हें नव्हे जो मी साचें । एथ मन करुनियां काचें ।

प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें ॥ ६३० ॥

६३०) विश्वरुप हें माझें खरें रुप नाही काय ? पण त्या ठिकाणीं मन साशंक करुन, क्षुल्लक असें जें चतुर्भुज रुप त्या ठिकाणी तूं प्रेम धरतोस, हे बरें नाहीं ! 

तरि आझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था ।

इयेविषयीं आस्था । करिसी झणें ॥ ६३१ ॥

६३१) तर अर्जुना, अजुनपर्यंत तरी हें तुझें ठरलेले मत ( विश्वरुप हें भयंकर रुप आहे व चतुर्भुज रुप हें सुंदर आहे ) टाकून दे. या सगुण रुपाविषयीं आस्था ( प्रेम ) कदाचित् करशील, तर करुं नकोस.    

हें रुप जरी घोर । विकृति आणी थोर ।

तरी कृतनिश्र्चयाचें घर । हेंचि करीं ॥ ६३२ ॥

६३२) हें विश्वरुप जरी भयंकर अक्राळविक्राळ आणि अवाढव्य असें, आहे, तरी ( चतुर्भुज रुपापेक्षां ) हें विश्वरुप माझें खरें रुप असल्याकारणानें हेंच खरें आहे, असा तूं पक्का निश्चय कर. 

कृपण चित्तवृत्ति जैसी । रोवोनि घाली ठेवयापासीं ।

मग नुसधेनि देहेसीं । आपण असे ॥ ६३३ ॥

६३३) कंजूष मनुष्य आपलें सर्व लक्ष ज्याप्रमाणें आपण पुरुन ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपलें इतर सर्व व्यवहार करीत असतो; 

कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळां ।

पक्षिणी अंतराळां- । माजीं जाय ॥ ६३४ ॥

६३४) किंवा पंख न फुटलेल्या पिलांच्याजवळ त्या घरट्यांत आपला सर्व जीव ठेवून त्या पिलांची आई ( पक्षीण ) जशी आकाशांत संचार करण्याकरितां जाते;

नाना गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधिलें वत्सें घरीं ।

तैसें प्रेम एथिंचें करीं । स्थानपती ॥ ६३५ ॥

६३५) अथवा गाय डोंगरांत चरत असते, परंतु तिचें सर्व लक्ष घरीं आपल्या वासरावर अडकून राहिलेलें असतें, त्याप्रमाणें या ( विश्वरुप ) ठिकाणचें तूं आपलें प्रेम मालक कर.  

येरें वरिचिलेनि चित्तें । बाह्यसव्यसुखापुरतें ।

भोगिजो कां श्रीमूर्तीतें । चतुर्भुज ॥ ६३६ ॥

६३६) बाकी वरवर बाह्यात्कारी मनानें बाहेरच्या मैत्रीच्या सुखापर्यंत आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे. 

परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा ।

जे इये स्वरुपौनि सद्भावा । नेदावें निघों ॥ ६३७ ॥

६३७) परंतु अर्जुना, या विश्वरुपापासून आपल्या सद्भभावास दुसरीकडे कोठें जाऊं देऊं नकोस. एवढें आमचें एक सांगणें तूं विसरुं नयेस, हेच तुला वारंवार सांगणें आहे. 

हें कहीं नव्हतें देखिलें । म्हणोनि भय जें तुज उपजलें ।

तें सांडी एथ संचलें । असों दे प्रेम ॥ ६३८ ॥

६३८) हें विश्वरुप म्हणजे ( पूर्वी ) कधीं न पाहिलेली गोष्ट, म्हणून तुला याचें भय उत्पन्न झालें आहे. ते भय टाक व या विश्वरुपाच्या ठिकाणीं प्रेम सांठवलेले राहूं दे.

आतां करुं तुजयासारिखें । म्हणितलें विश्र्वतोमुखें ।

तरि रुप सुखें । न्याहाळीं पां तूं ॥ ६३९ ॥

६३९) आतां तुझ्या म्हणण्यासारखें करुं तर अर्जुना,

 मागील ( सगुण ) रुप तूं खुशाल पाहा, असें सर्व बाजूंनी

 ज्याला मुखें आहेत असा विश्वरुप परमात्मा म्हणाला.



Custom Search