Saturday, January 23, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग २

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 2 
Ovya 31 to 60 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग २ 
ओव्या ३१ ते ६०

परि अनुवादला मीं प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे ।

आतां सांगेन काय श्रीरंगें । निरोपिलें जें ॥ ३१ ॥

३१) परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलों, तें संतांनी क्षमा करणें उचित हे. आतां श्रीकृष्णांनीं जें कांहीं सांगितलें तें सांगतों.

तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे ।

परि निवृत्तिकृपादीपउजियेडें । देखेन मी ॥ ३२ ॥

३२) तें बुद्धीलादेखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनीं तें क्वचित् सांगता येईल; तरी पण माझें गुरु निवृत्तिनाथ यांच्या कृपारुपी दिव्याच्या उजेडानें मी तें पाहीन.

जें दीठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे ।

जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥ ३३ ॥

३३) जर अतींद्रिय ज्ञानाचें बळ प्राप्त होईल, तर जें दृष्टीला दिसत नाहीं, तें डोळ्यांशिवाय पाहतां येतें.

ना तरी धातुवादाही न जोडे । ते लोहींचि पंधरें सांपडे ।

जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥ ३४ ॥

३४) दैवशात् परीस जर हाताला येईल, तर किमयेच्या योगानेंहि प्राप्त न होणारें उत्तम सोनें, लोखंडांतच मिळेल. 

तैसी सद्गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ।

म्हणऊनि ते अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥ ३५ ॥

३५) त्याप्रमाणें जर सदगुरुची कृपा होईल, तर प्रयत्न केला असतां कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही ? ज्ञानदेव म्हणतात, माझ्यावर ती ( कृपा ) अलोट आहे.  

तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरुपाचें रुप दावीन ।

अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥ ३६ ॥

३६) त्या सद्गुरु कृपेच्या आधारावर मी व्याख्यान करीन व माझ्या व्याख्यानात अरुप ब्रह्माचे स्पष्ट रुप दाखवीन आणि जरी तें ( ब्रह्म ) इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचें आहे तरी त्याचाहि अनभव इंद्रियांना येईल, असें मी करीन.

आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्र्वर्य ।

हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥ ३७ ॥

३७) ऐका; यश, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्र्वर्य हे सहा उच्च प्रतीचे गुण ज्याच्या ठिकाणीं वास करतात, 

म्हणोनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु ।

तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होईं आतां ॥ ३८ ॥

३८) म्हणून ज्यास भगवंत असे म्हणतात व जो सर्वसंगपरित्याग केलेल्यांचा सोबती आहे, तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, आतां तू पूर्ण लक्ष दे.

आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनाने झणीं मानीं ।

एर्‍हवी विचारजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥ ३९ ॥

३९) अर्जुना, ऐक या जगांत निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. त्यांना कदाचित तूं वेगळे मानशील, पण तसें मानूं नकोस. कारण, विचार करुन पाहिलें तर हे दोन्ही एकच आहेत.

सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु ।

पहातां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजी ॥ ४० ॥

४०) नावांच्या वेगळेपणामुळें भासणारा दुजेपणा टाकून दिला तर, योग तोच संन्यास होय. तत्त्वतः पाहिलें तर ब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणीं ह्या दोहोंत अंतर राहात नाहीं.

जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका  पुरुषातें बोलावणें ।

कां दोहीं मार्गीं जाणें । एकचि ठाया ॥ ४१ ॥

४१) ज्याप्रमाणें वेगवेगळ्या नांवांनीं एकाच पुरुषाला हांक मारतात, किंवा दोन रस्त्यांनीं एकच मुक्काम गाठतात;  

ना तरी एकचि उदक सहजें । परि सिनांना घटीं भरिजे ।

तैसें भिन्नत्व हें जाणिजे । योगसंन्यासांचें ॥ ४२ ॥

४२) किंवा स्वभावतः पाणी तितकें एकच, परंतु तें वेगवेगळ्या घागरींतून भरलें, म्हणजे जसें तें वेगवेगळें दिसतें, त्याप्रमाणें योग व संन्यास ह्यांचा वेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे. 

आइकें सकळ संमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी ।

जो कर्में करुनि रागी । नोहेचि फळीं ॥ ४३ ॥

४३) अर्जुना, ऐक. जो कर्माचे आचरण करुन त्याच्या फलाविषयीं आसक्त होत नाहीं, तोच ह्या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय.

जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें ।

आणि तेथिंचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥ ४४ ॥

४४) ज्याप्रमाणें पृथ्वी ही अहंकारावाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते व त्यांना येणार्‍या फलांची अपेक्षा करीत नाही,

तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें ।

जें जेणें अवसरें । करणें पावे ॥ ४५ ॥

४५) तसें कुक्रमातील वहिवाटीप्रमाणें वर्णाश्रमधर्मातील आचारांना अनुसरुन, जें कर्म ज्या वेळेला ( करणें ) प्राप्त आहे,    

 तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं ।

आणि बुद्धिही करोनि फळवेरीं । जायेचिना ॥ ४६ ॥

४६) तें त्याप्रमाणेंच व्यवस्थित करतो; परंतु त्यासंबंधीं आपल्या ठिकाणीं कर्तृत्वबुद्धि घेत नाही आणि बुद्धीनेहि फलापर्यंत जात नाहीं ( फलाची इच्छा करीत नाही ).

ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं ।

तोचि भरंवसेनिसीं । योगीश्र्वरु ॥ ४७ ॥

४७) असा जो असेल, तोच संन्यासी होय. अर्जुना, ऐक. तोच खात्रीनें योगिराज आहे असें समज.

वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हें सांडीन बद्धक ।

तरी टांकोटांकीं आणिक एक । मांडीचि तो ॥ ४८ ॥

४८) उलट जो नित्यनैमित्तिक कर्म करणें प्राप्त झालें तर त्या कर्माला हें कर्म बंधन करणारे आहे, हें मी टाकीन, असें म्हणतों पण हें कर्म  टाकलें कीं, लागलीच तो दुसरें एखादें कर्म करण्याचें आरंभितोच.     

जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु ।

तैसेनि आग्रहाचा पाइकु । विसंबे वायां ॥ ४९ ॥   

४९) असा एक लेप धुऊन टाकून लागलींच दुसरा लावावा, त्याप्रमाणें केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टांत पडतो.    

गृहस्थाश्रमाचें ओझें । कपाळीं आधींचि आहे सहजें ।

कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥ ५० ॥

५०) डोक्यावर अगोदरच स्वभावतः गृहस्थाश्रमाचें ओझें आहेच. ते टाकण्याकरितां संन्यास घेतला, तर त्याबरोबरच पुनः संन्यासाश्रमांतील कर्माचें ओझें तो डोक्यावर घेतो;   

म्हणूनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां ।

आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ॥ ५१ ॥

५१) म्हणून अग्निसेवा न टाकतां व कर्माचरणाची मर्यादा उल्लंघन न करतां योगाचें सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे.

ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जे जगीं ।

गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥ ५२ ॥

५२) ऐक जो संन्यासी तोच योगी आहे, अशी आपली एकवाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी या जगांत ध्वजा उभारुन प्रसिद्ध केले;

जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथेंचि योगाचें सार भेटे ।

ऐसें हें अनुभवाचेनि घटें । साचें जया ॥ ५३ ॥

५३) ज्या ठिकाणी त्याग केल्याचा संकल्प अजिबात नाहींसा होतो, त्याच ठिकाणीं योगाचे सर्वस्व ( ब्रह्म ) प्राप्त होतें, असें हें ज्याला अनुभवाच्या तराजूत खरें ठरुन पटलें आहे ( तोच संन्यासी व तोच योगी होय.   

आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था ।

तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणीं ॥ ५४ ॥

५४) अर्जुना, आतां योगरुपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचावयाचें  असेल, त्यानें कर्ममार्गरुपी पायर्‍यांस चुकूं नये. 

येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे असनाचिये पाउलवाटे ।

येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ॥ ५५ ॥

५५) तो या यमनियमरुपी पायर्‍यांपासून निघून आसानाच्या पायवाटेनें, प्राणायामाच्या कड्याने योगरुपी डोगराच्या मध्याभागावर येतो.   

मग प्रत्याहाराचा आधाडा । बुद्धीचियाहि पाया निसरडा ।

जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥ ५६ ॥

५६) नंतर प्रत्याहाररुपी तुटलेला कडा लागतो, त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेहि पाय ठरत नाहीत, त्या प्रसंगात हठयोग्यांना शेवटीं आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात.    

तरी अभ्यासाचेनि बळें प्रत्याहारीं निराळे ।

नखी लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ॥ ५७ ॥

५७) तरी अभ्यासाच्या बळानें, चढण्यास आधार नसणार्‍या प्रत्याहाररुपी कड्यावर वैराग्यरुपी नखी ( घेरपडीसारखी ) हळूहळू चिकटेल ( आणि याप्रमाणें ) चढावयास आश्रय मिळेल.

ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें ।

क्रमी ध्यानाचें चवरें । सांडे तंव ॥ ५८ ॥

५८) याप्रमाणें प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरुन येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्यानें ध्यानरुपी शिखर मागें टाकीपर्यंत तो चालतो. 

मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव ।

जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ॥ ५९ ॥

५९) मग या धारणामार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करावयाची आहे, अशा विषयीची इच्छा बंद पडून, ज्या अवस्थेमध्यें ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहींसा होतो; 

जेथ पुढील पैसा पारुखे । मागील स्मरावें तें ठाके ।

ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ॥ ६० ॥

६०) ज्या ठिकाणीं पुढील प्रवृत्ति बंद पडून मागील 

कशाचेंहि स्मरण होत नाहीं, अशा या ऐक्याच्या भूमिकेवर

 समाधि राहाते,



Custom Search

No comments: