Wednesday, April 27, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 6 Ovya 154 to 175 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ६ ओव्या १५४ ते १७५

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 6 
Ovya 154 to 175 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ६ 
ओव्या १५४ ते १७५

मूळ श्लोक

न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।

दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्र्वरम् ॥ ८ ॥

८) केवळ या तुझ्या दृष्टीनें मला पाहाण्यास तूं समर्थ नाहींस, ( याकरितां ) मी तुला दिव्य दृष्टि देतों. ( आतां ) माझें ईश्र्वरी सामर्थ्य पाहा. 

मग म्हणे उत्कंठे बोहट न पडे । अझुनी सुखाची सोप न सांपडे ।

परि दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥ १५४ ॥

१५४) मग देव म्हणाले, याची विश्वरुप पाहाण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अद्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाहीं; इतकेंच नव्हे, परंतु आम्ही विश्वरुप दाखविलें तें याला मुळीच आकलन होत नाहीं.

हें बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणिया म्हणितलें ।

आम्हीं विश्र्वरुप तरी दाविलें । परि न देखसीच तूं ॥ १५५ ॥

१५५) असें बोलून देव हंसले व हंसून अर्जुनास म्हणाले, तूं खूप पाहणारा आहेस ! आम्हीं तुला विश्वरुप दाखविलें, परंतु ( तूं ) पाहतच नाहीस.

यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ।

तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥ १५६ ॥

१५६) या श्रीकृष्णाच्या भाषणावर हुशार अर्जुन म्हणाला, महाराज, तर मग हा कमीपणा कोणाला आहे ? बगळ्याला चंद्रामृताचा उपभोग देऊं पाहाता ना ?

हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दाऊं जैसा ।

बहिरीयापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥ १५७ ॥

१५७) अहो महाराज, आपण आरसा घांसून तो आंधळ्यास दाखवावयास लागला आहातं. किंवा हे श्रीकृष्णा आपण बहिर्‍यापुढे गाणें सुरु केले आहे.

मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा ।

वायां धाडा शार्ङ्गधरा । कोपा कवणा ॥ १५८ ॥

१५८) पुष्पांतील सुगंधी कणाचा चारा जाणूनबुजून चिखल खाणार्‍या बेडकांपुढे टाकून, श्रीकृष्णा, वायां घालवीत आहात. मग रागावतां कोणावर ?    

जें अतींद्रिय म्हणोनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया विभागा फिटलें ।

तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखों ॥ १५९ ॥

१५९) जें ( विश्र्वरुप ) इंद्रियांस प्रत्यक्ष दिसणें शक्य नाहीं, म्हणून शास्त्रांद्वारां ठरलें आहे व जें केवळ ज्ञानदृष्टीलाच विषय होणारें आहे, असें जें विश्वरुप, तें तुम्हीं माझ्या चर्मचक्षूंपुढें ठेविलें; तर मी तें कसें पाहूं ? 

परि हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें ।

एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥ १६० ॥

१६०) परंतु हा तुमचा कमीपणा बोलूं नये, मीच सहन करावें तें बरें. या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, होय बाबा, तूं म्हणतोस तें मला मान्य आहे. 

सच स्वरुप जरी आम्हीं दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें ।

परि बोलत प्रेमभावें । घसाळ गेलों ॥ १६१ ॥

१६१) आम्हांला जर स्वरुप खरोखरच दाखवावयाचें होतें, तर तुला प्रथम पाहण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होतें. परंतु प्रेमामुळेबोलतां बोलतां विसरुन गेलो.

काय जाहलें न बाहतां भुई पेरिजे । तरी तो वेळु विलया जाइजे ।

तरी आतां माझें निजरुप देखिजे । ते दृष्टी देघों तुज ॥ १६२ ॥

१६२) हें कसें झालें म्हणशील तर, जमिनीची मशागत न करितां तिच्यांत बी पेरलें आणि त्यास पाणी घातलें, तर तो पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट जातो; ( त्याप्रमाणें तुला विश्वरुप पाहण्याची दृष्टि न देतां तुझ्यापुढें विश्वरुप मांडलें, तर तें मांडणें व्यर्थ जाणारच. ) परंतु आतां माझें स्वतःचे स्वरुप पाहण्यास समर्थ असणारीं दृष्टि तुला देतों.   

मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्र्वर्ययोगु आघवा ।

देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥ १६३ ॥

१६३) मग अर्जुना, त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्र्वर्ययोग पाहून त्याला अनुभवामध्यें सांठवून ठेव.

ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोकआद्यें ।

बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥ १६४ ॥   

१६४) वेदान्ताचा जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष व जो जगाला पूजनीय, असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो याप्रमाणें बोललां ( असें संजय म्हणाला ).

मूळ श्लोक

संजय उवाच

एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्र्वरो हरिः ।

दर्शयामास पार्थाय परमं रुपमैश्वरम् ॥ ९ ॥

९) संजय म्हणाला, हे राजा ( धृतराष्ट्रा ), महायोगेश्र्वैर्यसंपन्न हरि याप्रमाणें बोलून, नंतर अर्जुनाला ( आपलें ) ऐश्र्वर्ययुक्त उत्कृष्ट रुप दखविता झाला.   

पैं कौरवकुळचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती ।

जे श्रियेहुनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ॥ १६५ ॥

१६५) ( संजय म्हणाला, ) हे कौरव-कुळांतील सार्वभौम महाराजा, मला वारंवार हेंच आश्चर्य वाटलें की, लक्ष्मीपेक्षां त्रैलोक्यामध्यें जास्त दैववान् कोणी आहे का ? 

ना तरी खुणेचे वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं ।

ना सेवकपण तरी अंगीं । शेषाचांचि आथि ॥ १६६ ॥

१६६) अथवा तत्त्वाची गोष्ट वर्णन करण्यांत वेदाशिवाय जगांत दुसरा कोण समर्थ आहे, दाखवा बरें ! अथवा एकनिष्ठ सेवकपण जर पाहिलें, तर तें एक शेषाच्याच ठिकाणी  आहे.

हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पाहार योगी जैसे ।

अनुसरलें गरुडाऐसें । कवण आहे ॥ १६७ ॥

१६७) अहो महाराज, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेनें योगी असे आठहि प्रहर शिणत असतात, ( असे भगवंताकरिता कष्ट सोसणारे कोण आहेत; ) व गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला ( दुसरा ) कोण आहे ?    

परि तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें ।

जिये दिउनि जन्मले । पांडव हे ॥ १६८ ॥

१६८) परंतु तें ( आता ) सर्व एका बाजूला राहिलें. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले, त्या दिवसापासून, तें श्रीकृष्णापासून भक्तालां होणारें सुख त्यांच्याच ठिकाणी एकवटलें.  

परि पांचांही आंतु अर्जुना । कृष्ण सावियाचि जाहला अधीना ।

कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ॥ १६९ ॥

१६९) परंतु पाचहि पांडवांमध्यें श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या आधीन झाले. जसें एखाद्या विषयासक्त पुरुषाला स्त्री आपल्या आधीन करते. 

पढ़विलें पाखिरुं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले ।

कैसें दैव एथ सुरवाडलें । तें जाणों न ये ॥ १७० ॥

१७०) शिकवलेला पक्षीहि असें बोलत नाहीं; करमणुकीकरिता पाळलेला पशूहि इतका हुकमांत राहात नाहीं, इतके अर्जुनाच्या आधीन श्रीकृष्ण झाले. या अर्जुनाच्या ठिकाणी दै कसें भरभराटीस आलेलें आहे तें समजत नाहीं.

आजि परब्रह्म हें सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे ।

कैसे वाचेचे हन लळे । पाळीव असे ॥ १७१ ॥

१७१) या प्रसंगी संपूर्ण परब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचें भाग्य याच्याच दृष्टीला लाभलें आहे. पाहा ! श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसें पुरवीत आहेत !   

हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये ।

नवल पिसें लागलें आहे । पार्थाचे देवा ॥ १७२ ॥

१७२) अर्जुन रागावला कीं, कृष्ण निवांतपणें सहन करतात. अर्जुन रुसला म्हणजे देव त्याची समजूत करीत असतात. एकूण देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागलें आहें. 

एर्‍हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले ।

ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचे ॥ १७३ ॥

१७३) सहज विचार करुन पाहिलें तर, विषयाला जिंकूनच जन्माला आलेले शुकादिक खरे खरे पुरुष ते भगवंताच्या केवळ वैषयिक लीलांचेच वर्णन करणारे स्तुतिपाठक झाले. 

हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेलें पार्थाअधीन ।

यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥ १७४ ॥

१७४) योगी ज्यांचे सुख समाधीतच भोगतात, असा हा योग्यांच्या समाधीत भोगण्याचें ऐश्वर्य असून, तो अर्जुनाच्या अगदीं आधीन झाला आहे. याकरितां राजा धृतराष्ट्रा, माझें मन आश्चर्य करतें.  

तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथ कौरवेशा ।

कृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥ १७५ ॥

१७५) तसेंच संजय म्हणाला, कौरवांच्या राजा ( धृतराष्ट्रा )

, याच्यांत आश्चर्य तें काय ? कृष्ण त्याचा स्वीकार

 करतात, त्याचा असा भाग्योदय होतो.



Custom Search

No comments: