Dashak Visava Samas Aathava Dehekshetra Nirupan
Samas Aathava Dehekshetra Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us the Deha i.e. our body. Name of this Samas is Dehekshetra Nirupan.
समास आठवा देहेक्षेत्र निरुपण
श्रीराम ॥
विधीप्रपंचतरु वाढला । वाढतां वाढतां विस्तीर्ण जाला ।
फळेम येता विश्रांती पावला । बहुत प्राणी ॥ १ ॥
१) ब्रह्मदेवाच्या प्रपंचाचा वृक्ष वाढला. त्याची वाढ होतां होतां तो फारच विस्तारला. नंतर त्यास फळें आलीं. त्यावेळीं पुष्कळ प्रान्यांना समाधान मिळालें.
नाना फळें रसाळें लागलीं । नाना जिनसी गोडीस आलीं ।
गोडी पाहावया निर्माण केलीं । नाना शरीरें ॥ २ ॥
२) या प्रचंड वृक्षाला अनेक रसाळ फळें लागली आहेत. त्यांची गोडी अनेक पदार्थांमध्यें अनुभवास येते. ती गोडी चाखण्याकरितां अनेक शरीरें निर्माण झालीं. जीवाला पहावेसें वाटलें म्हणून डोळे निर्माण झालें. ऐकावेसे वाटलें म्हणून कान निर्माण झालें. चाखावेसेम वाटलें म्हणून जीभ निर्माण झालीं.
निर्माण जाले उत्तम विषये । शरीरेंविण भोगितां नये ।
म्हणोनी निर्मिला उपाये । नाना शरीरें ॥ ३ ॥
३) उत्तम विषय निर्माण केलेलें असलेम तरी शरीराशिवाय त्यांचा भोग घेता येत नाहीं. तें भोग भोगण्याचे साधन म्हणून अनेक प्रकारचीम शरीरें निर्माण झाली.
ज्ञानइंद्रियें निर्माण केलीं । भिन्न भिन्न गुणांचीं निर्मिलीं ।
येका शरीरासी लागलीं । परी वेगळालीं ॥ ४ ॥
४) पांच ज्ञानेंद्रियें निर्माण केलीं. पण प्रत्येकाचा गुण निराळा आहे. ती सारीं एकाच शरीरांत राहतात. पण प्रत्येक इंद्रिय निराळे आहे.
श्रोत्रइंद्रिईं शब्द पडिला । त्याचा भेद पाहिजे कळला ।
ऐसा उपाये निर्माण केला । इंद्रियांमधें ॥ ५ ॥
५) शब्द हा विषय कानाचा आहे. शब्दांचे भेद कळण्याची योजना, व्यवस्था कानाच्या ठिकाणीं केलेली आहे.
त्वचेइंद्रियें सीतोष्ण भासे । चक्षुइंद्रियें सकळ दिसे ।
इंद्रियांमधें गुण ऐसे । वेगळाले ॥ ६ ॥
६) त्वचेनें थंडपणा व गरमपणा याचे ज्ञान होतें. डोळ्यांनी सगळें पाहातां येते. ज्ञानेंद्रियांमध्यें अशा प्रकारचे वेगळे वेगळे गुण आहेत.
जिव्हेमधें रस चाखणें । घ्राणामधें परिमळ घेणें ।
इंद्रियांमधें वेगळाल्या गुणें । भेद केले ॥ ७ ॥
७) जिभेनें रस चाखण्याचा गुण आहे. तर नाकांत वास घेण्याचा गुण आहे. अशा वेगवेगळ्या गुणांमुळें इंद्रियांत भेद झाला आहे.
वायोपंचकीं अंतःकर्णपंचक । मिसळोनि फिरे निशंक ।
ज्ञानइंद्रियें कर्मइंद्रियें सकळिक । सावकास पाहे ॥ ८ ॥
८) अंतःकरणपंचक प्राणपंचकांत मिसळतें आणि निःशंकपणें शरीरांत वावरते. ज्ञानेंद्रियें व कर्मेंद्रियें यांचीं कार्ये सगळी अशा रीतेेनें स्वस्थपणें पाहावीत.
कर्मइंद्रियें लागवेगीं । जीव भोगी विषयांलागीं ।
ऐसा हा उपाये जगीं । ईश्र्वरें केला ॥ ९ ॥
९) या कर्मेंद्रियांद्वारा जीव विषय भोगतो. ईश्र्वरानें जगांत हा असा उपाय करुन ठेवला आहे.
विषय निर्माण जाले बरवे । शरीरेंविण कैसे भोगावे ।
नाना शरीराचे गोवे । याकारणें ॥ १० ॥
१०) भोगण्याचे विषय पुष्कळ उत्पन्न केलेलें आहेत. पण तें शरीरावांचून भोगता येत नाहींत. म्हणून नानाप्रकारची गुंतागुंतीची शरीरें ईश्र्वरानें निर्माण केलीं.
अस्तीमांशाचें शरीर । त्यामधें गुणप्रकार ।
शरीरासारिखें यंत्र । आणीक नाहीं ॥ ११ ॥
११) शरीर हाडामांसाचे बनलेलें असतें. त्यामध्यें गुणांचे अनेक प्रकार असतात. या शरीरासारखें दुसरे यंत्र जगांत नाहीं.
ऐसीं शरीरें निर्माण केलीं । विषयभोगें वाढविलीं ।
लाहानथोर निर्माण जालीं । येणें प्रकारें ॥ १२ ॥
१२) अशी ही शरीरें निर्माण केलीं. विषयांच्या भोगानें ती वाढविली. या रीतीनें त्यांच्यामधें लहान मोठा हा भेद निर्माण होतो.
अस्तिमांशाचीं शरीरें । निर्माण केली जगदेश्र्वरें ।
विवेकें गुणविचारे । करुनियां ॥ १३ ॥
१३) जगदीश्र्वरानें ही अस्थिमांसाची शरीरें निर्माण केलीं. ती निर्माण करतांना विवेकानें गुणविचार करुन त्यांना निर्माण केलें.
अस्तिमौंशाचा पुतळा । जेणें ज्ञानें सकळ कळा ।
शरीरभेद वेगळा । ठाईं ठाईं ॥ १४ ॥
१४) शरीर म्हणजे अस्थिमांसाचा पुतळा असतो. पण त्यांत ज्ञान भरलेलें आहे. त्याच्या सामर्थ्यानें जीवाला सर्व कला साध्य होतात. परंतु ठिकठिकाणीं शरीरांच्यामधें भेद आढलतो.
तो भेद कार्याकारण । त्याचा उदंड आहे गुण ।
सकळ तीक्ष्ण बुद्धीविण । कये कळे ॥ १५ ॥
१५) ज्या शरीरांत जेवढें ज्ञान असते, तेवढ्या कला त्यास साध्य होतात. शरीरांच्या ठिकाणीं हा जो भेद आढळतो त्याला देखील योग्य कारण आहे. त्या त्या भेदाचा मोठा उपयोग असतो. त्याच्या योगानेंच सर्व व्यवहार चालतात. पण तीक्ष्ण बुद्धिवांचून हें ध्यानांत येणार नाहीं.
सकळ करणें ईश्र्वराला । म्हणोनी भेद निर्माण केला ।
ऊर्ध्वमुख होतां भेदाला । ठाव कैंचा ॥ १६ ॥
१६) ईश्र्वराला हे विचित्र विश्र्व निर्माण करायचे होतें. म्हणून त्यानें भेद निर्माण केला. ऊर्ध्वमुख होऊन पाहिलें तर भेदाला जागाच राहात नाहीं.
सृष्टिकर्णी आगत्य भेद । संव्हारें सहजचि अभेद ।
भेद अभेद हा संवाद । मायागुणें ॥ १७ ॥
१७) ही सृष्टि निर्माण करायची म्हणजे, भेद अवश्यकच होता. सृष्टीचा संहार केला कीं तेथें सहजच अभेद असतो. माया आहे तोपर्यंत भेद व अभेद ही भाषा संभवते.
मायेमधें अंतरात्मा । नकळे तयाचा महिमा ।
जाला चतुर्मुख ब्रह्मा । तोहि संदेहीं पडे ॥ १८ ॥
१८) मूळमायेंत अंतरात्मा आहे. त्याचा महिमा कळत नाहीं. ब्रह्मदेवाला चार तोंडें असूनदेखील अंतरात्मा त्याला संशयांत पाडतो. मानवी बुद्धीला तर अनेक प्रश्र्ण पडतात.
पीळ पेंच कडोविकडीं । तर्क तीक्ष्ण घडीनें घडी ।
मनासी होये तांतडी । विवरण करितां ॥ १९ ॥
१९) त्या अंतरात्म्याचा विचार करतांना पदोपदी तर्काचे अनेक प्रकार, पीळ, पेंच, तीक्ष्ण तर्क वापरुन देखील अमतरात्म्याच अंत लागत नाहीं. त्यावेळीं मानवी मन अगदी हतबल होऊन जाते.
