Saturday, January 16, 2021

Shri RamCharitManas Part 74 श्रीरामचरितमानस भाग ७४

Shri RamCharitManas Part 74 
Doha 334 to 337 
श्रीरामचरितमानस भाग ७४ 
दोहा ३३४ ते ३३७ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—तेहि अवसर भाइन्ह सहित रामु भानु कुल केतु ।

चले जनक मंदिर मुदित बिदा करावन हेतु ॥ ३३४ ॥

त्याचवेळी सूर्यवंशाच्या ध्वजासारखे असलेले श्रीरामचंद्र भावांसह मोठ्या आनंदाने निरोप घेण्यासाठी जनकांच्या महालाकडे निघाले. ॥ ३३४ ॥

चारिउ भाइ सुभायँ सुहाए । नगर नारि नर देखन धाए ॥

कोउ कह चलन चहत हहिं आजू । कीन्ह बिदेह बिदा कर साजू ॥

स्वभावतः सुंदर असलेल्या त्या चारी भावांना पाहाण्यासाठी नगरातील स्त्री-पुरुष धावले. कोणी म्हणे, ‘ आज हे जाणार आहेत. जनक राजांनी निरोपाचे सामान सज्ज ठेवले आहे. ॥ १ ॥

लेहु नयन भरि रुप निहारी । प्रिय पाहुने भूप सुत चारी ॥

को जानै केहिं सुकृत सयानी । नयन अतिथि कीन्हे बिधि आनी ॥

राजांचे चारी पुत्र असलेल्या या पाहुण्यांचे रुप डोळे भरुन पाहून घ्या. हे शहाणे सखी, कोणास ठाऊक, कोणत्या पुण्यामुळे विधात्याने यांना येथे आणून आमच्या नेत्रांचे पाहुणे बनवून टाकले आहे. ॥ २ ॥    

मरनसीलु जिमि पाव पिऊषा । सुरतरु लहै जनम कर भूखा ॥

पाव नारकी हरिपदु जैसें । इन्ह कर दरसनु हम कहँ तैसें ॥

ज्याप्रमाणे मरणार्‍याला अमृत मिळावे, जन्माचा भुकेला असलेल्याला कल्पवृक्ष लाभावा आणि नरकात जाण्याजोग्या जिवाला भगवंताचे परमपद मिळावे, त्याप्रमाणे आमच्याकरितां यांचे दर्शन आहे. ॥ ३ ॥

निरखि राम सोभा उर धरहू । निज मन फनि मूरति मनि करहू ॥

एहि बिधि सबहि नयन फलु देता । गए कुअँर सब राज निकेता ॥

श्रीरामचंद्रांचे लावण्य निरखून हृदयात धारण करुन घे. आपल्या मनाला साप व यांच्या स्वरुपाला मणी बनवून ठेव.' अशा प्रकारे सर्वांना नेत्रांचे साफल्य देत सर्व राजकुमार राजमहालात गेले. ॥ ४ ॥ 

दोहा—रुप सिंधु सब बंधु लखि हरषि उठा रनिवासु ।

करहिं निछावरि आरती महा मुदित मन सासु ॥ ३३५ ॥

रुपाचे सागर असलेल्या सर्व भावांना पाहून संपूर्ण राणीवसा आनंदून गेला. सासवा फार प्रसन्न होऊन ओवाळणी टाकू लागल्या आणि आरती करु लागल्या. ॥ ३३५ ॥

देखि राम छबि अति अनुरागीं । प्रेमबिबस पुनि पुनि पद लागीं ॥

रही न लाज प्रीति उर छाई । सहज सनेहु बरनि किमि जाई ॥

श्रीरामांचे लावण्य पाहून त्या प्रेम-मग्न झाल्या. प्रेमवश झाल्यामुळे त्या त्यांच्या वारंवार पाया पडत होत्या. हृदयात प्रेम दाटले होते, म्हणून लज्जा राहिली नाही. त्यांच्या स्वाभाविक स्नेहाचे वर्णन कसे करता येईल ? ॥ १ ॥

भाइन्ह सहित उबटि अन्हवाए । छरस असन अति हेतु जेवॉंए ॥

बोले रामु सुअवसरु जानी । सील सनेह सकुचमय बानी ॥

त्यांनी श्रीरामांना भावांसह उटणे लावून स्नान घातले आणि मोठ्या प्रेमाने षड्रस भोजन वाढले. योग्य वेळ पाहून श्रीरामचंद्र शील, स्नेह आणि संकोचाने म्हणाले, ॥ २ ॥

राउ अवधपुर चहत सिधाए । बिदा होन हम इहॉं पठाए ॥

मातु मुदित मन आयसु देहू । बालक जानि करब नित नेहू ॥

‘ महाराज अयोध्यापुरीस जाऊ इच्छितात. त्यांनी आम्हांला निरोप घेण्यासाठी पाठविले आहे. हे मातांनो, प्रसन्न मनाने आज्ञा द्या आणि आम्हांला आपली मुले मानून नेहमी स्नेह ठेवा. ‘ ॥ ३ ॥

 सुनत बचन बिलखेउ रनिवासू । बोलि न सकहिं प्रेमबस सासू ॥

हृदयँ लगाइ कुअँरि सब लीन्ही । पतिन्ह सौंपि बिनती अति कीन्ही ॥

हे ऐकून अंतःपुर उदास झाले. सासवा प्रेमाधिक्यामुळे काही बोलू शकल्या नाहीत. त्यांनी सर्व कुमारींना हृदयाशी धरले व त्यांना पतींच्या हाती सोपवून पुष्कळ विनंती केली. ॥ ४ ॥

छं०—करि बिनय सिय रामहि समरपी जोरि कर पुनि पुनि कहै ।

बलि जाउँ तात सुजान तुम्ह कहुँ बिदित गति सब की अहै ॥

परिवार पुरजन मोहि राजहि प्रानप्रिय सिय जानिबी ।

तुलसीस सीलु सनेहु लखि निज किंकरी करि मानिबी ॥

त्यांनी विनंती करुन सीतेला श्रीरामचंद्रांना अर्पण केले आणि हात जोडून वारंवार सांगितले की, ‘ हे प्रिय, हे ज्ञानी, मी तुमच्यावरुन आपल्या शरीराची कुरवंडी करते. तुम्हांला सर्वांची स्थिती माहीत आहे. परिवाराला, पुरवासीयांना, मला व राजांना सीता ही प्राणप्रिय आहे, असे समजा. हे तुलसीदासांच्या स्वामी, हिचे शील व स्नेह पाहून हिला आपली दासी माना.

सो०—तुम्ह परिपूरन काम जान सिरोमनि भावप्रिय ।

जन गुन गाहक राम दोष दलन करुनायतन ॥ ३३६ ॥

तुम्ही पूर्णकाम आहात, ज्ञानशिरोमणी आहात, हे राम, तुम्ही भक्तांचे गुण ग्रहण करणारे, दोषांचा नाश करणारे आणि दयेचे धाम आहात.’ ॥ ३३६ ॥    

अस कहि रही चरन गहि रानी । प्रेम पंक जनु गिरा समानी ॥

सुनि सनेहसानी बर बानी । बहुबिधि राम सासु सनमानी ॥

असे म्हणून राण्या श्रीरामांचे चरण धरुन गप्प झाल्या. जणू त्यांच्या वाणी प्रेमाच्या दलदलीमध्ये रुतून गेल्या. स्नेहाने ओथंबलेली ती श्रेष्ठ वाणी ऐकून श्रीरामांनी सासवांचा अनेक प्रकारे सन्मान केला. ॥ १ ॥

राम बिदा मागत कर जोरी । कीन्ह प्रनामु बहोरि बहोरी ॥

पाइ असीस बहुरि सिरु नाई । भाइन्ह सहित चले रघुराई ॥

मग श्रीरामांनी हात जोडून निरोप मागत वारंवार प्रणाम केला. आशीर्वाद मिळाल्यावर पुन्हा मस्तक नमवून श्रीरघुनाथ निघाले. ॥ २ ॥

मंजु मधुर मूरति उर आनी । भईं सनेह सिथिल सब रानी ॥

पुनि धीरजु धरि कुअँरि हँकारीं । बार बार भेटहिं महतारीं ॥

श्रीरामांची सुंदर मूर्ती हृदयात धारण केल्याने राण्या प्रेमामुळे शिथिल झाल्या. नंतर धैर्य धरुन कन्यांना बोलावून माता वारंवार त्यांना छातीशी कवटाळू लागल्या. ॥ ३ ॥

पहुँचावहिं फिरि मिलहिं बहोरी । बढ़ी परस्पर प्रीति न थोरी ॥

पुनि पुनि मिलत सखिन्ह बिलगाई । बाल बच्छ जिमि धेनु लवाई ॥    

मुलींना निरोप द्यायच्या आणि त्यांना पुन्हा मिठीत घ्यायच्या. परस्परां-मध्ये प्रेम खूप वाढले होते ना ! सख्यांनी वारंवार भेटणार्‍या मातांना बाजूला केले. नुकत्याच व्यालेल्या गाईला तिच्या बछड्यापासून बाजूला केले जाते, त्याप्रमाणे. ॥ ४ ॥

दोहा—प्रेमबिबस नर नारि सब सखिन्ह सहित रनिवासु ।

मानहुँ कीन्ह बिदेहपुर करुनॉं बिरहँ निवासु ॥ ३३७ ॥

सर्व स्त्री-पुरुष आणि सख्यांसह संपूर्ण अंतःपुर सागरात डुबत होते. जणू जनकपुरात कारुण्य आणि विरह यांनी निवास केला होता. ॥ ३३७ ॥

सुक सारिका जानकी ज्याए । कनक पिंजरन्हि राखि पढ़ाए ॥

ब्याकुल कहहिं कहॉं बैदेही । सुनि धीरजु परिहरइ न केही ॥

जानकीने ज्या पोपट-मैनांना पाळून-पोसून मोठे केले होते आणि सोन्याच्या पिंजर्‍यांत ठेवून त्यांना शिकविले होते, ‘ ते वैदेही कुठे आहे ? ‘ त्यांच्या बोलण्यामुळे सर्वांचाच धीर खचला. ॥ १ ॥

भए बिकल खग मृग एहि भॉंती । मनुज दसा कैसें कहि जाती ॥

बंधु समेत जनकु तब आए । प्रेम उमगि लोचन जल छाए ॥

जेथे पक्षी व पशू असे व्याकूळ झाले, तेथे मनुष्यांची दशा काय सांगावी ? मग जनक आपल्या भावाबरोबर तेथे आले. प्रेम उचंबळून आल्याने त्यांच्या नेत्रांमध्ये अश्रू तरळले. ॥ २ ॥

सीय बिलोकि धीरता भागी । रहे कहावत परम बिरागी ॥

लीन्हि रायँ उर लाइ जानकी । मिटी महामरजाद ग्यान की ॥

महाराज जनक परम वैराग्यवान मानले जात होते, परंतु सीतेला पाहाताच त्यांचा धीरही खचला. राजांनी जानकीला उराशी धरले. प्रेमामुळे ज्ञानाचा बांध फुटला. ॥ ३ ॥

समुझावत सब सचिव सयाने । कीन्ह बिचारु न अवसर जाने ॥

बारहिं बार सुता उर लाईं । सजि सुंदर पालकीं मगाईं ॥

सर्व मंत्री त्यांना समजावू लागले, तेव्हा राजांनी विषाद

 करण्याची ही वेळ नाही, असा विचार केला. वारंवार

 मुलींना पोटाशी धरुन सुंदर सजविलेल्या पालख्या

 बोलावल्या. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: