Sunday, September 25, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 22 Ovya 458 to 481 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २२ ओव्या ४५८ ते ४८१

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 22 
Ovya 458 to 481 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग २२ 
ओव्या ४५८ ते ४८१

तरि तया माझारीं कांहीं । भरंवसोनि उणें नाहीं ।

इयें वायांचि सैन्यें पाहीं । वल्गिजत आहाती ॥ ४५८ ॥

४५८) तर त्यामध्यें खात्रीपूर्वक कांहीच शिल्लक राहाणार नाहीं. तें पाहा, या सैन्याकडून व्यर्थ बडबड केली जात आहे. 

हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें ।

यमावरि गजदळें । वाखाणिजताती ॥ ४५९ ॥

४५९) हे जे सैन्यांचे समुदाय जमवून शौर्यवृत्तीच्या बळानें गुरगुरत आहेत व हत्तीचे थवे वगैरे आपलीं सैन्यें यमाच्या वरचढ आहेत, असे त्यांचे वर्णन करीत आहेत, 

म्हणती सृष्टीवरी सृष्टी करुं । आण वाहूनि मृत्यूतें मारुं ।

जगाचा भरुं । घोटु यया ॥ ४६० ॥

४६०) तीं म्हणतात, ( तीं सैन्यें अशी वल्गना करतात ) कीं, आम्ही प्रतिसृष्टि करुं. शपथ वाहून ( प्रतिज्ञेनें ) मृत्यूला मारुं, आणि या विश्वाचा घोट भरुं. 

पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरि जाळूं ।

काई वाणवरी खिळूं । वारयातें ॥ ४६१ ॥

४६१) आम्ही ही सर्वच पृथ्वी गिळूं व हें आकाश तर वरच्या वरच पेटवून भस्म करुं; इतकेंच काय, एवढा चंचल वारा, पण त्यास देखील आम्ही आपल्या बाणानें जागच्या जागीं जखडून टाकूं. 

ऐशा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा ।

वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥ ४६२ ॥

४६२) पराक्रमाच्या मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत, ते अशा या चतुरंग सैन्यरुप संपत्तीच्या साहाय्यानें महाकाळाबरोबर स्पर्धा करतात.

बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट ।

मारकपणें काळकूट । महुर म्हणत ॥ ४६३ ॥

४६३) त्यांचे शब्द शस्त्रापेक्षां तीक्ष्ण आणि अग्नीपेक्षां दाहक वाटतात आणि या शब्दांच्या मारकपणाची काळकूट विषाशी तुलना केली, तर काळकूट विषाला मधुर म्हणावें लागेल.  

तरि हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळे ।

अगा चित्रींचीं फळें । वीर हे देखें ॥ ४६४ ॥

४६४) ( अशी जरी ते गर्वाने वल्गना करीत आहेत ) तरी हें वीर गंधर्वनगराचे लोट आहेत, किंवा पोकळीचे भेंडाळें. चित्राची रंगीत पोकळ फळें आहेत असें समज.

हा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला ।

इया शृंगारुनियां खाला । मांडिलिया पैं ॥ ४६५ ॥

४६५) हा सैन्यसमुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे. हें सैन्य नव्हे तर कापडाचा साप केलेला आहे. अथवा हे सजवून मांडलेले भोत आहेत.

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।

मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३ ॥

३३) म्हणून तूं ( युद्धाला ) उभा राहा. यश संपादन कर. शत्रूंना जिंकून समृद्धियुक्त अशा राज्याचा उपभोग घे. हे ( सर्व ) मीं पूर्वींच मारुन टाकलेले आहेत, हे सव्यासाचिन्, ( तूं ) केवळ निमित्तमात्र हो.

येर चेष्टवितें जें बळ । तें मियां मागांचि ग्रासिलें सकळ ।

जातां कोलौरीचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥ ४६६ ॥

४६६) शिवाय ज्या सामर्थ्यानें ते हालचाल करतात, तें सर्व सामर्थ्य मीं मध्येंच नाहीसें केले आहे. आतां हे मातीच्या चित्रांतील वेताळासारखे निर्जीव आहेत.

हालविती दोरी तुटली । तरि तियें खांबावरील बाहुलीं ।

भलतेणें लोटिली । उलथोनि पडली ॥ ४६७ ॥

४६७) खांबावरच्या बाहुल्यांना हालविणारी दोरी तुटली म्हणजे हवीं त्यानें त्या बाहुल्यांना ढकलले असतां त्या उलथून पडतात.

तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळु न लगेल पैं गा ।

म्हणोनि उठीं उठीं वेगा । शाहाणा होई ॥ ४६८ ॥

४६८) त्याप्रमाणें सैन्याचा हा आकार नाहींसा करण्याला काहींच वेळ लागणार नाही; एवढ्याकरितां अर्जुना, शहाणा हो, आणि लवकर ऊठ पाहूं.

तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें ।

मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागाविलें ॥ ४६९ ॥

४६९) विराटराज्याच्या गायी हरण करण्यांस जेव्हा हे ( कौरव ) मत्स्य देशांत आले होते, त्यावेळेस सरसकट सर्वांसच तू मोहनास्त्र घातलेंस. मग विराटाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर नावाच्या मुलानेंसुद्धा जशी सर्वांची शस्त्रें हिसकवून त्यांना नग्न केलें.   

आतां हें त्याहूनि निपटारें जाहलें । निवटीं आयितें रण पडिलें ।

घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ॥ ४७० ॥  

४७०) आतां हे त्याहीपेक्षां तेजोहीन झालेले आहेत व आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे. तर त्यांस तूं मार व एकट्या अर्जुनानें शत्रू जिंकले असें यश मिळव.    

आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे ।

तूं निमितमात्रचि होये । सव्यासाची ॥ ४७१ ॥    

४७१) आणि यांत केवळ रिकामें यशच मिळणार आहे असें नाही, तर संपूर्ण राज्यदेखील त्यांत आलेलें आहे. अर्जुना, तूं केवळ नांवाला मात्र कारण हो.

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् ।

मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥ ३४ ॥

३४) द्रोण, भीष्म, जयद्रथ आणि कर्ण आणि तसेच युद्धांतले इतर वीर मी मारलेले आहेत, त्यांना तू ठार कर. भिऊं नकोस. युद्ध कर. प्रतिपक्षीयांना युद्धांत तूं जिंकशील.

द्रोणचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं ।

कैसेनि कर्णावरी । परजूं हें न म्हण ॥ ४७२ ॥

४७२) द्रोणाची पर्वा करुं नकोस. भीष्माचें भय धरुं नकोस व कर्णावर शस्त्र कसें चालवूं असें म्हणू नकोस.

कोण उपायो जयद्रथा कीजे । हें न चिंतू चित्त तुझें ।

आणिकही आधि जे जे । नावणिगे वीर ॥ ४७३ ॥

४७३) जतद्रथाकरितां काय उपाय करावा, याविषयीं तुझ्या बुद्धीला विचार करण्याचें कारण नाही. आणखी वरीलप्रमाणे जे जे नांवाजलेले वीर आहेत;

तेही एक एक आघवे । चित्रींचे सिंहाडे मानावे ।

जैसे वोलेनि हातें घ्यावे । पुसोनियां ॥ ४७४ ॥

४७४) ते देखील एक एक पाहिले तर, सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत, असे समज.

यावरी पांडवा । काइसा झुंजाचा मेळावा ।

हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ॥ ४७५ ॥

४७५) अर्जुना, अशी वास्तविक स्थिती असतांना, युद्धाचा समुदाय तो काय उरलेला आहे ? हा सर्व नुसता आभास आहे. बाकी ( बाहेरील देखाव्याशिवाय इतर बल, तेज वगैरे ) सर्व मी नाहींसे केलें आहे.  

जेव्हां तुवां देखिले । हे माझां वदनीं पडिले ।

तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ॥ ४७६ ॥

४७६) ज्या वेळेला तूं हे सैनिक माझ्या तोंडांत पडलेले पाहिलेस, त्याच वेळेला या सर्वांचे आयुष्य संपलें. आतां हे पोकळ सोपटाप्रमाणें राहिलेले आहेत.

म्हणोनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं ।

न रिगे शोकसंकटीं । नाथिलिया ॥ ४७७ ॥

४७७) म्हणून लवकर ऊठ. मी यांस ( आंतून ) मारलें आहे, व तूं यांस ( बाहेरुन ) मार, आणि नसत्या शोकसंकटांत पडूं नकोस.

आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे ।

तैसें देखें गा तुझें । निमित्त आहे ॥ ४७८ ॥

४७८) आपणच निशाण उभें करावें व आपणच त्यास कौतुकानें बाण मारुन तें पाडावें. ( यांत असे बाण हे निमित्तमात्र आहेत, त्याप्रमाणे या सर्वांस मीच उत्पन्न केले व मीच मारलें आहे ). त्या बाणाप्रमाणें यांत तूं केवळ निमित्त आहेस,

बापा विरुद्ध जें जाहलें । तें उपजताचि वाघें नेलें ।

आतां राज्येंशीं संचलें । यश तूं भोगी ॥ ४७९ ॥

४७९) बाबा अर्जुना, तुझ्या हिताला विरुद्ध असें जें कांहीं एक उत्पन्न झालें होतें, तें उत्पन्न होतांक्षणींच वाघानें नेले ( उत्पन्न झाल्याबरोबरच तें नाहीसें झालें ) आतां ( वाटेंतील कांटा आयताच निघाल्यामुळें ) तुला मिळालेल्या राज्यासह यश तूं भोग.  

सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।

ते वधिले विशद । सायासु न लागतां ॥ ४८० ॥

४८०) तुझे भाऊबंद स्वभावतःच गर्वानें फुगून गेले होते व जगामध्यें ते बलवान आणि मदोन्मत्त झाले होते. त्यास मुळींच आयास न लागतां तूं साफ नाहीसें केलेस.

ऐसिया इया गोष्टी । विश्र्वाचां वाक्पटीं ।

लिहूनि घाली किरीटी । जगामाजीं ॥ ४८१ ॥

४८१) अर्जुना, या जगामध्यें अशा गोष्टी सर्व जगताच्या

 वाचारुपी पटलावर लिहून ठेव.



Custom Search

No comments:

Post a Comment