Friday, January 23, 2015

DeviMahatmya Adhyay 13 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (१३) तेरावा


DeviMahatmya Adhyay 13 
DeviMahatmya Adhyay 13 is in Marathi. It is a translation of DurgaSaptashi Adhyay 13 which is in Sanskrit. King Suratha and Vaishya both performed the Tapas and Sadhana for 3 years of Goddess Durga as advised by Medha rushi. Goddess pleased by their devotion gave them the blessings as they wished. King Surath asked for his Lost Kingdom which he received. Vaishya asked for Moksha which he received. Both became happy that Goddess Durga fulfilled their desire.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (१३) तेरावा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीअंबिकायै नमः ॥
श्रीपार्वतीअंगभूते नमः ॥ अखिल जगासी सुखदाते । 
भावें नमन करितों तूंतें । पुढें ग्रंथ चालवावया ॥ १ ॥
पूर्वाध्यायाचे अंतीं । चरित्रमहिमा वर्णिला निगुतीं । 
तैसीचि जाण फलश्रुती । देवीनें स्वमुखें कथियेली ॥ २ ॥
आतां पुढील कथेचें श्रवण । भावें करावें हो श्रोते सज्जन ।
जेणेंकरुनि अंतःकरण । सुखावें अपूर्व लाभें जेवीं ॥ ३ ॥  
मेधा म्हणे सुरथालागून । हें देवीमाहात्म्य केलें कथन ।
या प्रकाराचा प्रभाव पूर्ण । त्या देवीचा असे कीं ॥ ४ ॥
जी या जगातें करी धारण । भगवती विष्णुमाया जाण ।
जिनें ज्ञान केले उत्पन्न । अज्ञानही निर्मियेलें ॥ ५ ॥
तूं आणि हा वैश्य जाण । तैसेचि अन्य विवेकी जन ।  
तिनें मोहिले म्हणोन । मोहातें तुम्ही पावलां ॥ ६ ॥
अन्य जे कां सकळ जन । मायेनें मोहिले संपूर्ण ।
त्या मायेतें तुम्ही शरण । जावें परमेश्र्वरी ती ॥ ७ ॥
तीस आराधितां केवळ । नरासी देतसे स्वर्गफळ ।
भोग-मोक्षांतें तत्काळ । देत असे जगदंबा ॥ ८ ॥
मार्कंडेय म्हणे शिष्यासी । मेधा ऐसें बोलिला नृपासी ।
ऐकोनि त्याचिया वचनासी । काय करिता जाहला ॥ ९ ॥
ममत्व आणि राज्यहरण । जेणें वैराग्य पावला जाण ।
मग ऋषीतें करुनि नमन । तपाकारणें निघाला ॥ १० ॥
तैसाचि तो वैश्य जाण । ऋषीलागीं करुनि नमन ।
तोही वैराग्यातें पावून । तपाकारणें निघाला ॥ ११ ॥
अंबेच्या दर्शनालागुनी । रम्य नदीपुलिन पाहुनी ।
राहते जाहले तये स्थानीं । तो करीत तेधवां ॥ १२ ॥
तो वैश्य आणि नृपती । देवीसूक्ताचा जप करिती ।
दोघे वाळवंटीं निश्र्चितीं । आराधिते जाहले ॥ १३ ॥
देवीची प्रतिमा महीमयी । करोनि आराधिली त्यांहीं ।
पूजेतें करिते जाहले पाहीं । पुष्पधूपाग्नितर्पणे ॥ १४ ॥
आणोनियां पुष्पें अमूप । लावूनियां धूप दीप ।
फल नैवेद्य अर्पूनि जप । करितें जाहले भावेंसीं ॥ १५ ॥
दोघे राहूनि निराहार । अल्पाहारीं राखिलें शरीर ।
देवीचे ठायीं मन एकाग्र । नियमातें धरिते जाहले ॥ १६ ॥
निजगात्रांचें काढूनि रक्त । देते जाहले बलि निश्र्चित ।
ऐसें तीन वर्षेपर्यंत । आराधिती देवीसी ॥ १७ ॥
मग तीन वर्षांनंतर । देवी संतुष्ट जाहली त्यांवर ।
स्वरुप धरुनि साकार । प्रत्यक्ष बोलती जाहली ॥ १८ ॥
दोघांसी बोलली जगन्माता । जें मागणें तें मागा आतां ।
इच्छिलें पावाल तत्त्वतां । मजपासोनि सर्वही ॥ १९ ॥
हे नृपा हे वैश्या जाण । संतुष्ट जाहलें तुम्हांलागुन ।न 
आतां मागाल तें देईन । वरें तुम्हांसी निर्धारें ॥ २० ॥  
मार्कंडेय म्हणे नृपनंदन । मागता जाहला देवीलागुन ।
माझें राज्य मज अर्पण । याचि जन्मीं करावें ॥ २१ ॥
मजकारणें द्यावें बळ । मारीन शत्रूंसी तत्काळ ।
तैसेंचि त्यांचे सैन्य सकळ । निर्दाळीन क्षणार्धें ॥ २२ ॥
आणि अन्यजन्माचें ठायीं । मज राज्य द्यावें सर्वही ।
कोटिकल्प गेलिया पाहीं । राज्य माझें न जावें ॥ २३ ॥
सर्वही हा ब्रह्मांडगोळ । नाश पावलिया सकळ ।
माझें राज्य अक्षयी अढळ । कधीं काळीं न जावें ॥ २४ ॥
म्यां अमर असावें निश्र्चितीं । माझी कधीं न भंगावी स्मृती ।
जरारोगाची स्थिती । माझें ठायीं नसावी ॥ २५ ॥
त्यानंतर वैश्य बोलिला । वैराग्य जाहलें तयाला ।
ज्ञानातें मागता जाहला । देवीकारणें ते काळीं ॥ २६ ॥
संगरहित द्यावें ज्ञान । ' माझें '' मी '  हें नसावें भान ।
पुन्हां नसावें जन्ममरण । ब्रह्म निर्गुण व्हावें म्यां ॥ २७ ॥
ऐकोनि दोघांचिया बोला । देवी बोलिली नृपाला ।
स्वल्प दिवसांत राज्य तुजला । प्राप्त होईल निश्र्चयें ॥ २८ ॥
सकळ शत्रूंतें मारुन । राज्य पावसी अखंड जाण ।
सर्व सुखांतें पावून । सार्वभौम होशील ॥ २९ ॥
पुढें पावूनि मृत्यु उत्तम । सूर्यापासूनि पावसी जन्म ।
सावर्णि मनु होईल नाम । राजा होशील अक्षयी ॥ ३० ॥
वैश्यवर्या मजपासून । तुवां वांछिला वर पूर्ण । 
त्या श्रेष्ठ ज्ञानातें मी देईन । होईल ज्ञान तुजलागीं ॥ ३१ ॥
अहंकार ममत्व जाण । तुझें जाईल निरसून । 
समाधि लागूनि ब्रह्मपूर्ण । जीवन्मुक्त होशील तूं ॥ ३२ ॥
मार्कंडेय म्हणे शिष्यासी । जें जें इच्छिलें त्याहीं मानसीं ।
तदनुसार वर दोघांसी । देती जाहली जगदंबा ॥ ३३ ॥
भक्तिकरुनि दोघे स्तविती । तंव गुप्त जाहली भगवती ।
दोघे पावोनि वरांप्रती । धन्य होते जाहले ॥ ३४ ॥
असो या प्रकारें सत्वर । पावोनि देवीपासूनि वर ।
सर्व क्षत्रियांमध्यें थोर । सुरथ राजा जाहला ॥ ३५ ॥
तो होऊनियां सार्वभौम । सुख भोगिलें अनुपम ।
मग गति पावूनि उत्तम । सूर्यपुत्र जाहला ॥ ३६ ॥
सूर्यापासूनि पावला जन्म । सावर्णि मनु जाहलें नाम ।
सर्व मन्वंतरांत परम । अष्टम होता जाहला ॥ ३७ ॥
पंचभूतें लय पावती । तेव्हां तद्रूप होय नृपती । 
मागुती जाहलिया भूतस्थिती । मनु होईल आठवा ॥ ३८ ॥
त्रयोदश अध्यायपर्यंत । देवीचरित्र परमाद्भुत । 
मार्कंडेय शिष्यांसी निश्र्चित । अत्यादरें निवेदिलें ॥ ३९ ॥
हेंचि नैमिषारण्यीं सूतें । निवेदिलें शौनकादिकांतें ।
जें कां तुम्हीं पुसिलें मातें । तें हें तुम्हां निरुपिलें ॥ ४० ॥
असो या प्रकारेंकरुन । दिधलें सुरथासी वरप्रदान । 
आणि समाधिवैश्यालागून । वरप्रदान अर्पिलें ॥ ४१ ॥
देवीच्या प्रसादेंकरुन । दोघे जाहलें धन्य जाण ।
पुढिलिया अध्यायीं निरुपण । प्राधानिकरहस्य असे तें ॥ ४२ ॥
याचें करितां श्रवण पठन । सर्व संकटें जाती निरसून ।
उत्तम ज्ञानप्राप्ति पूर्ण । होय येणेंकरुनी ॥ ४३ ॥
सर्व संपदांची प्राप्ती । सकल पीडा नाश पावती ।
अंती बरवी पावूनि गती । स्वानंदीं निमग्न राहे तो ॥ ४४ ॥ 
ऐसें चरित्र सुरस गहन । तैसेंचि अपूर्व याचें श्रवण ।
पदापदाचा अर्थ जाण । या अध्यायीं निरुपिला ॥ ४५ ॥  
जैसें व्यासें कथन केलें । आणि देवीनें बिलविलें ।
तैसेंचि येथें वर्णियेलें संशय नाहीं सर्वथा ॥ ४६ ॥
त्या श्रीदेवीकारणें नमन । आमुचें असो भक्तीकरुन ।
वर्णेग्रामस्थ राम ब्राह्मण । शरण भावें जगदंबे ॥ ४७ ॥
इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने सुरथवैश्ययोर्वरप्रदाने नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ 
॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 13 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (१३) तेरावा


Custom Search

No comments: