Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 6
म्हणोनि
अविद्याजात नाथिलें । ते तिहींचि साच दाविलें ।
जिहीं
सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥ १२६ ॥
१२६)
म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारें दुःखच सुख या समजुतीनें स्वीकारलें, त्यांनींच
मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक हे खरे करुन दाखविले.
या कारणें
गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा ।
तूं झणें
कहीं हा वाटा । विसरोनि जाशी ॥ १२७ ॥
१२७)
अर्जुना, यामुळेंच विचार करुन पाहिलें, तर हे विषय वाईट आहेत. तूं कदाचित् चुकुन
कधीं त्या मार्गाला जाशील, तर जाऊं नकोस.
पैं यातें
विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष ।
निराशां
तयां दुःख । दाविलें नावडे ॥ १२८ ॥
१२८) जे
विरक्त पुरुष आहेत, ते या विषयांस, जसें कांहीं ते विषच आहेत, असें समजून त्यांचा
त्याग करतात. कारण ते निरिच्छ असल्याकारणानें विषयांनी दाखविलेले दुःखरुपी सुख
त्यांना आवडत नाहीं.
ज्ञानियांचा
हन ठायीं । यांची मातुही कीर नाहीं ।
देहीं
देहभावो जिद्दीं । स्ववश केले ॥ १२९ ॥
१२९)
आत्मज्ञान्यांच्या ठिकाणीं तर, या दुःखरुप विषयांची गोष्टसुद्धा नाहीं. कारण
त्यांनी देहांत असतांनाच कामक्रोधादि वृत्ति आपल्या आधीन ठेवल्या आहेत.
जयांतें
बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष ।
अंतरीं सुख
। एक आथि ॥ १३० ॥
१३०)
त्यांना अंतःकरणांत एक ब्रह्मसुख अनुभवाला आलेलें असतें, म्हणून ते बाह्य विषयांची
गोष्ट मुळींच जाणत नाहींत.
परी ते
वेगळेपणें भोगिजे । जैसे पक्षियें फळ चुंबिजे ।
तैसें नव्हे
तेथ विसरिजे । भोगितेपंही ॥ १३१ ॥
१३१)
परंतु पक्षी जसें फळ खातो, ( म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणिखाण्याची
क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट भासते ) तसें तें ब्रह्मसुख वेगळेपणानें ( भोक्ता,
भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून ) भोगण्यासारखें नाहीं, तर तेथें भोक्तेपणहि
विसरलें पाहिजे. ( म्हणजें हें भोगणें त्रिपुटीविरहित, म्हणजे तद्रूपतेचें असतें.
)
भोगीं
अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अचळु लोटी ।
मग सुखेंसि
घे आंठी । गाढेपणें ॥ १३२ ॥
१३२)
त्या भोगांमध्यें वृत्तीची अशी एक स्थिति उत्पन्न होतें कीं, ती स्थिति अहंकाराचा
पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो.
तिये
आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी ।
तेथ जळ
जैसें जळीं । वेगळें न दिसे ॥ १३३ ॥
१३३)
पाण्यांत पाणी मिळाल्यानंतर जसें वेगवेगळें दिसत नाहीं, त्याप्रमाणें त्या
आलिंगनाच्या संबंधांत आपणच आपल्याला मिठी मारतों, ( म्हणजे आपलेंच आपल्याशी सहज
ऐक्य होतें.
कां आकाशीं
वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे ।
तैसें सुखचि
उरे स्वरुपें । सुरतीं तिये ॥ १३४ ॥
१३४)
अथवा, आकाशांत वायूचा लय झाल्यानंतर आकाश व वायू हें दोन आहेत, असें म्हणतां येत
नाहीं; तसें या भागामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरुपानें राहतें,
ऐशी
द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एकचि होय ।
तरी तेथ
साक्षी कवणु आहे । जाणतें जें ॥ १३५ ॥
१३५)
अशी द्वैताची गोष्टच गेली, म्हणजे मग ऐक्य होतें, असें जर म्हणावें, तर तसें ऐक्य
जाणून, ‘ ऐक्य आहे ‘ असें म्हणणारा तेथें साक्षी तरी कोण उरला आहे ?
म्हणोनि असो
हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें ।
ते खुणचि
पावेल स्वभावें । आत्माराम ॥ १३६ ॥
१३६)
म्हणून हें मागील सगळें असूं दे. जें न बोलण्यासारखें आहे, तें काय बोलावें ? जो
ब्रह्मनिष्ठ आहे, तोच हें मर्म सहज जाणील.
जे ऐसेनि
सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले ।
ते मी जाणें
निखळ वोतले । सामरस्याचे ॥ १३७ ॥
१३७)
जें अशा सुखानें धुंद झालें आहेत व आपल्या ठिकाणींच आपण रममाण झाले आहेत, ते
पूर्णपणें साम्यरसाचे ( ब्रह्मैक्यभावाचे ) ओतलेले पुतळेच आहेत, असें मी समजतों.
ते आनंदाचे
अनुकार । सुखाचे अंकुर ।
की महाबोधें
विहार । केले जैसे ॥ १३८ ॥
१३८) ते
आनंदाचें प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंभ आहेत किंवा जणूं काय महाबोधानें आपल्याला
राहण्याला मंदिर केले आहेत.
ते विवेकाचे
गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।
नातरी
अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥ १३९ ॥
१३९) ते
विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत, किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणूं काय
मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजविलेले अवयवच आहेत.
ते
सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक ।
हें बहु असो
एकैक । वानिसी काई ॥ १४० ॥
१४०) ते
शुद्ध सत्त्वाचे सात्त्विक आहेत, अथवा चैतन्याचे अवयव आहेत. यावर श्रीगुरु
निवृत्तिनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे. तूं एक एक वर्णन कोठवर करणार ?
तूं
संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी ।
कीं निराळीं
बोल देखसी । सनागर ॥ १४१ ॥
१४१) तूं
जेव्हां संतांच्या स्तुतींत तन्मय होतोस, तेव्हां चालूं विषयाचे स्मरण तुला राहत
नाहीं आणि विषयाला सोडून पण चांगलें बोल तूं बोलतोस,
परि तो
रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।
करीं
साधुहृदयराउळीं । मंगळ उखा ॥ १४२ ॥
१४२)
परंतु हा रसाचा विस्तार आवरता घे; आणि आतां ग्रंथाचा अर्थरुपी दिवा प्रज्वलित कर व
सज्जनांच्या अंतःकरणरुपी मंदिरांत मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर.
ऐसा गुरुचा
उवायिला । निवृत्तिदासासी पातला ।
मग तो म्हणे
कृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥ १४३ ॥
१४३) याप्रमाणें
श्रीगुरुंची सूचना निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वर यांना मिळाली. मग ते
म्हणाले, श्रीकृष्ण जें म्हणाले, तेच ऐका.
अर्जुना
अनंत सुखांचां डोही । एकसरा तळुचि घेतला जिहीं ।
मग
स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ॥ १४४ ॥
१४४)
अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहांत, जे एकदम तळाशीं जाऊन पोंचले आहेत, ते मग त्याच
ठिकाणीं स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले.
अथवा
आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्र्व देखे ।
तो देहेंचि
परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥ १४५ ॥
१४५)
अथवा शुद्ध आत्मज्ञानानें जो, आपणच विश्व आहोंत, असें जाणतो, तो या देहांमध्येच
परब्रह्म आहे, असें खुशाल मानतां येईल.
जें
साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम ।
जिये
गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥ १४६ ॥
१४६) जें
खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जें क्षयरहित व अमर्याद आहे आणि निष्काम पुरुष ज्या
ठिकाणाची प्राप्ति करुन घेण्यास अधिकारी आहेत;
जें महर्षीं
वाटलें । विरक्तां भागा फिटलें ।
जें
निःसंशया पिकलें । निरंतर ॥ १४७ ॥
१४७)
जें थोर ऋषींकरितांच काढून ठेवलें आहे किंवा वैराग्यवानांच्या वाट्याला आलेले आहे
व जें नेहमीं संशयरहितास फलद्रुप होतें;
जिहीं
विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें ।
ते
निश्र्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥ १४८ ॥
१४८)
ज्यांनी आपण आपलें चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपलें आधीन करुन ठेवलें आहे,
असे पुरुष निश्र्चयानें ज्या स्वरुपांत लीन झालेअसतां पुनः जागें होत नाहीत (
वृत्तींवर येत नाहीत );
तें
परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण ।
तेंचि ते
पुरुष जाण । पंडुकुमरा ॥ १४९ ॥
१४९) जे
मोक्षरुप परब्रह्म, आत्मज्ञान्यांचें जें साध्य, तेंच ते पुरुष आहेत असें अर्जुना,
तूं समज.
ते ऐसे
कैसेनि जाहले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले ।
हें ही
पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ॥ १५० ॥
१५०) असे जे देहांत असतांनाच ब्रह्मभावास आले, ते, असे
कशानें झाले, हेंहि विचारशील तर तें आम्ही चांगलें ( पण
) थोडक्यांत सांगतों.
No comments:
Post a Comment