Sunday, September 25, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 21 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २१

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 21 
Ovya 437 to 457 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग २१ 
ओव्या ४३७ ते ४५७

आतां इये अंप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें ।

वक्त्रें नव्हतीं जोहरें । वोडवली जगा ॥ ४३७ ॥

४३७) आतां ह्या विश्वरुपाच्या शरीराचें तेज हेंच कोणी एक ( पारध्याचें ) जाळें आहे. त्यांतून स्थावरजगंमाला कोणत्या बाजूनें निसटून जातां येईल ? ही  तोंडें नाहींत, तर तीं पेटलेलीं लाखेची घरेंच जगाला प्राप्त झाली आहेत ! 

आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे ।

परि जया लागे तया प्राणें । सुटिका नाहीं ॥ ४३८ ॥

४३८) आपल्या आगीनें आपण ( दुसर्‍याला ) कसें पोळतों, हे अग्नीस जरी कळत नाहीं, तथापि ज्याला अग्नीची आग लागते, त्याचे प्राण वाचत नाहीत.

माझेनि तिखटपणें । कैसे निवटे हें शस्त्र कायि जाणे ।

कां आपुलिया मारा नेणे । विष जैसें ॥ ४३९ ॥

४३९) ( किंवा ) आपल्या तीक्ष्णपणानें ( दुसर्‍याचा ) कसा घात होतो, हें हत्यार काय जाणतें ? किंवा ( ज्याप्रमाणें ) विषास आपण किती प्राण घातक आहोंत, याची खबरहि नसते,  

तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं ।

परि ऐलीकडे मुखीं खाई । हों सरली जगाची ॥ ४४० ॥

४४०) त्याप्रमाणें तुला आपल्या स्वतःच्या उग्रपणाची बिलकुल आठवणच नाहीं. पण ( इकडे ) अलीकडच्याच तोंडांत सर्व जगाचा नाश होऊन राहिला आहे.

अगा आत्मा तूं एकु । सकलविश्वव्यापकु ।

तरी का आम्हां अंतकु । वोडवलासी ॥ ४४१ ॥

४४१) देवा, तूं सर्व जगाला व्यापून असणारा जर एकच आत्मा आहेस, तर मग अम्हाला प्राण घेणार्‍या यमाप्रमाणें कां पुढें आला आहेस ?

तरि मियां सांडिली जीविताची चाड । आणि तुवांही न धरावी भीड ।

मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ॥ ४४२ ॥

४४२) मीं तर आपल्या जगण्याची आशाच सोडली आहे. आणि तूंहि कांहीं भीडभाड धरुं नकोस, तुझ्या मनांत जें काय असेल, तें खुशाल स्पष्ट सांग पाहूं.

किती वाढविसी या उग्ररुपा । अंगींचें भगवंतपण आठवीं बापा ।

नाहीं तरि कृपा । मजपुरती पाहीं ॥ ४४३ ॥    

४४३) या उग्र रुपाला तूं किती वाढवीत आहेस ? देवा, आपल्या स्वतःच्या अंगीं असलेलें भगवंतपण ( पालन करण्याचा स्वभाव ) आठव; नाहीं तर ( तसें करण्याचें आपल्या मनांत नसेल तर ) माझ्यापुरती तरी कृपा कर.   

आख्याहि मे को भवानुग्ररुपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद ।

विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥ ३१ ॥

३१) ( हें ) उग्र रुप धारण केलेला तूं कोण आहेस मला सांग. हे देवश्रेष्ठा, मी तुला नमस्कार करतों. माझ्यावर अनुग्रह कर. हे आदिदेवा, तुला जाणण्याची मी इच्छा करीत आहें; कारण तुझी ही प्रवृत्ति (अभिप्राय ) मला समजत नाहीं.

परि एक वेल वेदवेद्या । त्रिभुवनाचिया आद्या ।

विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी ॥ ४४४ ॥

४४४) परंतु वेदाकडून जाणल्या जाणार्‍या त्रैलोक्याच्या मूळ कारणा व सर्व जगाला नमस्कार करण्याला योग्य अशा ( हे श्रीकृष्णा ), एक वेळ माझी विनंती ऐक.

ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिले शिरें ।

मग म्हणे तरि सर्वेश्वरें । अवधारिजो ॥ ४४५ ॥

४४५) त्या शूर अर्जुनानें याप्रमाणें बोलून प्रभूंच्या चरणांवत मस्तक ठेवलें आणि मग म्हणाला, हे जगत्प्रभो, आतां आपण ऐकावें. तर, 

मियां होआवया समाधान । पुसिलें विश्वरुपध्यान ।

आणि एकें काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥ ४४६ ॥

४४६) माझें समाधान व्हावें म्हणून मी विश्वरुपाचें ध्यान विचारलें; आणि इतक्यांत एकदम तूं सर्व त्रैलोक्य-संहार करीतच सुटलास !  

तरि तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविली ।

आघवांचि करीं परिजिलीं । शस्त्रें काह्या ॥ ४४७ ॥

४४७) तेव्हां तूं आहेस तरी कोण ? इतकी ही भयंकर तोंडे कशाकरिता तयार केलीस ? या सर्वच हातांत शस्त्रें कशाकरितां धारण केली आहेस ? 

जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें ।

कां डोळे करुनि मिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥ ४४८ ॥

४४८) जेव्हा महाराज तुमचा रागीटपणा अधिक वाढतो तेव्हां आकाशालाहि कमीपणा आणीत आहे ! तूं डोळे भयंकर वटारुन आम्हांला भीति काय म्हणून दाखवीत आहेस ?  

एथ कृतांतेंसीं देवा । कासया किजतसे हेवा ।

आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ॥ ४४९ ॥  

४४९) देवा, येथेसर्वनाश करणार्‍या काळाबरोबर स्पर्धा काय म्हणून करण्यात येत आहे ? या करण्यात तुझा अभिप्राय काय आहे ? तो तूं मला सांगावास.

या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु ।

आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसीं ॥ ४५० ॥

४५०) अर्जुनाच्या या भाषणावर श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहें आणि एवढ्या उग्रतेनें कशाकरितां वाढत आहे, हेच तूं विचारीत आहेस ना ?    

श्रीभगवानुवाच ---                                                   

कालोऽस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ।


ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३२ ॥

३२) श्रीकृष्ण म्हणाले, लोकांचा संहार करणारा ( व त्यासाठीं ) वृद्धि पावलेला काळ मी आहें, येथें मी लोकांचा संहार करण्यासाठीं प्रवृत्त झालों आहें. तुझ्याखेरीज दोन्ही सेनासमुदायांमध्ये जे योद्धे ( उभे ) आहेत , ते सर्व नाहींसे होतील.

तरि मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें ।

सैंघ पसरिलीं आथि तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ॥ ४५१ ॥

४५१) तर अरे, मी काळ आहें हें पक्कें समज. मी जगाचा नाश करण्याकरितां मोठा होत आहे, माझी तोंडें चहुकडे पसरलेलीं आहेत व मी ( त्या तोंडांनी ) हें सर्व आतां गिळून टाकीन.  

तेथ अर्जुन म्हणे कटकटां । उबगिलों मागिल्या संकटा ।

म्हणोनि आळविला तंव वोखटा । उधाइला हा ॥ ४५२ ॥

४५२) असें ऐकून अर्जुन म्हणाला, हाय, हाय ! ( हें सर्व सैन्यच्या सैन्यच या विश्वरुपाच्या उग्र तोंडांत जात आहे, अशा ) या पहिल्या संकतानें मी त्रासलों, म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना केली, त्यावर तो हा श्रीकृष्ण परमात्मा अनिष्ट रुपानें प्रकट झाला.

तेवींचि कठिण बोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी ।

म्हणोनि सवेंचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥ ४५३ ॥

४५३) त्यावर त्या कठीण बोलण्यानें अर्जुन निराश व कष्टी होईल; म्हणून लागलीच श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, पण यांत दुसरी आणखी एक गोष्ट आहे.

तरि आतांचि ये संहारवाहरे । तुम्ही पांडव असा बाहिरे ।

तेथ जातजात धनुर्धरें । सांवरिले प्राण ॥ ४५४ ॥

४५४) तर आत्ताच्या या संहाररुपी संकटाबाहेर फक्त तुम्ही पांडव राहिलेले आहांत. असें भगवंत बोलले, त्या वेळीं अर्जुनानें जाण्याच्या बेतांत आलेले आपलें प्राण सांवरुन धरले.

होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला ।

मग लागला बोला । चित्त देऊं ॥ ४५५ ॥

४५५) अर्जुन मरणरुप महामारींत सांपडला होता; तो पुन्हां सावध होऊन श्रीकृष्णाच्या बोलण्याकडे लक्ष देऊं लागला.

ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझे हें जाणावें ।

येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ॥ ४५६ ॥

४५६) अर्जुना, तुम्ही पांडव तेवढे माझे असल्यामुळें तुमच्यावांचून बाकी इतर सर्वांचा ग्रास करण्याला मी तयार झालों आहें, असें तूं पक्के समज; असें देव त्यावेळी म्हणाले.

वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी ।

तैसे जग हें माझां तोंडीं । तुवां देखिलें जें ॥ ४५७ ॥

४५७) विजेच्या प्रचंड अग्नीमध्यें ज्याप्रमाणें लोण्याचा गोळा घालावा, त्याप्रमाणें हें जग तू माझ्या तोंडामध्ये जें पाहिलेंस;


Custom Search

No comments: