Sunday, September 25, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 24 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 24 
Ovya 507 to 525 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग २४ 
ओव्या ५०७ ते ५२५

मूळ श्लोक

कस्माच्च ते न नमेरन् महात्मन् गरीयते ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।

अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥ ३७ ॥

३७) हे महात्मन् अत्यंत महान् अशा महद् ब्रह्माचा देखील आदिकर्ता जो तूं , त्या तुला, ते ( राक्षस इत्यादि ) कां नमस्कार करीत नाहींत ? हें अनंता, देवाधिदेवा, जगन्निवासा, तूं अक्षर आहेस व सत् व असत् म्हणून जें आहे तें तूं आहेस; त्याच्या अतीत जें आहे, तेंहि तूं आहेस.

एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा ।

न लगतीची चरणा । पळते जाहले ॥ ५०७ ॥

५०७) हे श्रीकृष्णा, येथें हे राक्षस तुमच्या चरणांना शरण न येतां कोणत्या कारणामुळें दूर पळून गेले आहेत ?

आणि हें तूतें काइ पुसावें । येतुलालें आम्हांसिही जाणवे ।

तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ॥ ५०८ ॥

५०८) आणि हें तुम्हांला तरी काय पुसावयाचें आहे ? एवढें तर आमच्याहि लक्षांत येण्यासारखें आहे ( ते हें पाहा, ) सूर्य उगवला असतां अंधार कसा टिकाव धरणार.

तूं स्वप्रकाशाचा आगरु । आणि जाला आहासि गोचरु ।

म्हणोनिया निशाचरां केरु । फिटला सहजे ॥ ५०९ ॥

५०९) तूं आत्मप्रकाशाची खाण आहेस, आणि ( आमच्यापुढें ) प्रत्यक्ष प्रगट झाला आहेस, म्हणून सहज राक्षसांची दुर्दशा उडाली आहे.

हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा ।

आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥ ५१० ॥

५१०) इतके दिवस, हे श्रीरामा, हें आम्हांला कांहींच समजत नव्हतें. हें तुझें अगाध सामर्थ्य आतांच आमच्या नजरेस येत आहे.

जेथूनि नाना सृष्टीचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली ।

तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥ ५११ ॥

५११) ज्याच्यापासून अनेक सृष्टीच्या पंक्ति व प्राणिमात्रांच्या समुदायरुप वेली उत्पन्न होत असतात, त्या महद् ब्रह्माला, प्रभु, आपली इच्छा प्रसवली आहे.

देवो निःसीमतत्त्व सदोदितु । देवो निःसीमगुण अनंतु ।

देवो निःसीमसाम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥ ५१२ ॥  

५१२) देवा, आपण अमर्याद तत्त्वरुप असून आपलें अस्तित्व त्रिकालाबाधित आहे. आपण अंतरहित असून आपल्या गुणांची गणती नाही; आपण अखंड निष्प्रतिबंधपणानें सर्वत्र व्याप्त आहांत व आपण देवांचे राजे आहांत.

 जी तूं त्रिजगतिये बोलावा । अक्षर तूं सदाशिवा ।

तूंचि संतासंत देवा । तयाही अतीत तें तूं ॥ ५१३ ॥

५१३) हे नित्य कल्याणरुप देवा, महाराजा, तूं त्रैलोक्यालाआश्रय आहेस. तूं अविनाशी आहेस. देवा, सत् व असत् तूंच आहेस व त्या पलीकडील जें तेंहि तूंच आहेस.        

मूळ श्लोक

त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।

वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरुप ॥ ३८ ॥

३८) तूं आदिदेव, पुराण पुरुष आहेस; तूं या विश्वाचें अखेरीचें निवासस्थान आहेस; तूं सर्व जाणतोस, तूं जाणण्याला ( अत्यंत ) योग्य आहेस, अत्यंत श्रेष्ठ असें आश्रयस्थान तूंच आहेस. हे अनंतरुपा, तूं ( हें ) विश्र्व व्यापिलें आहेस.

प्रकृतिपुरुषांचा आदी । जी महत्तत्त्वां तूंचि अवघी ।

स्वयें तूं अनादी । पुरातनु ॥ ५१४ ॥

५१४) देवा, ( तूं ) प्रकृति व पुरुषांचें मूळ आहेस. महत् तत्त्वाचा शेवटहि तूंच आहेस; तूं जन्मरहित आहेस व तूं सगळ्यांच्या पूर्वीचा आहेस. 

सकळ विश्र्वजीवन । जीवांसि तूंचि निधान ।

भूतभविष्याचें ज्ञान । तुझांचि हातीं ॥ ५१५ ॥

५१५) ( देवा, ) तूं सर्व जगाचें जीवन आहेस आणि जीवांचा शेवटही तुझ्यांतच होतो व भूतभविष्यांचें ज्ञान तुझ्या हातीं आहे.

जी श्रुतीचिया लोचना । स्वरुपसुख तूं अभिन्ना ।

त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तूं ॥ ५१६ ॥

५१६) हे जीवांशीं अभिन्नतेनें असणार्‍या देवा, श्रुतीच्या नेत्रास ( ज्ञानास ) गोचर होणारें असें जें स्वरुपसुख, तें तूं आहेस आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया, त्या मायेला आधार तूंच आहेस.  

म्हणोनि जी परम । तूंतें म्हणिजे महाधाम ।

कल्पांतीं महद् ब्रह्म । तुझां अंकीं रिगे ॥ ५१७ ॥

५१७) म्हणून देवा, तुला श्रेष्ठ असें आश्रयस्थान म्हणतात, आणि प्रळयकाळाच्या शेवटीं मायाहि तुझ्या स्वरुपीं लीन होते.

किंबहुना देवें । विश्र्व विस्तारिलें आहे आघवें ।

अनंतरुपा वानावें । कवणें तूंतें ॥ ५१८ ॥

५१८) फार काय सांगावें ! देवा, तुझ्याकडून सर्व विश्व विस्तारलें गेलें आहे. ज्या तुला अनंत रुपें आहेत, त्या तुझें वर्णन कोणी करावें ?  

मूळ श्लोक

वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।

नमो नमस्तेऽस्तु सहस्त्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ ३९ ॥

३९) वायु, यम, अग्नि, वरुण, चंद्र, ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाहि पिता तूं आहेस. तुला सहस्रावधि नमस्कार असोत.

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।

अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ ४० ॥

४०) हे सर्वत्र असणार्‍या प्रभो, पुढून, मागून सर्व बाजूंनी तुला नमस्कार असो. सामर्थ्याला अंत नसलेला तूं आहेस. तूं सर्व व्यापून आहेस. तस्मात् सर्व तूंच आहेस.

जी काय एक तूं नव्हसी । तूं कवणे ठायीं गा नससी ।

हें असो जैसा आहासी । तैसिया नमो ॥ ५१९ ॥

५१९) देवा, काय काय तूं नाहीस ? अरे तूं कोणत्या ठिकाणी नाहींस हें वर्णन करणे पुरें. तूं जसा असशील तशा तुला नमस्कार असो.

वायु तूं अनंता । यम तूं नियमिता ।

प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ॥ ५२० ॥

५२०) हे अनंता, तूं वायु आहेस व जगाचें शासन करणारा यम तूं आहेस. सर्व प्राण्यांच्या समुदायांत असणारा जो अग्नि ( जठराग्नि ) तो तूं आहेस.

वरुण तूं सोम । स्र्ष्टा तूं ब्रह्म ।

पितामहाचाही परम । आदिजनक तूं ॥ ५२१ ॥

५२१) देवा, तूं वरुण, चंद्र व जगत् उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस व त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आदि जनक तूं आहेस.

आणिकही जें जें कांहीं । रुप आथि अथवा नाहीं ।

तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥ ५२२ ॥

५२२) आणि हे जगन्नाथा, आणखी जें जें म्हणून कांहीं ज्याला रुप आहे अथवा नाहीं, तें सर्व तूंच आहेस. म्हणून तशा त्या तुला मी नमस्कार करतो.

ऐसें सानुरागें चित्तें । स्तवन केलें पांडुसुतें ।

मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२३ ॥

५२३) अशा प्रीतियुक्त अंतःकरणानें अर्जुनाने भगवंतांची स्तुति केली, मग पुन्हा म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो.

पाठी तिये साद्यंतें । न्याहाळी श्रीमूर्तीतें ।

आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२४ ॥

५२४) त्या पुन्हां त्या श्रीमूर्तीला त्यानें साद्यंत पाहिले आणि पुन्हां म्हणाला, ‘ प्रभो तुला नमस्कार असो, ‘ तुला नमस्कार असो. ‘

पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्ते ।

आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२५ ॥  

५२५) त्या मूर्तीच्या ( एकेक ) अवयवाचे भाग पाहतां

 पाहतां, त्याच्या अंतःकरणास समाधान वाटलें आणि पुन्हा

 म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार

 असो.



Custom Search

No comments:

Post a Comment