Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
संजय उवाचः-
एतच्छुत्वा वचनं केशवस्य
कृताञ्जलिर्वेपमानः कीरीटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं
सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥ ३५ ॥
३५) संजय म्हणाला,
श्रीकृष्णाचें हें भाषण ऐकून, ( भयानें ) कांपत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत
होऊन, साष्टांग नमस्कार घालून, पुन्हां श्रीकृष्णाला सद्गदित वाणीनें म्हणाला,
ऐसी आघवी हे कथा । तया
अपूर्णमनोरथा ।
संजयो सांगे कुरुनाथा ।
ज्ञानदेवो म्हणे ॥ ४८२ ॥
४८२) ज्ञानेश्र्वर
महाराज म्हणतात, याप्रमाणें ही सर्व हकीकत त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरुदेशाच्या
राजाला ( धृतराष्ट्राला ) संजय सांगत आहे.
मग सत्यलोकौनि गंगाजळ ।
सुटलिया वाजत खळाळ ।
तैशी वाचा विशाळ । बोलतां
तया ॥ ४८३ ॥
४८३) मग ज्याप्रमाणें
गंगेचे पाणी सत्यलोकापासून सुटलें असतां सारखें खळखळ वाजत जातें, त्याप्रमाणें तो
श्रीकृष्ण बोलत असतां तो गंभीर वाणीचा ओघ खळखळाटानें चालला होता.
नातरी महामेघांचे उमाळे ।
घडघडीत एके वेळे ।
घुमघमिला मंदराचळें ।
क्षीराब्धी जैसा ॥ ४८४ ॥
४८४) अथवा मोठमोठ्या
मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असतां जसा गडगडाट व्हावा, किंवा मंदर नांवाच्या
पर्वतानें क्षीरसमुद्रामध्यें ज्याप्रमाणें मंथनाचा आवाज एकसारखा घुमावा,
तैसें गंभीरें महानादें ।
हें वाक्य विश्र्वकंदें ।
बोलिलें अगाधें । अनंतरुपें
॥ ४८५ ॥
४८५) त्याप्रमाणें अगाध
व अनंतरुपधारी विश्वाचें कारण असलेल्या श्रीकृष्णानें गंभीर अशा मोठ्या शब्दानें
भाषण केलें.
तें अर्जुनें मोटकें ऐकिलें
। आणि सुख कीं भय दुणावलें ।
हें नेणों परि कापिन्नलें ।
सर्वांग तयाचें ॥ ४८६ ॥
४८६) तें अर्जुनानें
थोडेसें ऐकलें तोंच सुखाचा म्हणा कीं भीतीचा म्हणा दुप्पट जोर झाला; कशाचा, हे
आम्हांस माहीत नाही; परंतु एवढें खरें कीं, त्यामुळें त्याचें सर्व शरीर थरथरा कांपावयास
लागलें.
सखोलपणें वळली मोट । आणि
तैसेचि जोडले करसंपुट ।
वेळोवेळां ललाट । चरणीं
ठेवी ॥ ४८७ ॥
४८७) त्यास झालेलें सुख
अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळें तो आपल्या पायापर्यंत लवला आणि
झपाट्यांत कसें तरी करुन त्यानें हात जोडले आणि तो आपलें मस्तक पुनः पुनः प्रभूंच्या
पायांवर ठेवूं लागला.
तेवींचि कांहीं बोलों जाये
। तंव गळा बुजलाचि ठाये ।
हें सुख कीं भय होये । हें
विचारा तुम्ही ॥ ४८८ ॥
४८८) याचप्रमाणें
कांहीं बोलण्याचा प्रयत्न करावा, तो त्याचा कंठ भरुन राही; हें सुख झाल्याचें
लक्षण आहे कीं भीतीचे आहे, याचा तुम्ही आपल्या मनांतच विचार करुन निर्णय करा; (
असें ज्ञानेश्र्वर महाराज श्रोत्यांना सांगतात.)
परि तेव्हां देवाचेनि बोलें
। अर्जुना हें ऐसें जाहलें ।
मियां पदांवरि देखिलें ।
श्र्लोकींचिया ॥ ४८९ ॥
४८९) त्या वेळेला
देवांनी केलेलें भाषण ऐकून अर्जुनाची अशी ही स्थिती झाली. हें मी श्लोकांच्या वरील
‘ भीतभीतः प्रणम्य ‘ या पदांवरुन जाणलें.
मग तैसाचि भेणभेण । पुढती
जोहारुनि चरण ।
मग म्हणे जी आपण । ऐसें
बोलिलेति ॥ ४९० ॥
४९०) मग तसाच भीत भीत
तो पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करुन म्हणाला, महाराज आपण असें बोललात.
अर्जुन उवाचः—
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्
प्रहृष्यत्यनुरज्यते च ।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च
सिद्धसंघाः ॥ ३६ ॥
३६) अर्जुन म्हणाला, हे हृषीकेशा, तुझ्या
माहात्म्याने जग हर्ष व प्रेम पावतें हें योग्यच आहे. भयभीत राक्षस दशदिशांना पळत
आहेत. सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करीत आहेत. ( तेंही योग्यच आहे ).
ना अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु
।
हा बोलु कीर अढळु । मानूं आम्ही ॥ ४९१ ॥
४९१) कीं, अर्जुना, मी सर्वभक्षक काळ आहें
आणि सर्वांचा नाश करणें, ही तर माझी लीलाच आहें, हें जें तुझें बोलणें, तें आम्ही
खरोखरच खरें मानूं.
परि तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळे ।
ग्रासिजे हें न मिळे । विचारासी ॥ ४९२ ॥
४९२) परंतु हे परमेश्र्वरा, आपण जे काळ,
त्यांनीं आज ( स्थितिकालीं ) पालन करण्याच्या वेळेस जगाचा संहार करावा, हें माझ्या
विचाराला पटत नाहीं.
ऐसेनि आंगींचें तारुण्य मोडावें । कैचें नव्हे
तें वार्धक्य काढावें ।
म्हणोनि करुं म्हणसी ती नव्हे । बहुतकरुनी ॥ ४९३
॥
४९३) शरीरांत असलेलें तारुण्य कसें नाहीसें
करावें व नसलेलें म्हातारपण कोठून आणावें. ( या गोष्टी जर करुं म्हटलें तर जशा
व्हावयाच्या नाहींत त्याप्रमाणें ) जरी तूं या स्थितिकालीं संहार करुं म्हणतोस,
तरी तें बहुतकरुन होणार नाही.
हां जी चौपाहारी न मरतां । कोणेही वेळे श्रीअनंता
।
काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे ॥ ४९४ ॥
४९४) अहो देवा, चार प्रहर दिवस भरला नसतांच
कोणत्या तरी वेळी सूर्य मध्यान्हीं मावळला आहे काय ?
पैं तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळां ।
त्या तिन्ही परी सबळा । आपुलालां समयीं ॥ ४९५ ॥
४९५) देवा, अखंडित असे जे आपण काळ, त्या
आपल्यास तिन्हीहि वेळा, ( उत्पत्ति, स्थिति व लय ) आहेत. परंतु त्या तिन्ही वेळा,
आपापल्या समस्यांस पूर्ण सामर्थ्यवान् आहेत.
जे वेळीं हो लागे उत्पत्ती । ते वेळीं स्थिति
प्रळयो हारपती ।
आणि स्थितिकाळीं न मिरविती । उत्पत्ति प्रळयो ॥
४९६ ॥
४९६) ज्या वेळेस उत्पत्ति व्हावयास लागते,
त्या वेळीं स्थिति व प्रलय या दोन्ही अवस्था नाहीशा होतात; आणि स्थितिच्या वेळेस
उत्पत्ति व प्रळय या दोन्हीहि दिसत नाहीत.
पाठीं प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे ।
हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ॥ ४९७ ॥
४९७) प्रळयाच्या वेळेला, उत्पत्ति व स्थिति
या दोहोंचा लोप होतो, हें कशानेंहि बदलत नाही, असा हा क्रम अनादि कालापासूनचा
आहे.
म्हणोनि आजि तरी भरें भोगें
। स्थिति वर्तिजत आहे जगें ।
एथ ग्रसिसी तूं हें नलगे ।
माझां जीवीं ॥ ४९८ ॥
४९८) म्हणून आज तर
स्थितिकालीं जग हें भोगाच्या भरांत वागत आहे. म्हणून या स्थितिकालीं, तू ( कालरुप
श्रीकृष्ण ) त्याचा ( जगाचा ) संहार करशील, हें माझ्या मनाला पटत नाहीं.
तंव संकेतें देव बोले । अगा
या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें ।
तें प्रत्यक्ष तुज दाविलें
। येर यथाकाळें जाण ॥ ४९९ ॥
४९९) तेव्हां खूणेनें
देव म्हणाले, अरे अर्जुना, फक्त या दोन्ही सैन्यांचेंच आयुष्य संपले आहे. तें मी
तुला प्रत्यक्ष दाखविलें. त्यांच्याशिवाय इतर सर्व लोक आपापल्या योग्य कालीं मरण
पावतील.
हा संकेतु जंव अनंता । वेळु
लागला बोलतां ।
तंव अर्जुनें लोकु मागुता ।
देखिला यथास्थिति ॥ ५०० ॥
५००) हा इशारा देण्यास
देवाला जितका वेळ लागला, तितक्या वेळांत अर्जुनानें पुन्हां पूर्वीप्रमाणें सर्व
लोक सुखरुप असलेलें पाहिले.
मग म्हणतसे देवा । तूं
सूत्री विश्र्वलाघवा ।
जग आला मा आघवा ।
पूर्वस्थिती पुढती ॥ ५०१ ॥
५०१) मग अर्जुन
म्हणावयास लागला, देवा, या विश्वरुपी सोंगाचा तूं सूत्रधार आहेस. हें सर्व जग
पुन्हा पूर्वस्थितीला आलें ना ?
परि पडिलिया दुःसागरीं ।
तूं काढिसी कां जयापरी ।
ते कीर्ती तुझी हरी । आठवीत
असें ॥ ५०२ ॥
५०२) परंतु ( या तुझ्या
खेळांत ) दुःखसागरांत पडलेल्या जीवांना तूं ज्या प्रकारानें बाहेर काढतोस ती तुझी
कीर्ति, हे हरि, मी आठवीत आहें.
कीर्ती आठवितां वेळोवेळां ।
भोगितसें महासुखाचा सोहळा ।
तेथ हर्षामृतकल्लोळा । वरि
लोळत आहों ॥ ५०३ ॥
५०३) वारंवार आपली
कीर्ति आठवीत असतांना आम्ही ब्रह्मसुखाचा सोहळा भोगतों व त्या भोगांत हर्षरुप
अमृताच्या लाटांवर आम्ही लोळत आहोत.
देवा जियालेपणें जग । धरी
तुझां ठायीं अनुराग ।
आणि दुष्टां तयां भंग ।
अधिकाधिक ॥ ५०४ ॥
५०४) अहो देवा, जग हें
जगल्यामुळें तुझ्या ठिकाणीं प्रीति धरीत आहे आणि त्या दुष्टांना तुझ्यापासून
अधिकाधिक नाश आहे.
म्हणोनि पळताती दिशां ।
पैलीकडे ॥ ५०५ ॥
५०५) परंतु हे देवा,
त्रिभुवनांतील राक्षसांना तूं साक्षात् मृत्युच आहेस; म्हणून तें भयानें ( दहा )
दिशांच्या पलीकडे पळून जातात.
येर सुर सिद्ध किन्नर ।
किंबहुना चराचर ।
ते तुज देखोनि हर्षनिर्भर ।
नमस्कारित असती ॥ ५०६ ॥
५०६) बाकीचे देव, सिद्ध, किन्नर, फार काय सांगावें, हें
स्थावर जंगमात्मक जें जग आहे, ते सर्व तुला आनंद
भरित होऊन नमस्कार करीत आहे.
No comments:
Post a Comment