BhaktiYoga Part 12
जो धर्मकीर्तिधवळु । अगाध
दातृत्वें सरळु ।
अतुलबळें प्रबळु । बळिबंधनु
॥ २४१ ॥
२४१) ज्याची (
धर्मरक्षक म्हणून ) कीर्ति उज्ज्वल आहे, अपार औदर्याने जो वैषम्यभावरहित आहे,
तुलना करतां यावयाची नाहीं, अशा पराक्रमानें जो बलाढ्य आहे व जो बळीच्या बंधनांत
राहिला;
जो पैं सुरसहायशीळु ।
लोकलालनलीळु ।
प्रणतप्रतिपाळु । हा खेळु
जयाचा ॥ २४२ ॥
२४२) देवांना साह्य
करणें हा ज्याचा स्वभाव आहे. लोकांचे संगोपन करणें ही ज्याची लीला आहे, शरण
आलेल्याचा प्रतिपाळ करणें हा ज्याचा खेळ आहे;
जो भक्तजनवत्सलु ।
प्रेमजनप्रांजलु ।
सत्यसेतु सरळु । कलानिधि ॥
२४३ ॥
२४३) जो भक्तांविषयीं
मायाळू आहे व जो प्रेमळ जनांना सुलभ आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच
सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे;
तो कृष्णजी वैकुंठींचा ।
चक्रवर्ती निजांचा ।
सांगतुसे येरु दैवाचा ।
आइकतु असे ॥ २४४ ॥
२४४) तो भक्तांचा
सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्णपरमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जन ऐकत आहे.
आतां ययावरी । निरुपिती परी
।
संजयो म्हणे अवधारीं ।
धृतराष्ट्रातें ॥ २४५ ॥
२४५) आतां यानंतर
भगवंतांचा व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका, असें संजय धृतराष्ट्रास म्हणाला.
तेचि रसाळ कथा । मर्हाठिया
प्रतिपथा ।
जाणिजेल आतां । अवधारिजो ॥
२४६ ॥
२४६) तीच रसानें भरलेली
कथा मराठी भाषेच्या रुपांतरांत आणली जाईल; ती आपण ऐकावी.
ज्ञानदेव म्हणे तुम्ही ।
संत वोळगावेति आम्ही ।
हें पढविलों जी स्वामी ।
निवृत्तिदेवीं ॥ २४७ ॥
२४७) ज्ञानेश्र्वर
महाराज म्हणतात; महाराज, प्रभु निवृत्तिदेवांनीं आम्हाला हे शिकविलें आहे कीं,
आम्हीं तुम्हां संताची सेवा करावी.
॥ इति
श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन
संवादेभक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥ ( श्लोक २०; ओव्या २४७ )
॥ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु
॥
No comments:
Post a Comment