Shri Dnyaneshwari
नातरी गुरुकृपेसवें ।
वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें ।
स्फुरे तत्त्व तेवीं
पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥ ६५६ ॥
६५६) अथवा गुरुकृपा
झाल्याबरोबर, प्रपंचाचें सर्व ज्ञान ओसरल्याव, जसें एक ब्रह्ममात्र स्फुरतें,
त्याप्रमाणें विश्वरुप ओसरल्यावर अर्जुनानें कृष्णमूर्ति पाहिली.
तया पांडवा ऐसें चित्तीं ।
आड विश्र्वरुपाची जवनिका होती ।
ते फिटोनि गेली परौती । हें
भलें जाहलें ॥ ६५७ ॥
६५७) त्या अर्जुनाला मनांत
असें वाटलें कीं, ( माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्णमूर्तीच्या ) आड ( मध्यें ) जो
विश्वरुपाचा पडदा होता, तो पलीकडे निघून गेला, हें चांगलें झालें.
काय काळातें जिणोनि आला ।
महावातु मागां सांडिला ।
आपुलिया बाहीं उतरला । सात
सिंधु ॥ ६५८ ॥
६५८) जसा काय काळाला
जिंकून आला किंवा प्रचंड वार्यास मागें हटविलें, अथवा आपल्या हातांनीं सात समुद्र
पोहून उतरुन आला;
ऐसा संतोषु बहु चित्तें ।
घेइजत असे पांडुसुतें ।
विश्र्वरुपापाठीं कृष्णातें
। देखोनियां ॥ ६५९ ॥
६५९) अर्जुनानें
विश्वरुपानंतर कृष्णरुपाला पाहून आपल्या मनानें असा फार आनंद मानला.
मग सूर्याचां अस्तमानीं ।
मागुती तारा उगवती गगनीं ।
तैसी देखों लागला अवनी ।
लोकांसहित ॥ ६६० ॥
६६०) मग सूर्य
मावळल्यावर पुन्हां आकाशांत चांदण्या प्रकट होतात, त्यप्रमाणें अर्जुन हा
लोकांसहित पृथ्वी पाहावयास लागला.
पाहे तंव तें कुरुक्षेत्र ।
तैसेंचि दोहीं भागीं झालें गोत्र ।
वीर वर्षताती शस्त्रास्त्र
। संघाटवारी ॥ ६६१ ॥
६६१) अर्जुन पाहावयास
लागला, तों तें कुरुक्षेत्र तसेंच होतें; दोन्ही बाजूंना नातलग मंडळी तशीच (
पूर्वीप्रमाणें ) उभी होती, आणि योद्धे, शस्त्रांचे व अस्त्रांचे समुदायच समुदाय
वर्षाव करीत होते.
तया बाणांचिया मांडवाआंतु ।
तैसाचि रथु आहे निवांतु ।
धुरे बैसला लक्ष्मीकांतु ।
आपण तळीं ॥ ६६२ ॥
६६२) त्या बाणांच्या
मांडवाआंत रथ पूर्वीप्रमाणें स्थिर होता व घोडे हाकण्याच्या जागीं लक्ष्मीकांत
श्रीकृष्ण विराजमान झाले होते व आपण खालीं होता.
अर्जुन उवाच
दृष्ट्वेदं मानुषं रुपं तव
सौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः
प्रकृतिं गतः ॥ ५१ ॥
५१) अर्जुन म्हणाला, ‘
हे जनार्दना, हें तुझें सौम्य मानव रुप पाहून, आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत्
सावध झालों आहें.
एवं मागील जैसें तैसें ।
तेणें देखिलें वीर्यविलासें ।
मग म्हणे जियालों ऐसें ।
जाहलें आतां ॥ ६६३ ॥
६६३) पराक्रम करणें हाच
ज्याचा खेळ आहे, त्या अर्जुनानें याप्रमाणें पूर्वी जसें होतें तसें कृष्णाचें रुप
पाहिलें. मग श्रीकृष्णास म्हणाला आतां मी जगलों असें मला वाटतें.
बुद्धीतें सांडोनि ज्ञान ।
भेणें वघळलें रान ।
अहंकारेंसी मन । देशधडी
जाहलें ॥ ६६४ ॥
६६४) माझें ज्ञान
बुद्धीला सोडून भयानें रानोमाळ झालें होतें आणि मग हें आहंकारासह परागंदा झालें
होते.
इंद्रियें प्रवृत्ती भुलली
। वाचा प्राणा चुकली ।
ऐसी आपांपरी होती जाली ।
शरीरग्रामीं ॥ ६६५ ॥
६६५) इंद्रियें
विषयांकडे धावण्याचें विसरलीं होती व वाचाहि प्राणास मुकली होती ( बंद पडली होती
), याप्रमाणें शरीररुपी गांवात दुर्दशा उडाली होती.
तियें आघवींचि मागुतीं ।
जिवंत भेटली प्रकृती ।
आतां जिताणें श्रीमूर्ती ।
जाहलें इयां ॥ ६६६ ॥
६६६) तीं ( बुद्धि, मन
व इंद्रियें ) सर्वच पुन्हां टवटवीत होऊन आपल्या मूळ पदावर आलीं. आतां श्रीकृष्णा,
यांना जिवंतपण प्राप्त झालें ( ही आपल्या स्वभावावर येऊन आपापलीं कामें करावयास
लागलीं ).
ऐसें सुख जीवीं घेतलें । मग
कृष्णातें जी म्हणितलें ।
मियां तुमचे रुप देखिलें ।
मानुष हें ॥ ६६७ ॥
६६७) असा त्यानें मनांत
आनंद मानला व मग तो कृष्णास म्हणाला, महाराज, तुमचें हें मनुष्यरुप ( एकदाचें )
माझ्या दृष्टीस पडलें.
हें रुप दाखवणें देवराया ।
कीं मज अपत्या चुकलिया ।
बुझावोनि तुवां माया ।
स्तनपान दिधलें ॥ ६६८ ॥
६६८) हें देवाधिदेवा,
हें रुप दाखविणें म्हणजे मी जें चुकलेलें मूल, त्या मला तूं जी माझी आई, तिनें
माझी समजूत घालून मला स्तनपानच दिलें.
जी विश्र्वरुपाचां सागरीं ।
होतों तरंग मवित वांवेवरी ।
तों इयें निजमूर्तीचां
तीरीं । निगालों आतां ॥ ६६९ ॥
६६९) महाराज,
विश्र्वरुपी समुद्रांत जो मी हातानें लाटेमागून लाट आक्रमीत होतों, ( गटांगळ्या
खात होतो,) तो मी या आपल्या चतुर्भुज मूर्तिरुप किनार्यास आतां लागलों.
आइकें द्वारकापुरसुहाडा ।
मज सुकतीया जी झाडा ।
हे भेटी नव्हे बहुडा ।
मेघाचा केला ॥ ६७० ॥
६७०) हे द्वारकेच्या
राजा, ऐक. ( विश्वरुपदर्शनानंतर या चतुर्भुज रुपाची भेट ) ही भेट नव्हे, तर मी जें
सुकावयास लागलेलें झाड, त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षाव होय.
सावियाची तृषा फुटला । तया
मज अमृतसिंधु हा भेटला ।
आतां जिणयाचा फिटला ।
आभरंवसा ॥ ६७१ ॥
६७१) तहानेने पीडलेला
जो मी, त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात भेटला. आतां
माझा जगण्याविषयींचा संशय दूर झाला.
माझां हृदयरंगणीं । होताहे
हरिखलतांची लावणी ।
सुखेंसीं बुझावणी । जाहली
मज ॥ ६७२ ॥
६७२) माझ्या हृदयदेशांत आनंदाच्या वेलांची लावणी होत
आहे. ( आज ) सुखाची व माझी गांठ पडत आहे.
No comments:
Post a Comment