Wednesday, January 18, 2023

SunderKanda Part 20 Doha 56 to Doha 58 सुंदरकाण्ड भाग २० दोहा ५६ ते दोहा ५८

 

SunderKanda Part 20 
ShriRamCharitManas 
Doha 56 to Doha 58 
सुंदरकाण्ड भाग २० 
श्रीरामचरितमानस 
दोहा ५६ ते दोहा ५८

दोहा—बातन्हतम मनहि रिझाइ सठ जनि घालसि कुल खीस ।

राम बिरोध न उबरसि सरन बिष्नु अज ईस ॥ ५६ ( क ) ॥

चिठ्ठीत लिहिले होते, ‘ अरे, मूर्खा, फक्त गप्पा मारुन स्वतःच्या मनाची समजूत घालून आपले कुल नष्ट-भ्रष्ट करु नकोस. श्रीरामांना विरोध करुन तू ब्रह्मदेव, विष्णू व महेश यांना शरण गेलास, तरी तू वाचू शकणार नाहीस. ॥ ५६ ( क ) ॥

की तजि मान अनुज इव प्रभु पद पंकज भृंग ।

होहि कि राम सरानल खल कुल सहित पतंग ॥ ५६ ( ख ) ॥

एक तर अभिमान सोडून आपल्या लहान भाऊ बिभीषणाप्रमाणे प्रभुंच्या चरणांचा भ्रमर बन. नाहीतर हे दुष्टा, श्रीरामांच्या बाणरुपी अग्नीमध्ये परिवारासह पतंग-कीटकाप्रमाणे मरुन जा. ‘ ॥ ५६ ( ख ) ॥

सुनत सभय मन मुख मुसुकाई । कहत दसानन सबहि सुनाई ॥

भूमि परा कर गहत अकासा । लघु तापस कर बाग बिलासा ॥

चिठ्ठी ऐकताच रावण मनातून घाबरला, परंतु तोंडाने हसत तो सर्वांना म्हणू लागला—‘ ज्याप्रमाणे कोणी पृथ्वीवर पडून हाताने आकाश पकडण्याचा प्रयत्न करतो. तसाच हा छोटा तपस्वी प्रौढी मिरवत आहे. ‘ ॥ १ ॥

कह सुक नाथ सत्य सब बानी । समुझहु छाड़ि प्रकृति अभिमानी ॥

सुनहु बचन मम परिहरि क्रोधा । नाथ राम सन तजहु बिरोधा ॥

शुक नावाच्या दूताने म्हटले, ‘ महाराज ! अहंकारी स्वभाव सोडून, पत्रात लिहिलेल्या गोष्टी खर्‍या समजा, क्रोध सोडून माझे बोलणे ऐका. हे नाथ, श्रीरामांशी वैर सोडून द्या. ॥ २ ॥

अति कोमल रघुबीर सुभाऊ । जद्यपि अखिल लोक कर राऊ ॥

मिलत कृपा तम्ह पर प्रभु करिही । उर अपराध न एकउ धरिही ॥

जरी रघुवीर हे संपूर्ण लोकांचे स्वामी आहेत, तरी त्यांचा स्वभाव अत्यंत कोमल आहे. भेटताच ते प्रभु तुमच्यावर कृपा करतील आणि तुमचा एकही अपराध ते ठेवणार नाहीत. ॥ ३ ॥

जनकसुता रघुनाथहि दीजे । एतना कहा मोर प्रभु कीजे ॥

जब तेहिं कहा देन बैदेही । चरन प्रहार कीन्ह सठ तेही ॥

प्रभूंना जानकी देऊन टाका. हे प्रभू, माझे एवढे सांगणे पूर्ण करा. ‘ जेव्हा दूताने जानकीला परत देन्यास सांगितले, तेव्हा त्या दुष्ट रावणाने त्याला लाथ मारली. ॥ ४ ॥

नाइ चरन सिरु चला सो तहॉं । कृपासिंधु रघुनायक जहॉं ॥

करि प्रनामु निज कथा सुनाई । राम कृपॉं आपनि गति पाई ॥

तोसुद्धा बिभीषणाप्रमाणे त्याच्या पाया पडून नतमस्तक होऊन कृपासागर श्रीरघुनाथांच्याकडे गेला. प्रणाम करुन त्याने आपले म्हणणे सांगितले आणि श्रीरामांच्या कृपेने त्याला मुनीचे स्वरुप प्राप्प झाले. ॥ ५ ॥

रिषि अगस्ति कीं साप भवानी । राछस भयउ रहा मुनि ग्यानी ॥

बंदि राम पद बारहिं बारा । मुनि निज आश्रम कहुँ पगु धारा ॥

शिव म्हणतात, ‘ भवानी, तो ज्ञानी मुनी होता. अगस्त्य मुनींच्या शापामुळे राक्षस झाला होता. वारंवार श्रीरामांच्या चरणांना वंदन करुन तो मुनी आपल्या आश्रमात गेला. ॥ ६ ॥

दोहा---बिनय न मानत जलधि जड़ गए तीनि दिन बीति ।

बोले राम सकोप तब भय बिनु होइ न प्रीति ॥ ५७ ॥

इकडे तीन दिवस झाले, तरी जड बुद्धीच्या समुद्रानें श्रीरामांची विनंती मानली नाही. तेव्हा श्रीरामांनी क्रोधाने म्हटले –‘ भीतीशिवाय प्रीती होत नाही. ॥ ५७ ॥

लछिमन बान सरासन आनू । सोषौं बारिधि बिसिख कृसानू ॥

सठ सन बिनय कुटिल सन प्रीती । सहज कृपन सन सुंदर नीती ॥

हे लक्ष्मणा, धनुष्य-बाण आण. मी अग्निबाणाने समुद्राला शोषून टाकतो. मूर्खाशी नम्रता, कुटिलाशी प्रेम, स्वभावाने कंजूष असलेल्याला उदार उपदेश, ॥ १ ॥

ममता रत सन ग्यान कहानी । अति लोभी सन बिरति बखानी ॥

क्रोधिहि सम कामिहि हरिकथा । ऊसर बीज बएँ फल जथा ॥

ममतेमध्ये अडकलेल्या माणसाला ज्ञानाची गोष्ट, अत्यंत लोभ्याला वैराग्याचे वर्णन, क्रोधी माणसाला शांततेची गोष्ट आणि कामी माणसाला भगवंताची कथा—यांचा परिणाम नापीक जमिनीत बी पेरल्याप्रमाणे फुकट ठरतो. ‘ ॥ २ ॥

अस कहि रघुपति चाप चढ़ावा । यह मत लछिमन के मन भावा ॥

संधानेउ प्रभु बिसिख कराला । उठी उदधि उर अंतर ज्वाला ॥

असे म्हणून श्रीरघुनाथांनी धनुष्य सज्ज केले. हा विचार लक्ष्मणाला फार चांगला वाटला. प्रभूंनी अग्निबाणाचा नेम धरला, त्यासरशी समुद्राच्या हृदयात अग्नीची ज्वाळा उठली. ॥ ३ ॥

मकर उरग झष गन अकुलाने । जरत जंतु जलनिधि जब जाने ॥

कनक थार भरि मनि गन नाना । बिप्र रुप आयउ तजि माना ॥

मगर, साप आणि मासे यांचे समूह व्याकूळ झाले. जेव्हा समुद्राने पाहिले की, जलचर जीव जळू लागले आहेत, तेव्हा तो अभिमान सोडून सोन्याच्या थाळीमध्ये अनेक रत्ने घेऊन ब्राह्मणाच्या रुपाने आला. ॥ ४ ॥

दोहा—काटेहिं पइ कदरी फरइ कोटि जतन कोउ सींच ।

बिनय न मान खगेस सुनु डाटेहिं पइ नव नीच ॥ ५८ ॥

काकभुशुंडी म्हणतात, ‘ हे गरुडा, कोणी कितीहीउपाय केले, तरी केळीचे झाड कापल्यावरच फळे देते. नीच मनुष्य नम्रता मानत नाही. शासन केल्यावरच तो वाकतो. ॥ ५८ ॥

सभय सिंधु गहि पद प्रभु केरे । छमहु नाथ सब अवगुन मेरे ॥

गगन समीर अनल जल धरनी । इन्ह कइ नाथ सहज जड़ करनी ॥

समुद्राने भयभीत होऊन प्रभूंचे चरण धरले आणि तो म्हणाला, ‘ हे नाथ, माझे सर्व दोष क्षमा करा. हे नाथ, आकाश,वायू, अग्नी, जल व पृथ्वी या सर्वांची करणी स्वभावतःच ज्ञानहीन असते. ॥ १ ॥

तव प्रेरित मायॉं उपजाए । सृष्टि हेतु सब ग्रंथनि गाए ॥

प्रभु आयसु जेहि कहँ जस अहई । सो तेहि भॉंति रहें सुख लहई ॥

तुमच्या प्रेरणेमुळे मायेने यांना सृष्टीसाठी उत्पन्न केलेले आहे. सर्व ग्रंथांमध्ये असेच सांगितले आहे. ज्याच्यासाठी स्वामींची जशी आज्ञा असेल, तो त्याप्रमाणे राहाण्यात सुखी असतो. ॥ २ ॥

प्रभु भल कीन्ह मोहि सिख दीन्ही । मरजादा पुनि तुम्हरी कीन्ही ॥

ढोल गवॉंर सूद्र पसु नारी । सकल ताड़ना के अधिकारी ॥

प्रभूंनी मला शिक्षा देऊन चांगले केले, परंतु जिवांचे स्वभावसुद्धा तुम्हीच बनविले आहेत. ढोल, खेडूत, शूद्र, पशू व स्त्री हे सर्व दंडानेच वठणीवर येतात. ॥ ३ ॥

प्रभु प्रताप मैं जाब सुखाई । उतरिहि कटकु न मोरि बड़ाई ॥

प्रभु अग्या अपेल श्रुति गाई । करौं सो बेगि जो तुम्हहि सोहाई ॥

प्रभूंच्या प्रतपामुळे मी सुकून जाईन आणि सेना पलीकडे

 उतरेल, यात माझे मोठेपण नाही, तरीही प्रभूंची आज्ञा

 मोडता येत नाही, असे वेदांनी प्रतिपादन केले आहे.

 आता तुम्हांला जे बरे वाटेल, ते मी त्वरित करतो. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: