Saturday, January 23, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 1
Ovya 1 to 30
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १
ओव्या १ ते ३०

मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो ।

कृष्ण सांगती जो । योगरुप ॥ १ ॥

१) मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ‘ ( पांचव्यांत दंश दाखविलेला ) जो योगरुप अभिप्राय, कृष्ण अर्जुनाला सांगतील, तो ऐका. ‘

सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें ।

कीं तेचि अवसरीं पाहुणे । पातलों आम्ही ॥ २ ॥

२) श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणें केले. त्याच समयास आम्ही सहजगत्या पाहुणे प्राप्त झालो.

कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे ।

कीं तेंचि चवी करुनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥ ३ ॥

३) दैव किती थोर आहे हें कळत नाहीं ! ज्याप्रमाणें एखाद्या तहानलेल्या पुरुषानें पाणी पिण्यास लागावें व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुची पाहावी, तों त्यास, तें पाणी नसून अमृत आहे असें कळावें, 

तैसें आम्हां तुम्हां जाहलें । जें आडमुठीं तत्त्व फावलें ।

तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । हें न पुसों तूंतें ॥ ४ ॥

४) तसें आम्हाला व तुम्हाला झालें आहे. कारण मिळण्याचा संभव नसतां ब्रह्मज्ञान आपणांस मिळालें आहे. तेव्हां धृतराष्ट्र म्हणाला, ‘ आम्ही तुला ही गोष्ट विचारीत नाही.’ 

तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें ।

जे अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया ॥ ५ ॥

५) या बोलण्यानें त्या संजयाला धृतराष्ट्राचें हृदय मुलाविषयींच्या स्नेहानें या वेळीं घेरले आहे असें कळून आलें.

हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला ।

एर्‍हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं ये ॥ ६ ॥

६) हें लक्षांत येऊन संजय मनांतच हसला व आपल्याशींच म्हणाला, हा म्हातारा मोहानें अगदींच कामांतून गेला आहे. एर्‍हवीं या वेळेला प्रतिपादन तर फार चांगलें झालें आहे.

परि तें तैसें कैसेनि होईल । जात्यंधा कैसें पाहेल ।

तेवींचि येरु से घेईल । म्हणोनि बिहे ॥ ७ ॥

७) पण धृतराष्ट्राला हें प्रतिपादन गोड कसें लागणार ? जन्मांधाला कसें उजाडेल ? ( पण ही गोष्ट धृतराष्ट्राला तशी उघड सांगितली तर ) तो मनांत रोष ठेवील, म्हणून संजय उघड बोलण्यास भ्याला.

परि आपण चित्तीं आपुलां । निकियापरी संतोषला ।

जे तो संवादु फावला । कृश्णार्जुनांचा ॥ ८ ॥

८) पण तो मात्र आपल्याला कृष्ण अर्जुन संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनांत चांगल्या प्रकारें आनंदित झाला. 

तेणें आनंदाचेनि घालेपणें । साभिप्राय अंतःकरणें ।

आतां आदरेंसी बोलणें । घडेल तया ॥ ९ ॥

९) त्या आनंदाच्या तृप्तीनें श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन, तो धृतराष्ट्रास आदरानें सांगता येईल.

तो गीतेमाजि षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा ।

जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥ १० ॥

१०) तें संजयाचें सहाव्या अध्यायांतील बोलणें हा चातुर्ययुक्त प्रसंग आहे. ज्याप्रमाणें क्षीरसमुद्रांतून अमृताची निवड झाली,

तैसें गीतार्थाचें सार । जेम विवेकसिंधूचें पार ।

नाना योगविभवभांडार । उघडलें कां ॥ ११ ॥

११) त्याप्रमाणें हा सहावा अध्याय गीतेच्या अर्थांचे सार आहे. हा अध्याय विचाररुपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्र्वर्याचें खुलें केलेलें भांडारच होय.

जें आदिप्रकृतीचें विसवणें । जें शब्दब्रह्मासि न बोलणें ।

जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे ॥ १२ ॥

१२) जो मूळ मायेचें विश्रांतिस्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहींत व ज्या गीतारुपी वेलीच्या अंकुराचें स्वरुप वाढीला लागलेलें आहे,

तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा ।

सांगिजेल म्हणोनि परिसावा । चित्त देउनी ॥ १३ ॥

१३) असा हा सहावा अध्याय आहे. शिवाय तो अलंकारांनीं सजवून सांगितला जाईल. म्हणून लक्ष देऊन ऐकावा.

माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजासीं जिंकें ।

ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥ १४ ॥

१४) माझें हें प्रतिपादन मराठी भाषेंत आहे. हें खरें परंतु लीलेनें अमृतालाहि प्रतिज्ञापूर्वक जिंकील, अशा तर्‍हेची रसयुक्त रचना मी करीन. 

जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे ।

वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥ १५ ॥

१५) ज्या माझ्या अक्षरांच्या कोंवळेपणाच्या मानानें पाहिलें असतां, सुस्वरांचे निरनिराळे राग कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचें बल नाहीसें करील;

ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।

बोलें इंद्रिया लागे कळंभा । एकमेकां ॥ १६ ॥

१६) ऐका, रसाळपणाच्या लोभानें कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमध्ये परस्परांत भांडण लागेल.   

सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा ।

घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥ १७ ॥

१७) सहज पाहिलें तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे., परंतु जिव्हा म्हणेल कीं, हा शब्द माझा रसविषय आहे. नाकाला असें वाटेल कीं, या शब्दांच्या योगानें मला सुवास मिळावा तर तो शब्द अनुक्रमें रस व सुवास होईल. 

नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी ।

ते म्हणती उघडली खाणी । रुपाची हे ॥ १८ ॥

१८) या बोलण्याचा ओघ असा आश्र्चर्यकारक आहे कीं, तो पाहिला असतां डोळ्यांना तृप्ति मिळूं लागेल व ते म्हणतील, ‘ हे आम्हांला रुपविषयाचें कोठारच उघडलें आहे. ‘    

जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें ।

बोलु भुजाही आविष्कारे । आलिंगावयां ॥ १९ ॥

१९) संपूर्ण पद जेथें तयार होईल तेथें त्याच्या भेटीकरितां अंतःकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास बाहूहि पुढें सरसावतील.

ऐशी इंद्रियें आपुलालियां भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी ।

जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु ॥ २० ॥

२०) याप्रमाणें इंद्रियें आपल्या इच्छेप्रमाणें माझ्या शब्दांना लगट करतील; पण तो शब्द सर्वांचे सारखेंच समाधान करील. ज्याप्रमाणें एकटाच सूर्य जगाला आपल्या सहस्र किरणांनी जागें करतो;

तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण ।

पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥ २१ ॥

२१) त्याप्रमाणें शब्दांचें व्यापकपण असामान्य आहे, असें समजावें. त्याचा विचार करुन अभिप्राय जाणणार्‍याला यांत चिंतामणीसारखें गुण दिसून येतील.

हें असोत या बोलाचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरलीं ।

ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥ २२ ॥

२२) हें राहूं द्या. असें शब्द हीच कोणीं चांगली ताटें व त्यांत मोक्षरुप पक्वान्नें वाढलेलीं आहेत, अशी ही ग्रंथरचनारुपी मेजवानी मी निष्काम पुरुषांना केली आहे.    

आतां आत्मप्रभा नीत नवी । तेचि करुनि ठाणदिवी ।

जो इंद्रियांतें चोरुनि जेवी । तयासीचि फावे ॥ २३ ॥

२३) आतां नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी एक ठाणदिवा करुन, जो इंद्रियांना न कळतां जेवतो ( उपभोग घेतो ); त्यालाच ( कैवल्यरुप पक्वान्नांचा ) लाभ होतो. 

येथ श्रवणाचेनि पांगें- । वीण श्रोतयां व्हावें लागे ।

हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥ २४ ॥

२४) या मेजवानीकरितां श्रोत्यांना श्रवणेंद्रियाचा पंगिस्तपणा टाकावयास पाहिजे. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेनें भोगावयाची आहे. 

आहाच बोलाची वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे ।

मग सुखेंसी सुरवाडिजे । सुखाचिमाजि ॥ २५ ॥

२५) वरवर असलेली शब्दरुपी गवसणी काढून, आंत ब्रह्मरुपी अर्थ आहे, त्याच्याशी तद्रूप व्हावें; नंतर सुखामध्येंच सुखानें रंगून जावें.   

ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाईल ।

एरव्हीं आघवी गोठी होईल । मुकयाबहिरयाची ॥ २६ ॥    

२६) याप्रमाणें चित्ताला जर हळूवारपणा येईल, तरच माझ्या निरुपणाचा उपयोग होईल. नाहीतर मुक्याभिर्‍याच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल. 

परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांतें कडसावें ।

जे एथ अधिकारिये स्वभावें । निष्कामकाम ॥ २७ ॥

२७) परंतु तें आतां सर्वच राहूं द्या. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाहीं. कारण या विषयांत सहजच निष्काम अंतःकरणाचे लोकच अधिकारी आहेत.

जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी ।

तेवांचूनि एथींची गोडी । नेणती आणिक ॥ २८ ॥

२८) ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीनें संसार व स्वर्ग हें ओवाळून टाकले आहेत, त्यांच्यावाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजूं शकत नाहींत.

जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे ।

आणि तो हिमांशुचि जेविं खाजें । चकोराचें ॥ २९ ॥

२९) ज्याप्रमाणें कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणें विषयासक्त लोकांस हें प्रतिपादन समजणार नाहीं; आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणें चकोराचें आवडते खाद्य आहे,  

तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । आणि अज्ञानासी आन गांवो ।

म्हणोनि बोलावया विषय पहाहो । विशेषें नाहीं ॥ ३० ॥

३०) त्याप्रमाणें ज्ञानवानांचा हा विषय आहे आणि अज्ञानी

 लोकांना तर हे अनोळखीचें ठिकाण आहे म्हणून पाहा,

 ह्याविषयीं फार बोलण्याचें कारण नाहीं.



Custom Search

No comments: