Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
तस्मात् प्रणम्य प्रणिधाय
कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्यु:
प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥ ४४ ॥
४४) यास्तव, जगताचा
स्वामी व स्तवन करण्यास योग्य अशा तुला मी दंडवत घालून, नकस्कार करुन ( प्रार्थना
करतो ); प्रसन्न हो. हे देवा, पिता ज्याप्रमाणें पुत्राचें, मित्र ज्याप्रमाणें
मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणें प्रियजनांचे ( अपराध सहन करतो ) त्याप्रमाणें माझे
अपराध तूं कृपा करुन सहन करावेस. (पोटांत घालावेस.)
ऐसे अर्जुने म्हणितलें । मग
पुढती दंडवत घातलें ।
सात्त्विकाचें आलें । भरतें
तया ॥ ५६७ ॥
५६७) याप्रमाणें
अर्जुनानें भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळीं
त्यांच्यांत अष्टसात्त्विक भाव भरुन आले.
मग म्हणतसे प्रसीद प्रसीद ।
वाचा होतसे सद्गद ।
काढीं जी अपराध--।
समुद्रौनि मातें ॥ ५६८ ॥
५६८) मग त्याची वाचा सद्गदित
होऊन तो म्हणावयास लागला, ‘ प्रसन्न हो, प्रसन्न हो. ‘ देवा, मला अपराधरुपी
समुद्रातून काढ.
तुज विश्र्वसुहृदातें कहीं
। सोयरपणें न मनूंचि पाहीं ।
तुज ईश्र्वरेश्वराचां ठायीं
। ऐश्वर्य केलें ॥ ५६९ ॥
५६९) तूं सर्व जगाचा
मित्र असून, तूं आमचा एक नातेवाईक आहेस, असे समजून मी तुला कधी मान दिला नाही.
सगळ्या देवांचा जो तूं ईश्र्वर, त्या तुझ्या ठिकाणीं ( तुला सारथी करुन ) प्रभुत्व
( धनीपण ) गाजविले.
तूं वर्णनीय परी लोभें ।
मातें वर्णिसी पां सभे ।
तरि मियां वल्गिजे क्षोभें
। अधिकाधिक ॥ ५७० ॥
५७०) सर्वांकडून वर्णन
करण्यास तूं एकच योग्य आहेस ( तेव्हा वास्तविक पाहाता मीच तुझें वर्णन करणें योग्य
होते; ) पण माझ्याव तुझें प्रेम असल्यामुळें सभेमध्ये तूं माझेच वर्णन करीत होतास.
( तेव्हां मी आपलीस्वतःची योग्यता ओळखून उगीच बसावें की नाहीं ? तरी तसे न करतां )
तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिकअधिकच बडबड करीत होतो.
आतां ऐसऐसेया अपराधां ।
मर्यादा नाही मुकुंदा ।
म्हणोनि रक्ष रक्ष प्रमादा
। पसावो म्हणुनी ॥ ५७१ ॥
५७१) आतां देवा, अशा
माझ्या हातून घडलेल्या अपराधाला मर्यादा नाही. याकरितां माझ्यावर प्रसाद म्हणून
माझ्या चुकापासून माझे रक्षण कर.
जी हेंचि विनवावयालागी ।
कैंची योग्यता माझां आंगीं ।
परि अपत्य जैसें सलगीं ।
बापेंसि बोले ॥ ५७२ ॥
५७२) देवा, हीसुद्धा
विनंती करण्याची योग्यता माझ्या अंगी कोठे आहे ? परंतु लहान मूल ज्याप्रमाणें
आपल्या बापाशीं सलगीचे भाषण करते ( त्याप्रमाणें मी तुमच्याशी सलगीचे भाषण करीत
आहे. )
पुत्राचे अपराध । जरी जाहले
अगाध ।
तरी पिता साहे निर्द्वंद्व
। तैसे साहिजो जी ॥ ५७३ ॥
५७३) आपल्या मुलाच्या
किती जरी चुका झाल्या तरी बाप ज्याप्रमाणे दुजेपणा सोडून त्या सहन करतो,
त्याप्रमाणे, अहो महाराज, माझे अपराध आपण सहन करा.
सख्याचें उद्दत । सखा साहे
निवांत ।
तैसें तुवां समस्त । साहिजो
जी ॥ ५७४ ॥
५७४) बरोबरीचा स्नेही,
आपल्या स्नेह्याकडून कांहीं उपमर्द झाला असता, त्या विषयी कांहींच मनांत न घेतां
सहन करतो, त्याप्रमाणें महाराज, मी केलेलीं सर्व अविचारी कृत्यें आपण सहन करा.
प्रियाचां ठायीं सन्मान ।
प्रिय न पाहे समर्था जाण ।
तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण
। ते क्षमा कीजो ॥ ५७५ ॥
५७५) असें पाहा कीं,
स्नेह्याच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळींच इच्छा करीत नाही, त्याप्रमाणें आपण
आमच्या घरीं उच्छिष्ट काढलें. त्याची आपण क्षमा करावी.
नातरी प्राणाचें सोयरें
भेटे । मग जीवें भूतलीं जिये संकटें ।
तियें निवेदितां न वाटे ।
संकोचु कांहीं ॥ ५७६ ॥
५७६) अथवा जिवलग
स्नेह्याची गांठ पडल्यावर, मग आपण भोगलेले जे संकटाचे सर्व प्रसंग, ते त्यांस
सांगावयास काहींच संकोच वाटत नाहीं.
कां उखितें आंगें जीवें ।
आपणपें दिधलें जिया भावें ।
तिये कांतु मिनलिया न
राहवें । हृदय जेवीं ॥ ५७७ ॥
५७७) अथवा ज्या
पतिव्रतेने आपल्याला शरीरानें व प्राणानें सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण
केलें, तिची व पतीची भेट झाली असतां ज्याप्रमाणें तिच्या मनांतील कोणतीहि गोष्ट
पतीला सांगितल्यावाचून तिच्यानें राहवत नाहीं;
तयापरी जी मियां । हें
विनविलें तुमतें गोसाविया ।
आणि कांहीं एक म्हणावया ।
कारण असे ॥ ५७८ ॥
५७८) अहो महाराज,
त्याप्रमाणें मीं तुम्हांला माझें मागील अपराध क्षमा करण्याची विनंती केली; माझा
आणखी कांहीं एक सांगावयाचा हेतु आहे.
मूळ श्लोक
अदृष्टपूर्व हृषितोऽस्मि
दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रुपं
प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ४५ ॥
४५) पूर्वीं ( कधीं ) न
पाहिलेलें हें ( तुझें विश्वरुप ) पाहून मी हर्ष पावलों आहे; आणि भयानें माझें मन
व्याकुळे झालें आहे. ( म्हणून ) देवा मला तेंच ( पूर्वींचे ) रुप दाखव. हे देवाधिदेवा,
हे जगन्निवासा, माझ्यावर प्रसन्न हो.
तरि देवेंसीं सलगी केली ।
जे विश्र्वरुपाची आळी घेतली ।
ते मायबापें पुरविली ।
स्नेहाळाचेनि ॥ ५७९ ॥
५७९) तरी मी
विश्वरुपदर्शनाचा हट्ट घेतला, हा जो देवाशीं मी लडिवाळपणा केल, तो माझा
लडिवाळपणाचा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप, त्या तुम्ही पुरविला.
सुरतरुंचीं झाडें । आंगणीं
लावावीं कोडें ।
देयाचें कामधेनुचें पाडें ।
खेळावया ॥ ५८० ॥
५८०) कल्पवृक्षांची
झाडें अंगणामध्येंच कौतुकानें लावून द्यावींत अथवा कामधेनूचें वासरुं खेळावयास
आणून द्यावें;
मियां नक्षत्रीं डाव पाडावा
। चंद्र चेंडूवालागीं देयावा ।
हा छंदु सिद्धी नेला आघवा ।
माउलिये तुवां ॥ ५८१ ॥
५८१) मी नक्षत्रांच्या
फांद्यांशी डाव खेळावा, मला चेंडू म्हणून खेळावयास चंद्र द्यावा, हा सर्व माझा
हट्ट माझ्या आई, तूं सिद्धीस नेलास.
जया अमृतशालागीं सायास ।
तयाचा पाऊस केला चारी मास ।
पृथ्वी वाहून चासेचास ।
चिंतामणि पेरिले ॥ ५८२ ॥
५८२) ज्या अमृताच्या
थेंबाकरितां कष्ट पडतात, त्या अमृताचा पाऊस आपण चार महिने पाडलात व सर्वच पृथ्वी
पेरणीस लायक करुन तीमध्यें पाभारीच्या प्रत्येक तासांत ( फणांच्या रेषांत )
चिंतामणि नांवाची रत्नें पेरलींत.
ऐसा कृतकृत्य केला स्वामी ।
बहुवे लळा पाळिला तुम्ही ।
दाविलें जे हरब्रह्मीं ।
नायकिजे कानीं ॥ ५८३ ॥
५८३) महराज, याप्रमाणें
मला आपण कृतकृत्य केलेंत, तुम्हीं माझे पुष्कळ लाड पुरवलेत व जें शंकरव ब्रह्मदेव
यांनीं कानांनीं देखील ऐकलें नाहीं, तें तुम्हीं मला प्रत्यक्ष दाखविलेंत.
मग देखावयाची केउती गोठी । जयाची
उपनिषदां नाहीं भेटी ।
ते जिव्हारींची गांठी ।
मजलागीं सोडिली ॥ ५८४ ॥
५८४) मग तें त्यांना (
प्रत्यक्ष ) पाहावयाची गोष्ट कशाला पाहिजे ? ज्यांचें उपनिषदांना दर्शन नाहीं अशी
आपल्या जीवांतील गुह्य गोष्ट तुम्हीं माझ्याकरितां उघड केली.
जी कल्पादीलागोनी । आजिची
घडी धरुनी ।
माझीं जेतुली होउनी । गेलीं
जन्में ॥ ५८५ ॥
No comments:
Post a Comment