Wednesday, April 27, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 7 Ovya 176 to 196 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ७ ओव्या १७६ ते १९६

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 11 Part 7 
Ovya 176 to 196 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ७ 
ओव्या १७६ ते १९६

म्हणोनि तो देवांचा रावो । म्हणे पार्था ते तुज दृष्टि देवों ।

जया विश्र्वरुपाचा ठावो । देखसी तूं ॥ १७६ ॥

१७६) म्हणून, “ अर्जुना, ज्या दृष्टीने तूं संपूर्ण विश्वरुप पाहशील, ती दृष्टि मी तुला देतों. ” असा तो देवांचा राजा ( श्रीकृष्ण परमात्मा ) म्हणाला.   

ऐसीं श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें ।

तंव अविद्येचें आंधारें । जावोंचि लागे ॥ १७७ ॥

१७७) अशीं अक्षरें भगवंताच्या मुखांतून निघतात न निघतात, तोंच अज्ञानांधकार एकदम जावयास लागला.

तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका ।

अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया कृष्णें ॥ १७८ ॥

१७८) तीं अक्षरें नसून ब्रह्मसाम्राज्याला प्रकाशित करणार्‍या ज्ञानरुपी ज्योतीच अर्जुनाकरितां कृष्णानें उजळल्या, असे समजा. 

मग दिव्यचक्षु प्रगटला । तपा ज्ञानदृष्टी पाटा फुटला ।

ययापरी दाविता जाहला । ऐश्र्वर्य आपुलें ॥ १७९ ॥

१७९) मग अर्जुनाच्या ठिकाणीं दिव्य दृष्टि उत्पन्न झाली व त्याच्या ज्ञानदृष्टीनचें सामर्थ्य वाढलें. याप्रमाणें श्रीकृष्ण परमात्म्यांनीं आपला ऐश्र्वर्ययोग दाखविला.     

हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ ।

विश्र्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥ १८० ॥

१८०) हे जे सर्व अवतार, ते ज्या विश्वरुपी समुद्रावरील लाटा आहेत; आणि ज्या विश्वस्वरुपीं किरणांमुळें विश्व हें मृगजळ भासतें.  

जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे ।

आपणपें वैकुंठें । दाविलें तया ॥ १८१ ॥

१८१) ज्या योग्य व अनादि भूमिकेवर हें स्थावरजंगमाचें चित्र उमटतें, तें आपलें विश्वरुप कृष्णांनीं अर्जुनाला ( आपल्या ठिकाणी ) दाखविलें.   

मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती ।

तैं कोपोनियां हातीं । यशोदा धरिला ॥ १८२ ॥

१८२) पूर्वी बालपणी जेव्हां एका वेळेस या श्रीकृष्णांनी माती खाल्ली होती, तेव्हां यशोदेनें त्यास रागावून हातानें धरलें,

मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयचेनि मिसें ।

चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये ॥ १८३ ॥

१८३) नंतर त्या वेळीं भीत भीत जसें काहीं तोंडांतील ( मातीचा ) झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी यशोदेला विस्तारासह चौदाहि लोक आपल्या मुखांत दाखविले;

ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें ।

आणि वेदांचियेही मती ठेले । तें लागला बोलों ॥ १८४ ॥

१८४) अथवा ( तपश्चर्या करीत असतांना ध्रुवाच्या पुढें भगवान् प्रकट झाल्यावर ध्रुवाच्या मनांत भगवंताची स्तुति करावी असें आलें; पण ती कशी करावी हें त्यास कलेना ( तेव्हा ) मधुवनामध्यें भगवंतांनी आपला शंख त्याच्या गालास लावला. तेव्हा वेदांचीहि बुद्धी जेथें कुंठीत होते, तें तो बोलावयास लागला.  

तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया ।

आतां कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणे तो ॥ १८५ ॥

१८५) ( संजय म्हणाला ), राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्णानें अर्जुनावर त्याप्रमाणे अनुग्रह केला.त्यामुळें आतां माया कोणीकडे आहे, ही भाषा देखील तो जाणेनासा झाला.  

एकसरें ऐश्र्वर्यतेजें पाहले । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें ।

चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचां ॥ १८६ ॥

१८६) एकदम भगवंताच्या स्वरुप ऐश्र्वर्याचें तेज प्रकट झालें त्यामुळें जसें कल्पान्ताच्या वेळीं सर्व जलमय होतें, त्याप्रमाणें अर्जुनाला त्या वेळीं सर्व चमत्कारमय झालें आणि आश्र्चर्याच्या गर्दीत त्याचें चित्त बुडून गेलें.

जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकी ।

तैसा विश्र्वरुपकौतुकीं । पार्थु लोळे ॥ १८७ ॥

१८७) ज्याप्रमाणें ब्रह्मलोकापर्यंत व्यापलेल्या उदकांत एकटाच मार्कंडेय ऋषि पोहत होता, त्याप्रमाणें विश्र्वरुपरुपी आश्र्चर्यांत अर्जुन लोळूं लागला.

म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें ।

तीं चराचरें महाभूतें । काय जाहलीं ॥ ॥ १८८ ॥

१८८) अर्जुन म्हणाला, एवढें मोठे येथे आकाश होतें, तें कोण कोठें घेऊन गेला ? तें स्थावरजंगम पदार्थ व महाभूतें कोठें गेली ?   

दिशांचे ठावही हारपले । अधोर्घ्व काय नेणों जाहले ।

चेइलिया स्वप्न तैसें गेले । लोकाकार ॥ १८९ ॥

१८९) पूर्वादि दिशांचे मागमूसहि राहिले नाहींत, वर, खालीं हें कोण जाणें कोठें गेलें ? जागें झाल्यावर ज्याप्रमाणें स्वप्न नाहींसें होतें, त्याप्रमाणें सृष्टीचा आकारहि नाहींसा झाला.  

नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे ।

तैसी गिळिली विश्र्वरुपें । प्रपंचरचना ॥ १९० ॥

१९०) अथवा, सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्यानें चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणें ह्या विश्र्वरुपानें ही सृष्टीची रचना गिळून टाकली.  

तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरे ।

इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयावरी भरले ॥ १९१ ॥

१९१) तेव्हां मनाला मनपण स्फूरेनासें झालें, ( मनाचें संकल्पविकल्प करणें बंद झालें ) तसेंच बुद्धि आपण आपल्याला सांवरेनाशी झाली. ( बुद्धि कोणत्याहि गोष्टीविषयीं निश्र्चय करीनाशी झाली ). आणि इंद्रियांच्या वृत्ति ( आश्र्चर्यांने चकित होऊन ) माघारी परतून हृदयांत सांठवल्या. ( इंद्रियवृत्ति अंतर्मुख झाल्या. )  

तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागलें ।

जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां ॥ १९२ ॥

१९२) त्या स्थितीत स्तब्धपणा स्तब्धता प्राप्त झाली आणि एकाग्रतेस एकाग्रता आली. जणूं काय, ज्ञानमात्राला मोहन अस्त्र घातलें !

 तैसा विस्मितु पाहे कोडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रुपडें ।

तेंचि नानारुप चहूंकडे । मांडोनि ठेलें ॥ १९३ ॥

१९३) याप्रमाणें चकित होऊन तो कौतुकानें पाहूं लागला, तों पुढें जें चार भुजांचें स्वरुप होतें, तेंच अनेक रुपें घेऊन चारहि बाजूंना नटून राहिलें.   

जैसें वर्षाकाळींचें मेघौडे । का महाप्रळयींचें तेज वाढे ।

तैसें आपणेनवीण कवणीकडे । नेदीचि उरों ॥ १९४ ॥

१९४) ज्याप्रमाणें वर्षाऋतूंत येणारे मेघ किंवा महाप्रळयाच्या वेळचें तेज हीं पसरुन जिकडे तिकडे व्यापतात, त्याप्रमाणें आपल्या स्वरुपाशिवाय ( त्या विश्वरुपानें ) कोणतीहि जागा शिल्लक ठेवली नाही.

प्रथम स्वरुपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन ।

सवेचि उघडी लोचन । तंव विश्र्वरुप देखे ॥ १९५ ॥

१९५) ( दिलेल्या दिव्य दृष्टीनें ) विश्र्वरुप पाहिल्याबरोबर प्रथम त्याला समाधान प्राप्त झालें ( व त्यानें डोळें मिटून घेतले आणि पुन्हां ) लगेच डोळे उघडून पाहतो तों विश्र्वरुप त्याच्या दृष्टीस पडलें.

इहींचि दोहीं डोळां । पाहावें विक्ष्वरुपा सकळा ।

तोहि श्रीकृष्णें सोहळा । पुरविला ऐसा ॥ १९६ ॥

१९६) याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्र्वरुप पाहावें, अशी त्याची इच्छा होती, त्या इच्छेचा लळा श्रीकृष्णांनी याप्रमाणें पुरविला. 

 

No comments: