Friday, July 8, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 18 Ovya 381 to 3९6 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग १८ ओव्या ३८१ ते ३९६

 

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 18 Ovya 381 to 3९6 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग १८ 
ओव्या ३८१ ते ३९६

मोटकें विश्र्वरुप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें ।

आता जापाणीं जापाणीं आपुलें । अस्ताव्यस्त हें ॥ ३८१ ॥

३८१) विश्र्वरुप डोळ्यानें जरासें पाहिलें नाहीं, तोंच सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून आतां तूं आपलें अस्ताव्यस्त रुप आंवरुन घे आंवरुन घे.  

ऐसें करिसी म्हणोनि जरि जाणें । तरि हे गोष्टि सांगावी कां मी म्हणे ।

आतां एक वेळ वाचवीं जी प्राणें । यां स्वरुपप्रळयापासोनि ॥ ३८२ ॥

३८२) तूं असें करशील असें जर मला ठाऊक असतें, तर ‘ ही गोष्ट मला सांगा, ‘ असें मी कशाला म्हटलें असतें ? आतां या स्वरुप-प्रळयापासून माझें एकवार प्राण वांचवा महाराज ! 

जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरि सुईं वोडण माझिया जीविता ।

सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥ ३८३ ॥

३८३) अहो श्रीकृष्णा, जर आपण आमचे स्वामी आहांत तर माझ्या जीविताच्या आड ढाल घाला, व हा विश्वरुपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरुपाच्या ठिकाणीं सांठवा. 

आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्र्व वसतें ।

तें विसरलासी हें उपरतें । संहारुं आदरिलें ॥ ३८४ ॥

३८४) हे सर्व देवांपेक्षां श्रेष्ठ अशा देवा, ऐक. तूं जो चैतन्य, त्या तुझ्यामुळें सर्व विश्र्व वसतें आहे तें विसरलास व उलटें संहार करण्याचें काम आरंभलें आहेस.

म्हणोनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया ।

काढीं मातें महाभया--। पासोनियां ॥ ३८५ ॥

३८५) एवढ्याकरितां हे देवांतील राजा, श्रीकृष्णा, लवकर प्रसन्न हो व आपल्या मायाशक्तीला आवर; आणि मल या मरणासारख्या मोठ्या भयांतून बाहेर काढ.       

हा ठायवरी पुढतपुढती । तूंते म्हणिजे बहुवा काकुळती ।

ऐसा मी विश्र्वमूर्ती । भेडका जाहलों ॥ ३८६ ॥

३८६) इतकें तुला मोठ्या दीनपणे वारंवार म्हणावें, असा मी विश्वरुपाच्या योगानें खरोखर भ्यालों आहें. 

जें अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा ।

जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥ ३८७ ॥

३८७) ज्या वेळीं अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला, त्या वेळीं मी एकट्यानें तो परतविला व साक्षात् काळ समोर आला, तरी भय न धरणारा असा मी आहें, 

परि तया आंतुल नव्हे हे देवा । एथ मृत्युसही करुनि चढावा ।

तुवां आमुचाचि घोटु भरावा । या सकळ विश्र्वेंसी ॥ ३८८ ॥

३८८) परंतु देवा, ही विश्वरुप गोष्ट त्यांतील नव्हे. येथें तूं मृत्युवर ताण करुन या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस.

कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूंचि मिनलासि काळु ।

बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥ ३८९ ॥

३८९) प्रळयाची वेळ नसतांना मध्येंच कसा तूं काळ प्राप्त झालास ? हें त्रैलोक्य बिचारें अल्पायुषी झालें असें वाटतें.

अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां ।

कटा विश्र्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ॥ ३९० ॥

३९०) अरेरे ! विपरीत दैवा ! विश्वरुप दर्शनानें शांत व्हावें म्हणून खटपट केली, तों अकल्पित विघ्न उत्पन्न झाले. हाय ! हें त्रैलोक्य आतां नाहीसें होत चाललें ! तूं हे आतां गिळावयास लागलास ! 

हे नव्हे मा रोकडें । सैंध पसरुनिया तोंडें ।

कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥ ३९१ ॥

३९१) एकसारखीं तोंडें पसरुन हीं सैन्यें चारी बाजूंनी तूं ग्रासीत आहेस, हें प्रत्यक्ष ( दिसत ) नाहीं काय !  

मूळ श्लोक

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसंघैः ।

भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ २६ ॥ 

२६) तसेंच राजांच्या समुदायांसहवर्तमान हे धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, भीष्म, द्रोण, तसाच कर्ण, त्याप्रमाणेंच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योद्ध्यांसह----

नोहेति हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर ।

हे गेले गेले सपरिवार । तुझां वदनीं ॥ ३९२ ॥

३९२) हे कौरवांच्या वंशातील वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का ? अरे अरे, हे तर आपल्या परिवारांसुद्धां तुझ्या तोंडांत पूर्णपणे गेलेच म्हणावयाचे !

आणि जे जे यांचेनि सांवायें । आले देशोदेशींचे राये ।

तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटितु आहासी ॥ ३९३ ॥

३९३) आणि जे जे याच्या मदतीकरितां देशोदेशीचे राजे आले आहेत, त्यांची वार्ताहि सांगू जाता उरणार नाहीं, ( कोणी उरणार नाहीं, ) असा तूं सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस.   

मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां ।

आरणीं हन थाटा । देतोसि मिठी ॥ ३९४ ॥

३९४) मदोन्मत्त हत्तीचे समुदाय तू घटाघट गिळीत असून, युद्धभुमीवरील सेनासमुदाय तू गिळून टाकीत आहेस.

जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर ।

मुखाआंत भार । हारपताति मा ॥ ३९५ ॥

३९५) तोफांवरुन मारा करणारे लोक व पायांनी चालणारे पायदळ, यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत, नाही कां ?

कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्र्वातें गिळी ।

तियें कोटीवरील सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥ ३९६ ॥

३९६) जीं शस्त्रें यमाची भावंडें आहेत व ज्या शस्त्रांपैकी एकच सर्व विश्र्वाला गिळिल, अशी कोट्यावधि शस्त्रें तूं गिळित आहेस.    


Custom Search

No comments:

Post a Comment