Saturday, January 23, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ३

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 3 
Ovya 61 to 90 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ३ 
ओव्या ६१ ते ९०

येणें उपायें योगारुढु । जो निरवधि जाहला प्रौढु ।

तयांचिया चिन्हांचा निवाडु । सांगेन आइकें ॥ ६१ ॥

६१) या उपायांनी जो योगनिष्णात अखंड परिपूर्ण झाला, त्याचीं चिन्हें तुला निवड करुन सांगतों ऐक.

तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा ।

जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ॥ ६२ ॥

६२) तरी ज्याच्या इंद्रियरुपी घरांत विषयांचें येणें-जाणें होत नाहीं आणि जो आत्मज्ञानरुपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ निजलेला असतो.

जयाचें सुखदुःखाचेनि आंगें । झगटलें मानस चेवो नेघे ।

विषय पासींही आलिया से न रिघे । हें काय म्हणऊनि ॥ ६३ ॥

६३) ज्याच्या मनाला सुखदुःखांनीं स्वतः धक्के दिले असतांना तें जागें होत नाहीं, विषय अगदी जवळ आले तरी, हें काय आहे म्हणून ज्याला स्मरणही होत नाही;  

इंद्रियें कर्माचां ठायीं । वाढीनलीं परि कहीं ।

फळहेतूची चाड नाहीं । अंतःकरणीं ॥ ६४ ॥

६४) ज्याचीं इंद्रियें कर्म करीत असलीं, परंतु ज्याच्या अंतःकरणांत फलाची इच्छा कधीहि उत्पन्न झालीं नाहीं;

असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला ।

तोचि योगारुढु भला । वोळखें तूं ॥ ६५ ॥

६५) जो देहधारी असून वरीलप्रमाणें असतो व जो जागृत पुरुषाप्रमाणें सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ता प्रमाणें क्रियाशून्य दिसतो, तोच उत्तम प्रतीचा योगनिष्णात आहे, असे तूं समज. 

तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां ।

सांगें तया ऐसी हे योग्यता । कवणें दिजे ॥ ६६ ॥

६६) त्या वेळी अर्जुन म्हणाला, अनंता, तुझें बोलणें ऐकून मला फार आश्र्चर्य वाटतें, त्याला अशीहि योग्यता कोण देतो ?

तंव हांसोनि कृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें ।

कवणासि काय दीजेल कवणें । येथ अद्वैतीं इये ॥ ६७ ॥

६७) तेव्हां कृष्ण हंसून म्हणाले, तुझें बोलणें आश्चर्यकारक नव्हे काय ? या अद्वैतामध्ये येथें कोणाला कोणी काय द्यावयाचे आहे ? 

पैं व्यामोहाचिया शेजे । बळिया अविद्या निद्रित होईजे ।

ते वेळीं दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥ ६८ ॥

६८) अविवेकरुपी अंथरुणावर प्रबळ अविद्येच्या योगानें ( ज्या वेळेला जीव ) निजतो, त्यावेळेला हें जन्ममरणरुपी वाईट स्वप्न तो अनुभवितो.

पाठी अवसांत ये चेवो । तैं ते अवघेंचि होय वावो ।

ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोही आपणपांचि ॥ ६९ ॥

६९) नंतर ज्यावेळेला अकस्मात जागृति येते, त्या वेळेला तें स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होतें, अशा प्रकारचा आपल्या नित्य आस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो, तोही आपल्याच ठिकाणीं आपल्याला येतो.    

म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु कीजतु असे धनंजया ।

चित्त देऊनि नाथिलीया । देहाभिमाना ॥ ७० ॥    

७०) म्हणून अर्जुना, मिथ्या जो देहाभिमान, त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो.

हा विचारुनि अहंकारु सांडिजे । मग असतीच वस्तु होईजे ।

तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥ ७१ ॥

७१) विचार करुन हा अहंकार टाकावा आणि मग असलेलें आपलें स्वरुप ओळखून ब्रह्मरुप व्हावें, म्हणजे आपण आपलें कल्याण केल्यासारखें सहजच होईल.

एर्‍हवीं कोशकीटकाचि परी । आपणपया आपण वैरी ।

जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥ ७२ ॥

७२) नाहीं तर, जो शरीर हेंच उत्तम ठिकाण समजून, तेथें आत्मबुद्धि ठेवतो, तो कोशकिड्याप्रमाणें आपला आपणच शत्रु होतो.

कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे ।

कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ॥ ७३ ॥

७३) ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे होतात पाहा ! तो आपले असलेले डोळे आपणच झांकून घेतो; 

कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हें गा चोरलों म्हणे ।

ऐसा नाथिला छंद अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥ ७४ ॥

७४) किंवा  कोणी एक ( मनुष्य ) वेड लागल्यामुळें, पूर्वींचा जो मी, तो मी आतां नाहीं, मी चोरला गेलों, असें म्हणतो. ( आणि ) आपल्या मनांत असा नसताच आग्रह घेऊन असतो,   

एरव्ही होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुद्धि तैशी नोहे ।

देखा स्वप्नींचेनि घायें । कीं मरे साचें ॥ ७५ ॥

७५) एर्‍हवीं हल्लीं तो जो आहे, तो पूर्वीचाच आहे; पण काय करावें ? त्याच्या बुद्धीला तसें वाटत नाहीं. पाहा; स्वप्नांतील तलवारीचा वारानें कोणी खरोखर मरतो काय ?

जैसी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरे ।

तरी तेणें उडावें परि न पुरे । मनशंका ॥ ७६ ॥

७६) ( पोपटाला धरण्याकरितां बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळें  ) जेव्हां पोपटाच्या वजनानें ती नळी उलट बाजूला फिरते, तेव्हां त्याने वास्तविक तेथून उडून जावें, परंतु ( ही नळी सोडली तर आपण पडूं व मरुं, या ) त्याच्या मनांतील शंकेंचे समाधान होत नाहीं;  

वायांचि मान पिळी । अटुवें हियें आवळी ।

टिटांतु नळी । धरुनि ठाके ॥ ७७ ॥

७७) मग तो व्यर्थच मान इकडेतिकडे करतो व संकोचलेल्या छातीनें नळीला आंवळीत ( ती नळी ) चवड्यांत धरुन राहतो. 

म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां ।

कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥ ७८ ॥

७८) मग तो मनांत म्हणतो कीं, मी खरोखर बांधला गेलों आहे; अशा ( या ) कल्पनेच्या खोड्यांत सांपडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायांचा चववडा अधिकच गुंतवितो.

ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणिकें बांधला ।

मग नोसंडी जर्‍ही नेला । तोडूनि अर्धा ॥ ७९ ॥

७९) त्याप्रमाणें विनाकारण अडकलेल्या त्या पोपटाला दुसर्‍यानें कोणी बांधलें आहे काय ? अशा स्थितींत त्याला ओढून, अर्धा तोडून जरी नेला, तरी ती तो कांही केल्या नळी सोडीत नाहीं.  

म्हणऊनि आपणपया आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु ।

येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥ ८० ॥

८०) म्हणून ज्यानें आपला संकल्प ( देहाभिमान ) वाढविला आहे, तो आपला आपणच शत्रु होय. श्रीकृष्ण म्हणतात, दुसरा, जो खोट्याचा ( मिथ्या देहाचा ) अभिमान घेत नाही, तो आत्मज्ञानी म्हणावा. 

तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।

परमात्मा परौता । दुरी नाहीं ॥ ८१ ॥

८१) अशा त्या पुरुषानें आपले अंतःकरण जिंकल्यामुळें व त्याच्या इच्छा निवृत्त झाल्यामुळें, त्याला परमात्मा कोठें पलीकडे लांब नाहीं. 

जैसा किडाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि  होये ।

तैसें जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोपीं ॥ ८२ ॥     

८२) ज्याप्रमाणें हिणकस सोन्यांतून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर हेंच शंभर नंबरी सोनें होतें, त्याप्रमाणें अहंकाराचा नायनाट झाला असतां; जीवाला ब्रह्मत्व ठेवलेलेंच आहे.

हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा ।

नलगे मिळों जाणें आकाशा । आना ठाया ॥ ८३ ॥ 

( घट फुटून ) हा घटाचा आकार नाहींसा झाला असतां ; त्यांतील पोकळीस आकाशांत मिळण्याकरितां ज्याप्रमाणें दुसर्‍या ठिकाणी जावें लागत नाहीं; 

 

तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला ।

तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥ ८४ ॥

८४) त्याप्रमाणें ज्याचा हा मिथ्या देहाहंकार कारणासह नाहींसा झाला आहे, तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे.  

आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखांची कडसणी ।

इयें न समाती कांहीं बोलणीं । मानापमानाची ॥ ८५ ॥

८५) आतां थंड व उष्ण असे प्रकार किंवा हें सुख व हें दुःख अशी निवड, तसेंच हा मान व हा अपमान अशी समजूत, ह्या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणीं मुळींच संभवत नाहींत.  

जे जया वाटा सूर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्र्व होये ।

तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणउनि ॥ ८६ ॥

८६) कारण कीं, सूर्य ज्या मार्गानें जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणें त्याला जे जे प्राप्त होतें तें त्याचेंच स्वरुप आहे. ( आधी सांगितलेली द्वंद्वे त्याच्या ठिकाणीं संभवत नाहींत )

देखें मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा ।

तैशीं शुभाशुभें योगीश्र्वरा । नव्हती आनें ॥ ८७ ॥

८७) पाहा, मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात, त्या ज्याप्रमाणें समुद्राला बोंचत नाहींत, त्याप्रमाणें शुभाशुभें हीं योगेश्र्वराच्या आत्मस्वरुपाहून भिन्न नसल्यामुळे यास तीं द्वंद्वें प्रतीत होत नाहींत.   

जो हा विज्ञात्मकु भावो । तया विचारितां जाहला वावो ।

मग लागला जंव पाहो । तंव ज्ञान तें तोचि ॥ ८८ ॥

८८) अनुभवाला येणारें जें हें दृश्य जगत् त्याचा  विचार करतां, तें त्याच्या दृष्टीनें मिथ्या ठरलें;  व मग आपण कोण आहों, असें जेव्हां तो पाहावयास लागला, तेव्हां ज्ञान तेंच आपण आहोंत, असें त्यास कळलें.   

आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी ।

ते करावी ठेली आपैसी । दुजेनवीण ॥ ८९ ॥

८९) आतां द्वैत नसल्यामुळें ( मी ) व्यापक आहे किंवा मर्यादित आहे, अशी वाटाघाट करण्याचें ( त्याच्या ठिकाणीं ) सहजच थांबतें.

ऐसा शरीरीचि परि कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुके ।

जेणें जिंतलीं एकें । इंद्रियें गा ॥ ९० ॥

९०) अशा रीतीनें ज्या कोणी एकानें आपलीं इंद्रियें 

जिंकली आहेत, तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो 

परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो.



Custom Search

No comments: