Shri Dnyaneshwari
श्लोक
संजय उवाच
इत्यर्जुनं
वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रुपं दर्शयामास भूयः ।
आश्वासयामास च भीतमेनं
भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ५० ॥
५०) संजय म्हणाला, ‘
असें बोलून याप्रमाणें वासुदेवानें पुन्हा स्वतःचे ( पूर्वीचे ) रुप दाखविलें; आणि
तो महात्मा पुन्हा सौम्यस्वरुपधारी होऊन भयभीत अर्जुनाला धीर देता झाला.
ऐसें वाक्य जी बोलतखेंवो ।
मागुता मनुष्य जाहला देवो ।
हें ना परि नवलावो । आवडीचा
तिये ॥ ६४० ॥
६४०) महाराज ( राजा
धृतराष्ट्रा ), असें वाक्य बोलतांक्षणींच देव पुन्हा मनुष्य झाले, यात काही
मोठेंसें आश्चर्य नाही. परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीं जें प्रेम होतें, त्या
प्रेमाचेंच मोठें आश्चर्य आहे ( असें संजय म्हणाला ).
श्रीकृष्णचि कैवल्य उघडें ।
वरी सर्वस्व विश्र्वरुपायेवढें ।
हातीं दिधलें कीं नावडे ।
अर्जुनासि ॥ ६४१ ॥
६४१) श्रीकृष्ण
प्रत्यक्ष परब्रह्म होतेच. असे असूनसुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णानें
विश्वरुपाएवढें आपले सर्वस्व अर्जुनाच्या हातीं दिलें, असें असून तें ( विश्वरुप )
अर्जुनाला आवडलें नाही.
वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें
रत्नासि दूषण ठेविजे ।
नातरी कन्या पाहूनियां
म्हणिजे । मना न ये हे ॥ ६४२ ॥
६४२) ज्याप्रमाणें
एखाद्या वस्तूचा स्वीकार करुन ( मग ती वाईट म्हणून ) टाकून द्यावी किंवा
ज्याप्रमाणें अस्सल रत्नांत कांहीं तरी खोड काढीत बसावें, अथवा मुलीला पाहून मग ती
आपल्याला पटत नाहीं, असें ज्याप्रमाणें म्हणावें;
तया विश्र्वरुपायेवढी दशा ।
करितां प्रीतीचा वाढु कैसा ।
सेल दीधली उपदेशा ।
किरीटीसि देवें ॥ ६४३ ॥
६४३) श्रीकृष्णांनीं आपल्या
चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरुपाएवढा विस्तार केला, या गोष्टीवरुन अर्जुनाविषयीं
श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती ( हें स्पष्ट दिसतें ). अर्जुनाला देवांनी
विश्वरुप दाखविलें हा त्या शेलका ( अति उत्कृष्ट ) उपदेश केला.
मोडोनि भांगाराचा रवा ।
लेणें घडिलें आपलिया सवा ।
मग नावडे जरी जीवा । तरी
आटिजे पुढती ॥ ६४४ ॥
६४४) सोन्याची लगड
मोडून त्याचा जसा आपल्या इच्छेनुरुप दागिना करावा व मग तो दागिना जर आपल्या मनाला
आवडला नाहीं, तर तो पुन्हां जसा आटवून टाकावा;
तैसे शिष्याचिये प्रीती
जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्र्वरुप केलें ।
तें मना नयेचि मग आणिलें ।
कृष्णपण मागुतें ॥ ६४५ ॥
६४५) त्याप्रमाणें शिष्याच्या
प्रीतीकरतां वरील दृष्टांताप्रमाणें गोष्ट घडली. प्रथम सगुण श्रीकृष्णमूर्ति होती,
त्याचें विश्वरुप केलें; तें अर्जुनाच्या मनाला येईना, मग सगुण कृष्णरुप पुन्हां
आणलें.
हा ठाववरी शिष्याची निसी ।
सहाते गुरु आहाती कवणे देशीं ।
परी नेणिजे आवडी कैशी ।
संजयो म्हणे ॥ ६४६ ॥
६४६) येथपर्यंत
शिष्यानें दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशांत आहेत ? परंतु देवाचें
अर्जुनाविषयीं कसें प्रेम आहे, तें कळत नाहीं, असें संजय म्हणाला.
मग विश्र्वरुप व्यापुनी
भोंवतें । जें दिव्य योगतेज प्रगटलें होतें ।
तेंचि सामावलें मागुतें ।
कृष्णरुपीं तिये ॥ ६४७ ॥
६४७) मग श्रीकृष्णानें
विश्वरुपाचा पसारा घालून आपल्या सभोंवतीं जें अलौकिक योगाचें तेज प्रकट केले
होतें, तेंच त्यानें पुन्हां त्या सगुण कृष्णरुपांत एकत्र करुन सांठविलें.
जैसें त्वंपद हें आघवें ।
तत्पदार्थी सामावे ।
अथवा द्रुमाकारु साठवे ।
बीजकणिके जेवीं ॥ ६४८ ॥
६४८) ज्याप्रमाणें त्वम्
हें सर्वपद ( अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र, परिच्छिन्न अशा जीवाचें लक्ष्य जें
कूटस्थ चैतन्य तें ) तत् पदाच्या अर्थामध्यें ( सर्वज्ञ,सर्वशक्तिमान,
स्वतंत्रविभु अशा ईश्र्वरतत्त्वाचें लक्ष्य जें ब्रह्म; त्यांत ) सामावतें अथवा
वृक्षाचा सर्व आकार जसा बीजाच्या कणांत साठवतो;
नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा ।
गिळी चेइली जीवदशा ।
श्रीकृष्णें योगु तैसा ।
संहारिला तो ॥ ६४९ ॥
६४९) अथवा जीवाची
जागृतावस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते, त्याप्रमाणें तो
योग ( विश्वरुपाचा विस्तार ) श्रीकृष्णांनी आपल्यांत सामावून घेतला.
जैसी प्रभा हारति बिंबीं ।
की जळदसंपत्ती नभीं ।
भरतें सिंधुगर्भों ।
रिंगालें राया ॥ ६५० ॥
६५०) ज्याप्रमाणें
सूर्यादिकांचे तेज, हें सूर्यादिकांच्या बिंबांत सामावतें, किंवा मेघांचे समुदाय
आकाशामध्यें लीन होतात; ( अथवा ) राजा धृतराष्ट्रा, समुद्राची भरती समुद्राच्या
पोटात गडप होते;
हो कां ते कृष्णाकृतीचिये
मोडी । होती विश्र्वरुपपटाची घडी ।
ते अर्जुनाचिये आवडी ।
उकलूनि दाविली ॥ ६५१ ॥
६५१) त्याप्रमाणे
कृष्णाकृतीच्या रुपानें जी विश्र्वरुपरुपी वस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या पंसतीकरितां
देवांनी उकलून दाखविली.
तंव परिमाणा रंगु । तेणें
देखिला साविया चांगु ।
तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु
। म्हणोनि घडी केली पुढती ॥ ६५२ ॥
६५२) तेव्हां ( एखादें
वस्त्र विकत घेणारें गिर्हाईक जसें त्या वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज
पाहातें त्याप्रमाणें ) अर्जुनानें या विश्र्वरोरुपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग
सहज नीट पाहिला, त्या वेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवच नाहीं; म्हणून
देवांनीं विश्वरुप वस्त्राची सगुण कृष्णमूर्तिरुप पुन्हां घडी केली;
तैसें वाढीचैनि बहुवसपणें ।
रुपें विश्र्व जिंतिलें जेणें ।
तें सौम्य कोडिसवाणें ।
साकार जाहलें ॥ ६५३ ॥
६५३)
त्याप्रमाणेंआपल्या वाढीच्या अतिशय विस्तारानें ज्या कृष्णरुपानें विश्व जिंकलें
होतें, तें विश्र्वरुपानें वाढलेलें कृष्णरुप ( पुन्हां ) शांत सगुण व सुंदर असें
झालें.
किंबहुना अनंतें । धरिलें
धाकुटपण मागुतें ।
परि आश्र्वासिलें पार्थातें
। बिहालियासी ॥ ६५४ ॥
६५४) फार काय सांगावें
! श्रीकृष्णानें पुन्हां मर्यादित सगुण रुप धारण केलें, पण भ्यालेल्या अर्जुनाला
धीर दिला.
तेथ जो स्वप्नीं स्वर्गा
गेला । तो अवसांत जैसा चेइला ।
तैसा विस्मयो जाहला ।
किरीटीसी ॥ ६५५ ॥
६५५) त्या वेळीं स्वप्नांत स्वर्गांत गेलेला मनुष्य जसा
अकस्मात जागा व्हावा ( म्हणजे तो जसा एकदम
बदललेल्या परिस्थितीमुळें आश्चर्यचकित होतो ) तसें
अर्जुनास आश्चर्य वाटलें.
No comments:
Post a Comment