आत्मत्वें लागतें सकळ कांहीं । निरंजनीं हे कांहींच नाहीं ।
येकांतकाळीं समजोन पाहीं । म्हणिजे बरें ॥ २० ॥
२०) अंतरात्म्याचा विचार करतांना या सगळ्या गोष्टी लागतात. पण निरंजन व निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणीं यांचा कांहींच उपयोग होत नाही. एकांतांत जाऊन विचार केला तरच हें सगळें ध्यानांत येते.
देहेसामर्थ्यानुसार । सकळ करी जगदेश्र्वर ।
थोर सामर्थ्यें अवतार । बोलिजेती ॥ २१ ॥
२१) जगामध्यें सर्व देहांमध्यें अंतरात्मा विभागलेला आही. प्रत्येकामध्यें त्याचा अंश आहे. ज्या देहाचें सामर्थ्य जेवढे असते तेवढेंच कार्य जगदीश्र्वर त्या देहाकडून करवून घेतो. ज्या देहामध्यें अतिशय थोर सामर्थ्य आढळतें त्यास अवतार असें म्हणतात.
शेष कूर्म वर्हाव जाले । येवढे देहे विशाळ धरिले ।
तेणें करितां रचना चाले । सकळ सृष्टीची ॥ २२ ॥
२२) शेष, कूर्म, वराह यांचे देह फारच विशाल आहेत. त्यांच्या आधारावर सारी सृष्टि चालते.
ईश्र्वरें केवढें सूजगात्र केलें । सूर्यबिंब धावाया लाविलें ।
धुकटाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥ २३ ॥
२३) ईश्वराने केवढी करामत केली आहे. त्यानें सूर्याला आकाशंत धावावयास लावलें आहे.ढग म्हणजे धूर. पण त्याच्यामधें उदंड पाणी साठवलें आहे.
पर्वताऐसे ढग उचलती । सूर्यबिंबासी आछ्यादिती ।
तेथें सवेंचि वायोची गती । प्रगट होये ॥ २४ ॥
२४) आकाशामध्यें पर्वतप्राय ढग उत्पन्न होऊन सूर्याला झांकून टाकतात. मग तेथें वायूची गति लगेच प्रगट होते.
झिडकझिडकुं धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियारा ।
ढग मारुनी दिनकरा । मोकळे करी ॥ २५ ॥
२५) जणूं कांहीं काळाच्या सेवकाप्रमाणें वारा झडझडून वाहूं लागतो. तो ढगाला मारुन टाकतो व सूर्याला मोकळे करतो.
बैसती वीजांचे तडाखे । प्राणीमात्र अवचिता धाके ।
गगन कडकडून तडके । स्थळांवरी ॥ २६ ॥
२६) आकाशामध्यें मग विजांचा गडगडांट सुरु होतो. प्राण्यांच्या मनांत त्यामुळें भय निर्माण होते. आणि आकाश कडाडून पृथ्वीवर आदळल्यासारखें वाटते.
येहलोकासी येक वर्म केलें । महद्भूते महद्भूतआळिलें ।
सकळां समभागें चालिलें । सृष्टिरचनेसी ॥ २७ ॥
२७) या दृश्य विश्र्वामधें ईश्र्वरानें असें एक वर्म ठेवले आहे कीं, एक महाभूत दुसर्या महाभूतस आवरतें. म्हणून सर्व महाभूतांच्या सम प्रमाणानें सृष्टीचा व्यवहार व्यवस्थितपणें चालतो.
ऐसे अनंत भेद आत्मयाचे । सकळ जाणती ऐसे कैचें ।
विवरतां विवरतां मनाचे । फडके होती ॥ २८ ॥
२८) अंतरात्म्याचे अशा प्रकारें अनंत भेद आहेत. ते सगळे भेद जाणणारा कोणीच नाहीं. त्या भेदांचें विवरण करतां करतां मानवी मनाच्या चिंध्या होतात.
ऐसी माझी उपासना । उपासकीं आणावी मना ।
अगाध महिमा चतुरानना । काये कळे ॥ २९ ॥
२९) माझी उपासना ही अशी आहे. जे उपासक असतील त्यांनी तिच्यावर विचार करवा. त्या उपासनेचा महिमा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला देखील कळणार नाहीं.
आवाहन विसर्जन । हें चि भजनाचें लक्षण ।
सकळ जाणती सज्जन । मी काये सांगों ॥ ३० ॥
३०) आवाहन आणि विसर्जन हेंच भजनाचें लश्रण आहे. संत सज्जन हें जाणतात. मी अधिक सांगण्याची गरज नाहीं.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसमवादे देहेक्षेत्रनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava Dehekshetra Nirupan
समास आठवा देहेक्षेत्र निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment