Sunday, September 25, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 25 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २५

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 25 
Ovya 526 to 543 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग २५ 
ओव्या ५२६ ते ५४३

इये चराचरीं समस्ते  । अखंडित देखे तयांते ।

आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२६ ॥

५२६) या सर्व स्थावर-जंगमात्मक जगामध्ये अखंडित जो प्रभु त्याला त्यानें पाहिले आणि पुन्हां म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो.

ऐसीं रुपें तियें अद्भुतें । आश्र्चर्ये स्फुरती अनंतें ।

तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥ ५२७ ॥

५२७) अशी ही अनंत व अद्भुत रुपें जों जों आश्र्चर्यकारक रीतीनें अर्जुनाच्या पुढें प्रकट होत होतीं, तों तों अर्जुन प्रभो, तुला नमस्कार असो, नमस्कार असो, असेंच म्हणत होता.   

आणिक स्तुति नाठवे । आणि निवांताही नसवे ।

नेणों कैसा प्रेमभावें । गाजोंचि लागे ॥ ५२८ ॥

५२८) ‘ नमस्ते, नमस्ते ‘ याहून दुसरी स्तुति त्याला आठवेना, आणि निवांतपणानें राहावें हेंहि सहन होईना. कशा प्रेमभावानें तों ( अर्जुन ) ‘ नमस्ते नमस्ते ‘ अशीच गर्जना करीत होता, ते कळत नाहीं !

किंबहुना इयापरी । नमन केले सहस्रावरी ।

कीं पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥ ५२९॥

५२९) फार काय सांगावें ! याप्रमाणें अर्जुनानें हजारों नमस्कार केले व पुन्हा म्हणाला कीं, हें माझ्यासमोर असणार्‍या श्रीहरि , तुला नमस्कार असो.

देवासि पाठी पोट आथी कीं नाहीं । येणे उपयोगु आम्हा काई

तरी तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥ ५३० ॥

५३०) देवाला पाठ व पोट आहे का नाही, याचा विचार करुन आम्हांला काय प्रयोजन आहे ? परंतु महाराज, पाठमोरा जो तूं, त्याला नमस्कार असो. 

उभा माझिये पाठीसीं । म्हणोनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी ।

सन्मुख विन्मुख जगेंसी । न घडे तुज ॥ ५३१ ॥

५३१) माझ्या पाठीमागे तूं जसा आहेस म्हणून मी आपल्यास पाठमोरे असे म्हणतो; परंतु हे परमेश्र्वरा, जगाशीं समोर अथवा पाठमोरें होणें हे तुझ्या ठिकाणी संभवत नाहीं. ( कारण जगद्रूप तूंच आहेस ). 

आतां वेगळालिया अवेवां । नेणें रुप करुं देवा ।                   

म्हणोनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥ ५३२ ॥

५३२) आतां वेगवेगळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे, देवा, मला कळत नाही याकरितां सर्व चराचर बनून सर्वांच्या आंत आत्मेरुपानें तूंच आहेस त्या तुला नमस्कार असो. 

जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमितविक्रमा ।

सकळकाळीं समा । सर्वदेवा ॥ ५३३ ॥

५३३) देवा, अनंत बलाच्या आवेशाचे तूं ठिकाण आहेस व तुझ्या पराक्रमाला मोजता येत नाही; तूं तिन्ही काळीं सारखा ( एकरुप ) असतोस; आणि सर्व देवांच्या रुपानें तूंच आहेस, त्या तुला नमस्कार असो.

आघवां अवकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे ।

तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ॥ ५३४ ॥

५३४) ज्याप्रमाणें सर्व पोकळींत आकाश हें पोकळी होऊन असतें, त्याप्रमाणें तूं सर्वांना व्यापून सर्व झाला आहेस.

किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ ।

परि क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ॥ ५३५ ॥

५३५) फार काय सांगावें !  हें सर्व त्रिभुवन केवळ तूंच आहेस; परंतु क्षीरसमुद्रावर जशा क्षीराच्या लाटा असतात, ( त्याप्रमाणें त्रिभुवन हें तुझ्या ठिकाणीं आहे.)

म्हणोनियां देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां ।

हें आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व ॥ ५३६ ॥

५३६) म्हणूनादेवा, तूं या सर्व जगाहून वेगळा नाहींस, हें माझ्या खरोखर अनुभवाला आलें. तर आतां देवा, सर्व तूंच आहेस.

सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति ।

अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि ॥ ४१ ॥

४१) तुझा हा महिमा न जाणणारा मी, प्रमादामुळें अथवा प्रेमामुळें मित्र समजून, तुच्छतापूर्वक, अरे कृष्णा, अरे यादवा, अरे सख्या, इत्यादि जें तुला बोललों; 

परि ऐसिया तूंतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही ।

म्हणोनि सोयरे संबंधधर्मी । रहाटलों तुजसीं ॥ ५३७ ॥

५३७) परंतु एवढा मोठा तूं असूनहि हे प्रभो, आम्हीं तुला केव्हांच जाणलें नाही आणि त्यामुळें आम्ही तुझ्याशीं असलेले आप्तसंबंधाचें नातें लक्षांत घेऊन, त्या दृष्टीनें तुझ्याशीं वागणूक ठेवली, 

अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें ।

वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ॥ ५३८ ॥

५३८) अरे अरे ! ही फारच अनुचित गोष्ट झाली कीं मी सडा घालण्याच्या कामीं अमृताचा उपयोग केला ! आणि लहानसें शिंगरुं घेऊन त्याच्या मोबदल्यांत कामधेनूच देऊन टाकली.  

परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि गाडोरा आम्हीं घातला ।

कल्पतरु तोडोनि केला । कुंपु शेता ॥ ५३९ ॥

५३९) तूं म्हणजे आम्हांला प्रत्यक्ष परिसाचा खडकच लाभला होतास. पण तो फोडृन आम्ही त्याचा उपयोग भिंतीच्या पाया भरण्ताच्या कामीं केला; अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून शेत राखण्याकरितां कुंपण केले !

चिंतामणीची खाणी लागली । तेणेंवरी वोढाळें वोल्हांटिली ।

तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणें ॥ ५४० ॥

५४०) मला तूं ( म्हणजे, चिंतामणि नामक रत्नांच्या खाणीचा लाभ झालास; परंतु मी त्या रत्नांचा उपयोग ओढाळ गुरांना हांकण्याकडे केला. या तर्‍हेनें तुझी प्राप्ति झाली असतांनाहि, ती प्राप्ति, तूं स्नेही म्हणून मी व्यर्थ घालविली.

हें आजिचेंचि पाहे पां रोंकडें । कवण झुंज हें केवढें ।

परि परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ॥ ५४१ ॥

५४१) ( मागच्या सर्व गोष्टी असूं दे. ) आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पाहा कीं, हें युद्ध कसलें व काय किंमतीचें आहे ! पण तूं मूर्तिमंत परब्रह्म असतांहि तुला या युद्धांत मी सारथी केलें आहे !

ययां कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा ।

ऐसा वणिजेसाठी जागेश्र्वरा । विकलासि आम्हीं ॥ ५४२ ॥

५४२) हे दातारा, तडजोड करण्याकरितां कौरवांच्या घरीं आम्हीं तुला पाठविलें. अशा प्रकारें देवा, तूं प्रत्यक्ष जागृत दैवत असूनदेखील, तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहारांकरिता खर्ची घातलें.

तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख ।

उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करुं ॥ ५४३ ॥

५४३) तूं योग्यांचें समाधिसुख आहेस; मी कसा मूर्ख कीं, हें

 मी जाणलें नाहीं व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल, असें

 भाषण करीत होतों.



Custom Search

No comments:

Post a Comment