Sunday, October 16, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 34 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 34 
Ovya 691 to 708 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३४ 
ओव्या ६९१ ते ७०८

तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें ।

जाणितला तरी स्वभावें । दृष्ट होय ॥ ६९१ ॥

६९१) ( असें ज्या वेळीं होईल ), त्याच क्षणाबरोबर मी ( भगवंत ) विश्वरुप आहें असें कळेल; आणि असा मी समजल्यावर, साहजिक रीतीनें मी तसा ( विश्वरुप ) दिसेन.

मग इंधनीं अग्नि उद्दिपे । आणि इंधन हे भाष हारपे ।

तें अग्निचि होऊनि आरोपे । मूर्त जेवीं ॥ ६९२ ॥

६९२) मग काष्ठांत ( घर्षणानें ) अग्नि उत्पन्न झाल्यावर, काष्ठ हा शब्द नाहींसा होऊन, तें काष्ठच जसें मूर्तिमंत अग्नि बनतें;      

कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें ।

मग उदेलियां एकसरें । प्रकाशु होय ॥ ६९३ ॥

६९३) अथवा जोपर्यंत सूर्यानें उदय केला नाहीं, तोपर्यंत आकाशच अंधार होऊन असतें, मग सूर्योदय झाल्यावर तें आकाशच एकसारखें प्रकाश होतें;

तैसें माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।

अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥ ६९४ ॥

६९४) त्याप्रमाणें माझें प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची येरझार संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जातें, हें लक्षांत ठेव.

मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें ।

किंबहुना सामावे । समरसें तो ॥ ६९५ ॥   

६९५) मग मी, तो आणि सर्व ( विश्व ) हें एक मीच स्वभावतः आहे फार काय सांगावें ? तो ऐक्यभावानें माझ्यामध्यें सामावला जातो.

मूळ श्लोक

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः ।

निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ५५ ॥

५५) हे पांडवा, जो मत्प्रीत्यर्थ कर्म करणारा, मीच ज्यांचें प्राप्तव्य आहे, असा माझा भक्त, संसारसंगरहित, कोणाहि भूतांशीं वैर नसलेला असा तो ( पुरुष ) मजप्रत येतो.  

जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगी ।

जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥ ६९६ ॥

६९६) जो ( भक्त ) माझ्या एकट्याकरितांच शरीरानें कर्में आचरतो आणि ज्याला जगामध्यें माझ्यावांचून दुसरें कांहीं चांगलें नाहीं;

दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ ।

जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥ ६९७ ॥

६९७) ज्याचा इहपरलोक, हें सर्व केवळ मीच होऊन राहिलों आहें व ज्यानें आपलें जगण्याचें प्रयोजन माझीच प्राप्ति होणे, हेंच ठरविलें आहे,  

भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहे बांधला ।

म्हणोनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥ ६९८ ॥

६९८) तो, भूतें ही भाषा विसरला; कारण त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाहीं; म्हणून तो निर्वैर झाला असतां तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ति करतो.

ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये ।

तैं मीचि होऊनि ठाये । पांडवा गा ॥ ६९९ ॥

६९९) अरे अर्जुना, असा जो भक्त आहे, त्याचें हें शरीर ज्या वेळी पडतें, त्या वेळी तो मीच होऊन राहतो. 

ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें ।

संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥ ७०० ॥

७००) उदरामध्यें जगत् असल्यामुळें दोदिल झालेले व करुणेच्या रसाने रसाळ, असें जे श्रीकृष्णदेव, ते याप्रमाणे बोलले, असें संजय ( धृतराष्ट्राला ) म्हणाला. 

ययावरी तो पांडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु ।

आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥ ७०१ ॥

७०१) याप्रमाणें श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंदरुपी धनाने थोर झाला; कारण श्रीकृष्णाच्या चरणांचे सेवन करण्यांत जगामध्ये तोच एक चतुर होता.

तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं ।

तंव विश्र्वरुपाहूनि कृष्णाकृती । देखिला लाभु ॥ ७०२ ॥

७०२) त्यानें देवाच्या दोन्ही मूर्तिचित्तामध्ये चांगल्या न्हाहाळून पाहिल्या, तेव्हां विश्वरुपापेक्षां कृष्णाच्या सगुण रुपामध्यें फायदा आहे, असे त्यास आधळून आले. 

परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें ।

जें व्यापकाहूनि नव्हे । एकादेशी ॥ ७०३ ॥

७०३) परंतु त्याच्या या समजुतीला देवानें मान दिला नाहीच, कारण व्यापक रुपापेक्षां ( विश्वरुपापेक्षा ) एकदेशी रुप ( चतुर्भुज रुप ) बरें नव्हे, असें श्रीकृष्ण म्हणाले.

हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी ।

उपपत्ती शङ्गी । दाविता जाहला ॥ ७०४ ॥ 

७०४) आणि हेंच ( चतुर्भुज ) रुपापेक्षां विश्वरुप बरें ही गोष्ट स्थापित करण्याकरितां एक दोन चांगल्या युक्ति श्रीकृष्णांनी दाखविल्या.

तिया ऐकोनी सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु ।

तरी होय बरवें दोन्हींआंतु । तें पुढती पुसों ॥ ७०५ ॥

७०५) त्या युक्ति ऐकून अर्जुन मनांत म्हणतो, या दोन्ही रुपांमध्यें कोणतें बरें आहे, ते देवाला आतां यापुढें विचारुं.  

ऐसा आलोचु करुनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी ।

आदरील ते परिसावी । पुढां कथा ॥ ७०६ ॥

७०६) याप्रमाणें मनांत विचार करुन आतां तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारील; ती कथा पुढें आहे, ती ऐकावी.

प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें ।

निवृत्तिपादप्रसादें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७०७ ॥

७०७) निवृत्तीनाथांच्या पायांच्या कृपेनें ती कथा सोप्या अशा ओंवी छंदांत मजेनें सांगता येईल असे ज्ञानेश्रवरमहाराज म्हणतात. 

भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोंवियाफूलें मोकळीं ।

अर्पिली अंघ्रियुगुलीं । विश्र्वरुपाचां ॥ ७०८ ॥

७०८) मी शुद्ध भावनारुप ओंजळींत हीं ओव्यारुपी

 मोकळी फुलें भरुन विश्वरुपाच्या दोन्ही पायांवर अर्पण

 केली. ( असें ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात. )

इति श्रीनद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरुपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः ॥

( श्लोक ५५; ओव्या ७०८ )

॥ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥     



Custom Search

No comments: