Shri Dnyaneshwari
दिव्यमाल्याम्बरधरं
दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्र्चर्यमयं देवमनन्तं
विश्र्वतोमुखम् ॥ १० ॥
१०) दिव्य पुष्पें व
अस्त्रें धारण केलेले, दिव्य गंधाची ज्यास उटी केली होती, सर्व आश्र्चर्यांनी
युक्त, अनंत, सर्वतोमुख व दिव्य स्वरुप असलेला असा ( देव अर्जुनाने पाहिला. )
कीं भेणें तेथूनि काढिली
दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी ।
तंव सुरतरूंची सृष्टी ।
जयापासोनि कीं जाहली ॥ २१८ ॥
२१८) त्या हातांतील
असंख्य शस्त्रांच्या भयानें तेथून दृष्टि काढून, मग जेव्हां अर्जुन कंठ व मुगुट
पाहावयास लागला, तेव्हां कल्पतरुची सृष्टि ज्यापासून झाली,
जियें महासिद्धींचीं
मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे ।
तैसीं कुसुमें अति चोखटें ।
तुरंबिलीं देखिलीं ॥ २१९ ॥
२१९) जों फुलें
महासिद्धीची मूळ स्थानें ( आहेत ) व श्रम पावलेली लक्ष्मी जेथें विश्रांति पावते,
अशी अतिशुद्ध फुलें मस्तकावर धारण केलेलीं त्यानें पाहिली.
मुगुटावरी स्तबक । ठायीं
ठायीं पूजाबंध अनेक ।
कंठीं रुळताति अलौकिक ।
माळादंड ॥ २२० ॥
२२०) मुकुटावर फुलांचे
घोस होते; मस्तकावर ठिकठिकाणीं निरनिराळ्या पूजा बांधलेल्या होत्या आणि गळ्यांत
फुलांचे अवर्णनीय हार शोभत होते.
स्वर्गें सूर्यतेज वेढिलें
। जैसें पंधरेनें मेरुतें मढिलें ।
तैसें नितंबावरी गाढिलें ।
पीतांबरु झळके ॥ २२१ ॥
२२१) स्वर्गानें जसें
सूर्यतेज नेसावें, किंवा जसें मेरुपर्वताला सोन्यानें मढवावें, त्याप्रमाणें
कमरेच्या खालच्या भागावर कसलेला पीतांबर चमकत होता.
श्रीमहादेवो कापुरें उटिला
। कां कैलासु पारदें डवरिला ।
नाना क्षीरोदकें पांघरविला
। क्षीरार्णवो जैसा ॥ २२२ ॥
२२२) श्रीशंकराला जशी
कापराची उटी लावावी, अथवा कैलासास जसा पार्याचा लेप द्यावा, अथवा क्षीरसमुद्राला
जसें क्षीरोदकाचें पांघरुण घालावें,
जैसी चंद्रमयाची घडी
उपलविली । मग गगनाकरवीं बुंथी घालविली ।
तैसी चंदनपिंजरी देखिली ।
सर्वांगीं तेणें ॥ २२३ ॥
२२३) ज्याप्रमाणें
चंद्राची घडी उकलून मग त्याचें पांघरुण आकाशाकडून घेववावें, त्याप्रमाणें, पांढरी
शुभ्र चंदनाची उटी विश्वरुपाच्या सर्व शरीरभर त्यानें पाहिली.
जेणें स्वप्रकाशा कांतीं
चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे ।
जयाचेनि सौरम्यें जीवित
जोडे । वेदवतीये ॥ २२४ ॥
२२४) ज्याच्या योगानें
स्वरुपप्रकाशाला तेज चढतें व ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते व ज्याच्या
सुवासानें पृथ्वीला अस्तित्व प्राप्त होतें;
जयाचे निर्लेप अनुलेपु करी
। जे अनंगुही सर्वांगीं धरी ।
तया सुगंधाची थोरी । कवण
वानी ॥ २२५ ॥
२२५) ज्या चंदनाची उटी
ब्रह्महि आपल्या अंगास लावतें व मदनदेखील ज्यास आपल्या सर्व अंगावर धारण करतो,
त्या चंदनाच्या सुवासाची थोरवी कोण वर्णन करील ?
ऐसी एकैक शृंगारशोभा ।
पाहतां अर्जुन जातसे क्षोभा ।
तेवींचि देवो बैसला कीं उभा
। कां सेयांतु हें नेणवे ॥ २२६ ॥
२२६) अशीं एक एक
शृंगाराची शोभा पाहात असतां अर्जुन भांबावला, त्याचप्रमाणें देव बसले, आहेत कीं
उभे आहेत, कीं निजले आहेत हे त्यास कळेना.
बाहेर दिठी उघडोनि पाहे ।
तरि आघवें मूर्तिमय देखतु जाये ।
मग आतां न पाहे म्हणोनि उगा
राहे । तरी आंतुही तैसेंचि ॥ २२७ ॥
२२७) दृष्टि उघडून तो
बाहेर पाहूं लागला, तरी सर्वच विश्र्वरुमय आहे, असें त्यास दिसूं लागलें. मग आतां
मी कांही पाहाणार नाहीं, असा निश्र्चय करुन त्यानें डोळे मिटून घेतले, तरी आंतहि
त्याला तसेंच विश्वरुप दिसलें.
अनावरें मुखें समोर देखें ।
तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके ।
तंव तयाहीकडे श्रीमुखें ।
करचरण तैसेचि ॥ २२८ ॥
२२८) अर्जुन आपल्यासमोर
अगणित मुखें पाहात होता. त्यांच्या भयानें जेव्हां तो त्याच्याकडे पाठ करुन उभा
राहिला, तेव्हां तिकडेहि विश्र्वरुपाचीं मुखें, हात, पाय हे तसेंच होते, ( असे
त्यास दिसलें ).
अहो पाहतां कीर प्रतिभासे ।
एथ कांहीं नवलावो काइ असे ।
परि न पाहतांही दिसे । चोज
आइका ॥ २२९ ॥
२२९) अहों पाहूं लागलें
म्हणजे खरोखर दिसतें यांत काही आश्र्चर्य आहें काय ? परंतु हे आश्र्चर्य ऐका कीं,
या विश्वरुपाच्या बाबतींत डोळे मिटून घेतलें असतांहि विश्वरुप दिसत होतें.
कैसें अनुग्रहाचें करणें ।
पार्थाचें पाहणें आणि न पाहणें ।
तयाहीसकट नारायणें ।
व्यापूनि घातलें ॥ २३० ॥
२३०) प्रभूच्या कृपेची
करणी कशी अद्भुत आहेपाहा ! अर्जुनाचें पाहणें व न पाहणें हें सर्वच भगवंतानी
व्यापून टाकलें.
म्हणोनि आश्र्चर्याचां
पुरीं एकीं । पडिला ठायेंठाव थडी ठाकी ।
तंव चमत्काराचां आणिकीं ।
महार्णवीं पडे ॥ २३१ ॥
२३१) म्हणून
आश्र्चर्याच्या एका पुरांत पडला असतां तो जो तत्काळ किनारा गाठी, तों आणखी दुसर्या
चमत्काराच्या मोठ्या समुद्रांत तो पडे.
ऐसा अर्जुन असाधारणें ।
आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें ।
कवळूनि घेतला तेणें ।
अनंतरुपें ॥ २३२ ॥
२३२) याप्रमाणें त्या
अनंतरुपानें, अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाच्या कौशल्यानें, व्यापून टाकले.
तो विश्र्वतोमुख स्वभावें ।
आणि तेंचि दाखवावया लागीं पांडवें ।
प्रार्थिला आतां आघवें ।
होऊनि ठेला ॥ २३३ ॥
२३३) तो श्रीकृष्ण परमात्मा
स्वाभाविकरीत्या विश्तोमुख आहे, आणि तेंच त्यानें आपलें स्वाभाविक रुप दाखवावें
म्हणून अर्जुनानें प्रार्थना केली. म्हणून आतां तो सर्व विश्वरुपानें बनून राहिला.
आणि दीपें कां सूर्यें
प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे ।
तैसी दिठी नव्हे जे
वैकुंठें । दिधली आहे ॥ २३४ ॥
२३४) आणि श्रीकृष्णानी
जी दृष्टि अर्जुनास दिली, ती दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाने प्रकट होईल (
तिला दिसेल ), अथवा मिटली असतां तिचे पाहण्याचेंच बंद राहील, अशी नव्हती.
म्हणोनि किरीटीसि दोहीं परी
। तें देखणें देखे आंधारीं ।
हें संजयो हस्तिमापुरीं ।
सांगतसे राया ॥ २३५ ॥
२३५) म्हणून अर्जुनाला
दोन्ही प्रकारांनी, उजेडांत अथवा अंधारांत ( म्हणजे डोळे उघडले तरी व मिटले तरी )
तें विश्वरुप पाहावेंच लागलें. हें संजयानें हस्तिनापुरांत राजा धृतराष्ट्राला
सांगितले
म्हणे किंबहुना अवधारिलें ।
पार्थें विश्र्वरुप देखिलें ।
नाना आभरणीं भरलें ।
विश्र्वतोमुख ॥ २३६ ॥
२३६) संजय म्हणतो फार काय सांगावें ? अर्जुनानें नाना प्रकारच्या अलंकारांनीं भरलेलें व ज्याला सर्व बाजूंनीं मुखें आहेत, असें विश्वरुप पाहिलें, हें तुम्ही ऐकलें काय ?
.
No comments:
Post a Comment