Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
कस्माच्च ते न नमेरन् महात्मन् गरीयते
ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्
॥ ३७ ॥
३७) हे महात्मन् अत्यंत महान् अशा महद्
ब्रह्माचा देखील आदिकर्ता जो तूं , त्या तुला, ते ( राक्षस इत्यादि ) कां नमस्कार
करीत नाहींत ? हें अनंता, देवाधिदेवा, जगन्निवासा, तूं अक्षर आहेस व सत् व असत्
म्हणून जें आहे तें तूं आहेस; त्याच्या अतीत जें आहे, तेंहि तूं आहेस.
एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा ।
न लगतीची चरणा । पळते जाहले ॥ ५०७ ॥
५०७) हे श्रीकृष्णा, येथें हे राक्षस तुमच्या
चरणांना शरण न येतां कोणत्या कारणामुळें दूर पळून गेले आहेत ?
आणि हें तूतें काइ पुसावें । येतुलालें
आम्हांसिही जाणवे ।
तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ॥ ५०८ ॥
५०८) आणि हें तुम्हांला तरी काय पुसावयाचें
आहे ? एवढें तर आमच्याहि लक्षांत येण्यासारखें आहे ( ते हें पाहा, ) सूर्य उगवला
असतां अंधार कसा टिकाव धरणार.
तूं स्वप्रकाशाचा आगरु । आणि जाला आहासि गोचरु ।
म्हणोनिया निशाचरां केरु । फिटला सहजे ॥ ५०९ ॥
५०९) तूं आत्मप्रकाशाची खाण आहेस, आणि (
आमच्यापुढें ) प्रत्यक्ष प्रगट झाला आहेस, म्हणून सहज राक्षसांची दुर्दशा उडाली
आहे.
हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि
श्रीरामा ।
आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥ ५१० ॥
५१०) इतके दिवस, हे श्रीरामा, हें आम्हांला
कांहींच समजत नव्हतें. हें तुझें अगाध सामर्थ्य आतांच आमच्या नजरेस येत आहे.
जेथूनि नाना सृष्टीचिया वोळी । पसरती
भूतग्रामाचिया वेली ।
तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥ ५११
॥
५११) ज्याच्यापासून अनेक सृष्टीच्या पंक्ति व
प्राणिमात्रांच्या समुदायरुप वेली उत्पन्न होत असतात, त्या महद् ब्रह्माला, प्रभु,
आपली इच्छा प्रसवली आहे.
देवो निःसीमतत्त्व सदोदितु । देवो निःसीमगुण
अनंतु ।
देवो निःसीमसाम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥ ५१२ ॥
५१२) देवा, आपण अमर्याद तत्त्वरुप असून आपलें
अस्तित्व त्रिकालाबाधित आहे. आपण अंतरहित असून आपल्या गुणांची गणती नाही; आपण अखंड
निष्प्रतिबंधपणानें सर्वत्र व्याप्त आहांत व आपण देवांचे राजे आहांत.
जी तूं
त्रिजगतिये बोलावा । अक्षर तूं सदाशिवा ।
तूंचि संतासंत देवा । तयाही अतीत तें तूं ॥ ५१३ ॥
५१३) हे नित्य कल्याणरुप देवा, महाराजा, तूं
त्रैलोक्यालाआश्रय आहेस. तूं अविनाशी आहेस. देवा, सत् व असत् तूंच आहेस व त्या
पलीकडील जें तेंहि तूंच आहेस.
मूळ श्लोक
त्वमादिदेवः पुरुषः
पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च
धाम त्वया ततं विश्वमनन्तरुप ॥ ३८ ॥
३८) तूं आदिदेव, पुराण
पुरुष आहेस; तूं या विश्वाचें अखेरीचें निवासस्थान आहेस; तूं सर्व जाणतोस, तूं
जाणण्याला ( अत्यंत ) योग्य आहेस, अत्यंत श्रेष्ठ असें आश्रयस्थान तूंच आहेस. हे
अनंतरुपा, तूं ( हें ) विश्र्व व्यापिलें आहेस.
प्रकृतिपुरुषांचा आदी । जी
महत्तत्त्वां तूंचि अवघी ।
स्वयें तूं अनादी । पुरातनु
॥ ५१४ ॥
५१४) देवा, ( तूं )
प्रकृति व पुरुषांचें मूळ आहेस. महत् तत्त्वाचा शेवटहि तूंच आहेस; तूं जन्मरहित
आहेस व तूं सगळ्यांच्या पूर्वीचा आहेस.
सकळ विश्र्वजीवन । जीवांसि
तूंचि निधान ।
भूतभविष्याचें ज्ञान ।
तुझांचि हातीं ॥ ५१५ ॥
५१५) ( देवा, ) तूं
सर्व जगाचें जीवन आहेस आणि जीवांचा शेवटही तुझ्यांतच होतो व भूतभविष्यांचें ज्ञान
तुझ्या हातीं आहे.
जी श्रुतीचिया लोचना ।
स्वरुपसुख तूं अभिन्ना ।
त्रिभुवनाचिया आयतना । आयतन
तूं ॥ ५१६ ॥
५१६) हे जीवांशीं
अभिन्नतेनें असणार्या देवा, श्रुतीच्या नेत्रास ( ज्ञानास ) गोचर होणारें असें
जें स्वरुपसुख, तें तूं आहेस आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया, त्या मायेला आधार
तूंच आहेस.
म्हणोनि जी परम । तूंतें
म्हणिजे महाधाम ।
कल्पांतीं महद् ब्रह्म ।
तुझां अंकीं रिगे ॥ ५१७ ॥
५१७) म्हणून देवा, तुला
श्रेष्ठ असें आश्रयस्थान म्हणतात, आणि प्रळयकाळाच्या शेवटीं मायाहि तुझ्या
स्वरुपीं लीन होते.
किंबहुना देवें । विश्र्व
विस्तारिलें आहे आघवें ।
अनंतरुपा वानावें । कवणें तूंतें ॥ ५१८ ॥
५१८) फार काय सांगावें ! देवा, तुझ्याकडून सर्व विश्व
विस्तारलें गेलें आहे. ज्या तुला अनंत रुपें आहेत, त्या तुझें वर्णन कोणी करावें ?
मूळ श्लोक
वायुर्यमोऽग्निर्वरुणः
शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तु सहस्त्रकृत्वः
पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ ३९ ॥
३९) वायु, यम, अग्नि,
वरुण, चंद्र, ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाहि पिता तूं आहेस. तुला सहस्रावधि नमस्कार
असोत.
नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते
नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं
सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ ४० ॥
४०) हे सर्वत्र असणार्या
प्रभो, पुढून, मागून सर्व बाजूंनी तुला नमस्कार असो. सामर्थ्याला अंत नसलेला तूं
आहेस. तूं सर्व व्यापून आहेस. तस्मात् सर्व तूंच आहेस.
जी काय एक तूं नव्हसी । तूं
कवणे ठायीं गा नससी ।
हें असो जैसा आहासी ।
तैसिया नमो ॥ ५१९ ॥
५१९) देवा, काय काय तूं
नाहीस ? अरे तूं कोणत्या ठिकाणी नाहींस हें वर्णन करणे पुरें. तूं जसा असशील तशा
तुला नमस्कार असो.
वायु तूं अनंता । यम तूं
नियमिता ।
प्राणिगणीं वसता । अग्नि जी
तूं ॥ ५२० ॥
५२०) हे अनंता, तूं
वायु आहेस व जगाचें शासन करणारा यम तूं आहेस. सर्व प्राण्यांच्या समुदायांत असणारा
जो अग्नि ( जठराग्नि ) तो तूं आहेस.
वरुण तूं सोम । स्र्ष्टा
तूं ब्रह्म ।
पितामहाचाही परम । आदिजनक
तूं ॥ ५२१ ॥
५२१) देवा, तूं वरुण,
चंद्र व जगत् उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस व त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आदि
जनक तूं आहेस.
आणिकही जें जें कांहीं ।
रुप आथि अथवा नाहीं ।
तया नमो तुज तैसयाही ।
जगन्नाथा ॥ ५२२ ॥
५२२) आणि हे जगन्नाथा,
आणखी जें जें म्हणून कांहीं ज्याला रुप आहे अथवा नाहीं, तें सर्व तूंच आहेस.
म्हणून तशा त्या तुला मी नमस्कार करतो.
ऐसें सानुरागें चित्तें ।
स्तवन केलें पांडुसुतें ।
मग पुढती म्हणे नमस्ते ।
नमस्ते प्रभो ॥ ५२३ ॥
५२३) अशा प्रीतियुक्त
अंतःकरणानें अर्जुनाने भगवंतांची स्तुति केली, मग पुन्हा म्हणाला, प्रभो, तुला
नमस्कार असो.
पाठी तिये साद्यंतें ।
न्याहाळी श्रीमूर्तीतें ।
आणि पुढती म्हणे नमस्ते ।
नमस्ते प्रभो ॥ ५२४ ॥
५२४) त्या पुन्हां त्या
श्रीमूर्तीला त्यानें साद्यंत पाहिले आणि पुन्हां म्हणाला, ‘ प्रभो तुला नमस्कार
असो, ‘ तुला नमस्कार असो. ‘
पाहतां पाहतां प्रांतें ।
समाधान पावे चित्ते ।
आणि पुढती म्हणे नमस्ते ।
नमस्ते प्रभो ॥ ५२५ ॥
५२५) त्या मूर्तीच्या ( एकेक ) अवयवाचे भाग पाहतां
पाहतां, त्याच्या अंतःकरणास समाधान वाटलें आणि पुन्हा
म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार
असो.
No comments:
Post a Comment