Monday, November 21, 2022

BhaktiYoga Part 4 Ovya 60 to 88 भक्तियोग भाग ४ ओव्या ६० ते ८८

 

BhaktiYoga Part 4 
Shri Dnyaneshwari 
Adhyay 12 Ovya 60 to 88
भक्तियोग भाग ४ 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १२ ओव्या ६० ते ८८

मूळ श्लोक

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।

अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥

५) अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणीं ज्याचें चित्त आसक्त आहे, त्यांना अधिक क्लेश पडतो. कारण देहधार्‍यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टानें साध्य होतो.   

जिहीं सकळभूतांचां हितीं । निरालंबीं अव्यक्तीं ।

पसरलिया आसक्ती । भक्तीवीण ॥ ६० ॥

६०) सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय, निर्गुण आणि सर्व प्राण्यांचें मूर्तिमंत हितच, असें जें ब्रह्म त्या ब्रह्माची प्राप्ति होण्याकरिता ज्या योग्यांनीं त्या ठिकाणीं आसक्ति धरलेली असते,  

तयां महेंद्रादि पदें । करिताति वाटवधें ।

आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें । पडोनि ठाती ॥ ६१ ॥

६१) त्यांस ( त्या योग्यांस ) इंद्रपदादि पदें वाटमारेपणा करतात व ऋद्धिसिद्धींपासून उत्पन्न होणारीं सुखदुःखे त्या योग्यांच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून राहतात. 

कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग ।

आणि शून्येंसीं आंग । जुंझवावें कीं ॥ ६२ ॥

६२) कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकाराबरोबरच शरीर लढवावें लागतें. 

ताहाने ताहानाचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी ।

अहोरात्र वावीं  । मवावा वारा ॥ ६३ ॥

६३) तहानेनें तहानच प्यावी, भूक लागली असतां भूकच खावी आणि रात्रंदिवस वावांनी वारा मोजावा.

उन्निद्रेयाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें ।

झाडासि साजणें । चाळावें गा ॥ ६४ ॥

६४) जेथें जागणें हेंच निजणें, इंद्रियांचा निरोध करणें हेंच विषयांचें हेंच विषयाचें प्रशस्त भोगणें आणि अरे, झाडाशी मैत्री करुन बोलावे लागतें, 

शीत वेढावें । उष्ण पांघुरावें ।

वृष्टीचिया असावें । घराआंतु ॥ ६५ ॥

६५) थंडी नेसावी, ऊन पांघरावें आणि पावसाच्या घरांत असावें. 

किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीत नवा ।

भ्रतारेंवीण करावा । तो हा योगु ॥ ६६ ॥

६६) अर्जुना फार काय सांगावें ? हा योग करणें, म्हणजे नवर्‍यावांचून नित्य नवा अग्निप्रवेश करणें ( सती जाणें ) आहे.    

एथ स्वामीचें काज । ना वापिकें व्याज ।

परि मरणेंसीं झुंज । नीत नवें ॥ ६७ ॥

६७) हा योग करण्याच्या कामांत नवर्‍याचें ( नवर्‍याबरोबर सती गेले असतां जसा पुढें तोच नवरा मिळतो, तसें नवरा मिळवण्याचें ) काम नाही अथवा नवर्‍याकडच्या कुलाचाराचें कांहीं निमित्तहि नाही; परंतु मरणाबरोबर ( मात्र ) नित्य नवी लढाई आहे.

ऐसें मृत्यूहूनि तिख । कां घोंटे कढत विख ।

डोंगर गिळितां मुख । न फाटे काई ॥ ६८ ॥

६८) याप्रमाणें योगाचें दुःख मृत्यूहून तीक्ष्ण आहे. अथवा कढत विष पिववेल काय ? डोंगर गिळतांना मुख फाटणार नाहीं काय ? 

म्हणोनि योगाचिया वाटा । जे निगाले गा सुभटा ।

तयां दुःखाचाचि वाटा । भागा आला ॥ ६९ ॥

६९) म्हणून अर्जुना, या योगाच्या वाटेनें माझी प्राप्ति करुन घेण्याकरितां जे निघाले, त्यांच्या वांट्याला दुःखाचाच भाग आला.

पाहें पां लोहाचे चणे । जैं बोचरिया पडती खाणें ।

तैं पोट भरणें कीं प्राणें । शुद्धी म्हणों ॥ ७० ॥     

७०) असें पाहा कीं, जेव्हां बोचर्‍या माणसास लोखंडाचें चणे खाण्याचा प्रसंग येतो, तेव्हां तें त्यांचें पोट भरणें म्हणावें, कीं प्राणांशीं त्याचा वियोग म्हणावा ?    

म्हणोनि समुद्र वाहीं । तरणें आथि केंही ।

कां गगनामाजीं पाईं । खोलिजतु असे ॥ ७१ ॥

७१) म्हणून बाहूंनी समुद्र तरुन जाणें, हें कोठें ( शक्य ) आहे काय ? अथवा आकाशांत पायानें चालणें घडतें काय ?

वळघलिया रणाची थाटी । आंगीं न लगतां काठी ।

सूर्याची पाउटी । कां होय गा ॥ ७२ ॥

७२) युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागतां सूर्याची पायरी करुन ( सूर्यंमंडळाचा भेद करुन ) जातां येईल काय ?

यालागीं पांगुळा हेवा । नव्हे वायूसि पांडवा ।

तेवीं देहवंतां जीवां । अव्यक्तीं गति ॥ ७३ ॥

७३) म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणें पांगळ्याला वायूशीं स्पर्धा करतां येणार नाहीं, त्याप्रमाणें शरीरधारी जीवांची निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणीं गति नाही.  

ऐसाही जरी धिंवसा । बांधोनिया आकाशा ।

झोंबती तरी क्लेशा । पात्र होती ॥ ७४ ॥

७४) असें असूनहि जर ते जीव, धैर्य धरुन निर्गुणाचाच पिच्छा पुरवतील, तर त्यांना दुःख प्राप्त होईल. 

म्हणोनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा ।

जे कां भक्तिपंथा । वोटंगले ॥ ७५ ॥

७५) म्हणून अर्जुना, याहून दुसरे जे भक्तिमार्गाला लागले, ते हें दुःख जाणतच नाहींत.

मूळ श्लोक

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।

अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६ ॥

६) पण, हे पार्था, जे सर्व कर्में मला अर्पण करुन मत्पर होऊन, अनन्य भक्तियोगानें माझें ध्यान करीत उपासना करतात;  

कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें ।

जिये कां वर्णविशेखें । भागा आलीं ॥ ७६ ॥

७६) ( येथून भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषाचें वर्णन करतात. ) त्या भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषांची कर्मेंद्रियें हीं वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्में आनंदानें करीत असतात.

विधीते पाळित । निषेधातें गाळित ।

मज देऊनि जाळित । कर्मफळें ॥ ७७ ॥

७७) ते पुरुष शास्त्रानें सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्रानें मनाई केलेली कर्में ते करीत नाहींत व केलेल्या कर्मांची फळें, तीं कर्में मला अर्पण करुन , जाळून टाकतात.   

ययापरी पाहीं । अर्जुना माझां ठाई ।

संन्यासूनि नाहीं । करिती कर्में ॥ ७८ ॥

७८) अर्जुना, याप्रमाणे ते मला कर्में अर्पण करुन कर्में नाहींशीं करता

आणीकही जे जे सर्व । कायिक याचिक मानसिल भाव ।

तयां मीवांचूनि धांव । आनौती नाहीं ॥ ७९ ॥त

७९) आणखी ज्या ज्या म्हणून काहीं शरीराच्या, वाणीच्या व मनाच्या क्रिया असतात, त्या सर्वांची प्रवृत्ति माझ्याशिवाय दुसरीकडे नसते.

ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर ।

ध्यानमिषें घर । माझें झाले ॥ ८० ॥

८०) असें जे माझे ठिकाणीं गढून माझी निरंतर उपासना करतात व जे माझें निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्तानें जे माझें घर झाले आहेत;

जयांचिये आवडी । केली मजशीं कुळवाडी ।

भोग मोक्ष बापुडीं । त्यजिलीं कुळें ॥ ८१ ॥

८१) ज्यांच्या प्रेमानें माझ्याशीं देवघेव केलेली असते व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष, हीं कुळें दोन आहेत, असें समजून ज्यांनी त्यांचा त्याग केलेला असतो.   

ऐसे अनन्ययोगें । विकले जीवें मनें आंगें ।

तयांचें कायि एक सांगें । जें सर्व मी करीं ॥ ८२ ॥    

८२) याप्रमाणें एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यांसह जे मला विकलेले असतात, त्यांचें काय एक मी करतों म्हणून सांगूं ? कारण सर्वच मी करतों.  

तेषांमहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।

भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७ ॥

७) माझ्या ( सगुणस्वरुपाच्या ) ठिकाणीं ज्यांनी चित्त ठेविलें आहे, अशा त्या ( भक्तांचा ) मीअल्प काळांत मृत्युरुप संसारसागरामधून उद्धार करणारा होतों. 

किंबहुना धनुर्धरा । जो मातेचिया ये उदरा ।

तो मातेचा सोयरा । केतुला पां ॥ ८३ ॥

८३) फार काय सांगावें ? अर्जुना, जो आईच्या पोटीं जन्म घेतो, तो आईचा किती आवडता असतो बरें ?

तेवीं मी तयां । जैसे असती तैसियां ।

कळिकाळ नोकोनियां । घेतला पटा ॥ ८४ ॥

८४) त्याप्रमाणें माझें भक्त जसे असतील त्या स्थितींत मी त्यांच्यावर प्रेम करतों व कळिकाळाचा पराभव करुन त्यांस मी आपल्या पदरांत घेतों.

एर्‍हवीं तरी माझिया भक्तां । आणि संसाराची चिंता ।

काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥ ८५ ॥

८५) सहज विचार करुन पाहिले तर, ( कोणीहि ) एकदां माझा भक्त म्हणून ठरला, मग त्यास संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला ? सांग. राजाच्या कुटुंबास भीक मागण्याचें कारण पडेल काय ?      

तैसे ते माझें । कलत्र हें जाणिजे ।

कायिसोनिही न लाजें । तयांचेनि मी ॥ ८६ ॥

८६) त्याप्रमाणें तें भक्त माझें कुटुंब आहेत असें समजावें, त्यांचे कोणतेंहि पडलेलें काम करण्यांत मला कमीपणा वाटत नाहीं.  

जन्ममृत्युचां लाटीं । झळंबती इया सृष्टी ।

तें देखोनियां पोटीं । ऐसें जाहलें ॥ ८७ ॥

८७) जन्ममृत्युच्या लाटांत हें जग गटांगळ्या खात असलेलें पाहून, माझ्या पोटांत असा विचार आला.

भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे ।

येथ जरी कीं माझे । विहिती हन ॥ ८८ ॥

८८) संसारसागराच्या खवळण्यानें कोणास भय उत्पन्न

 होणार नाहीं ? या योगानें ( संसारसागराच्या क्षोभानें )

 माझें भक्त कदाचित् भितील; 



Custom Search

No comments:

Post a Comment