Monday, September 26, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 28 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २८

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 28 
Ovya 586 to 608 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग २८ 
ओव्या ५८६ ते ६०८

तयां आघवियांचिआंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु ।

परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥ ५८६ ॥

५८६) त्या सर्व जन्मांचा मी झाडा घेऊन पाहात आहें, पण ही गोष्ट ( विश्वरुपाचे दर्शन ) ऐकलेतरी किंवा पाहिलेली आढळतच नाही.

बुद्धीचें जाणणें । कहीं व वचेचि याचेनि आंगणें ।

हे सादही अंतःकरणें । करवेचिना ॥ ५८७ ॥

५८७) बुद्धीची जाणण्याची शक्ति कधीं याच्या ( विश्वरुपाच्या ) अंगणांतसुद्धा येत नाही व अंतःकरणाला कल्पनासुद्धां करतां येत नाहीं,

तेथ डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी ।

किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत ॥ ५८८ ॥

५८८) अशा स्थितींत डोळ्यांना पाहावयास मिळावें, ही गोष्टच कशाला बोलावयास पाहिजे ? फार काय सांगावें ? हें पूर्वीं कधींहि पाहिलें नाहीं अथवा ऐकलें नाहीं. 

तें हें विश्वरुप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें ।

तरि माझें मन झालें । हृष्ट देवा ॥ ५८९ ॥

५८९) तें हें आपलें विश्वरुप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवलेंत, त्यामुळें देवा, माझें मन आनंदित झालें.

परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसी गोठी करावी ।

जवळीक हे भोगावी । आलिंगावासी ॥ ५९० ॥ 

५९०) परंतु आतां अशी जीवामध्यें इच्छा आहे कीं, तुझ्याशीं गोष्टी कराव्यात व तुझें सान्निध्य भोगावें व तुला आलिंगन द्यावें.      

ते येचि स्वरुपीं करुं म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे ।

आणि कोणा खेंव देइजे । तुज लेख नाहीं ॥ ५९१ ॥

ह्या सर्व गोष्टी या विश्वरुपाबरोबर करुं म्हटलें, तर अनंत मुखांपैकीं कोणत्या एका मुखाबरोबर बोलावें ? आणि तुझ्या विश्वरुपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावें ?

म्हणोनि वारियासवें धांवणें । न ठके गगना खेंव देणें ।

जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ॥ ५९२ ॥

५९२) एवढ्याकरितां वार्‍याबरोबर पळणें जमणार नाहीं व आकाशाला आलिंगन देणें घडणार नाहीं. समुद्रामध्यें जलक्रीडा कशी खेळावी ? 

यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा ।

म्हणोनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हें आतां ॥ ५९३ ॥

५९३) याकरितां हे श्रीकृष्णा, माझ्या मनांत या विश्वरुपाविषयीं भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा कीं आपण प्रकट केलेलें विश्वरुप आतां परत आवरुन घ्यावें.

पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे ।

तैसें चतुर्भुज रुप तुझें । तो विसावा आम्हां ॥ ५९४ ॥

५९४) स्थावरजंगमात्मक जग मजेनें हिंडून पाहावें ( व त्या हिंडण्यांत बर्‍याचशा हालअपेष्टा भोगल्यावर ) त्यामुळें घरीं सुखानें विश्रांति घेत राहावें, त्याप्रमाणें ( तुझे अफाट विश्वरुप पाहिल्यानंतर तुझें श्यामसुंदर चतुर्भुज रुप आम्हांस विश्रांतीची जागा आहे.

आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें ।

शास्त्रांतें आलोडावें । परि तियें सिद्धांतु तो हाचि ॥ ५९५ ॥  

५९५) आम्हीं योगमात्राचा अभ्यास करावा व त्या योगानें याच अनुभवाला ( तुझें श्यामसुंदर चतुर्भुज रुप ) यावें. आम्ही शास्त्राचा अभ्यास करावा, परंतु शास्त्रांचा सिद्धान्त हाच ( चतुर्भुज रुप ) आहे.

आम्हीं यजनें किजती सकळें । परि तियें फळावीं येणेंचि फळें ।

तीर्थें होतु सकळें । याचिलागीं ॥ ५९६ ॥

५९६) आम्हीं सर्व यज्ञ करावेत, परंतु याचें फळ हेंच ( चतुर्भुज रुप ) मिळावें. आमच्या सर्व तीर्थयात्रा याचकरितां असोत.

आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे ।

तया फळीं फळ हेंचि तुझें । चतुर्भुज रुप ॥ ५९७ ॥

५९७) आणखीं जें जें कांहीं दानपुण्य आम्ही करुं त्याच्या फळाच्या ठिकाणीं तुझें चतुर्भुज रुप हेंच फळ होय.  

ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणोनि तेंचि देखावया लवडसचडी ।

वर्तत असे ते सांकडी । फेडीं वेगां ॥ ५९८ ॥

५९८) याप्रमाणें त्या चतुर्भुज रुपाची आवड आहे; म्हणून तेंच पाहण्याकरितां लगबग आहे. ती अडचण ( तळमळ ) आपण लवकर दूर करा.

अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्ववसवितेया ।

प्रसन्न होईं पूजितया । देवांचिया देवा ॥ ५९९ ॥ 

५९९) हे अंतःकरणांतील सर्व गोष्टी जाणणार्‍या देवा, सर्व विश्व वसविणार्‍या देवा, व भजलें जाणारे जे देव त्या देवांच्या देवा, मला प्रसन्न हो.    

मूळ श्लोक

किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।

तेनैव रुपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ ४६ ॥

४६) किरीट  धारण करणार्‍या, गदा धारण करणार्‍या हातामध्यें चक्र धारण करणार्‍या अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे विश्वरुपधारिन्, तूं पुन्हा तेंच चतुर्भुज स्वरुप धारण कर.   

कैसें नीलोत्पलातें रांवित । आकाशाही रंगु लावित ।

तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ॥ ६०० ॥

६००) त्या चतुर्भुज श्यामसुंदर रुपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगविणारा, आकाशासहि ( निळा ) रंग देणारा व इंद्रनील नांवाच्या रत्नाला निळ्या रंगाचें तेज ( प्रकाश ) दाखविणारा आहे.

जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासीचि निघालिया भुजा ।

ज्याचें जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥ ६०१ ॥

६०१) ज्याप्रमाणे पाचेच्या रत्नाला सुगंध उत्पन्न व्हावा अथवा आनंदासच हात फुटावेत ( त्याप्रमाणें भगवंताचें शरीर शोभत होतें.) ज्याच्या घुडग्यांचा आश्रय केल्यामुळे ( ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळें ) मदनास सौंदर्य प्राप्त झालें. 

मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें ।

शृंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया ॥ ६०२ ॥

६०२) प्रभूंनी मुकुटाला मस्तकावर ठेवल्यामुळें त्या मुकुटाला भगवंताचें मस्तक मुकुट झालें. ( म्हणजे भगवंताच्या मस्तकानें मुकुटाला शोभा आली.) व ज्या भगवंतांच्या शरीरानें शृंगारास ( वस्त्रें, अलंकार इत्यादिकांस अलंकार ( शोभा ) प्राप्त झाला. 

इंद्रधनुष्याचिये आडणी । माजी मेघ गगनरंगणीं ।

तैसें आवरिलें शार्ङ्गपाणी । वैजयंतिया ॥ ६०३ ॥

६०३) आकाशमंडळांत इंद्रधनुष्याच्या वर्तुळांत जसा मेघ आवरलेला आसतो, त्याप्रमाणें वैजयंती माळेनें श्रीकृष्ण आवरले गेले.  

कवणी ते उदार गदा । असुरां देत कैवल्य सदा ।

कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ॥ ६०४ ॥

६०४) कशी ती उदार गदा ! कीं जी गदा असुरांना नेहमीं मोक्षपदाला नेते ! गोविंदा, तुमचें सुदर्शन चक्र खरोखरच सौम्य तेजानें कसें शोभत आहे ?

किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठेत पां मी ।

म्हणोनि आतां तुम्ही । तैसया होआवें ॥ ६०५ ॥

६०५) फार काय सांगावें ? महाराज, तें आपले चतुर्भुज श्यामसुंदर रुप पाहण्यास मी उत्सुक आहें, म्हणून आतां आपण ( हें प्रचंड विश्वरुप आवरुन ) तें चतुर्भुज रुप धारण करावें.

हे विश्वरुपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे ।

आतां होताति आधले । कृष्णमूर्तीलागीं ॥ ६०६ ॥

६०६) महाराज, हें विश्वरुपाचें सोहाळे भोगून माझे डोळे शांत झाले. आतां ते ( डोळे ) श्रीकृष्णमूर्ति पाहण्याकरितां अत्यंत उत्सुक होत आहेत.

तें साकार कृष्णरुपडें । वांचूनि पाहो नावडे ।

तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥ ६०७ ॥

६०७) ह्या डोळ्यांस त्या सगुण कृष्णमूर्तिशिवाय इतर कांहीं पाहणें आवडत नाहीं. तें सगुण स्वरुप यांस पाहावयास मिळालें नाहीं, तर या विश्वरुपाची माझ्या डोळ्यांना कांहीं किंमत वाटत नाहीं.    

आम्हां भोगमोक्षाचां ठायीं । श्रीमूर्ती वांचूनि नाहीं ।

म्हणोनि तैसाचि साकारु होई । हें सांवरीं आतां ॥ ६०८ ॥

६०८) आम्हांला ( ऐहिक व पारलौकिक ) भोगाच्या

 ठिकाणीं ( फार काय सांगावें ) मोक्षाच्या ( देखील )

 ठिकाणीं श्यामसुंदर मूर्तीवांचून दुसरें कांहीं नाहीं. म्हणून

 देवा, आतां तूं तसाच ( चतुर्भुज ) हो व हें विश्वरुप 

आटोप.




Custom Search

No comments:

Post a Comment