Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 20 Ovya 416 to 435
तियें रत्नें दांताचिये
सवडी । कूट लागलें जिभेचां बुडीं ।
कांहीं कांहीं आगरवडीं ।
द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥ ४१६ ॥
४१६) मुकुटांवरील
कांहीं रत्नें दांतांच्या फटींत सांपडली आहेत; कित्येक रत्नांचें झालेलें पीठ,
जीभेच्या बुडास लागलें असून कांहीं कांहीं दाढांचे अग्रभागहि त्या पिठानें माखून
गेले आहेत;
हो कां जे विश्र्वरुपें
काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें ।
परि जीवदेहींचीं सिसाळें ।
अवश्य कीं राखिलीं ॥ ४१७ ॥
४१७) अथवा ज्याप्रमाणें
विश्वरुपी काळानें लोकांचीं शरीरे व बळें जरी ग्रासलीं तरी जीवांच्या देहाचे उत्तम
भाग जीं लोकांचीं मस्तकें, तीं अवश्य रक्षण केलीं गेलीं,
तैसीं शरीरामाजीं चोखडीं ।
होतीं उत्तमांगें इयें फुडीं ।
म्हणोनि महाकाळाचांहि
तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥ ४१८ ॥
४१८) त्याप्रमाणें
मस्तकें निश्चयेकरुन शरीराचे उत्तम भाग होतीं; म्हणून तीं महाकाळाच्या ( विश्वरुपी
काळाच्या ) तोंडंत जरी गेली, तरी पण शेवटी विश्वरुपी महाकाळाच्याहि तोंडांत नाश
पावलीं नाहीत.
मग म्हणे हें काई ।
जन्मलयां आन मोहरचि नाहीं ।
जग आपैसेंचि वदनडोहीं ।
संचरताहे ॥ ४१९ ॥
४१९) नंतर अर्जुन
म्हणावयास लागला, हें काय ? जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही ! सर्व जण
आपोआप विश्वरुपाच्या मखरुपी डोहांत जात आहे.
या आघवियाचि सृष्टी ।
लागलिया आहाति वदनाचां वाटीं ।
आणि हा जेथिंचिया तेथ मिठी
। देतसे उगला ॥ ४२० ॥
४२०) या सर्वच सृष्ट्या
मुखाच्या वाटेस लागल्या असून, हे विश्वरुप उगीच जागच्या जागीच त्यांस गिळून टाकीत
आहे.
ब्रह्मादिक समस्त । उंचा
मुखामाजीं धांवत ।
येर सामान्य हे भरत । ऐलीच
वदनीं ॥ ४२१ ॥
४२१) ब्रह्मदेव आदिकरुन
सर्वजण उंच असलेल्या मुखांमध्यें वेगाने जात आहेत आणि बाकीचे जे साधारण प्रतीचे
लोक आहेत ते अलीकडील तोंडांतच पडत आहेत.
आणीकही भूतजात । तें
उपजलेचि ठायीं ग्रासित ।
परि याचिया मुखा निभ्रांत ।
न सुटेचि कांहीं ॥ ४२२ ॥
४२२) आणखी देखील जेवढे
प्राणी आहेत, तेवढ्या सर्वांस उत्पन्न झालेल्या ठिकाणींच मुख गिळून टाकीत आहे; पण
याच्या मुखांतून खरोखर कांहींच सुटत नाहीं.
मूळ श्लोक
यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा
विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ २८ ॥
२८) ज्याप्रमाणें
नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करुन धांव घेतात, त्याप्रमाणें सर्व
बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या तोंडांत हे नरवीर प्रवेश करीत आहेत.
जैसे महानदीचे वोघ । वहिले
ठाकिती समुद्राचें आंग ।
तैसें आघवांचिकडूनि जग ।
प्रवेशत मुखीं ॥ ४२३ ॥
४२३) ज्याप्रमाणें
मोठ्या नद्यांचे प्रवाह मोठ्या वेगानें समुद्रास येउन मिळतात, त्याप्रमाणें सर्व
बाजूंनीं हें जग त्याच्या मुखंत शिरत आहे.
आयुष्यपंथें प्राणिगणीं ।
करोनि अहोरात्रांची सोवाणी ।
वेगें वक्त्रामिळणीं ।
साधिजत आहाती ॥ ४२४ ॥
४२४) आयुष्याच्या
मार्गानें रात्रंदिवसांच्या पायर्या करुन सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय
त्वरेनें मुखांत प्रवेश करण्याचें साधीत आहेत.
मूळ श्लोक
यथा प्रदीप्तं ज्वलनं
पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।
तथैव नाशाय विशन्ति
लोकस्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ २९ ॥
२९) अत्यंत वेगानें
युक्त असे पतंग ज्याप्रमाणें प्रदीप्त अग्नीमध्यें ( स्वतःच्या ) नाशाकरितांच
तुझ्या मुखामध्यें प्रवेश करीत आहेत.
जळतया गिरीचिया गवखा--।
माजीं घापती पतंगाचिया झाका ।
तैसे समग्र लोक देखा । इये
वदनीं पडत ॥ ४२५ ॥
४२५) पेट घेतलेल्या
डोंगराच्या दरीमध्यें ज्याप्रमाणें पतंगाचे समुदाय उड्या घालतात, त्याप्रमाणें
पाहा, ते सर्व लोक या तोंडामध्यें येऊन पडत आहेत.
परि जेतुलें येथ प्रवेशलें
। तेतुलया लोहें पाणीचि पां गिळिलें ।
वहिवटींहि पुसिलें । नामरुप
तयांचें ॥ ४२६ ॥
४२६) परंतु तापलेलें
लोखंड जसें पाण्याला शोषून टाकतें, त्याप्रमाणें जेवढे म्हणून प्राणी या मुखांत
जात आहेत, तेवढ्यांचें वहिवाटीलासुद्धां नामरुप राहात नाही.
मूळ श्लोक
लेलिह्यसे ग्रसमानः
समन्ताल्लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः ।
तेजभिरापूर्य जगत् समग्रं
भासस्तवोग्राः प्रतपंति विष्णो ॥ ३० ॥
३०) हे विष्णो, जळत
असणार्या मुखांनीं सर्व लोकांना सर्व बाजूनीं गिळत असणारा तूं, ( अतृप्तीमुळें )
जिभा चाटीत आहेस. तुझी प्रखर तेजें ( आपल्या ) तेजानें सर्व जगाला व्यापून त्याला
ताप देत आहेत.
आणि येतुलाही आरोगण ।
करितां भुके नाहीं उणेपण ।
कैसें दीपन असाधारण ।
उदयलें यया ॥ ४२७ ॥
४२७) आणि इकडेहि खात
असतां भूक कांहीच कमी होत नाही याच्या जठराग्नीला किती तरी विशेष प्रखरता आली आहे
!
जैसा रोगिया ज्वराहूनि
उठिला । का भणंगा दुष्काळु पाहला ।
तैसा जिभांचा लळलळाटु
देखिला । आवाळुवें चाटितां ॥ ४२८ ॥
४२८) जसा एकादा रोगी
तापांतून बरा व्हावा ( म्हणजे त्याला खा खा सुटते ), अथवा जसें एखाद्या भिकारी
मनुष्याला दुष्काळ संपून सुकाळ झाला म्हणजे खा खा सुटते, त्याप्रमाणें ओष्ठप्रांत
चाटतांना जिभेच्या हलण्याची गडबड दिसते.
तैसें आहाराचेन नांवें
कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं ।
कैसी समसमित नवाई ।
भुकेलेपणाची ॥ ४२९ ॥
४२९) तसेंच खाण्याचा
जेवढा म्हणून पदार्थ आहे, त्यापैकीं तुझ्या तोंडापासून कशाचाच बचाव झाला नाहीं,
खरमरीत भूक लागलेल्या स्थितीची ही कशी अपूर्वता आहे ?
काय सागराचा धोंडु भरावा ।
कीं पर्वताचा घांसु करावा ।
ब्रह्नकटाहो घालावा ।
आसकाचि दाढे ॥ ४३० ॥
४३०) सर्व समुद्रच पिऊन
टाकावा कीं काय किंवा पर्वताच गट्ट करावा कीं काय, अथवा हें संपूर्ण विश्व
दाढेखालीं घातलें कीं काय,
दिशा सगळियाचि गिळाविया ।
चांदिणिया चाटूनि घ्याविया ।
ऐसें वर्तत आहे साविया ।
लौल्य बा तुज ॥ ४३१ ॥
४३१) सगळ्या दिशाच
गिळून टाकाव्या अथवा चांदण्या चाटूनपुसून घ्याव्यात, अशी ही, देवा तुला साहजिक
हांव दिसत आहे.
जैसा भोगीं कामु वाढे । कां
इंधनें आगीसि हाकाक चढे ।
तैसी खातखातांचि तोंडें ।
खाखातें ठेली ॥ ४३२ ॥
४३२) ज्याप्रमाणें
विषयभोगानें भोगण्याची इच्छा वाढते, अथवा सरपणानें अग्नीची खा खा अधिक होते,
त्याप्रमाणें तुझीं तोंडें सारखीं खात असतांहि पुनः पुनः खा खा करीतच राहिलीं
आहेत.
कैसें एकचि केवढें पसरलें ।
त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें ।
जैसें का कवींठ घातलें ।
वडवानळीं ॥ ४३३ ॥
४३३) एकच तोंड ( पण )
कसें व केवढें पसरलें आहे ! ज्याप्रमाणें वडवानळामध्यें कवठ घालावें त्याप्रमाणें
हे तिन्ही लोक तुझ्या जिभांच्या टोकालाच लागलेले दिसतात.
ऐसीं अपारें वदनें । आतां
येतुलीं कैचीं त्रिभुवनें ।
कां आहारु न मिळतां येणें
मानें । वाढविलीं असह्या ॥ ४३४ ॥
४३४) ( एका तोंडाची अशी
वाट झाली ! ) अशीं ( आपल्या विश्वरुपांत ) असंख्य तोंडें आहेत ! आतां ( इतक्या
मुखांना ) इतकीं त्रिभुवनें कोठलीं ? तेव्हां ( ज्याच्या तेजाचा ताप ) सहन करणें
अशक्य आहे अशा तूं, त्यांना खायला मिळत नसतां तीं इतकीं कशाला वाढविलीस ?
अगा हा लोकु बापुडा । जाहला
वदनज्वाळां वरपडा ।
जैसीं वणवेयाचिया वेढां ।
सांपडती मृगें ॥ ४३५ ॥
४३५) अहो, बिचारें हें
जगत् तुझ्या तोंडांतून निघणार्या ज्वाळांच्या मडक्यांत सांपडलें आहे.
ज्याप्रमाणें वणव्याच्या वेढ्यांत जनावरें सांपडावींत,
आतां तैसें विश्वासि
जाहालें । देवो नव्हे हें कर्म आलें ।
कीं जगजळचरां पांगिलें ।
काळजाळें ॥ ४३६ ॥
Shri Gurucharitra Mahatmya
ReplyDeleteSir, I want to read this... is it available in print version.. Please recommend the publishers name... Thanks a lot 🙏