Wednesday, April 27, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 11 Ovya 255 to 275 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ११ ओव्या २५५ ते २७५

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 11 
Ovya 255 to 275 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ११ 
ओव्या २५५ ते २७५

मूळ श्लोक

अर्जुन उवाच

पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ।

ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ॥ १५ ॥

१५) हे देवा, तुझ्या देहामध्यें ( सर्व ) देव, त्याचप्रमाणें ( स्थावरजंगमादि ) भूतविशेषांचे सर्व समुदाय, कमलामध्ये असलेला ब्रह्मदेव, शंकर ( आणि विष्णु ), सर्व ऋषि आणि दिव्य नाग मी पाहात आहें.   

म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्हीं ।

जें हें विश्वरुप कीं आम्ही । प्राकृत देखों ॥ २५५ ॥

२५५) अर्जुन म्हणाला, हे प्रभो, तुमचा जयजयकार असो. आम्ही सामान्य असुनहि हें विश्र्वरुप पाहण्यास समर्थ झालों, ही तुम्ही अद्भुतच कृपा केली.

परि साचचि भलें केलें गोसाविया । मज परितोषु जाहला साविया ।

जी देखिलासि जो इया । सृष्टीसी तूं आश्रयो ॥ २५६ ॥

२५६) पण महाराज, आपण खरोखर चांगलें केलेंत. तूं ह्या सर्व सृष्टीला आश्रय आहेस असें पाहिले आणि सहजच मला समाधान वाटलें.

देवा मंदराचेनि अंगलगें । ठायीं ठायीं श्र्वापदांची दांगें ।

तैसीं इयें तुझां देहीं अनेगें । देखतसें भुवनें ॥ २५७ ॥

२५७) देवा, मंदार पर्वताच्या आश्रयानें ज्याप्रमाणें ठिकठिकाणीं हिस्र पशूंची अरण्यें असतात, त्याप्रमाणें ह्या तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पाहात आहे.

अहो आकाशाचिये खोळे । दिसती ग्रहगणांचीं कुळें ।

कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीचीं ॥ २५८ ॥

२५८) महाराज, आकाशाच्या खोळेंत ग्रहसमुदायाचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षांवर अनेक पक्ष्यांची घरटी असावीत,

तयापरी श्रीहरी । तुझा विश्र्वात्मकीं इये शरीरीं ।

स्वर्ग देखतसें अवधारीं । सुरगणेंसीं ॥ २५९ ॥

२५९) हे श्रीहरि, ऐक; त्याप्रमाणे तुझ्या ह्या विश्र्वरुप शरीराच्या ठिकाणी देवसमुदायासह मला स्वर्ग दिसत आहे.

प्रभु महाभूतांचें पंचक । येथ देखत आहें अनेक ।

आणि भूतग्राम एकैक । भूतसृष्टीचें ॥ २६० ॥

२६०) महाराज, आपल्या स्वरुपाच्या ठिकाणी पंचमहाभूतांच्या अनेक पंचकड्या मी पाहात आहे आणि एकेक भूतसृष्टीतील प्राणिसमुदाय मी पाहात आहे.

जी सत्यलोकु तुजमाजीं आहे । देखिला चतुराननु हा नोहे ।

आणि येरीकडे जंव पाहें । तंव कैलासुही दिसे ॥ २६१ ॥

२६१)  महाराज, सत्यलोक तुमच्या विश्र्वरुपांत आहे. हा ( मी ) पाहिला, हा ब्रह्मदेव नव्हे काय ?  आणि दुसरीकडे पाहतो तों कैलासहि दिसतो.

श्रीमहादेव भवानियेशीं । तुझां दिसतसे एके अंशीं ।

आणि तूंतेंही गा हृषीकेशी । तुजमाजीं देखें ॥ २६२ ॥

२६२) पार्वतीसह श्रीशंकर तुझ्या एक भागांत दिसत आहे. आणि हे श्रीकृष्णा, तुला देखील तुझ्या ह्या विश्र्वरुपामध्ये मी पाहात आहे.

पैं कश्यपादि ऋषिकुळें । इयें तुझां स्वरुपीं सकळें ।

देखतसें पाताळें । पन्नगेंशीं ॥ २६३ ॥

२६३) कश्यपादि ऋषींचे समुदाय हे सर्व तुझ्या स्वरुपांत दृष्टीस पडतात. त्याप्रमाणें सर्पासह सातहि पाताळें तुझ्या स्वरुपात दृष्टीस पडत आहेत.

किंबहुना त्रैलोक्यपति । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती ।

इयें चतुर्दशभुवनें चित्राकृती । अंकुरली जाणों ॥ २६४ ॥

२६४) फार काय सांगावें ? हें त्रैलोक्याच्या राजा श्रीकृष्णा, तुझ्या शरीरावरील एक एक भाग हीच कोणी भिंत, तीवर हे चौदा लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट उमटलेले आहेत, असे वाटते.  

आणि तेथिंचे जे जे लोक । ते चित्र रचना जी अनेक ।

ऐसें देखतसें अलौकिक । गांभीर्य तुझें ॥ २६५ ॥   

२६५) आणि त्या लोकांतील ते जे प्राणी, तीच वेगवेगळीं चितारलेली चित्रें होत याप्रमाणें तुझी अलौकिक गंभीरता दृष्टीस पडत आहे.   

मूळ श्लोक

अनेकबाहुदरवक्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरुपम् ॥

नान्त न मध्यं न पुनस्तवादि पश्यामि विश्वेश्वर विश्वरुप ॥ १६ ॥

१६) हे विश्वेश्वरा, विश्वरुप कृष्णा, मी तुला अनेक हात, पोट, मुखें व नेत्र असलेला व अनंत रुपांनीं सर्व ठिकाणीं भरलेला असा पाहात आहें. तुझा आरंभ, मध्य अथवा अंत ( यापैकी ) मला ( कांहींच ) दिसत नाहीं.  

तया दिव्यचक्षूंचेनि पैसें । चहुंकडे जंव पाहत असें ।

तंव दोर्दंडीं जैसें । आकाश कोंभैलें ॥ २६६ ॥

२६६) त्या दिव्य दृष्टीच्या बळामुळें मी जो चहुंकडे पाहात आहे. तों बळकट भुजांच्या ठिकाणीं जणू काय आकाश उत्पन्न झालेलें दिसतें. 

तेसे एकचि निरंतर । देवा देखतसें तुझे कर ।

करीत आघवेचि व्यापार । एकीं काळीं ॥ २६७ ॥

२६७) त्याचप्रमाणें देवा, एकटे तुझे हातच एका वेळीं सर्व व्यापार निरंतर करीत आहेत, असें मी पाहातों

मग महाशून्याचेनि पैसारें । उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें ।

तैसीं देखतसें अपारें । उदरें तुझीं ॥ २६८ ॥

२६८) मग ब्रह्माच्या विस्तारानें जशीं कांहीं ब्रह्मांडाचीं भांडारेंच उघडावीत, अशी तुझी अमर्याद पोटें मीं पाहातों.  

जी सहस्रशीर्षयाचें देखिलें । कोडीवरी होताति एकिवेळें ।

कीं परब्रह्माचि वदनफळें । मोडोनि आलें ॥ २६९ ॥

२६९) महाराज, आपलीं हजारों मस्तकें आहेत, ( असें जें आपलें श्रुतीनें वर्णन केलें आहे ) त्याचा अनुभव या विश्वरुपांत एकाच वेळीं कोटीपेक्षांहि अधिक वेळां मी घेतला, अथवा परब्रह्मच मुखरुपी फळांनी दाट भरुन आलें ( असें दिसतें ) 

तैसीं वक्त्रें जी जेउतीं तेउतीं । तुझीं देखतसें विश्र्वमूर्ती ।

आणि तयाचिपरी नेत्रपंक्ति । अनेक सैंध ॥ २७० ॥

२७०) त्याप्रमाणें हे विश्वरुपी परमेश्वरा, मी जिकडे तिकडे तुझीं मुखें पाहात आहें आणि त्याचप्रमाणें डोळ्यांच्या अनेक पंक्तीच्या पंक्ति जिकडे तिकडे पाहात आहें.

हें असो स्वर्ग पाताळ । कीं भूमी दिशा अंतराळ ।

हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसें ॥ २७१ ॥

२७१) हें असो. हा स्वर्ग, हें पाताळ किंवा ही पृथ्वी, ह्या दिशा व हें आकाश असें बोलण्याची सोय राहिली नाही. सर्वच विश्वरुपानें भरलेलें मी पाहात आहें.

तुजवीण एकादियाकडे । परमाणुही एतुला कोडें ।

अवकाशु पाहतसें परि न सांपडे । ऐसें व्यापिलें तुवां ॥ २७२ ॥  

२७२) तुझ्याशिवाय एखाद्या बाजूला परमाणूएवढी तरी जागा सांपडेल, म्हणून मी कौतुकानें शोधीत आहें ; पण सांपडत नाहीं, असें तू ( सर्व ) व्यापलें आहेस.        

इहीं नाना भूतीं सहितें । जेतुलीं साठविलीं होतीं महाभूतें ।

तेतुलाहि पवाडु तुवा अनंतें । कोंदला देखतसें ॥ २७३ ॥

२७३) या नाना प्रकारच्या प्राण्यांसहित जितकीं महाभूतें साठविली होती, तितकाहि विस्तार, तूं जो अनंत, त्या तुझ्याकडून पूर्ण भरलेला मी पाहात आहे.   

ऐसा कवणे ठायाहूनि तूं आलासीं । एथ बैसलासि कीं उभा आहासि ।

आणि तूं कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढे ॥ २७४ ॥ 

२७४) असा तूं कोणत्या ठिकाणाहून आलास ? तूं येथे बसलेला आहेस कीं उभा आहेस ? आणि तूं कोणत्या आईच्या पोटांत होतास ? तुझी आकृति तरी केवढी आहे ?

तुझें रुप वय कैसें । तुजपैलीकडे काय असे ।

तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां ॥ २७५ ॥

२७५) तुझें रुप कसें, वय किती, तुझ्या पलीकडे काय

 आहे ? ( आणि ) तूं कशावर बसलेला आहेस ? असं

 जेव्हा मी पाहू लागलो,



Custom Search

No comments: