Sunday, October 16, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 33 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 33
Ovya 673 to 690 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३३ 
ओव्या ६७३ ते ६९०

मूळ श्लोक

श्रीभगवानुवाच – सुदर्दर्शमिदं रुपं दृष्टवानसि यन्मम ।

देवा अप्यस्य रुपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः ॥ ५२ ॥

५२) श्रीकृष्ण म्हणाले, महत्प्रयासानेंहि दिसण्याला कठीण, असें जें माझें हें रुप तूं पाहिलेंस, त्या रुपाचें दर्शन घेण्यासाठीं देव देखील नित्य उत्सुक आहेत. 

यया पार्थाचिये बोलासवें । हें काय गा म्हणितलें देवें ।

तुवां प्रेम ठेवुनि यावें । विश्र्वरुपीं कीं ॥ ६७३ ॥

६७३) या अर्जुनाच्या भाषणाबरोबर भगवंत म्हणाले, हें काय रें ? तूं विश्वरुपाच्या ठिकाणीं प्रेम ठेवून ( सगुणाकडे )

मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती ।

ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि ॥ ६७४ ॥

६७४) मग या सगुण मूर्तीला ( विश्वरुपावर दृढ प्रेम ठेवून नुसतें रिकामें ) नुसत्या देहसामग्रीनें ( नुसत्या रिकाम्या देहानें ) भेटावें. हे सुभद्रापते अर्जुना, ही जी तुला आम्हीं मागें शिकवण दिली होती, ती विसरलास !   

अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरुही होय साना ।

ऐसा आथि मना । चुकीचा भावो ॥ ६७५ ॥

६७५) अरे अविचारी अर्जुना, एवढा मोठा मेरु ( सोन्याचा पर्वत ) पण तो एकदा कां प्राप्त झाला म्हणजे त्याचें कांहीं महत्व वाटत नाहीं, अशी जी मनाची समजूत होते, तीं चुकीची आहे.    

तरि विश्र्वात्मक रुपडें । जें दाविलें आम्हीं तुजपुढें ।

तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥ ६७६ ॥

६७६) तरी आम्हीं तुझ्यापुढें जें विश्वरुप दाखविले, तें शंकरालासुद्धां अनेक तपें केलीं तरी प्राप्त होत नाहीं.

आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताती किरीटी ।

परि अवसरु नाहीं भेटी । जयाचिये ॥ ६७७ ॥

६७७) अर्जुना, योगी हे अष्टांग योगासारख्या संकटांना तोंड देऊन शिणतात; परंतु ज्या विश्वरुपाच्या दर्शनाचा प्रसंग त्यांना येत नाहीं;     

तें विश्र्वरुप एकादे वेळ । कैं देखों अळुमाळ ।

ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां ॥ ६७८ ॥

६७८) तें विश्र्वरुप एखादे वेळीं तरी थोडेसें आम्ही केव्हां पाहूं, असें चिंतन करतांना देवांचा काळ जातो.

आशेचिया अंजुळी । ठेऊनि हृदयाचां निडळीं ।

चातक निराळीं । लागले जैसे ॥ ६७९ ॥

६७९) आशारुप ओंजळ हृदयरुप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसे आकाशाकडे पाहातात,

तैसे उत्कंठानिर्भर । होऊनियां सुरनर ।

घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥ ६८० ॥

६८०) त्याप्रमाणे देव व मनुष्य हे विश्वरुप दर्शनाच्या उत्कंठेनें आतुर होऊन आठहि प्रहर ( रात्रंदिवस ) विश्वरुपाची भेट होईल काय, म्हणून घोकीत बसतात.

परि विश्र्वरुपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे ।

तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हे ॥ ६८१ ॥

६८१) परंतु विश्वरुपासारखी गोष्ट कोणी स्वप्नांतसुद्धां पाहिली नाहीं. असें हें विश्वरुप तें हे तूं आज प्रत्यक्ष सुखानें पाहिलेंस. 

मूळ श्लोक

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।

शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥ ५३ ॥

५३) ज्या प्रकारें तूं मला पाहिलेंस त्या प्रकारें वेद पठनानें, तपानें, दानानें अथवा यज्ञानें ( देखील ) मी ( कोणाला ) दिसणें शक्य नाहीं.  

पैं उपायासि वाटा । न वाहती एथ सुभटा ।

साहिसहित वोहटा । वाहिला वेदीं ॥ ६८२ ॥

६८२) परंतु अर्जुना, या विश्वरुपाच्या ठिकाणीं कोणत्याहि साधनाचा लाग नाहीं ( मार्ग सांपडत नाहीं ); व सहा शास्त्रांसह वेद, लाग न लागल्यानें, या विश्वरुपापासून मागें हटले.

मज विश्र्वरुपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा ।

तपांचियाही सर्वभारा । नव्हेचि लागु ॥ ६८३ ॥

६८३) मी जो विश्वरुप, त्या माझ्याकडे चालत येण्याला, अर्जुना, तपांच्या सर्व समुदायालासुद्धा सामर्थ्य नाही.

आणि दाना कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें ।

जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ॥ ६८४ ॥

६८४) आणि तूं जशा विस्तारानें मला पाहिलेंस, तसा मी दानांनी दिसण्यास खरोखर कठीण असून ; यज्ञांनीहि मी तसा पाहण्यास सांपडत नाहीं.

तैसा मी एकीच परी । आंतुडें मां अवधारीं ।

जरी भक्ति येऊनि वरी । चित्तातें गा ॥ ६८५ ॥

६८५) ( तूं ज्या विस्तारानें मला पाहिलेंस; ) तसाच मी एकाच प्रकारानें ( मार्गानें ) पाहावयास सांपडतों व तो प्रकार हाच कीं जर भक्ति येऊन चित्ताला वरील ( तरच मी पाहावयास सांपडतों ) हें लक्षात ठेव.

मूळ श्लोक

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।

ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ ५४ ॥

५४) पण हे अर्जुना, अशा स्वरुपाचा जो मी, त्या मला हें ( अनन्य भक्तीच्या योगानेंच ) तत्त्वतः जाणणें, पाहाणें आणि माझ्यामध्यें लीन होणें शक्य आहे.

परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी ।

धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणे ॥ ६८६ ॥

६८६) परंतु तीच भक्ति अशी कीं, पावसाच्या वृष्ट्यास पृथ्वीवांचून अशी निराळी गतीच ठाऊक नसते, तशी ( म्हणजे त्या भक्तीला मजवांचून दुसरा विषयच नाही अशी ); 

कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिवसिती ।

गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥ ६८७ ॥

६८७) अथवा सर्व जलरुप संपत्ति घेऊन भागीरथी जशी समुद्राचा शोध करीत करीत एकनिष्ठेने  समुद्रास मिळून पुन्हा मिळतच आहे;

तैसे सर्वभावसंभारें । न घरत प्रेम एकसरें ।

मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ॥ ६८८ ॥

६८८) त्याप्रमाणे सर्व भावांच्या समुदायांसह अनावर प्रेम मद्रुप होऊन, एकसारखें माझ्यामध्यें प्रवेश करतें.

आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा ।

क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥ ६८९ ॥

६८९) आणि क्षीरसमुद्र जसा कांठावर व मध्येही एकसारखा दूधमयच असतो, त्याप्रमाणें मी सारखा सर्वव्यापी आहें,

तैसे मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं ।

भजनासि कां दुसरी । भ्रांति नाहीं ॥ ६९० ॥

६९०) त्याप्रमाणें माझ्यापासून तों मुंगीपर्यंत, फार काय

 सांगावें ? सर्व स्थावरजंगमात्मक जगामध्ये भजनाला

 माझ्याशिवाय दुसरें कांहीं ( नाहीं ) याबद्दल शंकाच

 नाही. 



Custom Search

No comments: