Tuesday, December 15, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग १

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 1 
Ovya 1 to 25 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग १ 
ओव्या १ ते २५

मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचें बोलणें ।

एक होय तरी अंतःकरणें । विचारुं ये ॥ १ ॥

१) मग अर्जुन, श्रीकृष्णाला म्हणाला, अहो, हें असें कसें तुमचें बोलणें ? यांत ( बोलण्यांत ) एकवाक्यता असेल, तर त्यासंबंधीं मनानें कांहीं विचार करतां येईल.

मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपला होता बहुवसु ।

तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ॥ २ ॥

२) सर्व कर्मांचा त्याग करावा असें तुम्हींच मागें अनेक रीतींनीं सांगितलें होतें, तर आतां कर्म योगाविषयींच्या भराला जास्त उत्तेजन कां देतां ? 

ऐसें द्वयर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांचिया चित्ता ।

आपुलिये चाडे अनंता । उमजु नोहे ॥ ३ ॥

३) श्रीअनंता असें हें दुटप्पी बोललें असतां, आमच्या सारख्या अल्प समजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाहीं.

ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे ।

हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥ ४ ॥

४) ऐका. एक तत्त्व जर सांगावयाचें असेल, तर एकच निश्र्चितपणें सांगितलें पाहिजे, हें तुम्हाला दुसर्‍यांनी सांगावयास पाहिजे काय ?

तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासी विनविलें होतें ।

जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥ ५ ॥

५) एवढ्यासाठीं मी आपल्यासारख्या थोरांना ( मागें ) विनंती केली होती की, हें तत्त्वज्ञान संदिग्ध भाषेंत सांगू नये.

परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा ।

सांगें दोहींमाजि बरवा । मार्गु कवण्या ॥ ६ ॥

६) परंतु देवा, मागें झालें ते राहूं द्या. आतां ह्या वेळीं उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकीं चांगला कोणता हें सांगा. 

जो परिणामींचा निर्वाळा । अचंबितु ये फळा ।

आणि अनुष्ठितां प्रांजळा । सावियाचि ॥ ७ ॥

७) ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचें फळ अचूक प्राप्त होतें व ज्याचें अनुष्ठान सहजच सरळ आहे;

जैसें निद्रेचें सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे ।

तैसें सोकासना सांगडें । सोहपें होय ॥ ८ ॥

८) ज्याप्रमाणें झोपेच्या सुखांत व्यत्यय न येतां रस्ता तर बराच काटत जातो, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल ( तो सांगा ).

येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले ।

मग होईल ऐकें म्हणितलें । संतोषोनियां ॥ ९ ॥

९) ह्या अर्जुनाच्या बोलण्यानें देव मनांत आनंदित झाले. मग संतुष्ट होऊन म्हणाले, ‘ ऐक. तसेंहि होईल-‘

देखा कामधेनुऐसी मापे । सदैव जया होये ।

तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ॥ १० ॥

१०) ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात, पाहा, ज्या दैववानाला कामधेनूसारखी आई मिळते, त्याला चंद्र, पण तोसुद्धा खेळावयास मिळतो.

पाहें पां शंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता ।

काय क्षीराब्धि दूधभाता । देइजेचिना ॥ ११ ॥

११) हें, पाहा, श्रीशंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणें दूधभाताकरितां क्षीरसमुद्र दिला नाहीं कां ?

तैसा औदार्याचा कुरुठा । कृष्ण आपु जाहलिया सुभटा ।

कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा ॥ १२ ॥

१२) त्याप्रमाणें उदारपणाचें घर, जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाच्या अधीन झाल्यावर मग तो ( अर्जुन ) सर्व सुखाचे वसतिस्थान कां होऊं नये ?     

एथ चमत्कारु कायसा । गोसावी लक्ष्मीकांताऐसा ।

आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ॥ १३ ॥

१३) यांत आश्र्चर्य ते कसलें ?  लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असतां आतां आपल्याला हवें तसें त्यानें कां मागून घेऊं नये ?  

म्हणोनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधलें ।

तेंचि सांगेन बोलिलें । काय कृष्णें ॥ १४ ॥

१४) म्हणून अर्जुनानें जें मागितलें तें श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिलें. ( ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात ) श्रीकृष्ण जें काय म्हणाले, तेंच मी सांगेन.

तो म्हणे गा कुंतीसुता । हें संन्यासयोग विचारितां ।

मोक्षकर तत्त्वता । दोनीहि होती ॥ १५ ॥

१५) श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग, विचार करुन पाहिलें तर, तात्त्विकदृष्ट्या, दोन्ही मोक्ष प्राप्त करुन देणारे आहेत.

तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा ।

जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ॥ १६ ॥

१६) तरी पण जाणते व नेणते, या सगळ्यांना, हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सोपा आहे. ज्याप्रमाणें पाण्यांतून तरुन जाण्याला, स्त्रियांना व बालकांना नाव ( हे सुलभ साधन आहे. ), त्याप्रमाणे भवसागरांतून तरुन जाण्याला ) हा कर्मयोग साधन आहे.      

तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे ।

येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥ १७ ॥

१७) त्याचप्रमाणें सारासाराचा विचार केला तर, हाच सोपा दिसतो. यानें कर्माच्या संन्यासापासून मिळणार्‍या फलाची प्राप्ति कष्टांवाचून होते.   

आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह ।

मग सहजें हे अभिन्न । जाणसी तूं ॥ १८ ॥

१८) आतां एवढ्याकरितां मी तुला कर्मसंन्यास करणाराचें लक्षण सांगेन; मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत, असें तूं सहजच जाणशील.

तरी गेलियाची से न करी । न पवतां चाड न धरी ।

जो सुनिश्र्चळु अंतरीं । मेरु जैसा ॥ १९ ॥

१९) तरी गतगोष्टींची जो आठवण करीत नाहीं; कांहीं मिळालें नाहीं तर त्याची इच्छा धरीत नाही, जो मेरुपर्वताप्रमाणें अंतःकरणांत अगदी अचल असतो, 

आणि मी माझें ऐसीआठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।

पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥ २० ॥

 २०) आणि ज्याच्या अंतःकरणामध्यें  ‘ मी ‘  आणि ‘ माझे ‘ यांचें स्मरणच राहिलें नाहीं, अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे, असें तूं जाण. 

जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला ।

म्हणोनि सुखें सुख पावला । अखंडित ॥ २१ ॥

२१) ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगच सोडून जातात. म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासें प्राप्ति होते.

आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें ।

जें घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हणऊनि ॥ २२ ॥

२२) अशा स्थितींत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची कांहीं जरुरी नाही, कारण त्यांची आसक्ति घेणारें जे मन, तेंच स्वभावतः निःसंग झालें आहे.

देखें अग्नि विझोनि जाये । मग जे रांखोडी केवळु होये ।

तैं ते कापुसें गिंवसूं ये । जियापरी ॥ २३ ॥

२३) पाहा, विस्तव विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हां त्याला कापसामध्येंदेखिल ज्याप्रमाणें गुंडाळून ठेवता येतें,

तैसा असतोनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं ।

जयाचिये बुद्धी । संकल्पु नाहीं ॥ २४ ॥

२४) त्याप्रमाणें ज्याच्या बुद्धींत संकल्प नाहीं, तो उपाधींत असूनसुद्धा कर्मबंधनांत सापडत नाहीं.

म्हणोनि कल्पना जैं सांडे । तेंचि गा संन्यासु घडे ।

या कारणें दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥ २५ ॥

२५) म्हणून ज्यावेळेला कल्पना सुटते, त्याच वेळेला 

संन्यास घडतो; म्हणून कर्मसंन्यास व कर्मयोग हे दोन्ही 

सारखे आहेत.



Custom Search

No comments: