Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
मा ते व्यथा मा च विमूढभावो
दृष्ट्वा रुपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यपेतभीः प्रीतमनाः
पुनस्त्वं तदेव मे रुपमिदं प्रपश्य ॥ ४९ ॥
४९) हें माझें अशा
प्रकारचें भयानक रुप पाहून तूं व्याकुळ होऊं नकोस, तूं भ्रांतचित्त होऊं नकोस.
गतभय व प्रीतियुक्त अंतःकरणाचा होऊन, पुन्हा तूं तें माझें पूर्वींचेच रुप
पाहा.
म्हणोनि विश्र्वरुपलाभें
श्र्लाघ । एथिंचें भय नेघ नेघ ।
हें वांचूनि चांग । न मनीं
कांहीं ॥ ६२३ ॥
६२३) म्हणून
विश्वरुपप्राप्तीनें तूं आपल्याला धन्य समज व या विश्वरुपाची भीति मुळींच बाळगूं
नकोस. या विश्वरुपावांचून कांहीं चांगलें मानूं नकोस.
हां गा समुद्रु अमृताचा
भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।
मग कोणीही आथि वोसंडिला ।
बुडिजेल म्हणोनि ॥ ६२४ ॥
६२४) अरे अर्जुना,
प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात् कोणी तेथें प्राप्त झाला; मग
आपण यांत बुडून मरुन जाऊं, म्हणून कोणी तरी त्याचा त्याग केला आहे काय ?
नातरी सोनयाचा डोंगरु ।
येसणा न चले हा थोरु ।
ऐसें म्हणोनि अव्हेरु ।
करणें घडे ॥ ६२५ ॥
६२५) अथवा ( एखादा )
मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असतां ) हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर ‘
आपल्याला नेतां येत नाही, ‘ असें म्हणून त्याचा त्याग करणें घडेल काय ?
दैवें चिंतामणि लेईजे । कीं
हें ओझें म्हणोनि सांडिजे ।
कामधेनु दवडिजे । न पोसवे
म्हणोनि ॥ ६२६ ॥
६२६) दैवयोगानें
चिंतामणि नांवाचें रत्न अंगावर धारण करावें व तें ओझें म्हणून ज्याप्रमाणें टाकून
द्यावें किंवा आपल्याला पोसवत नाहीं म्हणून ( ज्याप्रमाणें ) कामधेनु हांकुन
द्यावी;
चंद्रमा आलिया घरा ।
म्हणिजे निगें करितोसि उबारा ।
पडिसायि पाडितोसि दिनकरा ।
परता सर ॥ ६२७ ॥
६२७) चंद्र आपल्या घरीं
आला असतां तुझ्या योगानें उष्मा होतो म्हणून त्याला ज्याप्रमाणें तूं चालता हो,
असें म्हणावें, अथवा तूं सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा, असें सूर्यास
म्हणावें;
तैसें ऐश्र्वर्य हें महातेज
। आजि हातां आलें आहे सहज ।
कीं एथ तुज गजबज । होआवी
कां ॥ ६२८ ॥
६२८) त्याप्रमाणें हें
महातेजरुपी ( विश्वरुपी ) ऐश्र्वर्य आज तुझ्या हातीं सहज आलें आहे. असें असून
येथें तुझी कासाविशी कां व्हावी ?
परि नेणसीच गांवढिया । काय
कोपों आतां धनंजया ।
आंग सांडोनि छाया ।
आलिंगितोसि मा ॥ ६२९ ॥
६२९) परंतु हें अडाण्या,
तुला कांहीं कळत नाहीं. अर्जुना, आतां तुझ्यावर काय रागवायचें आहे ? प्रत्यक्ष अग
सोडून पडछायेला आलिंगन तूं देतो आहेस नव्हे काय ?
हें नव्हे जो मी साचें । एथ
मन करुनियां काचें ।
प्रेम धरिसी अवगणियेचें ।
चतुर्भुज जें ॥ ६३० ॥
६३०) विश्वरुप हें
माझें खरें रुप नाही काय ? पण त्या ठिकाणीं मन साशंक करुन, क्षुल्लक असें जें
चतुर्भुज रुप त्या ठिकाणी तूं प्रेम धरतोस, हे बरें नाहीं !
तरि आझुनिवरी पार्था ।
सांडीं सांडीं हे व्यवस्था ।
इयेविषयीं आस्था । करिसी
झणें ॥ ६३१ ॥
६३१) तर अर्जुना,
अजुनपर्यंत तरी हें तुझें ठरलेले मत ( विश्वरुप हें भयंकर रुप आहे व चतुर्भुज रुप
हें सुंदर आहे ) टाकून दे. या सगुण रुपाविषयीं आस्था ( प्रेम ) कदाचित् करशील, तर
करुं नकोस.
हें रुप जरी घोर । विकृति
आणी थोर ।
तरी कृतनिश्र्चयाचें घर ।
हेंचि करीं ॥ ६३२ ॥
६३२) हें विश्वरुप जरी
भयंकर अक्राळविक्राळ आणि अवाढव्य असें, आहे, तरी ( चतुर्भुज रुपापेक्षां ) हें
विश्वरुप माझें खरें रुप असल्याकारणानें हेंच खरें आहे, असा तूं पक्का निश्चय
कर.
कृपण चित्तवृत्ति जैसी ।
रोवोनि घाली ठेवयापासीं ।
मग नुसधेनि देहेसीं । आपण
असे ॥ ६३३ ॥
६३३) कंजूष मनुष्य आपलें
सर्व लक्ष ज्याप्रमाणें आपण पुरुन ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेले ठेवतो
आणि मग केवळ देहाने आपलें इतर सर्व व्यवहार करीत असतो;
कां अजातपक्षिया जवळा । जीव
बैसवूनि अविसाळां ।
पक्षिणी अंतराळां- । माजीं
जाय ॥ ६३४ ॥
६३४) किंवा पंख न
फुटलेल्या पिलांच्याजवळ त्या घरट्यांत आपला सर्व जीव ठेवून त्या पिलांची आई (
पक्षीण ) जशी आकाशांत संचार करण्याकरितां जाते;
नाना गाय चरे डोंगरीं । परि
चित्त बांधिलें वत्सें घरीं ।
तैसें प्रेम एथिंचें करीं ।
स्थानपती ॥ ६३५ ॥
६३५) अथवा गाय डोंगरांत
चरत असते, परंतु तिचें सर्व लक्ष घरीं आपल्या वासरावर अडकून राहिलेलें असतें,
त्याप्रमाणें या ( विश्वरुप ) ठिकाणचें तूं आपलें प्रेम मालक कर.
येरें वरिचिलेनि चित्तें ।
बाह्यसव्यसुखापुरतें ।
भोगिजो कां श्रीमूर्तीतें ।
चतुर्भुज ॥ ६३६ ॥
६३६) बाकी वरवर
बाह्यात्कारी मनानें बाहेरच्या मैत्रीच्या सुखापर्यंत आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर
मूर्तीचा उपभोग घे.
परि पुढतपुढती पांडवा । हा
एक बोलु न विसरावा ।
जे इये स्वरुपौनि सद्भावा ।
नेदावें निघों ॥ ६३७ ॥
६३७) परंतु अर्जुना, या
विश्वरुपापासून आपल्या सद्भभावास दुसरीकडे कोठें जाऊं देऊं नकोस. एवढें आमचें एक
सांगणें तूं विसरुं नयेस, हेच तुला वारंवार सांगणें आहे.
हें कहीं नव्हतें देखिलें ।
म्हणोनि भय जें तुज उपजलें ।
तें सांडी एथ संचलें । असों
दे प्रेम ॥ ६३८ ॥
६३८) हें विश्वरुप
म्हणजे ( पूर्वी ) कधीं न पाहिलेली गोष्ट, म्हणून तुला याचें भय उत्पन्न झालें
आहे. ते भय टाक व या विश्वरुपाच्या ठिकाणीं प्रेम सांठवलेले राहूं दे.
आतां करुं तुजयासारिखें ।
म्हणितलें विश्र्वतोमुखें ।
तरि रुप सुखें । न्याहाळीं
पां तूं ॥ ६३९ ॥
६३९) आतां तुझ्या म्हणण्यासारखें करुं तर अर्जुना,
मागील ( सगुण ) रुप तूं खुशाल पाहा, असें सर्व बाजूंनी
ज्याला मुखें आहेत असा विश्वरुप परमात्मा म्हणाला.
2 comments:
i realy love this blog its not only gave the lyrics but the whats goin on which time thats amezing
visit WWW.worldtechfit.blogspot.com
i realy love this blog its not only gave the lyrics but the whats goin on which time thats amezing
visit hindiburner.com
Post a Comment